Monday, September 3, 2012

धनगर-गवळ्यांच्या अवनतीचा कालखंड



महाराष्ट्रावर प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारी दोनच घराणी. पैकी सर्वात प्रथम सातवाहन. त्यांनी साडेचारशे वर्ष सत्ता गाजवत महाराष्ट्र घडवला. सातवाहन हे मुलचे धनगर. दुसरी प्रदीर्घ काळ टिकलेली अत्यंत महत्वपुर्ण सत्ता म्हणजे देवगिरीच्या यादवांची. ही सत्ता साडेतिनशे वर्ष (सन ८३५ ते १३१८) टिकली. नुसती टिकली एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीवर अमिट परिणाम सोडला. यादव हे मुळचे अहिर गवळी. म्हणजेच तेराव्या शतकापर्यंत धनगर-गवळ्यांनीच महाराष्ट्रावर सत्ता गाजवली. एक संस्कृतीचे निर्माण घडवले. आजही महाराष्ट्र प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या त्याच संस्कृतीचे अनुसरण करत आहे. पण फरक एवढाच आहे कि या दोन्ही समाजांना आजच्या संस्कृतीत जवळपास स्थान नाही.

इतिहासकारांनी सातवाहन व यादवांचा इतिहास फारसा लिहिलेला नाही. जोही लिहिला आहे तो जातीय दृष्टीकोनातुन लिहिलेला आहे. सातवाहनांच्या कुळाबद्दलही अकारण विओवाद निर्माण करुन ठेवला आहे. असो.

यादवांची सत्ता गेली आणि इस्लामी सत्ता आली. या काळापासुन मराठी संस्कृतीचे क्रमश: अध:पतन सुरु झाले. वर्णव्यवस्था, जातीव्यवस्थेचे स्तोम वाढु लागले होतेच. धनगर-गवळी हे व्यवस्थेने शुद्रांत जमा करुन टाकले होते. असे असले तरी चवदाव्या शतकाच्या अखेरपर्यंत हे दोन्ही समाज आर्थिक दृष्ट्या बलाढ्य असेच होते.

परंतु प्रकृतीला कदाचित ही संपन्नता मंजुर नव्हती. महाराष्ट्रात १३९६ ते १४०८ या काळात एक भिषण दुष्काळ पडल्याची नोंद आहे. तत्पुर्वीही अनेक पडले असतील पण दुर्दैवाने त्यांची नोंद नाही. या उपरोल्लिखित दुष्काळास दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणुन ओळखले जाते. या दुष्काळात स्थिती एवढी भिषण होती कि गांवेचा गांवे ओस पडली. लाखो जनावरे, माणसे अन्न-पाण्याअभावी या दुष्काळात मरण पावली. लोक झाडांच्या साली, म्रुत जनावरे खावु लागली. शेवटी वेळ अशी आली कि माणसे मृत माणसांनाही खावु लागली.

१५९६ सालीही असाच भिषण दुष्काळ भारतभर पडला होता. अबुल फजल लिहितो कि "माणुस माणसाला खात होता आणि लहान मोठे रस्ते प्रेतांनी बंद केले होते."

त्यानंतरही १७व्या शतकात पडलेल्या लहान-मोठ्या दुष्काळांचे वर्णन मोरल्यंड या संशोधकाने केले आहे. १६१४ ते १६६० या काळात असे १२ दुष्काळ पडले होते. त्यात सर्वात मोठा दुश्काळ होता १६३० सालचा. हा त्यंत उग्र स्वरुपाचा असुन या दुष्काळाबद्दल व्ह्यन ट्विस्ट हा डच व्यापारी लिहितो:

"पाउस इतका अल्प पडला कि पेरणी केलेले बी वाया तर गेलेच, पण गवतही उगवले नाही. गुरे ढोरे मेली. शहरांतुन आणि खेड्यांतुन, शेतात आणि रस्त्यांवर प्रेतांच्या राशी पडल्याने इतकी दुर्गंधी सुटली रस्त्यावरुन जाणे भयावह होते. गवत नसल्याने गुरे-ढोरेही प्रेतेच खावु लागली. माणसे प्राण्यांची प्रेते खायला येवु लागली. दुष्काळाची तीव्रता वाढु लागली तशी माणसे शहरे व खेडी सोडुन निराशेने दाही दिशा भटकु लागली....जेथे जावे तेथे प्रेतांशिवाय आम्हाला काहीच दिसत नव्हते...
"पुरुष बायका-मुलांना टाकुन जात होते. स्त्रिया स्वत:ला गुलाम म्हणुन विकुन घेत, आया बालकांची विक्री करत. काही कुटुंबांनी विष प्राशन करुन एकत्रीत म्रुत्युला कवटाळले....माणसांचे मांस उघडपणे बाजारात विकले जात होते..."

