Sunday, July 15, 2012

कोष्टी-साळी...विणकरांचा इतिहास!




पुरातन काळापासून मानवी समाजाने प्रतिकुल निसर्गाशी झुंज देण्यासाठी कल्पकता व प्रतिभा वापरत एकामागुन एक जी साधने शोधली त्याला तोड नाही. आजच्या वैज्ञानिक प्रगतीने आपण जेवढे थक्क होतो त्याहीपेक्षा अधिक, पराकोटीच्या प्रतिकुलतेत, अत्यंत वन्य अवस्थेत पुरातन मानवाने जे शोध लावले त्यामुळे चकित व्हायला होते. किंबहुना आजचे विज्ञान आपल्या पुरातन पुर्वजांच्याच अथक प्रयत्नांच्या पायावर उभे राहत आकाशाला गवसणी घालायला सज्ज आहे.
.त्या आदिम काळी, जेंव्हा मनुष्य शिकारी मानव होता, तेंव्हा शिकार केलेल्या प्राण्यांचे चर्म वा झाडांच्या साली (वल्कले) गुंडाळुन प्रतिकुल हवामानाला तोंड देत होता. हळु हळु तो काही प्राण्यांना माणसाळुन पाळुही लागला. शिकारी मानव पशुपालक मानव बनला हा मानवी जीवनशैलीच्या बदलाचा एक महत्वाचा टप्पा आहे. मनुष्य अद्याप भटकाच होता. चरावु कुरणांच्या शोधात त्याला सतत भटकावेच लागे. सरासरी २० हजार वर्षांपुर्वीच मानवाला सर्वप्रथम लोकर व वनस्पतीजन्य धाग्यांपासुन वस्त्रे बनवण्याची कल्पना सुचली असावी. पक्षांची घरटी, कोळ्यांची जाळी यांच्या सुक्ष्म निरिक्षणातुन आपणही कृत्रीमपणे नैसर्गिक धाग्यांपासुन वस्त्र बनवू शकतो ती ही अभिनव संकल्पना. कल्पना सुचुन ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याला जे सायास पडले असतील...त्यासाठी जी कृत्रीम साधने बनवायला जी प्रतिभा वापरावी लागली असेल तिची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. हजारो प्रयत्न वाया गेल्यानंतरच त्याला वस्त्रनिर्मिती जमली असनार. त्यासाठीचा त्याचा पराकोटीचा संयम आदर वाटावा असाच आहे.
आस्ट्रेलिया, रशिया आणि आस्ट्रिया येथे नवपाषाणयुगातील (इसपु १०,०००) कातलेले धागे व विणलेल्या वस्त्रांचे अवशेष मिळाले आहेत. भारतात सिंधु संस्कृतीत हडप्पा व लोथल येथेही रंगवलेल्या सुती वस्त्रांचे अवशेष मिळालेले आहेत. एवढेच नव्हे तर सुत कातण्याच्या चरख्याचे व चात्यांचेही अवशेष मिळालेले आहेत. तेथेच सापडलेल्या मानवी प्रतिमांनी बेलबुट्टीदार तलम वस्त्रे नेसलेली आपल्याला पहायला मिळतात. म्हणजेच भारतात कापसापासुन वस्त्रे बनवण्याची कला सनपुर्व दहा-बारा हजार वर्षांपुर्वीपासुनच विकसीत होवू लागली होती असे म्हणता येते. ऋग्वेदातही लोकरीच्या वस्त्रांचे विपुलतेने उल्लेख येतात. वैदिक काळातही कपडे विणण्याचे काम स्त्रीयाच करत असत. अशा स्त्रियांना वायित्री, वासोवाय अथवा सिरी म्हणत. किंबहुना जगभर आद्य विणकर या स्त्रीयाच होत्या असे आपल्याला दिसते.
धागे (मग ते लोकरीचे का असेनात.) पिंजणे, कातने ते धाग्यांची शिस्तबद्ध उभी रचना करत मग आडवे धागे अत्यंत कौशल्याने गुंफत नेत वस्त्र बनवणे ही किती किचकट व कष्टदायक प्रक्रिया असेल हे आपण सोबतच्या इजिप्तधील इसपु ३००० मधील सोबतच्या चित्रावरुन पाहु शकतो.



