Thursday, July 19, 2012

वाटा...अंधारलेल्या?


Image result for globalisation

जेंव्हा आपण आपली समाजरचना आणि जागतिकीकरणाचा विचार करतो तेंव्हा खालील प्रश्न उपस्थित होतात.

जागतिकीकरणाला अनुकुल अशी आमची मानसिकता आहे काय? जागतिकीकरणातुन जी नवी संस्कृती बनत आहे तिचा स्वीकार करत स्वत:त अनुकुल बदल घडवण्याचे मानसिक सामर्थ्य आमच्यात आहे काय?
जागतिकीकरणामुळे जागतिक पातळीवर जी नवी संस्कृती बनू पहात आहे तीवर आमचा काही प्रभाव असणार आहे काय? कि आम्ही परावलंबी पराभुत मानसिकतेतुन अपररिहार्य म्हणुन ती संस्कृती स्वीकारत जाणार आहोत?

जागतीक संस्कृती स्वीकारणे अपरिहार्य ठरणारच असेल तर मग आमच्या संस्कृतीचे काय होणार? आमची संस्कृती जागतिकीकरणाला अनुकुल आहे कि प्रतिकूल?

आम्ही नव्या जगाची आव्हाने पेलण्यास समर्थ आहोत काय?

आमची समाज व्यवस्था अशा समर्थ पिढीला घडवण्यासाठी अनुकूल आहे काय?

या निमित्ताने अजुनही अनेक प्रश्न उपस्थित करता येतील, पण येथे आपल्याला या प्रमुख प्रश्नांवर चर्चा करायची आहे. पहिल्या प्रश्नाला अनुसरुन एक उपप्रश्न असा आहे कि मुळात जागतिकीकरण ईष्ट आहे कि अनिष्ट. याचे उत्तर सोपे आहे खरे तर. जागतिकीकरण ही मुळात नवीन संकल्पना नाही. पुरातन काळापासुन ही प्रक्रिया सुरु झालेली आहे. जागतिकीकरणाचा अर्थ म्हणजे अशी अर्थव्यवस्था ती राष्ट्रीय किमान नियंत्रणांखाली रहात राष्ट्रांचा सीमा ओलांडत पसरत जाते व त्यासाठी तशी अनुकुल धोरणे बनवली जातात. कोणत्याही देशात कोणीही कोणताही उद्योग उभारण्यास अटकाव होऊ नये ही मुक्त अर्थव्यवस्थेची आदर्श कल्पना झाली. अजुन तरी जागतिकीकरणात हा टप्पा गाठला नाही. तरीही एकुणातील वाटचाल त्या दिशेने अत्यंत वेगाने होतेय हे नाकारता येत नाही.

पुरातन काळी जेंव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार सागरी व खुष्कीच्या मार्गाने सुरु झाले तीच जागतिकीकरणाची प्राथमिक सुरुवात होती. भारतातुन रेशमी/सुती वस्त्रांपासुन ते मसाल्यांपर्यंतचे पदार्थ अरबस्थान, ग्रीस, इजिप्त, चीन अशा वेगवेगळ्या राज्यांत (तेंव्हा मुळात राष्ट्र ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती.) जात व तिकडुन सोणे, मद्यादि अगणित वस्तु भारतात येत असत. व्यापाराबरोबरच संस्कृतीचेही आदान-प्रदान होत असे. किंबहुना परस्पर संपर्कामुळे तसे होणे अपरिहार्यच होते. यात धार्मिक संकल्पनांचीही उधार-उसनवारी होती. उदा. सूर्य पुजा ही भारतियांनी मध्य आशियातुन आलेल्या मगी लोकांकडुन घेतली. परस्पर भाषांतही एकमेकांचे शब्द मिसळत गेले. जगभर अनेक संस्कृत्यांनी कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या संस्कृतीवर राज्य तरी केले वा गुलाम तरी झाल्या. रोमने प्रदिर्घ काळ युरोप व उत्तर आफ्रिका ते आशिया खंडाच्या काही प्रदेशावर साम्राज्य गाजवले. त्यातुनही त्या भागांत रोमनांश संस्कृती निर्माण झाली. तसेच त्यापुर्वी ग्रीकांश संस्कृत्या बनल्याच होत्या. भारतात ग्रीक, शक, हुण, कुशाण यांनी प्रदिर्घ काळ राज्ये गाजवली...अर्थात त्यांनी येथील संस्कृतीचा काही भाग उचलला तर त्यांच्या संस्कृतीचा काही भाग एतद्देशीयांनी स्वीकारला.
हे काय होते? जागतिकीकरणच होते.

