Saturday, October 18, 2014

उत्खनन



समोर हिरवा सागर हेलकावतो आहे. अधून मधून दाट झाडीतुन, पर्वत उतारांवरून वाट काढत धावणारे शुभ्र ओहोळ दिसत आहेत. रात्री पाऊस बराच झाला. अवकाळी पाऊस. त्याचा ओलावा आणि वनश्रीचा धुंद करणारा वास लपेटत मी खिडकीजवळ उभा आहे. साथीला कोकणातला दमटपणा आहेच. श्रेया तिच्या अर्धवट पेंटींगवर तिच्या रुममद्ध्ये काम करत बसलीय. तिला अशा वेळीस डिस्टर्ब करणे मला आवडत नाही. खरे तर तिलाच. मी आपली सवय लावून घेतलीय. चित्र पुर्ण झाल्याशिवाय मला न दाखवण्याचा तिचा नियम आहे. मला चित्रांतील विशेष काही कळत नाही असे तिचे मत आहे आणि मला ते स्विकारायला तिने भाग पाडले आहे. तरीही तिची चित्रे जेंव्हा मी पाहतो, अर्थात पुर्ण झाल्यावर, तेंव्हा तिच्यातल्या प्रतिभेच्या आविष्काराने मी भारावून गेल्याशिवाय राहत नाही.
    दीड वर्ष झाले माझा मुक्काम इकडेच आहे. मस्त उत्खनन चालू आहे. रोज काहीतरी विस्मयकारक सापडते. पुरातन काळातील घडामोडींबाबत विस्मित होतांनाच त्यांची ज्ञात इतिहासाशी सांगड घालतांना दमछाकही होते. इतिहासाची पुनर्रचना करण्याची आवश्यकता आम्ही एकमेकांना पटवून देतो. तंबूतील छोटी पार्टी आणि आपापल्या तात्पुरत्या घरी.
    मी नव्या फाईंड्सवरही विचार करतो आहे. पण सुसंगत विचार करता येणे जमत नाहीहे हे लक्षात आल्यावर मी तो विचार सोडून द्यायचा प्रयत्न करतो. कोकणमधील मानवी वस्त्यांचा काळ पुरातन आहे हे खराय...त्यांची सांगड आपण अनेक मानव वंशांशी घातलीय...पण हे नवे लोक कोठून आले असतील? हे माहित असलेल्या संस्कृत्यांपैकी दिसत नाहीत. ज्या संस्कृतीशी संबंध जोडता येवू शकेल ते इकडे येणे शक्य कोटीतील दिसत नाही. हा काहीतरी इतिहासातील तुटलेला दुवा दिसतोय...पण तो जोडावा लागेल...नाहीतर कोणी अन्य बाजी मारून जायचा. (नाहीतरी आमचे शोध संस्क्रुतिष्ट जसेच्या तसे कोठे मान्य करतात? ते त्यांचे वेगळेच अन्वयार्थ काढतातच कि!)
    श्रेया हाक मारते. मी भानावर येतो. तृप्त निसर्गावर एक नजर फिरवून वळतो. श्रेया हालमद्ध्ये आलेली आहे. नेहमीसारखीच उत्फुल्ल आणि तेजाळ. बहुदा तिचे पेंटिग मनासारखे पुढे सरकतेय. मी जवळ जातो. हलकेच मिठीत घेतो. सवयीने चावटपणाही करतो. ती खारीसारखी सटकते. "चहा आणते..." ती म्हणते. किचनच्या दिशेने निघते. मी तिच्या मागोमाग.
    तिला माझे किचनमद्ध्ये येणे, तिला छेडणे आवडत नाही...किमान ती तरी असे म्हणते. तिला आवडते बहुदा असा माझा मीच समज करून घेत असतो...तिची लटकी बोलणी हसत निर्लज्जपणा दाखवत ऐकत असतो. खरे तर मला तिला असे छेडायला आवडते काय? मी तसा यावर गंभीरपणे विचार केलेला नाहीय. मी फार रोम्यंटिक आहे असेही नाही. मी तिच्यावर आजही प्रेम करतो काय या प्रश्नावरही मी फारसा विचार केलेला नाही. हा बहुदा माझा टाईमपास असावा असाही मी काहीवेळा समज करून घेतला आहे. एखादी पुरातन वस्तू, शिलालेख, सिर्यमिकचे तुकडे अथवा घरांचे गाडलेले अवशेष पाहिले कि मी जेवढा हरखून जातो तेवढा नक्कीच तिच्या सहवासात नाही हेही मला माहित आहे. 
    मग हा सारा सवयीचा भाग आहे कि काय? असेलही. काय फरक पडतो. मला ती आजही तेवढीच आवडते. माझे जग वर्तमानात आनण्याचे काम तिचेच आहे. नाहीतर मी पुरातनतेत हरवलेला. मला मित्रही नाहीत. म्हणजे माझ्या पेशामुळे मित्र बनणेही अवघड. जे आहेत त्यांना फारतर व्यावसायिक मित्र म्हनता येतील....त्यातले अनेक फार फार तर सेमिनार्सच्या वेळीस भेटनारे, एकमेकांवर कशी कुरघोडी केली याच्याच गप्पा बियर ढोसत हाकणारे. (याचा अर्थ मी बियर ढोसत नाही असा नाही.) पण ज्याला मित्र म्हणता येतील असे नाहीतच कोणी आणि मला त्याची खंत आहे असे तर मुळीच नाही.
    श्रेया माझी मैत्रीण आहे असेही नाही. तिचे जग वेगळे. माझे वेगळे. गप्पा मारायला आमच्याकडे फारसे विषय नसतात. तिने सारे नातेवाईक कधीच सोडलेले तर मी नातेवाईकांत कधीच न रमलेला. तरीही तिच्या अवतीभवती करायला मला आवडतं हे खरं...गप्पा मारायला विषय नाहीत याची खंत वाटावी अशी वेळ बहुदा त्यामुळेच आली नसावी.
    आताही मी किचनमद्ध्ये तिच्या मागेच खुर्चीवर बसलोय. ती चहा बनवण्यात मग्न. बोलत काहीच नाहीहे. मी तिच्या नितंबांकडे टक लावून पाहतोय. मला आवडते आणि हे तिलाही माहित आहे. नकळत मी चाळवतो. मनात बेफाम कल्पना दौडू लागतात. मी उठतो. मागुनच तिला मिठीत घेतो. ती किंचित वळून रागाने पाहते. "सोड मला..." मी तिच्या ओठांवर ओठ ठेवतो...मिठी अजुनच घट्ट करतो. ती चहा बनवत असतांना किंवा स्वयंपाक करत असतांना मी तिच्याशी या पद्धतीने अनेकदा रत झालेलो आहे. सोपे काम. गाऊन वर उचलायचा...तोही तिचे सारे विरोध पचवत...मग तिचा स्विकार मिळवत...कल्पनेनेच मी पेटत चाललोय....

    आयुष्य कसे असते आणि कसे असावे याचा मी कधी विचार केलेला नाही. करुन फारसा उपयोग नसतो हे मला माहित आहे. त्याउलट हजारो वर्षांपुर्वीचे जीवन कसे असेल, सामाजिक अनुबंध कसे असतील, त्यांची दैनंदिन संस्कृती कशी असेल यावर जास्त विचार करण्यात मला जास्त आनंद होतो. श्रेया माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तिचे जीवन माझ्यापेक्षा वेगळे काढून दाखवता येईल असे मला वाटत नाही. भले आमची क्षेत्रे वेगळी असतील पण आम्ही कोणाला कधी आडवे गेलेलो नाही. तिला पुरातनतेत रस नाही. भविष्यात तर त्याहून नाही. फार काय आमच्या एकुलत्या चिरंजीवांनी पुढे काय दिवे लावावेत यावरही ती कधी विचार करतांना दिसलेली नाही. "त्याला करायचे ते करुद्यात." ती म्हणते. एके काळी माझा मुलगाही पुरातत्वविद व्हावा असे मला वाटे. पण नंतर मीही तो विचार सोडून दिला. आता तो बेंगलोरला असतो. त्याने कोणती शाखा निवडली हे मला आठवूनच आठवते. तो एन्जोय करतोय ना...बास झाले. आम्ही दोघेच जीवन एन्जोय करतोय. ती तिच्या चित्रांच्या विश्वात हरवलीय तर मी माझ्या पुरातनतेत. आयुष्य असेच असावे काय? की लोक म्हणे जगतात, स्वप्ने पाहतात, जीवापाड धावतात, संघर्ष करतात...कधी जिंकतात...कधी हरतात...ते म्हणजे आयुष्य? माहित नाही. मला कधी हरावे अशी वेळ आली नाही. मी कोणाशीही स्पर्धा केलेली नाही. माझे वैचारिक विरोधक पुष्कळ आहेत. पण माझ्या नांवाचा दबदबाही आहे. देश-विदेशांत मला कार्यशाळांना निमंत्रण असते. माझी मते ऐकायला मोठमोठे पुरातत्वविद आतूर असतात. मेसोपोटेमियन संस्कृती आणि हडप्पा संस्कृतीतील काही साम्ये मी दाखवून दिल्याने मी जगभर हेडलाईन बनलो होतो. पण तसे पुन्हा पुन्हा व्हावे, प्रत्येक शोध मी प्रेसकडे न्यावा असे मला कधी वाटले नाही हेही खरे.