  सुरुवातीला जगभर अशाच प्रकारे वस्त्रे विणली जात असत. पुढे मात्र भारताने हातमागांचा शोध लावत इसपु १५०० ते इसवी सनाच्या बाराव्या शतकापर्यंत जागतीक वस्त्रोद्योगावर स्वामित्व गाजवले. किंबहुना भारतीय अर्थव्यवस्था ही वस्त्रांना केंद्रस्थानी ठेवतच भरभराटीला आली. हातमागाचा भारताने लावलेला शोध म्हणजे औद्योगिक क्रांतीचा श्रीगणेशा होता. जगाला भारताने दिलेली आद्य देनगी म्हनजे वस्त्रोद्योग होय. अत्यंत मुलायम, सोपी ते क्लिष्ट संरचना, पोत आणि विण असनारी साधी ते तलम नक्षीदार वस्त्रे निर्माण करण्यात अठराव्या शतकापर्यंत भारताशी स्पर्धा करु शकणारा एकही देश नव्हता. विणकर समाजाने अवघ्या जगात भारताची निर्विवादपने शान वाढवली.
वस्त्रांचा शोध हा मानवी इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. नैसर्गिक साधनांना आपण आपले जीवन सुखकर करण्यासाठी वापरु शकतो ही जाणीव आपल्या पुर्वजांना नक्कीच प्रेरीत करुन गेली असणार.

विणकर समाजाचा उदय

प्रत्येक व्यवसायाची जात बनणे हे भारतीय समाजाचे अव्यवच्छेदक लक्षण आहे. भारतातील विणकामाचा इतिहास पुरातन असला तरी तो स्त्रियांकरवी जवळपास घरोघरी चालवला जात होता. सिंधु काळातच भारताचा विदेश व्यापार सुरु झाला. इजिप्तमधील ममींना गुंडाळलेल्या जात असलेल्या वस्त्रांत भारतीय कापसाचीही वस्त्रे मिळाली आहेत. याचाच अर्थ असा कि सनपुर्व ३२०० पासुनच भारतीय सुती वस्त्रे जगभर पसरु लागली होती. मागणी वाढली तसे विविध मानवी समुदायांतील कुशल लोक या व्यवसायात उतरु लागले. हातमागांचा शोध लावला. सुत कातणे हे काम स्त्रीयांकडे राहिले तर वस्त्रे विणने आता पुरुष करु लागले. अशा रितीने देशभर हा व्यवसाय फोफावला.
विणकरांना प्रांतनिहाय व विणण्यातील वेगवेगळी कौशल्ये यानुसार वेगवेगळी नांवे मिळाल्याचे आपल्याला दिसते. जैन कोष्टी व मुस्लिम वीणकर (मोमिन, व अन्सारी) वगळले तर या सर्वच समाजातील समान धागा म्हणजे ते शैव आहेत. चौंडेश्वरी (चामुंडेश्वरी) जिव्हेश्वर, गणपती अशा शैव दैवता त्यांची आराध्ये आहेत. लिंगायत समाजातही कोष्टी आहेत.
महाराष्ट्रात प्रामुख्याने देवांग कोष्टी, हळबी, लाड, क्रोष्टी, गधेवाल, देशकर, साळेवार, स्वकुळ साळी, सुतसाळी व पद्मसाळी अशा जवळपास पंधरा पोटजाती आहेत. वरकरणी या विविध जाती पडलेल्या दिसत असल्या तरी त्या एकाच मुळच्या समाजातुन व्यवसाय कौशल्यातील भिन्नतेमुळे निर्माण झाल्या आहेत एवढेच.
उदाहरणार्थ "कोष्टी" हे जातीनाम कोसा अथवा कोष (रेशीम अथवा कापसाचा) यापासुन वस्त्रे बनवणा-यांना लाभले. साळी (अथवा शाली/शालीय) हा शब्द शाल (साल) वृक्षाच्या सालीपासुन पुरातन काळी वस्त्रे बनवत त्यांना मिळाला. त्यात पुन्हा वस्त्रांचे अनेक प्रकार असल्याने ज्या-ज्या प्रकारची वस्त्रे बनवण्यात निपुणता होती त्यानुसार त्या त्या वर्गाला विशेषनामेही मिळाली. उदा. देव व उच्चभ्रु लोकांसाठी वस्त्रे बनवत त्यांना देवांग (अथवा देवांगन) कोष्टी म्हटले जावू लागले. काही नांवे, उदा. हळबी कोष्टी, ज्या विशिष्ट मानवी समुदायातुन आले त्यावरुन पडली. हळबी स्वत:ला मुळचे झारखंडमधील हळबा आदिवासी मानतात. यांची वसती प्रामुख्याने विदर्भात आहे.
कोष्टी/साळी/कोरी समाज देशभर पसरला असुन या समाजाने आपली मुळे उत्तरकाळात कधी ब्राह्मण तर कधी क्षत्रियांशी भिडवली असली तरी वैदिक वर्णव्यवस्थेने मात्र त्यांना शुद्रच मानले आहे. तेराव्या शतकानंतर निर्माण झालेल्या अन्याय्य बलुतेदारी पद्धतीत बारा बलुतेदारांत त्यांचा समावेश केला गेलेला आहे. महाराष्ट्र शासनाने २००८ पासुन त्यांचा समावेश स्पेशल ब्यकवर्ड क्लासमद्धे केलेला आहे.