म्हणजेच जगाला जागतिकीकरण नवे नाही. फार तर एवढेच म्हणता येते कि जौद्योगिकरणपुर्वी त्याचा वेग अत्यंत मंद होता तर औद्योगिक क्रांतीनंतर तो वाढला. संगणक व माहितीजालाच्या क्रांतीनंतर तर तो वेग एवढा वाढला आहे कि एखाद्याला भोवळच यावी. आता एवढा वेग योग्य कि अयोग्य याची चर्चा येथे न करता आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे वळतो.

ज्यामुळे फायदा होईल असे वाटते ती व्यवस्था कोणतीही असो, ती स्वीकारण्याकडे माणसाचा कल असतो. अत्यंत कृर अशा हुकुमशाह्याही मानवाने तात्कालिक भावनिक वा आर्थिक फायदे उकळण्यासाठीच स्वीकारलेल्या आहेत. लोकशाही ही त्यातल्या त्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात यशस्वी ठरते म्हणुन ती प्रेय वाटते, एवढेच.

भारतीय मानसिकता जागतिकीकरणाचे फायदे घेत असल्याने ती जागतिकीकरणाला अनुकुल आहे असेच म्हणावे लागेल.

परंतु ही अनुकुलता गोंधळयुक्त आहे.

जागतिकीकरण हवे आहे पण संस्कृतीवर आक्रमण नको अशी काहीशी विचित्र मानसिकता आहे. पण आक्रमण रोखणे सोडा....त्या आक्रमनाच्या लाटेवर आपण स्वार झालेलोच असतो याचे भान मात्र नसते.
मोबाईल...इंटरनेट आता खेडोपाडी झपाट्याने पसरत आहे. येत्या पाच वर्षांत देशभरात घरोघरी...संगणक-इंटरनेट पोहोचलेले असतील. मोठ्यांच्या तर सोडाच, दहा-बारा वर्षाच्या प्रत्येक पोरांच्या हाती अत्याधुनिक मोबाईलचे व्हर्जन असेल.

जागतिकीकरण म्हनजे एवढेच नाही. याही पल्याड जावून बियाणी-पाणी-पुरवठा, आरोग्य सेवा, शाळा-कोलेजेस, किराणा ते कपड्याची दुकाने विदेशी संस्था चालवतील...जवळपास प्रत्येक उत्पादन व सेवा विदेशी कंपन्या देवु लागतील. तसे अनुकुल कायदे बनतील. तसेही बराक ओबामाने अप्रत्यक्षपणे भारताला तसे सुनावलेही आहे...बदला...जागतिकिकरणाचा वेग वाढवा.

पुरातन जागतिकीकरण हे उभयपक्षी स्वातंत्र्य मानत घडत होते.

आता तशी स्थिती राहिली नाही.

म्हणजे जागतिकीकरण अनिष्ट आहे असे आज म्हनता येत नाही.

आपला जागतिकीकरणाकडे पहायचा दृष्टीकोन बदलावा लागणार आहे.

जागतिकीकरणात आज आपले स्थान पाहिले तर बौद्धीक कामगार स्वस्तात पुरवणारा देश म्हणुन आपली ख्याती आहे. आता त्यातही चीन ते दक्षीण अमेरिकेतील अनेक देश आपल्या स्पर्धेत उतरले आहेत. त्याचा भविष्यातील परिणाम काय असेल हे आज सांगता येणार नाही.

साखर ते वस्त्रे आज निर्यात होतात पण ती सरकारी अनुदानांशिवाय जागतीक बाजारात विकलीच जावु शकत नाही एवढी किंमतीत तफावत आहे.

चीन मात्र निर्यातीत भारतावर कधीच मात करुन बसलाय.

भारताचा आयात-निर्यात व्यापार हा आतबट्ट्याचा आहे.

काही अवाढव्य भारतीय कंपन्या सोडल्या तर भारतीय कंपन्या देशांतर्गतच उच्च विकासदर गाठु शकलेल्या नाहीत. परदेशात विस्तार करणे तर दुरच राहिले.

याचा अर्थ असा होतो कि ग्राहक म्हणुन व बौद्धीक/शरीरश्रमी कामगार म्हणुन आम्ही जागतिकीकरणात आहोत हे खरे आहे पण जागतिक बाजारपेठेत मुल्यवर्धीत सेवा व उत्पादने विकण्यात आम्ही अत्यंत मागे पडलेलो आहोत.