    परदेशाची आठवण आली म्हणून सांगतो. माझी एक स्क्यंडेनिव्हियन प्रेयसीही आहे. मी युरोपात असलो कि ती आवर्जून येते. माझ्याबरोबरच राहते. ती खरे तर तत्वज्ञानाची प्राध्यापक. तिच्यात आणि माझ्यात जुळतील असा एकही कोमन धागा नाही. मला तत्वज्ञानात काडीइतकाही रस नाही. पण ती रतीचतूर आहे. खरे तर श्रेयाशी संभोगाचे जे वेगवेगळे प्रयोग करतो ते तिनेच मला शिकवलेले आणि प्रत्येक भेटीत अजून शिकवण्यासाठी नवे असे तिच्याकडे असतेच! त्याला खरे तर प्रेम म्हणता येईल असे मला वाटत नाही. पण ओढीला प्रेम म्हणायचे असेल तर हरकत नाही. पण ती एक जीवनातील सिक्रेट मौज आहे आणि त्याबाबत मी श्रेयाला कधीच बोललेलो नही. कशाला तिला दुखवायचे?
    साईट आली. मजूर लोक घोळक्याने निवांत बसलेत. माझे सहकारी येताहेत. मला गुड मोर्निंग करत कालच्या पावसाने कसा घोटाळा केलाय हे सांगताहेत. आज काम पुढे सरकणर नाही हे जवळपास नक्कीच आहे. उन्हाने भाजून काढायला सुरुवात केलीय आणि उष्म वाफाळ हवा वैताग आणत आहे. मी जवळच्याच तंबुत जातो. कागदांच्या ढिगा-याकडे पाहतो. "तिसरा स्तर आज सुरु करणार होतो आपण..." मला माहित असलेली गोष्टच पुन्हा सांगितली जाते. मी लक्ष देत नाही. कागद आणि रेखाटणे चाळत राहतो. अधून मधून तंबुत शिस्तीत मांडून ठेवलेल्या फाइंड्सकडे पाहतो...मधेच उठतो...एखाद्याचे जवळून निरिक्षण करतो.
    "छे...हे लोक येथील कोणत्याही संस्कृतीचे घटक वाटत नाहीत."
    "समुद्रमार्गे आलेले येथे वसलेले हे लोक...पण नेमके कधी?"
    "शिट. हा परिसर गेली दोन-तिनशे वर्ष तरी वहिवाटीत नाही. आपण दोन स्तर पाहिले आहेत. अजून कार्बन डेटिंग आले नसले तरी हे वरचे स्तरच किमान चारेक हजार वर्ष जुने असतील." मी म्हणतो खरे पण अजुनही माझा विश्वास नाही.
    "बहुतेक आपण एका वेगळ्याच संस्कृतीचा शोध लावलाय...!" सहकारी म्हणतो. त्याच्या आवाजात अधीरपणा आहे. मला हे आवडत नाही. नि:ष्कर्षांवर पोहोचायची का घाई असते लोकांना? आताशी आपण उत्खनन करतोय...तिस-या स्तरात काय सापडेल हे अजून माहित नाही...त्याहीखाली एखादा थर असेल तर मग पहायलाच नको....! मी काही बोलत नाही. याक्षणी मला या संस्कृतीचा संभाव्य दुवा शोधणे महत्वाचे वाटते. मी तंबुमधून अचानक बाहेर पडतो. जवळपास एक हेक्टर जमीनीवर चाललेल्या डेक्कन कोलेजला अभिमान वाटेल अशा साइटवरून नजर फिरवतो. पाण्याची ट्रेंचेस मद्ध्ये तळी साठली आहेत. मी खेदाने नजर वळवतो. हौशी लोक उत्सुकतेने येतात असे लोक येथेही जमा आहेत. कोणाला माझ्याशी बोलावे, ही कोणती आणि कधीची संस्कृती असे विचारावे असे त्यांना वाटते. लोकांशी बोलायला मला एके काळी आवडायचे. पण अनेक मुर्ख आपल्या सहज बोलण्यावर चक्क ब्लोग लिहितात आणि माझे किरकोळ बोलणे म्हणजेच माझे अंतिम मत अशा आविर्भावात लिहितात हे लक्षात आल्यावर मी बोलणे बंद केले. स्वत: पहा आणि काय ठरवायचे ते ठरवा लेको! ते बहुदा भारतीय संस्कृतीची पुरातनता पाहुनच दि्पून गेलेले असतात...त्यात धर्मवादी असले तर मग त्यांच्या आविर्भावी मतांबद्दल विचारायलाच नको. इडियट्स...!
    मी सर्वांवर उदासीन नजर फिरवत पुन्हा तंबुत येतो. तेवढ्यात मोबाईल रिंगतो. सहसा मला जास्त फोन येत नाहीत. मी उत्सुकतेने पाहतो. डा. मोहंती. क्वचित कधी येणारा फोन मी नवलाने घेतो. नमस्कार-चमत्कार त्याच उत्साहात पार पडतात. उत्खननाच्या प्रगतीची चौकशी होते. मग ते मुद्द्यावर येतात. "तुम्हाला भेटायला एक व्यक्ती उत्सूक आहे. आपल्या क्षेत्रातील नाही. लेखक आहे. त्याला जरा मदत पाहिजे..." मी कपाळाला आठ्या घालतो. मला कोणा लेखकाला भेटायची उत्सुकता नाहीय. मागे कधीतरी एकाला त्याच्या कादंबरीत पुरातत्व विज्ञान कसे काम करते हे घालायचे होते. मी त्याच्या बिनडोक वाटलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे अति उत्साहाने दिली होती. दोनेक वर्षांनी त्याचे पुस्तक मला भेट आले. मी एवढ्या उत्सुकतेने वाचायला घेतले..पण जसजसा वाचत गेलो हिरमोड होत गेला. त्या प्राण्याला अगदी बेसिक्सही समजली नव्हती....काय काय तारे तोडले होते....माझा ऋण-निर्देश पाहून मलाच घृणा वाटली....खरे तर माझी बेईज्जती केली म्हणून खतलाच भरायला हवा होता त्याच्यावर एवढा मी संतापलो होतो. आणि त्यात अजून एक लेखक मला भेटायला येणार...छी! मी मोहंतींना सध्या व्यस्त असल्याने भेटता येणार नाहे असे सांगितले. मग ते म्हणाले लेखक बंगाली आहे...फार मोठे नांव आहे. मी म्हणतो  अहो माझी बायकोही बंगाली आहे त्यामुले बंगाली लोक मला आजिबात आवडत नाहीत! पण ते आग्रहच करतात. काय नांव आहे त्याचे? "सुदर्शन बासू". मला जरा घुसमटल्यासारखे होते. हे नांव मला बहुदा माहित आहे. हा तोच असला तर मी त्याला भेटणे कालत्रयी शक्य नाही. मी सरळ नकार देतो. संवाद तोडतो. खुर्चीवर बसतो. मला खुप उकडू लागले आहे. हवेतील उमस छळू लागलीय. हुडुत....मला भेटतोय लेकाचा...