पुराणकथा बनवणारा एकमेव समाज!

आपल्याला आश्चर्य वाटेल पण बहुदा हा भारतातील एकमेव समाज आहे ज्यांची स्वत:ची ज्ञाति-माहात्म्ये व उदय सांगणारी किमान दोन पुराणे आहेत. यातुन समाजोत्पत्तीची येणारी कथा ही ख-या समाजेतिहासाला धरुनच आहे हे विशेष. अर्थात त्याला अद्भुततेची जोड आहेच. यापैकी पहिले पुराण म्हणजे देवांग पुराण. हे पुराण मुळ्चे संस्कृतातील आहे असे म्हणतात, परंतु आता त्याचे तेलगु, तमिळ आणि कानडी अनुवाद उपलब्ध आहेत. या पुराणानुसार शिवाने ब्रह्मदेवाला विश्वनिर्मितीची आज्ञा दिली. ब्रह्मदेवाने मनुमार्फत विश्व निर्माण केले व त्यानंतर तो शिवस्थानी विलीन झाला. परंतु मानव प्राण्यासाठी वस्त्रे निर्माण करणारे निर्माण केले गेलेच नाहीत. त्यामुळे मानवांना वल्कले व चर्म पांघरुन रहावे लागले. यामुळे त्रस्त झालेल्या लोकांनी शिवाची ब्रह्मदेवामार्फत याचना केली. त्यामुळे शिवाने देवल ऋषीला निर्माण केले. देवल ऋषीने प्रथम विष्णुकडुन धाग्यांची प्राप्ती करुन घेवून देवांसाठी वस्त्रे वीणली. मग त्याने मयासुराकडुन मानवांसाठी वस्त्रे विणायला चरखा व हातमाग मिळवला...अशी ही पुराणकथा पुढे जाते व शिवाचे व देवांग समाजाचे माहात्म्य विषद करते.
   दुसरे पुराण आहे श्री भगवान जिव्हेश्वर विजय (साळी माहात्म्य पुराण). हे पुराण मुळ अत्रि ऋषिंनी व्यासांच्या सांगण्यावरुन रचले व संत भानुदास खडामकर यांनी त्याचा मराठीत अनुवाद केला.
या पुराणानुसार ब्रह्मदेव विष्णू व अन्य देवतागणासह भगवान शंकराकडे गेले व विनंती केली कि , `परमेश्वरा, आदिमायेकडून सॄष्टीची रचना झाली. तिच्या सत्व, रज, तम या त्रिगुणांपासून ब्रम्हा, विष्णू, महेशाची उत्पत्ती झाली. ब्रम्हाने ब्रम्हांडाची रचना करून, पंचमहाभूतांना निर्मून, देव, दानव, मानव व विभिन्न जीवकोटिंना जन्म दिला खरा, पण देव, दानव व मानव इतर प्राण्यासारखे नग्नावस्थेतच आहेत.  त्यांच्या लज्जा रक्षणार्थ वस्त्राची निर्मिती झाली पाहिजे. हे महादेवा, वस्त्रानिर्मितीची व्यवस्था आपण करावी अशी विनंती करण्यास आम्ही आलो आहोत'तेव्हा महादेवांनी आदिमायेचे स्मरण केले.तिने प्रसन्न होऊन शंकरास म्हटले, `परमेश्वरा, वस्त्र निर्मिणार्‍या पुरूषाची आपण उत्पत्ती करा.'