याचाच अर्थ असा होतो कि जागतिकीकरनाला अनुकुल अशी आमची एकतर्फी भुमिका आहे...पण दुस-या बाजुसाठी आवश्यक अशी नव-सृजनात्मक मानसिकता घडवण्यात आम्ही अपयशी ठरलेलो आहोत.
आमची समाजव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, मुल्य व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था आमची मानसिकता बदलण्यातील सर्वात मोठे अडथळे आहेत. ते दुर कसे करायचे हाच आमच्या समोरचा आजचा गंभीर प्रश्न आहे.
यावर जोवर आम्ही व्यापक विचारमंथन व कठोर आत्मपरिक्षण करत नाही तोवर आमची मानसिकता ख-या अर्थाने जागतिकीकरनाला लाय्क नसून अर्थ-गुलामीलाच लायक अशी आहे हे पक्के समजुन चालावे लागणार आहे.

आमच्या संस्कृती रक्षकांना नेहमीच पुरातन संस्कृतीच्या भवितव्याची काळजी लागुन राहिलेली असते. कोनतीही संस्कृती यच्चयावत जगात जशी होती तशीच्या तशी चीरकाळ टिकत नसते याचे भान त्यांना नसते. भारतीय संस्कृतीचेच म्हणावे तर  शैव संस्कृती, समन संस्कृती, ( बौद्ध-जैन कालीन संस्कृती) ते इस्लामकालीन संस्कृती...यात किती परिवर्तने झाली हे इतिहासाकडे निर्लेप मनाने एक दृष्टीक्षेप टाकला तरी थक्क व्हायला होते. समाजप्रवाह आपापल्या कालाच्या परिप्रेक्षात जुन्यातील योग्य तेवढे स्वीकारत नवीन नीति-धर्मनियम बनवत पुढे जात असतो. अनेक सांस्कृतीक अंधारयुगेही अधुनमधुन डोकावत असतात. जगभर असे घडलेले आहे. आज जागतिकीकरणामुळे संस्कृती बदलते आहेच. हा बदल थांबवणे ही अशक्यप्राय बाब आहे.

येथेही पुन्हा प्रश्न हाच कि आम्ही फक्त सांस्क्रुतीक "घेवाणी"च्या बाजुने असनार आहोत कि "देवाणी"च्याही बाजुने? आणि देवाण-घेवाण ही फक्त तुल्यबळांतच होत असते. दुर्बलांत नाही. अर्थसत्ता आणि राजसत्ता जेंव्हा प्रबळ असते तेंव्हाच देवाण-घेवाण होवू शकते. ज्या देशात अजुनही ५५% लोक भुकेकंगाल आहेत, ४०-४५% लोक फक्त धडपणे जगु शकतात...

तो देश कोणती संस्कृती जगाला देउ शकणार आहे? कागदोपत्री श्रेष्ठ संस्कृत्या कामाच्या नसतात. गतकालीन माहात्म्यांना कोणी महत्व देत नाही.

संस्कृत्या घडवाव्या लागत असतात...जगाव्या लागत असतात.

  पण त्यासाठी मुळात सर्वांचे आर्थिक उत्थान व्हावे यासाठी आमच्याकडे काय कार्यक्रम आहे?

आपली प्रगती साधन्यासाठी स्वाभिमानाने स्वबलावर उभे राहण्यासाठी जी मानसिकता बनवावी लागते ती क्षमता आमच्या समाजव्यवस्थेत मुळातच नसेर्ल तर आपल्याला मुळात संस्कृतीच नाही असे म्हणावे लागते.
साधे पाण्याचे घ्या. आपल्याकडे दुष्काळ पडला तरी इस्त्राएलच्या शंभरपट पाऊस पडलेला असतोच. तरी पावसाने ओढ दिली कि पाण्याची बोंबाबोंब सुरुच.  जुने जाऊद्या, ७२च्या दु:ष्काळात बनवलेली जवळपास ९५% गांवतळी आज गाळ भरुन क्रिकेटची मैदाने झाली आहेत. जलसंधारणाचा कार्यक्रम आपल्याच स्वार्थासाठी का होईना स्वत: राबवावा हे आजही समजत नसेल तर हे दरिद्रीच राहणार. नेत्यांना तेच हवे. अब्जावधी रुपये कागदोपत्री खर्च झाल्याचे दाखवत आमचे जलसंधारनातील महनिये जर तालुकेच्या तालुके खरेदी करण्याच्याच मोहिमेवर असतील तर दुसरे काय होनार?