या सतत पडलेल्या दुष्काळांनी कुणब्यांना जेवढे हवालदिल केले त्याहीपेक्षा अधिक पशुपालकांची भिषण अशी ससेहोलपट केली. पशुंना जगवणे अशक्य झाले. चारा नाही कि पाणी नाही. अन्नान्न करत माणसेच जेथे मरत होती तेथे मुक्या शेळ्या-मेंढ्या, गायी-म्हशींचा काय पाड लागणार? या दुष्काळांनी धनगर-गवळ्यांचा आर्थिक कणाच मोडुन टाकला एवढे मात्र खरे. सारी अर्थव्यवस्था कोलमडुन पडली. त्यात सुलतानी प्रहार होतच होते. धर्म नष्ट व्हायच्या बेतात आलेला. सुकाळ आल्यावर शेती पुन्हा उमलु लागली हे खरे, पण पशुंची पुन्हा नव्याने पैदास करत उभारी धरायला पशुपालकांना मात्र वेळ लागला. ते मागे पडु लागले. पुर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त करता येणे जवळपास अशक्यच झाले.

शेतक-यांनी नदी-ओढ्याकाठच्या जमीनी व्यापल्या होत्या. शेतीसाठी पाण्याची आवश्यकता बघता ते संयुक्तिकही होते. धनगरांनी मात्र चा-यासाठी व्यापलेल्या जमीनी या जवळपास ओसाड, गवताळ आणि डोंगराळ होत्या. त्यामुळे पावसाळी काळ सोडला तर दुसरे पीक घेता येणे अशक्यच होते. आजही या स्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळे धनगर समाज हा निमभटकाच राहिला. म्हणजे पानकळ्यात धनगर वाड्यात थांबुन जमेल तेवढे कसायचे आणि पानकळा संपला कि चा-याच्या शोधात शेळ्या-मेंढ्यांचे कळप घेवून चारी दिशा फिरत रहायचे.

पण यामुळे धनगर समाजाचा एक अप्रत्यक्ष फायदाही झाला. महाराष्ट्रातील दुर्गमातिदुर्गम प्रदेश त्यांनी पायतळी तुडवला असल्याने हाताच्या रेषांइतकाच महाराष्ट्र त्यांना तोंडपाठ झाला. आज जे डोंगरी गड-कोट-किल्ले महाराष्ट्रात दिसतात त्या जागा शोधण्याचे श्रेय धनगरांकडेच जाते. आजच्या बोरघाटाचा मार्गही शिंग्रोबा नामक धनगरानेच इंग्रजांना दाखवला. रायगडावरील हिरकणी बुरुजाची कथा कोण विसरेल? हिरकणी ही धनगरच. अभेद्य अशा समजल्या जाणा-या रायगडावरील चोरवाटही तिला माहित होती. छ. शिवाजी महाराजांनी तिचा यथोचित सन्मान करुन ती चोरवाट बंद करण्यासाठी बुरुज बांधला. तो आजही हिरकणी बुरुज म्हणुन ओळखला जातो.

धनगरांनी राजसत्तांना केलेली मोलाची मदत म्हणजे हेरगिरी. सतत भटकंती असल्याने व चा-यासाठीच हिंडत असल्याने शत्रुमुलुखातील हालचाली त्यांना आपसुक कळत. छ. शिवाजी महाराजांनी नुसत्या गडकोटांसाठी नव्हे तर हेरगिरीसाठीही त्यांचा उपयोग करुन घेतला...पण सर्वात महत्वाचा उपयोग म्हनजे गनीमी कावा.

आधीच सांगितल्याप्रमाणे दुर्गमातिदुर्गम भागांतील वाटा-चोरवाटाही त्यांना तोंडपाठ असल्याने शत्रुवर छापा मारण्यासाठी वाटाडे असत ते धनगरच. कुत्र्यांचा उपयोग अशा छाप्यांत कसा करुन घ्यायचा हे शिकवले ते धनगरांनीच. "Native Breeds of India-Mudhol" या प्रबंधात डा. बी. सी. रामचंद्रन आणि डा. पी. व्ही. यतिंदर म्हणतात कि गनीमी काव्याने शिवाजी महाराज जेंव्हा छापा टाकण्यास जात तेंव्हा आधी प्रशिक्षीत कुत्र्यांची फौजच शत्रुच्या छावणीवर तुटुन पडे. शत्रुच्या गोटात धावपळ व्हायला लागली कि मग मावळे तुटुन पडत व शत्रुची कत्तल करत. औरंगझेबाने या पद्दतीच्या हल्ल्यांची दहशत घेतली होती असेही या लेखकद्वयाने नमुद करुन ठेवले आहे.
थोडक्यात स्वराज्याच्या उभारणीत धनगर समाजाने महत्वाचे योगदान दिले. अर्थात या योगदानाचा विसर आपल्या इतिहासकारांना पडला. सामाजिक इतिहास हा मुळात मराठीत लिहिला गेलाच नसल्याने असे घडले हेही खरे.