मग शिवशंकराने आपल्या जिभेतुन एका दिव्य शिशुची निर्मिती केली...ते बालक म्हणजेच जिव्हेश्वर. साक्षात शिवपुत्र!
जिव्हेश्वर मोठा झाल्यानंतर मग आदीमायेच्या आदेशानूसार ब्रम्हा, विष्णु, महेश, नारद, शेष, नंदी आदी देवतांनी मागाच्या निरनिराळ्या भागांना रूप दिले. कैलासातील एका प्रशस्त जागेत मागाची स्थापना केली. ब्रम्हदेवाने कापसाची निर्मिती केली. कापसापासून सूत काढले गेले. सार्‍या देवांच्या कृपेने निर्मित त्या मागाची मनोभावे पूजा करून एका मंगल अशा सोमवारी शुभ मूहूर्तावर वस्त्र विणले गेले सर्वप्रथम कलात्मक वेलबुट्टीनी युक्त असा श्वेतवर्णाचा पीतांबर विणला गेला. अशा रितीने वीणकर समाजाचा आद्य पुरुष शिवाच्या जिव्हेतुन, म्हणजे खुद्द शिवपुत्रच, निर्माण झाला. या पुराणातील आठवा व नववा अध्याय म्हणजे विणकरांना विणकामातील सर्व प्रक्रिया समजावुन देणारा व विविध प्रकारची वस्त्रे कशी विणावीत याचे प्रशिक्षण देनारे म्यन्युएल आहे असे म्हटले तरी चालेल. एवढेच नव्हे तर तुतीची झाडे लावुन रेशीम कसे निर्माण करावे याचीही सविस्तर माहिती या पुराणात येते. शेतीचा अपवाद वगळता अन्य व्यवसायांबाबत प्राचीन काळी अशी रचना झाल्याचे दिसत नाही.
दोन्ही पुराणे आकाराने जवळपास अन्य पुराणांएवढीच मोठी असुन प्रासादिकही आहेत. आपल्या समाजाची उत्पत्ती एवढ्या विस्तृतपणे सांगणारी, अद्भुतरम्य घटनांनी भरलेली पुराणे फक्त कोष्टी/साळी या वीणकर समाजाची असावीत यावरुनही या समाजांची पुरातनता व त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो.
आणि ते खरेही आहे. इसवीसनपुर्व पंधराशेपासुन ते सन अठराशे पर्यंत या समाजाने अवघ्या जगाला आपल्या कुशल वीणकामाने वेड लावले. वीणकर समाजाचा हा प्रदिर्घ काळ म्हणजे भारताचा सुवर्णकाळच होता असे म्हनायला हरकत नाही. या सुवर्णकाळातील विणकर माहात्म्य आणि नंतर या समाजाचे कालौघात झालेले सामाजिक व आर्थिक अध:पतन, आजची ससेहोलपट याचा आढावा घेवूयात!