आणि ही बेईमानी वृत्ती कोणत्या क्षेत्रात नाही?

  मग जर आमची संस्कृतीच अशी बेईमानीची असेल तर आमच्या संस्कृतीला कोण घेणार?

आणि बेईमानीच्या पायावर सामाजिक व सर्वसमावेशक अर्थ-क्रांती घडु शकत नाही...

आणि काही लोक चालले भ्रष्टाचार निर्मुलन म्हणजेच क्रांती असा नारा द्यायला.

आपल्या प्रजेची मानसिक भ्रष्टता व त्यामुळेच आलेली नवनिर्मानातील पंगुता यावर आपण कधी चर्चा करनार आहोत?

भारताने असा काय मौलिक शोध गेल्या हजार वर्षांत लावुन दाखवलाय कि ज्याचा जागतीक अर्थव्यवस्थेवर व जीवनव्यवस्थेवर प्रभाव पडलाय?

आमच्या शिक्षणव्यवस्थेने आमची सृजनात्मकता मारुन टाकलीय. आमचे आईबाप आम्हाला धाडसी बनण्याचे स्वातंत्र्य नाकारतात...जेथे कल आहे तेच शिकण्याचा व तेच करीअर म्हणुन करु देण्याचा मुलभुत अधिकार नाकारतात. आम्हीही आमच्या पोरांना असेच गुलाम बनवणार यात शंका नाही.

मग गुलाम कधी मानसिक तुरुंगाच्या भिंती तोडुन पळतोय होय?

आणि गुलामांना कधी संस्कृती असते होय?

आपल्याला सर्वप्रथम आमच्या कमतरता वेळीच हुडकल्या पाहिजेत. मंथन केले पाहिजे. आणि जोवर लोक बदलत नाहीत तोवर अर्थक्रांती होणार नाही. अर्थक्रांती होत नाही तोवर आम्ही संस्कृतीचे निर्मातेही होवू शकत नाही. जागतीक परिप्रेक्षात आम्ही नेहमी ग्राहकच राहणार...खंदे विक्रेते होवू शकणार नाही. ज्ञानाचेही ग्राहकच राहणार, ज्ञानदाते बनू शकनार नाही.

थोडक्यात जागतिकीकरणात आम्ही जगु हे खरे पण आत्मगौरव नसेल त्या जगण्यात.

बघुयात आपण खरोखर काय सकारात्मक करु शकतो ते....

वाटा अंधारलेल्या आहेत... त्या आमच्या मनावर झाकोळलेल्या नि:ष्क्रीयतेमुळे...

फक्त ती राख झटकत...वाटांना महामार्ग बनवत आत्मसन्मानाचे युद्ध सुरु करावे लागणार आहे...
तरच आम्ही जागतिकीकरणात एक महत्वाचे प्रभावशाली एकक बनु शकतो...नाहीतर आहेच आपले...ये रे माझ्या मागल्या...


3 comments:

  1. जागतिकीकरणाचा सामना करण्यासाठी अजूनही आपण सक्षम नाहीत म्हणजे आपली राजसत्ता,अर्थसत्ता,शिक्षणव्यवस्था अजूनही सक्षम नाहीत.आपली कौशल्ये विकसित होण्यासाठी आपले प्रयत्न कमी पडतात.सगळे काही सरकारनेच करावे हि अजूनही मानसिकता आहे.त्यामुळे अजूनही आपण अविकसित किंवा मागासलेले आहोत.आत्म:सन्मान संपला आहे आणि पर्यायाने गुलामीची मानसिकता जास्त आहे.अजूनही गप्पात काही जन आत्ताच्या व्यवस्थेपेक्षा इंग्रजांचा राजकारभार चांगला होता असे मान्य करतात म्हणजे यात सगळे आले म्हणजे प्रजा किती ऐतखाऊ झाली आहे ते लक्षात येईल.

    ReplyDelete
  2. Sanjay sir
    Strongly agreed. Gulamichya manasiktetun baher padne atishay avashyak ahe. Ajunahi vichar ahet. Nantar manden. Lekh awadla tyasathi ha pratisad

    ReplyDelete
  3. mihi ek sanskriti japa mhnanara prani aahe ani vikshipt sudhaa aahe kadachit me lupt honar aahe,kalanusar na badalyamule.

    seriously!!

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...