   
    आज काही खास करण्यासारखे नाही. सहका-यांनी कालच्या फाइंड्सचे व्यवस्थित वर्गीकरण केलेय. महत्वाच्या वस्तू ट्रकमद्धे शिस्तीत लोड झाल्यात. गांवाजवळच आमचे तात्पुरते गोडाऊन आहे. तेथे त्या काही काळ राहतील. पुढे मागे संग्रहालयही बनेल. बनायलाच हवे. आम्ही एका अत्यंत अनपेक्षित संस्कृतीचा शोध लावलाय आणि तोही भारतात...कोकण किनारपट्तीवर.
    येथे थांबण्यासारखे काही नाही. आज उत्खनन होणार नाही. मजुरांना मोकळे करा. मी सांगतो आणि बाहेर पडून सरळ माझ्या कारमद्ध्ये बसतो. निघतो. मी जरा सैरभैर झालोय हे खरे आहे.हा बसू कोण आहे हे मला माहित आहे. मी कोण आहे हेही मला माहित आहे. आणि माझी बायको आधी त्याची बायको होती हेही मला माहित आहे. तो माझा मित्र होता...कि मी त्याला मित्र बनवला होता कि माझ्या गरजेमुळे मी त्याला मित्र बनवले होते? आता मला फारसे आठवत नाही. पण त्याला मी मित्र बनवले होते. असेल. मी त्याच्या बायकोला पळवले. कि ते अपरिहार्य असेच होते? जग तरी तसेच समजत असेल हे खरे. मी त्याला नंतर कधी भेटलो नव्हतो. श्रेयाजवळ कधीच त्याचा विषयही काढला नव्हता...मीही कधी चुकुनही तिला तिच्या पहिल्या लग्नाची आठवण करून दिली नव्हती. किंबहुना न बोलताच आमच्यात तो अलिखित करार झाला होता आणि गेली वीसेक वर्ष तो पाळलाही होता. तो माझा द्वेष करत असणार हे तर उघड होते. पण मला त्या ची पर्वा नव्हती. श्रेयाशी त्याचे झालेले लग्न हा एक अपघात होता...नाईलाजाचा मामला होता. कि आपण तसे समजत होतो? माहित नाही. कधी विचारच केला नाही. करण्याची गरजही भासली नाही. आपण तिच्यात तेंव्हा दंगच एवढे होतो! ते जावुद्या. या हरामखोराला मला आताच का भेटावे वाटतेय? असेल तो मोठा बंगाली लेखक आता. त्याला पुरातत्वीय माहितीच हवी आहे तर देशात शेकडोंनी पडलेत...मुद्दाम. बहुदा तो मला मुद्दाम भेटू इच्छितोय. मला अपराधी वाटायला लावायला. हुडूत. मी श्रेयावर प्रेम करतो. मी तिच्याशी लग्न केलेय. तिने तुझ्याशी रितसर घटस्फोट घेतलाय. मी तुला भेटणार नाही. कदापि नाही.
    श्रेयाला सांगावे काय?
    नकोच! कशाला तिला यात ओढायचे? मी कार वळणावर थांबवतो. छानसा ओढा दाट झाडीच्या दाटीतून ओसंडून वाहतोय. त्याचा निनाद ते गूढ जग व्यापून उरलाय. आजवर कधी न केलेले विचार अकारण उमदळू लागलेत. साले डोके दुखतेय. सवय नाही ना! बहुदा त्याच्या मनात अजुनही तिच्यावर प्रेम असावे. तिला भेटण्यासाठी ही मला भेटायची शक्कल. पोरकट माणूस! किती महिने ती त्याच्यासोबत राहिली होती...दोनेक तर नक्कीच. मी त्याच्या घरी खरे तर तिलाच भेटायला जायचो तेंव्हा तिला आनंदी पाहिलं कि मनात नकळत त्यांची रात्र कशी गेली असेल असा विचार, कितीही झटकायचा प्रयत्न केला तरी, यायचा हे खरे. ती माझ्यावर प्रेम करते तर तेथे आनंदी का असा प्रश्नही छळायचा हे खरे. पण मी तरीही फार खोलात जात नव्हतो. घरी नाही तर बाहेर कोठे ना कोठे भेटत होतो. माझ्या रुमवर नेवून मनमुक्त शृंगारही करत होतो. कधीकधी त्या आवेगात "मी दुस-याची बायको भोगत आहे..." या विचाराने अधिकच चेकाळत तिला अजून आवेगाने भोगत असे हेही खरे. पण ते विचार त्याच वेळीस. आम्ही शांत झालो कि तिच्यावरील अनिवार प्रेमाने ओथंबलेलो असायचो...आवदत नसली तरी तिच्या प्रेमाखातर चित्रांच्या प्रदर्शनांना भेटीही द्यायचो....तिचीही भव्य प्रदर्शने भरवेल असे मोठ्या प्रेमाने बोलायचो...तिच्या डोळ्यांत उमदळणारा आनंद मला हरखवून टाकायचा. तिचा सहवास मला अतिप्रिय होता.
कि त्यात अजून काही होते? जगतांना ज्या गोष्टी समजत नाहीत त्या जगून झाल्यावर नंतर काय समजणार? आपण संस्कृत्यांचे उत्खनन करतो आणि त्या संस्कृतीतील लोकांच्या जगण्याचा अंदाज बांधतो...तो तेवढा खोटा तेवढाच हा अंदाज खोटा नव्हे काय? ओढा वेगाने खळाळतोय. पाण्यावर नजर स्थिर राहत नाहीहे. आपण शोधलेल्या संस्कृतीचे लोकही येथे येत असतील. ते पशुपालक होते हे तर मिळालेल्या पुराव्यांवरून उघड आहे. तेही या ओढ्याकाठी आले असतील. त्यांच्या पाउलखुणा येथे कोठेतरी उमटल्या असतील. पण ते कोणत्या भाषेत बोलत असतील? त्यांच्यात विवाहसंस्था असली तर ती नेमकी कशी असेल? या ओढ्याकाठी किती शृंगार झडले असतील? श्रेया त्याच्या मिठीत वासनेने कुंद होत त्याला कसा प्रतिसाद देत असेल?
   
    मी निघतो. हा ओढा दुष्ट आहे. ही शांतता जीवघेणी आहे. मोहंती भडव्याला कोणी सांगितले होते मला फोन करायला? साले फडतूस बिनडोक या लेखकांची जात. आणि त्यात हा बासू...कुत्र्याची अवलाद...लायकी होती का रे तुझी श्रेयाशी लग्न करायची? तिच्या परिस्थितीचा फायदा मिळाला तुला...हरामखोर...पाने उपहासाने सळसळत नाहीहेत ना? मी कारमद्ध्ये बसतो. जरा वेळ शांत व्हायचा प्रयत्न करतो. चला निघुयात आता. श्रेयाबरोबर अरण्यात फिरुयात जरा...पण नेहमीसारखे जमेल आपल्याला? कशाला आपण त्या आठवणी काढतोय? नकोच त्या!

    श्रेया तिचा फोल्डिंग आयझल घेउन अंगणातच काहीतरी रेखाटण्यात मग्न आहे. उन्हात त्या लालसर बंगल्याच्या पार्श्वभुमीवर तीच चित्रासारखी दिसतेय. माझ्या आत येणा-या कारकडे एक उडती नजर टाकत ती पुन्हा झुकुन तिच्या कामात मग्न. मी कार पार्क करून तिचाजवळ येतो. थबकतो. पहिल्यांदाच काय बोलावे हे समजत नाहीहे. तीही आत्ममग्न. मी अचानक पुढे झुकतो, तिला जवळ ओढून घेतो, माझ्याकडे वळवतो...ओठांवर ओठ ठेवतो आणि विचारतो..."श्रेया, माझ्यावर प्रेम आहे ना तुझे?" ती मागे सरते. केस नीट करते. ओठांना किंचित मुरड घालत हसते आणि उलट विचारते, "याचे उत्तर कधीही देणार नाही...जा आत आणि मला काम करू दे..." मी किंचित हिरमुसतो. वळतो. पण पाय निघत नाही. तिच्याशी खूप बोलावे वाटतेय पण काय हेही समजत नाही. ती आपलीच आहे हे ठाम माहित आहे. पण काय सांगावे? समजा तिला तो माझ्याशी झालेल्या लग्नानंतर कधी गुपचूप भेटला असेल तर? तिलाही कधी त्याचीही ओढ वाटली असेल तर? पुन्हा एकदा त्यांचा शृंगार रंगला असेल काय? तसे झाले असेल तर त्याला तिला पुन्हा मिठीत घेतांना नेमके काय वाटले असेल? कि तसे नाहीच...मीच कल्पनांचे पतंग उडवतोय? पण अशक्य काय आहे यात? वीसेक वर्षांने जो आठवण काढतो तो....हे पुरातत्व वगैरे सारे झुठ!