सतत निसर्गाच्या सहवासात, एकाकी खुल्या आभाळाखाली रहायची सवय यामुळे धनगरांच्या दृष्टीकोनात व्यापकता येणे स्वाभाविक होते. सातवाहन, यादवांनी ती व्यापकता दाखवलेली होतीच. या दोन्ही समाजांचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय दृष्टी. आणि तिची मध्ययुगात चुणुक दाखवली ती मल्हारराव होळकरांनी. खानदेशात राहुन मल्हाररावांनी माळव्यावर स्वतंत्रपणे स्वा-या करत मोगल सत्तेला हादरे द्यायची सुरुवात अवघ्या पाचशे बारगीर-शिलेदारांच्या सैन्यासह सुरु केली. बाळाजी विश्वनाथाच्या दिल्ली स्वारीत स्वतंत्रपणे सहभाग घेतला. मल्हाररावांच्या पराक्रमी व स्वतंत्र वृत्तीची जाणीव याच कालात बाजीरावाला झाली. त्याने पेशवा होताच मल्हाररावांना माळव्याचा सुभेदार म्हणुन नेमले. मराठेशाहीतील सुभेदार पद दिले गेलेले एकमेव सेनानी म्हणजे मल्हारराव. मल्हाररावांनी उत्तर तुडवली. सपाट प्रदेशातील गनीमी कावा विकसीत केला...इतका कि त्याला "मल्हारतंत्र" म्हटले जाते. पानिपत युद्धात गेलेली मराठेशाहीचे पत काही महिन्यांत परत मिळवली. इंग्रजांनाही गनीमी काव्यानेच धुळ चारली.

राष्ट्रीय दृष्टीची सकारात्मक बाजु दाखवणारी दुसरी महान स्त्री म्हणजे अहल्यादेवी. त्यांनी रामेश्वरपासुन ते काश्मीरपर्यंत आणि पेशावर पासुन बंगालपर्यंत जेवढी समाजोपयोगी वास्तुंची, मंदिरांची जीर्णोद्धार ते नवनिर्मिती करत महान राष्ट्रीय कार्य केले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. १८०२ पासुन यशवंतराव होळकरांनी इंग्रजांचा धोका ओळखत त्यांच्या विरुद्ध एकहाती स्वातंत्र्यलढा उभारला. अठरा युद्धे केली आणि सर्व युद्धांत विजय मिळवला. दुर्दैवाने त्यांच्यावर मृत्युने अकाली घाव घातला. पण त्यांची पत्नी तुळसाबाई यांनी इंग्रजांना तब्बल सात वर्ष आपल्या राज्यापासुन दुर ठेवले. शेवटी इंग्रजांनी फितुरीचा फायदा घेत तुळसाबाईंचा खुन केला तेंव्हाच त्यांना होळकरी राज्याचा घास घेता आला. पुढे तरीही भिमाबाईने गनीमी काव्याचाच वापर करत इंग्रजांशी युद्ध सुरुच ठेवले. आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी म्हणुन जागतीक इतिहासात त्यांचे नांव नोंदले गेले आहे...अर्थात आम्हाला त्याचे फारशी पर्वा नाही. खुद्द मल्हाररावांसारख्या मुत्सद्दी सेनानीला "धनगर" म्हणुन त्यांच्या कालात हिनवले जात होते...तर इतरांची काय कथा?

होळकरी युगात धनगरांनी युद्धशास्त्रात प्रगती केली. संताजी वाघांसारखे...भाऊसाहेब पेशव्यांना वाचवण्यासाठी बलिदान देणारे महान सरदार झाले...पण सामाजिक परिप्रेक्षात धनगरांचे स्थान तीळमात्र बदलले नाही...

(क्रमश:)

संजय सोनवणी
९८६०९९१२०५

3 comments:

  1. तुम्ही सातवाहन हे धनगर आणि यादव हे गवळी असे लिहिले आहे , काही संशोधकांच्या मते हे मराठे होते. तर तुमचे मत अधिक स्पष्ट कसे व्हावे?

    ReplyDelete
    Replies
    1. यादव घराण्याचा प्रथम पुरुष हा गुजरात मधील द्वारकेहून आला होता. जो गवळी धनगर होता.

      Delete
  2. यावरून हे लक्षात येते की धनगर वंशाच्या इतिहासाशीवाय भारतीय इतिहास पुर्ण होवू शकत नाही.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...