Saturday, June 1, 2013

मनुष्यतेचे राज्य आणण्यासाठी...

भगवान गौतम बुद्ध आठवा
मोहनदास करमचंद गांधी नामक
एक महात्मा आठवा
वैचारिक विरोधांना 
महात्म्याशीही 
आणि त्याच वेळीस व्यवस्थेशीही
फक्त विचारांच्या शक्तीने
संघर्ष करणारे महामानव 
बाबासाहेब आठवा...

ती खरी शक्ति होती...
कालजेयी
अधमांना नामोहरम करणारी
समतेला सर्वोपरि मानणारी
ती सर्व व्यवस्थांवर मात करुन
मिळवणारी...
आणि मिळवलेली....
कोठे विस्मरले गेले ते?

कोठुन उगवले 
हे बंदुकीला खांद्यांवर मिरवत छाताडांत 
गोळ्या घालणरे?
कोठुन उगवले हे अतर्क्य प्राणी
विश्वशांतीला 
त्या तत्वज्ञानाला
गोळ्या घालणारे
आणि गोळ्यांचे समर्थन करनारे?

हिंसेतून हिंसाच जन्माला येते....
द्वेषातून द्वेषच जन्माला येतो...
रक्त नेहमी रक्ताचीच मागणी करत असते...
हिंसेचे तत्वज्ञान हे नेहमीच
फक्त भेकडांचे असते...

कोण आहोत आपण?
कोठे आहोत आपण? 
तीन-चार हजार वर्षांपुर्वी 
जाणीवांतून उद्रेकना-या औपनिषदिक, 
श्रेष्ठ श्रमण
महावीर
आणि भगवान गौतम बुद्धाच्या 
कमलकोमल  
वचनांनी आजही 
जागे केलेच नसेल आम्हाला
असेल आम्हाला रक्ताचा हव्यास आजही
तर मग
पुन्हा विचारायलाच हवे आम्हीच आम्हाला कि
कोठे आहोत आम्ही?
तेथेच नव्हे काय
जेथे होतो तीन-चार हजार वर्षांपुर्वी?

समता हृदयातून येते
समता धमण्यांतुन वाह्ते
जी जीवनव्यापी भावनांतून येते
आणि सर्वांच्या जीवनासाठी 
असते व्याकूळ
समता रक्त सांडून येत नसते
ती प्रत्येकाच्या हृदयात 
मानवता वसवून येत असते...

असायलाच हवा संघर्ष तर
तो असलाच पाहिजे अधमांना 
मनुष्य बनवण्यासाठी
भले द्यावे लागले प्राण
तरीही देवू
फक्त
मनुष्यतेचे राज्य आणण्यासाठी...

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...