    मी हालमधुनच पुन्हा वळतो. ती पाठमोरी...तिचे प्रमाणबद्ध नितंब...सकाळची आठवण येते...पण याक्षणी चावटपणा करायची कसलीही इच्छा होत नाही. तिला निरखत बसतो. स्त्रीचे मन समजू शकेल अशी जगात एकही शक्ती नाही...काय चालले असेल तिच्या मनात? एवढी वर्ष झाली. तिला त्याची आठवण आलीच नसेल? कसे शक्य आहे? शेवटी दोन महिने का होईना ते एकत्र राहिलेत...रात्री घालवल्यात...एकमेकांना भोगलेय....कसे भोगले असेल? तिला ते स्पर्श किती आवडत असतील? त्याच्याशी रत होतांना तृप्ततेचे किती हुंकार उमटत असतील? पुढाकर कोण घेत असेल? त्याचे आघात झेलतांना ती काय चित्कारत असेल? नकळत मी इथित होतोय. ती कल्पना करुनच. रागही येतोय. असुयाही वाटतेय...आणि तरीही तिला भोगायची इच्छाही प्रबळ होतेय. मी विकृत होतोहे काय?

    * * *

    ही संस्कृती वेगळी आहे हे आम्हाला ठामपणे माहित आहे कारण तिच्याशी समांतर संस्कृती आम्हाला अन्यत्र सापडलेली नाहीहे. थोडीफार साम्ये असलेली एकच संस्कृती आहे ती म्हणजे पोलिनेशियन. पण त्या संस्कृतीचे आणि येथे सापडलेल्या संस्कृतीचे टायमिंग म्यच होत नाही. कसे शक्य आहे? या अवशेषांवरून पहिल्याच...म्हनजे अगदी अलीकडच्या थराचा कालच किमान तीन-साडेतीन हजार वर्ष तरी मागे जातोय. दुस-या आणि पहिल्या थरात किमान आठशे ते हजार वर्षांचे अंतर स्पष्ट दिसतेय. कार्बन डेटिंगने ब-यापैकी अचुक समजेल पण तरीही आपले अंदाज काही शतकांचा फरक सोडला तर आजतागायत चुकलेले नाहीत. पोलिनेशियन संस्कृतीचे सर्वात पुरातन अवशेष फारतर तीनेक हजार वर्ष जुने आहेत. आणि पोलिनेशियन मुळात कधी भारतात आले असण्याची शक्यता नाही. हा सारा गोंधळ आपण निस्तरु...पण आपल्याला आजवरच्या गृहितकांना धक्का देणारे सापडलेय हे नक्की. मला घाई आवडत नाही. जगात वरकरणी साम्ये असलेल्या संस्कृत्या सापडल्या म्हणजे त्या कोणेतरी एकाच समाजगटाशी संबंधित होत्या असे मानता येत नाही हे मला माहित आहे. तिसरा स्तर उलगडायला उद्या सुरुवात होईल. श्रेया बाजुलाच उभी आहे. कसे लक्षात आले नाही? माझ टेबल नेहमीच अस्ताव्यस्त असतो. ते तिला आवडत नाही आणि मी तो तिला कधी आवरुही देत नाही. माझ्या गोष्टी मलाच सापडतात असा माझा दृढ विश्वास आहे. अनेकदा त्या गृहितकाला तडा जातो हेही खरे आहे....पण तरीही. मे तिच्याकडे प्रश्नार्थक पाहतो. "तू विनोदी दिसत होतास." ती हसत म्हणते. "असेल!" मी उडवून लावत म्हणतो. हा नेहमीचा संवाद आहे. मी काम करण्यात मग्न असलो कि जत्रेत हरवलेल्या लहाण मुलासारखा वेंधळा दिसतो असे तिचे जुने मत आहे. रात्र होत आली आहे. तिने नेहमीप्रमाणे मासे केले असणार याची मला खात्री आहे. प्रश्न असलाच तर कोणते आणि कसे एवढाच! ती पक्की मच्छीखाऊ आहे!
    म्हणजे मला आवडत नाहीत असे मुळीच नाही. "तुझ्यामुळे मीही अर्धा बंगाली झालोय" असे मी तिला चेष्टेने म्हणालो खरे पण विसरु आलेल्या बासुला आठवणीत डोकावायची काय गरज होती? साला तोही मच्छीखाऊच असणार की! येथेही आपल्याला इस्टर बेटांसारखे खडकांत कोरक्लेले अर्धाकृती माणसांचे पुतळे सापडले तर काय बहार येईल? सारे जग हादरुन उठेल. पण काळ म्यच होत नाही. तसे पुतळे येथे सापडू शकत नाही. वरकरणी साम्ये म्हणजे येथे कधीकाळी पोलेनिशियन राहून गेले असतील असे तर मुळीच नाही. यथेच ते किमान दोन-तीन हजार वर्ष स्थायी झालेले दिसतात. कोकणच्याच संस्कृतीत या संस्कृतीचे काही अवशेष दिसतात काय हे नंतर शोधावे लागेल. अर्था ते काम समाजशास्त्रज्ञ करत राहतील. आपले काम फक्त उत्खनन. श्रेया अजुनही माझ्याकडेच बघतेय. जरा गंभीर दिसतेय. मी माझ्या विचारांच्या दलदलीतून मोठ्या कष्टाने बाहेर पडतो. "काय गं? कसला विचार करतेयस?" ती खाली झुकते. माझ्या कपाळांवर ओठ ठेवते. म्हणते, "आज तुझा मुड चांगला का नाही? काम मनासारखे पुढे सरकत नाहीहे काय?" नाही. तसं नाहीहे. पाऊस पडला ना काल! काम ठप्प. जरा वैतागलोय. उद्या पुन्हा सुरू! आज पाऊस येईल असे दिसत नाही. पण उकडतय खूप! येथे ए.सी. नाहीय. तात्पुरत्या भाड्याचा हा बंगला. तरी दीड वर्ष होत आले कि! आक्खं टेकाड साफ करायलाच आठ महिने गेले. पंखा फुल्ल वेगात भिरभिरतोय खरा पण उष्मा काही केल्या जात नाही. श्रेयाला मी नकळत जवळ घेतो. तिच्या नितंबांचा मऊसर स्पर्ष मला हवासा वाटतो. तिच्याकडे पाहतो, विचारतो..."ए, तू माझ्यावर प्रेम करतेस ना गं?" ती आवेगाने माझे चुंबन घेते. माझ्या छातीवरुन हात फिरवते. ती मुडमद्ध्ये आलीय हे मला समजतं. मलाही राहवत नाही. आणि बेडचीही गरज नाही. बाजुच्याच कमरेएवढ्या उंचीच्या कपाटावर तिला बसवतो. ती तिचा गाऊन काढून भिरकावते. मी तिला जवळ घेऊन सर्वत्र कुरवाळत राहतो, ओलावतो....तिच्यात शिरतो...तिचे हुंकार मला अधिक तृप्त करतात. मनात येणारे विकृत विचार हटवायचा मी प्रयत्न करतोय. पण जमत नाही. माझ्या आत नेमकं काय दडलय आणि का हे मला उमजत नाहीहे. तशे वेळच कधी आली नव्हती म्हणा! पण आज आलीय. हरामखोर मोहंती आणि तो बासू...त्याला मीच का आठवावा? नेमके काय कारण असेल? विचार करायलाच हवा. माझे आघात मिळमिळीत होऊन जातात. विझतात. माओरी लोकांचाही विचार करायला पाहिजे. विलक्षण लोक. पण हे पोलिनेशियन लोक तेथे आले कोठून? आणि इकडे कसे पोहोचले असतील? पण वरकरणी साम्ये दिसताहेत म्हणजे आपणही नि:ष्कर्षांची घाई तर करत नाहीहे ना? नाही. विचार तर सर्व अंगांनी केला पाहिजे. बासुबरोबर श्रेयाची पहिली रात्र कशी गेली असेल? ती माझ्याकडे विचित्रासारखी पाहतेय. उठते. कपडे गोळा करत माझ्या समोरच घालते. केस व्यवस्थित करते. मंद हसते आणि काही न बोलता निघून जाते. आज फसलेच सारे. पण काय करणार? हा कसला तरी पाठलाग चाललाय आणि खरे तर काय गरज आहे त्याची? श्रेया माझी आहे. तिचे माझ्यावर अपार प्रेम आहे. माझ्या सर्व भाव-भावना तिला समजतात. मी का उगा भलते विचार करतोय?