देशोदेशी गारुड

भारतीय वस्त्रे सनपुर्व ३२०० पासुनच निर्यात होवू लागली होती हे आपण पाहिले. जातककथा, ब्राह्मणे, जैन साहित्यात विविध प्रकारच्या वस्त्रांच्या व विणकर समाजाबाबतच्या नोंदी मिळतात. ढाक्क्याची मलमल, बनारसी वस्त्रे (भारतात बनारसी साड्यांसाठी अधिक प्रसिद्ध.) पैठणच्या सुप्रसिद्ध पैठण्या व सुती व रेशमी तलम वस्त्रे, याचे जगावर अद्भुत गारुड पसरले होते. इतके कि भारतीय मलमली वस्त्रंसाठी रोमचे नागरिक एवढा पैसा (सोण्याच्या रुपात) मोजत असत कि रोमची तिजोरी रिकामी व्हायला लागली. रोमचा बादशहा अस्वस्थ झाला. हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात प्लिनी (थोरला) या इतिहासकाराने नोंदवून ठेवले आहे.
या निर्माणकर्त्यांनी आपले कौशल्य वापरत असंख्य पोतांची, नक्षांची, संरचनांची वस्त्रे निर्माण केली. देशाची पत जगभर वाढवली. सिंधु संस्कृतीच्या काळानंतर चेऊल, सोपारा, भडोच ई. बंदरांतुन वस्त्रांचे तागे निर्यात होत. भरतकामातही एवढी प्रगती केली कि मार्को पोलो या जगप्रसिद्ध प्रवाशाने तेराव्या शतकात भारताला भेट दिली होती. आपल्या प्रवास वर्णनात त्याने या भरतकामातील अद्भुत प्रगतीबद्दल भारतीय कोष्ट्यांची/साळ्यांची मनसोक्त तारिफ केली आहे. पेरिप्लसनेही पहिल्या शतकात येथील मलमली वस्त्रांची तारीफ केलेली आहे. एवढेच नव्हे तर ऋग्वेदात मानवी दैवाची तुलना विणकराच्या विणण्याशी केली आहे.
"दोन भिन्नरुप धारिणी युवतीस्वरुपी नियती सहा खुंट्याच्या मागावर
पुन्हा पुन्हा वस्त्र विणतात...
त्यापैकी एक धागे काढते आणि दुसरी जोडते..
त्यांचे हे कार्य अविरत आणि अविश्रांत चालु असते. (ऋग्वेद १०.७.४२)

      विदेश व देशांतर्गत व्यापारामुळे विणकर समाजाचीही आर्थिक भरभराट होत होती. हातमागाच्या शोधामुळे हा उद्योग ख-या अर्थाने पहिला इंजिनियरिंग उद्योग बनला. कापुस व हातमाग युरोपमद्धे गेले ते अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळीस. थोडक्यात या विणकर साळी/कोष्टी/कोरींनी जगभर अद्भुत गारुड निर्माण केले. भारतात एक नाही-दोन नाही...जवळपास दोनशे प्रकारची वैविध्यपुर्ण वस्त्रे निर्माण होवू लागली होती...यावरुनच विणकर समाजाच्या प्रतिभेची कल्पना करता येवू शकते.

कौटिल्याच्या काळातील सरकारीकरण

या व्यवसायात जी भरभराट व्हायला लागली त्यामुळे राजसत्तांचे लक्षही या उद्योगाकडे वळाले. जेथे धन दिसते तेथे सरकार वळणार नाही तरच नवल! दुस-या शतकात विणकामाचा उद्योग सरकारी बनला असे अर्थशास्त्रावरुन दिसते. विणकामाचे सरकारी कारखाने निघू लागले. विणकरांना तेथे स्वतंत्र उद्योग सोडुन नोक-या करणे भाग पडु लागले. ही एकार्थाने वेठबिगारीच होती. विणकरांवरील देखरेख करणा-या अधिका-यांना "सूत्राध्यक्ष" असे म्हटले जावू लागले. घायपात, कापुस, लोकर, गवत, झाडांच्या साली व तागापासुन तंतू काढणे, कातणे व त्याची वस्त्रे विणने ही कामे त्याच्या देखरेखीखाली होऊ लागली. सूत कातायचे काम विधवा, दंड देण्यास असमर्थ असणा-या स्त्रिया, जोगिणी व वेश्यांकडुन करवून घेवू जावू लागले. या काळात (इसवी सन २०० ते ५००) विणकरांच्या स्वातंत्र्यावर गदा आल्याचे आपल्याला दिसते. त्यानंतर मात्र जशी राजकीय स्थिती बदलली, पुन्हा विणकर स्वतंत्र झाले.
सुरुवातीला या व्यवसायात रस असनारे व विणकामात कुशल असनारे विणकामाच्या व्यवसायात सहजी येवू शकत असे. पुढे मात्र या व्यावसायिइकांच्या प्रदेशनिहाय जाती पडु लागल्या. अहिर, हळबा, वैश्य ते अगदी ब्राह्मणही या व्यवसायात पडले व तेही कोष्टी/साळी/कोरी (कोलिक) म्हणुनच ओळखले जावू लागले. त्यातही पोटजाती पडु लागल्या. पोटजाती या कौशल्याच्या आधारांवर निर्माण होत गेल्या.
अर्थव्यवस्थेत विणकर समाजाचा सर्वात मोठा वाटा असला तरी मात्र दुस-या शतकापासुनच विणकरांचे काम हे हलक्या प्रतीचे मानले जावू लागले हेही एक आश्चर्यच आहे. "विणकाम हे अत्यंत कष्टाचे व हलक्या दर्जाचे आहे." असा उल्लेख भीमसेन जातकात येतो. स्मृतींनी विणकरांना शूद्र घोषित करुन टाकले. नग्नांना ज्यांनी आपल्या अपार कौशल्याने व प्रतिभेने वस्त्रे दिली, नटने-थटने शिकवले, जीवनात एक अनमोल वस्त्रानंद भरला...देशाच्या तिजो-या भरल्या त्यांनाच शूद्र ठरवत सामाजिक दर्जा घसरवणा-या वैदिक स्मृती व त्यांचे पालन करू लागलेल्या तत्कालिन सर्वच समाजाला दोष द्यावा तेवढा थोडाच आहे.
असे असले तरी या समाजाचा आर्थिक दर्जा मात्र उच्च स्वरुपाचाच होता असे आपल्याला दिसते. तेराव्या शतकात एकट्या ठाण्यात पाच हजार विणकर मखमली कापड बनवत असत असा उल्लेख अरबी व्यापा-यांनी करुन ठेवला आहे. बु-हाणपुरही या कालात वस्त्रनिर्मितीचे मोठे केंद्र म्हणुन उदयाला आले होते.
तेराव्या शतकानंतर महाराष्ट्रात बलुतेदारी नामक एक अनिष्ट प्रथा सुरु झाली. त्यामुळे नवनवीन शोधण्याचा उत्साह मावळत गेलेला दिसतो. हातमाग ते यंत्रमाग ही पुढची पायरी मागणी असुनही भारत गाठु शकला नाही त्याचे मुळ कारण या अध:पतनाच्या अवस्थेत आहे. त्यात सतत पडत असलेले दुष्काळ आणि राजकिय अस्थिरतेने भरभराटीचे दिवस अस्तंगत होवू लागले. अनेक विणकरांनी धर्मही बदलला. कोणी जैन झाले तर कोणी मुस्लिम. मोमिन व अन्सारी हे आजचे मुस्लिम विणकर मुळचे हिंदुच. त्यांना जुलाहा असे म्हटले जाई. उत्तर भारतात जुलाहा हे हिंदुही धर्मातही आहेत व मुस्लिमही.
या सामाजिक व आर्थिक अध:पतनाच्या काळात विणकर समाजात अनेक संतही जन्माला आले. कबीर हे या सर्वांचे मेरुमणी. थिरुवल्लीवर या विणकर संताने तर दक्षीणेत आपल्या स्वर्गीय काव्याने जनमानसावर मोहिनी घातलेली होतीच. याशिवाय दादु दयाळ, कहार, रज्जब आदी अनेक संत विणकर समाजात जन्माला आले. वैदिकांच्या विषमतेच्या उद्घोषाविरुद्ध बंड पुकारत या सर्वच संतांनी सामाजिक समतेची चळवळ उभारायला मोलाचा हातभार लावला.