* * *

    पोलिनेशिया हा एक द्वीपसमूह आहे. सनपूर्व १८०० च्या आसपास ते लोक ताहिती, स्यमोआ, माओरी, टोंगान्स वगैरे गटांत अनेक बेटांवर विखुरलेले. हे लोक तिथे मुळात तैवानमधून आले असावेत असा एक तर्क. पण तर्क हे फेटाळण्यासाठीच असतात. नंतर ते मुळचे तेथिलच असाही सिद्धांत आला. जेनेटिक इंजिनियरिंगही डावाला लावले गेले. हे अजून बाल्यावस्थेतील शास्त्र. ठोस सबूत नव्हे. पण प्रत्येक प्रकारच्या विचारगटाला तुटके का होईना बळ द्यायची शक्ती त्यात निर्विवाद. पण येथे समोर पुरातन कोकणी (किंवा असेल तिथल्या) संस्कृतीची चिन्हे दिसताहेत त्यात काही साम्ये आश्चर्यकारक आहेत हे समोर येतेय. मी भाजलेल्या लाल मातीच्या भांड्याच्या तुकड्यांकडे नीट पाहतोय. ती नक्षी आणि चिन्हे वेगळी आहेत. पोलिनिशियनांच्या गुहाचित्रांसारखीच काही तंतोतंत. अनेक संस्कृत्या स्वतंत्रपणे उत्क्रांत झाल्या हे मान्य केले तरी एवढा तंतोतंतपणा आढळणे अशक्य. पण पोलिनिशियनांचा इतिहास वेगळा आहे. स्वतंत्र आहे. त्यांची वंशशाखाही वेगळी. असो. उत्खनन आज वेग पकडतय. मी अजून नवीन काय समोर येतेय त्याची वाट पाहतोय. अधून-मधून साईटवर चक्करही मारतोय. पर्यवेक्षक आपापले काम शिस्तीत करताहेत. येथे नाजुकपणा हवा. एखादी मोलाची चीज उध्वस्त होऊ नये, मग घिसाडघाई कशी चालेल? "साहेब, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलय..." मी वळतो. त्याला न ओळखणे शक्यच नव्हते. एवढा काळ वाहून गेला असला तरी तोही शेवटी एके काळी मित्रच होता माझा. त्याच्या अनेक कथा त्याने मला हिंदीतून ऐकवल्याही होत्या. नंतर तो इंग्रजीतुनही लिहायला लागला हे मला इंटरनेट सर्चवरुन समजलेले होतेच. असा सर्च श्रेयाही अधून मधून घेत असणार या जाणीवेने म्हना कि भ्रमाने म्हणा, मी शिळकलो होतोच. तर तो समोर होता आणि हसत होता आणि मला काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नव्हते. मी कोरडा राहिलो. हाकलून देण्यचा विचार तसाच विरला. पण कशी प्रतिक्रिया द्यावी? कि अपराधी वाटतय आपल्याला...त्याची बायको पळवल्याबद्दल...त्याचे तिच्यावर खूप प्रेम होते हे उघडच आहे...ते प्रेम तो तरी कसा विसरला असेल? मीच स्वार्थी बनलो कि काय? पण श्रेयाचे माझ्यावर प्रेम होते आणि आहे. मी तिला फोर्स केले नाही. तीच माझ्याकडे आली आणि तुझ्याबरोबरच रहायचे म्हणाली. मलाही हे अनपेक्षीत होते. पण मी तिला जावू दिले नाही हेही खरे आहे. आम्ही राहिलो. तिने घटस्फोट घेतला. आम्ही लग्न कलं. एवढच. या काळात त्याला काय वाटलं असेल याचा विचार करायची काही गरजही नव्हती. केलाही नाही.
    मी तंबुत शिरतो. तो पाठोपाठ येणार हे मी गृहितच धरलेले. तो आला. मी त्याला "बस" म्हटलो नाही. पण तो लोखंडी खुर्चीवर बसला. "माफ करा, मोहंतींनी सांगुनही तुम्ही भेट दिली नाही त्यामुळे डायरेक्ट आलो. माझा तुम्हाला भेटायचा हेतू खरेच पूर्ण अक्यडमिक आहे. आणि संपुर्ण भारतात मला याबाबत मार्गदर्शन करू शकेल असे दुसरे कोणी नाही. मी अनेकांना भेटलो, पण ते किती उथळ आहेत हे दिसून आले. आपण पहिल्यांदाच भेटत आहोत. जुने जग मी कधीच हुगळीत विसर्जित केलेय. तर मी एक नवी कादंबरी लिहितोय. म्हणजे सध्या फक्त रिसर्च चालू आहे." मी काहीच बोलत नाही आणि त्याच्याकडे पाहतही नाही. हे सारे ढोंग आहे हे समजतेय मला. "मी प्रास्तविकात जास्त वेळ घालवत नाही. येथे तुम्हाला जी संस्कृती सापडलीय ती वेगळी आहे हे मला नेटसर्च मद्ध्ये समजलं. तेंव्हाच माझ्या आशा जरा पल्लवीत झाल्या. नाहीतर काय होतं कि कल्पना या कल्पनाच राहून जातात. पण वास्तवाचं बळ मिळालं कि लेखनाचं खरं समाधान लाभतं. नाही का?" त्याचा प्रश्न मी निरुत्तरीत ठेवतो. नाहीतर वास्तव समजून हा कोणते दिवे लावणार आहे? "तर मी गेल्या वर्षी ताहितीला फिरायला गेलो होतो. ब-याच बेटांना भेटी दिल्या. आता जुनी पोलिनेशियन संस्कृती फारशी उरलेली नाही. जी आहे ती एखाद्या म्युझियमसारखी. वसाहतवाल्यांनी वाट लावलीय तिची. पण आहे रहस्यमय आणि गूढ. खूप फिरलो. त्यांचे पुरातत्वीय अवशेषही पाहिले. हजारो वर्षांपुर्वी हे लोक त्या छोट्या छोट्या बेटांवर कसे आले असतील याच्या शास्त्रीय आणि लोकरंजक थिय-याही वाचल्या. ते लोक उत्कृष्ठ दर्यावर्दी असले पाहिजेत याची खात्रीही पटली. पण काही मानववंश शास्त्रज्ञ म्हणतात हे लोक बाहेरून आलेले नाहीत. तेथीलच मुलनिवासी. नशीब ती बेटे भारताएवढी नाहीत नाहीतर मुलनिवासी विरुद्ध आक्रमक असा मस्त वाद पेटला असता. ते जाऊद्या. वसाहतवाल्यांनी त्यांचे अस्तित्व संपवत आणले हेही खरे. पो आणि आटुआ, त्यांच्या पुर्वज देवता, कोठे लोपत चालल्यात समजत नाही. पण या लोकांनी मला मोहात पाडले हे खरे,." हे सांगायला तू येथवर आलास? खड्ड्यात गेली तुझे कादंबरी. मला तुझ्यासमोर बसवत नाहीहे.
    हवा अधिकच दमट झालीय. वारं वहायचं थांबलं कि विचारायलाच नको. बाहेर मजुरांचा कोलाहल, मधुनच पर्यवेक्षकांचे ओरडणे दाटून येतेय. मला बाहेर जावसं वाटतय. पण कोणी सायबांचा पाव्हणा आलाय म्हनून नारळपाणी आणले असेल तर त्या बिचा-यावर ओरडण्यात तरी अर्थ काय? मी अडकत चाललोय. तो नारळपाणी पिऊ लागतो. "मला प्रश्न पडला तो हा कि हे लोक अथांग सागर पार करत प्रशांत सागरातील या इवल्या बेटांवर आले तरे कोठून? नाही...मला आउट ओफ तैवान थियरी माहित आहे. जवळचा प्रदेश म्हनून तसा अंदाज बांधला जाणं यात नवल नाही. पण आता तो सिद्धांत फारसा मान्य होत नाही. ते दक्षीणपुर्व आशियातून आले असावेत असाही तर्क आहे. तर ते तेथलेच मुळचे असाही तर्क आहे. असुद्यात. ते महत्वाचे नाही. माझा अंदाज होता, समजा पोलिनिशियन लोक भारतातुनच तेथे प्राचीन काळी गेले असले तर?"