औद्योगिक क्रांती: विणकर भुईसपाट

अठराव्या शतकापर्यंत आपल्या विशिष्ट कौशल्याने जगभर आदराचे कारण बनुन राहिलेल्या विणकर समाजाला शेवटचा झटका दिला तो औद्योगिक क्रांतीने. युरोपात यांत्रिक मागांचा शोध लागला. गरजेपेक्षा अधिक उत्पादन होऊ लागले. भारतात बस्तान बसवु पहात असणा-या इंग्रजांना येथील बाजारपेठ काबीज करायची होती. जशी त्यांची सत्ता स्थापित झाली तसा त्यांनी आपला पहिला मोर्चा विणकरांकडे वळवला. त्यांच्या कापडाचा दर्जा हीणकस असला तरी ते स्वस्ता:त उपलब्ध होते. (आठवा ते भरड मांजरपाट.) पण तरीही आपण देशीवस्त्र उद्योगाला तोंड देवू शकत नाही हे लक्षात येताच त्यांनी दडपसत्र आरंभले. अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने त्यांनी येथील उद्योग नष्ट करण्याचा चंग बांधला. बंगालमधील मलमली वस्त्रे विणना-यांचे तर अंगठेच तोडले. हातमागावरील विणकाम खालावू लागले.
महात्मा गांधींनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यात "स्वदेशी" चा नारा दिला. "चरखा चला चला के...लेंगे स्वराज्य लेंगे" सारा देश एकसुरात गाउ लागला. देशी हातमागांना पुन्हा बरे दिवस येवू लागले. सारा देश स्वदेशीमय झाला तो गांधीजींच्या चरखा क्रांतीने.
पण स्वातंत्र्य आले. स्वतंत्र भारताच्या सरकारनेही औद्योगिकरणाचाच वसा घेतला. असे करत असतांना आपण या उद्योगात जे पुरातन कालापासुन आहेत त्यांना आधुनिकिकरणाच्या प्रवाहात भांडवल पुरवत आणायला हवे याचा मात्र विसर पडला. धडाधड हातमाग बंद पडु लागले. पुर्वेचे म्यंचेस्टर म्हणुन गाजणा-या इचलकरंजीसारख्या हातमागांच्या शहरावरही ही वीज कोसळली. यंत्रमाग आले. कुशल व स्वतंत्र बाण्याचे विणकर यंत्रमागांवर नोकर म्हणुन काम करु लागले. एवढ्या जनसंख्येला यंत्रमाग सामावून घेवू शकत नव्हते. त्यांना आता अन्यत्र रोजगार शोधण्यासाठी भटकावे लागले. काही शिकलेत...अगदी उच्च पदवीधर होत नव्या जगात नव्याने सुरुवात करत जगण्याच्या वाटा शोधताहेत.
या समाजाला आजही राजकीय प्रतिनिधित्व नाही. केंद्र सरकारने विणकरांच्या समस्या सोडवण्यासाठी यंदाच्या बजेटमद्धे फक्त शंभर कोटी रुपयांचा निधी दिलाय. त्याविरुद्ध आवाज उठवण्याचेही सामर्थ्य या समाजाकडे आज उरलेले नाहीय. अवघ्या जगावर गारुड माजवणारा हा कलासक्त समाज आज त्यांच्या परंपरागत व्यवसायात मात्र देशोधडीला लागलाय.

पोटजाती आणि सामाजिक क्रांती

विणकरांत प्रदेशनिहाय व जातीअंतर्गत अनेक पोटजाती आहेत. मुळचे हे सर्व एकाच विराट मानवी समुदायातुन व्यवसाय कौशल्यामुळे विणकर बनलेले हे लोक. पण पोटजातींत विवाह होत नव्हते. प्रत्येक पोटजात ही स्वतंत्र समजत आपापली पाळेमुळे काल्पनिक पुराण इतिहासांत शोधत होती. सर्व विणकर समाजाचे हंपी येथे जगद्गुरु पीठ आहे. सध्या श्री दयानंद पुरी महाराज या पीठाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी प्रागतिकतेचा वसा घेत बेटीबंदी तोडण्यासाठी अव्याहत प्रयत्न सुरु केले आहेत. सुजाण विणकर समाजही त्यांच्या आवाहनाला सकारात्मक पाठिंबा देत आहे ही एक नव्या समाज क्रांतीची सुरुवात आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
दुर्दैव हे कि आता पुन्हा ती हातमागावरील विलक्षण पोतांची घट्ट परंतु तलम विणीची वस्त्रे पहायला मिळनार नाहीत...
एका विराट देशी उद्योगाचा हा अंत वेदनादायक आहे हे नक्कीच!