    हसू कि रडू या मुर्खावर? शास्त्र अशा कल्पनांच्या भरा-यांवर चालत नाही. "आर्य मुळचे येथलेच. येथुनच ते जगभर गेले असे काही हिंदुत्ववादी सांगतात. फ्यंटसी म्हनून असल्या कल्पना ठीक आहेत, पण त्या ख-या नसतात." मी कोरडेपणे आणि त्याच्याकडे न पाहता बोलतोय.
    "तो भाग वेगळा आहे. मुलात आर्य हा कोणी वंश होता यावरच कोणाचा विश्वास नाहीय. पण ते जाऊद्या. आपण येथे प्रत्यक्ष पुराव्यांबद्दल बोलतोय. येथे तुम्हाला जी संस्कृती सापडलीय ती काही अंशी तरी पोलिनिशियन संस्कृतीशी जुळतेय असे तुमचे प्राथमिक अंदाज आहेत. मी ऐकलय हे, खरे ना?" हरामखोर मोहंती. प्राथमिक अंदाज आणि सर्व संशोधन करून निघणारे नि:ष्कर्श यातील फरक त्या हरामखोराला अजून समजत नाहीत? "आम्ही अद्याप कसलाही अंदाज बांधलेला नाहीय." मी तेवढाच कोरडा राहतो. माझा संतापही आवाजातून व्यक्त होत नाहीय. "मला खरेच मदत हवी आहे." तो आर्जवाने म्हणतो. "मला ही साम्ये समजावून घ्यायला आवडेल. अगदी थोडकी असली तरी चालतील. माझ्याजवळ तेथील बेटांवर जेवढे अवशेष मिळालेत त्यांचे फोटोग्राफ्स आहेत...व्हिडियोही. मला येथे जे सापडलेय ते तुम्हीच दाखवू शकता. मी फक्त फोटो घेईल. मला कादंबरी लिहितांना तुलना करता येईल आणि..." मी प्रथमच त्या मुर्खाकडे पाहतो. माझ्या नजरेत मलाही नकळत तिरस्कार भरलाय. यासाठी त्याला माझी भेट हवी होती. "येथे अन्य कोणालाही कसलाही फोटो -व्हिडियो काढता येत नाही. तशी परवानगी तुम्हाला दिल्लीवरुन मिळाली तरच...अन्यथा नाही. हा सारा संरक्षीत एरिया आहे." तो माझ्या डोळ्यांत पाहतो. पुन्हा हसतो. मला त्याचे थोबाड फोडावे वाटतेय. "मी याचा दुरुपयोग करणार नाहीहे..." "मी अशी परवानगी देवू शकत नाही." "काय बिघडणार आहे? मोजके तुमच्यासारखे पुरातत्वविद सोडले तर कोणाला कळतोय त्यांचा अर्थ?" मी प्यत्युत्तर देवू इच्छितो. देत नाही. उठतो. तंबुत ठेवलेल्या काही अवशेषांकडे जातो, न्याहाळत बसतो. येथे राहणारे लोक, कोणीही असोत, कुंभारकामात त्यांनी चांगलीच प्रगती साधली होती हे नक्कीच. ही भांडी चाकावर घडवले गेलीत हे स्पष्टच आहे. त्यापेक्षा त्यांच्य कुंभारकामाच्या एका भट्त्तीचे सापडलेले अवशेष. तशा भट्ट्या जगात अन्य कोठे सापडल्याची नोंद नव्हती. या भागातील लोहयुक्त तांबड्या मातेचा त्यांनी फारच कौशल्याने उपयोग करून घेतला होता. कदाचित त्यांनी लोहही शोधले असावे अशी शंका यावी एवढे अस्पष्ट पुरावेही आम्हाला मिळत होते. भारतात लोहयुग ब-याच उशीरा अवतरले असाच आजवरचा समज होता. त्या समजाला येथील पुरावे उध्वस्त करत होते. मग पोलिनिशियनांचे येथे काय काम? ते किमान ज्या वेळीस येथे संस्कृती आकारत होती तेंव्हा ते पोलिनिशियात नव्हते. ते उत्कृष्ठ दर्यावर्दी होते. हा येडचाप म्हनतो, जर ते येथून गेले असतील तर? हाही हिंदुत्ववाद्यांसारखा "सर्व काही मुळचे भारतीय" या मताचा दिसतोय. मुर्खा, जेनेटिक शास्त्र बाल्यावस्थेत असले तरी मुख्य गाभा चुकत नाही. वांशिक दृष्ट्या पोलिनेशियन आणि भारतीय एक असु शकत नाही...किमान तीन-चार हजार वर्षांत कितीही संकर झाले तरी एवढा फरक पडत नाही. आणि भाषेचे, त्यांच्या धर्मकल्पनांचे काय करणार आहेस तू? त्यांच्या भुतांच्या कल्पना तरी तू नीट अभ्यासल्यास काय?
    तो माझ्या जवळ येत त्या वस्तूंकडे अनिमिषपणे पाहतोय. खाली झुकून नारळांच्या करवंटींपासून (आता मूळ स्वरुपात नसलेल्या) बनवलेल्या शिंकाळ्यासारख्या अवशेषाला स्पर्श करतोय. असा स्पर्ष प्रत्येक नवशिक्याला आवडतो. मलाही आवडायचा. पुरातन वस्तुला हात लावणे म्हणजे जणू त्या काळात जाणे. मी आक्षेप घेत नाही. अशा अनेक वस्तू आम्हाला मिळाल्यात. "अशाच वस्तू मी कूक आयलंडवर संग्रहालयात पाहिल्यात." तो म्हणतो. मला ते माहित आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या देवतांचे दगडी नसले तरी ब्रोंझमद्ध्ये बनवलेले आकार पाहिले आहेत. पण त्याने नेमके काय सिद्ध होते? ज्या बाबी कदापि पोलिनेशियन मुळाच्या असू शकत नाहीत अशाही येथे अनेक सापडल्यात. "माझी कथा साधारणपणे अशी आहे. पुरातन काळ. कोकणात पुरातन मानव दहा-बारा हजार वर्षांपुर्वी अवतरला त्यांचेच वंशज. निसर्गाला अनुसरून वाढलेली संस्कृती. आदिम व्यवस्था. प्राथमिक स्थितीतील भाषा. काही हजार वर्षांनंतर उद्भवलेली भौगोलिक स्थिती...म्हणजे सागराची पातळी वाढत जाणे. काही लोक येथून जगण्यासाठी सागरात उतरतात. भरकटतात. अनेक संघर्ष होत ते प्रथम स्यमोआ बेटावर उतरतात. पुन्हा आपापसात संघर्ष होत ते अन्य बेटांवर विखरत राहतात. वगैरे. मनुष्य आपले मुळ दंतकथांतुन अथवा पुराकथांतून जपतो. आटुआ हा त्यांचा साहसांचा देव. मला वाटतं ज्याने येथल्या लोकांना तिकडे नेले त्या पुर्वजाचेच हे दैवतीकरण असावे. पण ते महत्वाचे नाही. मला ठोस आधार हवा. मला जर भारत आणि पोलिनेशिया यातील पुरातन सांस्कृतिक बंध दाखवता आला तर..." "कशासाठी?" मी तुटक. मला त्याचा कंटाळा येवू लागलाय. "कशासाठी म्हणजे? माझ्या कादंबरीची थीम जास्त थरारक आणि रोचक बनेल. कादंबरी ही शेवटी फ्यंटसी असली तरी त्यात जेवढी तथ्यात्मकता आणता येईल तेवढी उत्तम. नाही का? मुळत तुमचे हे फाईंडिंगच एवढं एक्सायटिंग आहे कि लोक तुटून पडतील त्यावर!"
    कादंबरीकार यापेक्षा अधिक काय विचार करू शकतो? त्याला आपली कादंबरी खपावू बनली पाहिजे. मग त्यासाठी सत्याचे बळी दिले तरी चालतात. अर्थात काही शास्रज्ञ म्हणवणारे तरी वेगळे काय करतात म्हणा! असो. तो त्याचा धंदा आहे. हा कधी कटेल? "मला सारी साईट पहायचीय...पाहता येईल?" मी बोलत नाही. तंबुबाहेर येतो. माझा एक सहाय्यक बाजुलाच टेबल-खुर्ची मांडुन वस्तुंच्या याद्या करण्यात मग्न आहे. मी त्यालाच कामगिरी देतो. तो उत्साहाने पाव्हण्याला घेऊन निघतो. पाव्हण्याचे "थ्यंक्स" माझ्या कानावरून जातात.

* * *

    येथे थांबावे काय? प्रश्न छळतो खरा. प्रश्न कसलाच नाहीय, पण मला त्याचे येथले अस्तित्व छळतेय. हा माझ्या बायकोचा नवरा होता. तिच्याबरोबर हा अनेकदा झोपलेला आहे. तिनेही त्याचा प्रणय एन्जोय केला आहे. साथ दिली आहे. मला त्यांच्या बेडरुममधील चित्रे दिसू लागतात. ते अश्लील संवाद कानावर आदळू लागतात. ते...ते....मी डोळे मिटून घेतो हे खरे आहे, पण जे मनातच आहे ते अदृष्य कसे होणार? ते अधिकच ठळक होत जाते. पोलिनेशियन कसा शृंगार करत असतील? त्यांची कुटूंबव्यवस्था नेमकी कशी असेल? ते स्त्रीसत्ताक असतील कि पुरुषसत्ताक? अजून ते तितके स्पष्ट नाही. पण त्यांच्यात काहीतरी व्यवस्थ होती. मात्रुदेवतांपेक्षा पुरुष देवतांच्या प्रतिमा जास्त अहेत...पण त्यामुळे ते पुरुषसत्ताकच होते हे कसे सिद्ध होणार? हा मुद्दाम आलाय. किंवा मी त्याला अजून जगजहीर न केलेल्य उत्खननांतील अवशेषांचे फोटो काढू देईल असे वाटलेच कसे? काही पुरातत्वविद प्रसिद्धीच्या सोसापायी तसे करतात हे खराय....पण बेकायदेशीर ते बेकायदेशीर. हा...डोळ्यांनी पहा काय पहायचे ते...श्रेयाला नाही पाहिलेस? पुरती विवस्त्र आणि अंतरंगांसहित? पाहिलेच असनार. बायको होती ना तुझी. मीही पाहिले. हजारदा आणि उत्तेजितही झालो तेवढ्याचदा. तुही झाला असशील. येथे कशाला आला आहेस? संस्कृत्यांची खुळे जोवर तथ्यात्मकता असते तोवर ठीक आहेत. त्यावर कल्पनांच्या भरा-या सुरू झाल्या कि त्यांची वाट लागते. लोकांवर याच कल्पनांचा पगडा बसतो. राजकारणावरही. मग आम्हालाही काही नि:ष्कर्श बदलायला सांगितले जाते. मी असे कधीही मान्य केलेले नाही. पण त्यांना फरक पडत नाही. त्यांच्याकडे भाडोत्री लोकांची कमी नसते. "भारतात सापडली पोलिनिशियन संस्कृतीची मुळे!" ही बातमी जगभरची हेडलाईन बनेल. कोणीतरी रातोरात फेमस बनेल. च्यनेल्सवर चर्चा घडतील. राष्ट्रवाद्यांत उन्माद उसळतील. पण खरे काय असते? संस्कृत्यांचे मूळ शोधणे येवढे सोपे असते काय? येथे ती कोठून आली असे विचारले तर मग काय उत्तर असेल? अजून एखादी साईट बाजुलाच सापडली (आणि तशा शक्यता आहेत. आम्ही त्यांचेही सर्वेक्षण करतोय!) आणि तेथे काही वेगळेच सापडले तर? मी येथे थांबावे कि निघून जावे घरी? पण श्रेयाशी तरी काय बोलणार? तिला सांगावे काय कि तुझा एक्स मला आज भेटला म्हणून? ....काय प्रतिक्रिया येईल तिची? त्याच्या आठवणी दाटून येतील कि विसरली असेल सारे ती? स्त्रीया आपले पहिले प्रेम...(कि पहिला संभोग?) सहजी विसरत नाहीत असे म्हणतात....अवघडच आहे सारं! जावे तरी कोठे? का हायवेवरील एखादा बार गाठावा? छे. ते काही खरे नाही. काय विचित्र झालोय मी? तेवढ्यात माझा एक सहकारी येतो. चेहरा अत्यंत उत्फुल्ल. "सर, आपल्याला काहीतरी सापडलय...चला ना,...." मी त्या उत्साहात काही वेळ विरून जातो. त्याच्या मागोमाग. ट्रेंच पाचजवळ पोहोचतो. सारे मजूर काम थांबवून उभे. मला वाट करून देतात. सहकारी जोडीला आहेच...आणि समोरच्या घोळक्यात अग्रभागी बासू.
    मी एवढा एक्सायटेड नाहीहे. मलाही हे जरा अनपेक्षीत असले तरी उत्खननांत मी आजवर एवढ्या अनपेक्षिततांचा सामना केलाय कि मला अनपेक्षितच अपेक्षित असते. अर्धवट उकरल्या गेलेल्या दहा-बारा फुट लांबीच्या त्रिकोणात पडलेल्या अखंड दगडापासून तयार केलेल्या खांबांची ती रचना आहे. खांब काही ठिकाणी काही अंशी भग्न झालेले आहेत, पण त्यांची एके काळची अभंगता सहज दिसू शकते. त्रिकोणाच्या डोक्यावर एक स्तंभशिर्षासारखी कसली तरी आकृती आहे. दोन मजूर ब्रशेसनी त्यावरील चिखल-माते साफ करत आहेत. काही मजुरांने पाण्याच्या बादल्या भरून आणून ठेवल्या आहेत. "आज पुरे..." मी म्हणतो. बासू माझ्याकडे आश्चर्याने पाहतो. खरे तर ते स्तंभशिर्ष त्याला नेमके कशाचे आहे हे पहायचेय. आणि मी ते त्याला पाहू देणार नाही...किमान आतातरी. मजुरही अवाक झलेले. एरवी अशा वेळचा माझा उत्साह आणि घाईच्या सुचना त्यांना माहित आहेत. पण मी आज ठाम आहे. हे अपेक्षित अनपेक्षीत आहे हे मला माहित आहे. मलाही हे नेमके काय हे पहायची उत्सुकता आहे. एवढ्या मोठ्या प्रतीकांची सहजा प्राप्ती होत नसते. ब-याच बाबी तपासाव्या लागतील. पहिली म्हणजे या जागेचा उपयोग "ते" लोक कशासाठी करत होते, तिचा नक्की आकार काय, येथे सापडलेल्या अन्य वस्तू कोणत्या? नको पहायला? मी आलो तसाच वळतो. बासू माझ्या मागोमाग येतो. माझ्या गतेशी त्याची गती जुळवतो आणि धापाळल्या स्वरात म्हणतो, "हे योग्य नाही. तुम्ही मुद्दाम तसं केलत. तुम्ही जुन्या काळापासून दूर झलेले नाहीत. कसे होणार म्हणा? जुना काळ तुमच्याबरोबरच वाहतोय...मला सोडून. खरे तर मी तुमच्यावर नाराज असलो पाहिजे...द्वेष केला पाहिजे. माझी बायको पळवलीत तुम्ही. मी तिच्यावर किती प्रेम करत होतो हे तिला कधीच समजले नाही. पण विसरलो मी तिला. आताही नाईलाज नसता तर मी आलो नसतो येथे...येथेच काय पण तुमच्या कोसोदूर क्षेत्रातही फिरकलो नसतो. मला माझं नवं जग प्रिय आहे. मला ही कादंबरी पुर्ण करायची अहे. ही कादंबरी मला जगभर नांव मिळवून देईल. मला माझे नांव आणि माझे साहित्य प्रिय आहे. श्रेयाला परत भेटायची साधी इच्छाही मला नाही. मी तिच्यासाठी येथे आलो नाही. समजतय का तुम्हाला? मला मदत करा..."