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

14 comments:

  1. सर खूप सुंदर....!

    ReplyDelete
  2. ही पुस्तके कोठे उपलब्ध होऊ शकतील?

    ReplyDelete
    Replies
    1. http://www.jivheshwar.com/samajdarshan/ebooks.html

      Pls visit this link where you can free downl;oad Jivheshvar vijay.

      Delete
    2. can we publish it in newspaper?

      Delete
    3. Yes, you can. Just inform when it appears and in which newspaper.

      Delete
  3. Balutedari system started in 13th century. Can anyone explain reasons behind it. What exactly happened at that time that caused this system.

    ReplyDelete
  4. Constant famines during 1300 till 1630 AD changed over all social scenario. Also foreign and inland trade came to standstill because of vaidik "Sindhu bandi" and Islamic invasions. For survival, it seems, to provide livelihood to each and one business community (caste) village administrations decided to barter the servivces in the form of Balute over cash payments. We do not find this system prior to 1300 AD. Thanks.

    ReplyDelete
    Replies
    1. Sanjay Sir thanks for your response. But your answer has created many questions in my mind.
      Why inland trade was affected by "Sindu Bandi" which has nothing to it?
      "Sindu Bandi" was imposed in tenth or evevanth century way its effects were observed after 200 years?
      Why "Sindhu bandi" was enforced in tenth or eleventh century. What happened that caused this?
      There were famines in india many time in ancient india, but there is no such record of any social changes due to that. What was the speciality of famines of this period?
      Another question is that why there were constant famines during this period only? It is said that intensity of famines is much to do with the governance is that correct? Was there any change in tax pattern / way of tax collection during this period?
      In sixteenth century ban of sea travel was imposed in china and it was justified on confusion way of thinking.
      Similar ban was imposed in Japan on the basis of same confusion theory.
      Japanese society was divided in 4 castes with Samurai (warrior) as highest and merchants at lowest level, in the same period.
      Ban of sea travel was imposed in Bali (Indonesia) also Varna system based on birth was imposed among Balines Hindus in this period only.
      Why different civilizations (read pagan civilizations) started behaving in similar way during this time?

      Delete
    2. Hi, there is no recorded reason why "Sindhu bandi" was imposed. We are left here just to speculation. However to effect Sindhubandi completely with the help of rulers it took time of about 200 years. Inland trade affected because of Islamic invasions. Southern India remained comparatively peaceful, still northern India remained prohibited for trade.

      Why various civilizations started behaving similarly during that period is an interesting question. We have to find reasons in the political and cultural upheavals of then period.

      The famines I am talking about were of severe nature. People eat dead...even human dead bodies. The villages were abandoned. Entire social structure was destroyed in a way. Balutedari system in a way offered security to the people hence was accepted by an large...but it killed spirit of innovation.

      Delete
  5. खुप छान माहिती आहे. विणकर समाजाबद्दल अधिक माहिती असल्यास प्रकाशित करावी. हि विनंती.

    ReplyDelete
  6. सर, तुमच्या संशोधनाबद्दल मी लिहावं हे अगदीच बालिशपणाचं ठरेल. खूप छान सर! मी स्वतः पद्मशाली (पद्मसाळी) समाजातून येतो (समाजाचं मूळ तेलंगाणा). जेव्हढ तुम्ही मांडलात त्याच्या निम्म्यापेक्षासुद्धा कमी माझ्या स्वतःच्या समाजातील लोकांना माहिती आहे. आपले संशोधन असेच अखंडित सुरु राहो अन भारताच्या उज्ज्वल इतिहासाची पुनर्मांडणी आपल्या हातून होवो या सदिच्छेसह... शिवानंद सुरकुटवार, नांदेड.

    ReplyDelete
  7. Devang. Kosti. /sali. Smajachi. Mhayati. Farch. Chhan

    ReplyDelete
  8. A fellow like me feel it difficult to read and understand it. If it is made available in English, many more people may read and appriceat.Will it be so...

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...