    मी बहिरा आहे. मला कोणाला मदत करायची नाहीहे. लेखकांना तर मुळीच नाही. सत्याला विपर्यस्त स्वरुपात मांडत लोकांचे फालतू मनोरंजन करत बुद्धीभेद करणारे हे लोक. जगाचा इतिहास अशाच मनोरंजनवाद्यांनी विकृत केला. हा लिहिणार पोलिनेशियन भारतातून तिकडे गेले. लोकांना आवडते असले काहीबाही वाचायला. अशांना मदत करणे म्हणजे नवीन विकृतीत भर घालणे. लोथलला काहीतरी जुन्या चुलींसारखे दिसणारे अवशेष मिळाले तर लगेच बोंब सुरु झाली कि ते यज्ञवेद्यांचे अवशेष आहेत....म्हनून ती संस्कृतीही यज्ञकर्त्यांची. बकी हजार पुरावे गेले खड्ड्यात. येथेही हे लोक तसेच करणार. हेतू काहीही असो. धर्मवादी कि रंजनवादी. तो बोलायचे थांबत नाहीहे. मी वैतागलोय. श्रेया वैतागले असती का? ती जर त्याला एकटी भेटली असती...सहज किंवा ठरवून तर कसली भावनिकता दाटली असती तिच्यात? कि सरळ जावून बिलगली असती त्याला? मी श्रेयाला सुखात ठेवलेय. पण खरेच का? नेमके सूख कशात आहे हे कोणाला माहित तरी असते का? कि नेवू याला सरळ घरी? बघुयात तिच्या प्रतिक्रिया. पडू द्या मिठ्यांत. आणि याचे तयारी असेल तर आम्ही दोघेही एकत्र तिच्याशी....छी! काय विकृत होत चाललोय मी. पण याने तिच्याशी संभोगाची स्वप्ने पाहिलीच नसतील का? मी होतो तसाच तोही कासाविस झालाच नसेल का? कल्पनेतला संभोग काय आणि प्रत्यक्षातला काय? नैतिक दृष्टीने काय फरक पडतो? मी आता शांत होतोय. हा सगळा वेडेपणा आहे. श्रेयाबद्दल असा विचार करणे हा माझा नीचपणा आहे. तिला जे माहितच नाहे त्याबद्दल मी एवढ्या कल्पनेच्या विकृत भरा-या का मारतोय? क्षमा कर गं मला. बहुदा मीही लेखकांसारख्या फ्यंटस्या रचू लागलोय. हा दगडी त्रिकोण आणि त्यावरील एवढे मोठे स्तंभशिर्ष ....हा बहुदा त्यांच्या धर्मश्रद्धेचा भाग असू शकेल...किंवा राजसत्तेतील एखाद्या संकल्पनेचा. एरवी त्याचा काही उपयोग दिसत नाही. पोलिनेशियनांत असला प्रकार अगदी पुराणकथांतही ऐकिवात नाही. नीट पहावा लागेल. स्तंभसिर्ष मात्र पुरुष चेह-यचे असेल तर मग वेगळा विचार करावा क्लागेल. तो बोलतच चालला आहे. "मला माहिती हवीय. मिळेल तेवढी. तुमची फाईंडिग्ज काय हेही मला समजावून सांगा. मी साईट बव्हंशी पाहिली. या संस्कृतीला एक्झाक्ट पोलिनेशियन म्हणता येणार नाही हे मला मान्य आहे. पण जागा बदलल्या कि जगण्याची साधने बदलतात. तशी संस्कृतीही नवी वळणे घेते. पोलिशियनांबाबत असे घडणे अशक्य नाही. शेवटी तेथली जिओलोजी वेगळी, हवामान वेगळे. सारे म्हणजे सारेच वेगळे. पण त्यांचा प्रवास खुपच रोमहर्षक झाला असणार. मी खुपच एक्साईट झालोय. मला या कादंबरीशिवाय काहीच सुचत नाहीहे...." नसेल सुचत. मग येथे का? कल्पनांच्या भरा-याच मांडायच्या तर हे संशोधन करून लिहिण्याचे आव कशाला? मी किंचित थांबतो. त्याच्याकडे प्रथमच सरळ रोखून पाहतो. ते तेवढे सोपे नाही याची जाणीव मला आहे. पण मी याक्षणी या क्षणाचा आणि परिस्थितीचा मालक आहे याचेही भान मला आहे. "तुम्ही पहायचे तेवढे पाहिले आहे. यापेक्षा अधिक सांगायला माझ्याकडे काहीही नाही. तुम्हाला जो अर्थ लावायचा तो लावा. त्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. येथलेच लोक पोलिनेशियात गेले कि तेथले येथे आले हे जोवर सर्व उत्खनन पुर्ण होत नाही तोवर ठामपणाने कोणीही सांगणार नाही. दोन-तीन बाबी मात्र विसरू नका. पहिली बाब म्हणजे पोलिनेशियन लोक टट्टु संस्कृतीचे होते...तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. येथे टट्टुचे पुसटसे अस्तित्वही मिळत नाही. दुसरी बाब म्हणजे भाषा. कसल्याही स्थितील पोलिनेशियनांच्या भाषेचे मूळ भारतीय कोणत्याही भाषेत नाही. कोकणात तर नाहीच नाही. तिसरी बाब म्हणजे ते कोणत्य प्रकारची जहाजे-नावा बनवत होते ते पहा. त्या कोठल्याही स्थितीत भारतीय रचनांशी मेळ खात नाहीत. सिंधू संस्कृतीत सापडलेल्या नांवांच्या, बैलगाड्यांच्या प्रतिकृत्यांची डिझाइन्स आजही सिंध प्रांतात तशीच्या तशी वापरली जातात. संस्कृती काही लोक निघून गेले म्हणून अदृष्य होत नसते. तिचा प्रवाह राहतोच. कोकणात तरी या संस्कृतीचे जीवंत अवशेष नाहेत. आमच्या समोरील समस्या वेगळी आहे. ती आम्ही सोडवू...वेळ लागेल कारण आमचे निश्कर्श शास्त्रशुद्ध आणि ठोस पुराव्यांवर असतात. तुम्ही तुमची कादंबरे लिहा खुशाल...कोण येतो नाहीतरे तपासायला? आता आपली भेट संपली. मला खूप कामे आहेत. आपण या आता." मी सरळ कारकडे निघतो. तो कसा आला, कोठे जाणार हे माहित असण्याची मला गरज नाही. वाटेतुनच मोबाईलवरून माझ्या सहका-यांना फोन करून या गृहस्थाला कसलेही माहिती न देण्याचे आणि पुन्हा साईटवर येवू न देण्याचे आदेश द्यायलाही मी विसरणार नाही. मी घरी निघालो आहे. पण श्रेयाकडे का, हे मला माहित नाही.

* * *

    पाषाणस्तंभशिर्षे जगात नवीन नाहीत. कोठे ती सिंहाची असतात तर कोठे अन्य प्राण्यांची. पण असे पाषाण त्रिकोण बनवलेले मी कोठे ऐकलेले अथवा वाचलेले नाही. त्रिकोणाच्या स्तंभांचा आकार पाहिला तर ते कधीकाळी, म्हनजे ही सम्स्कृती जीवंत असतांना उभे असणार हे स्पष्ट होते. इस्टर बेटांवर पाषाणांत कोरलेल्या शेकडो मानवी मुखाकृत्या आहेत. त्याचा हेतू काय हे नक्की कोणालाच माहित नाही. कदाचित ती पुर्वजपुजेची प्रथा असू शकेल आपल्याकडे वीरगळ करतात तशी. अशा प्रथा कोणत्या ना कोणत्या रुपात जगभर सापडतात. त्यावरून कोणत्याही संस्कृतीचे प्रभाव सिद्ध होत नाहीत. पण ही त्रिकोणी आकृती व त्यावरील शिर्ष कोड्यात टाकणारे आहे हे नक्की. मलाही ते शिर्ष नेमके कशाचे आहे हे पाहण्याची उत्सुकता आहे. पुरातत्वीय जगात ते खळबळ माजवणार हे नक्की. याबाब्त अनेक सिद्धांत पुढे येणे तर अपरिहार्य आहे. माझा सिद्धांत काय असेल हे मलाही अद्याप माहित नाही. अजून खूप उत्खनन करायचेय...अजून काय अपेक्षीत अनपेक्षीत समोर येईल हे मला तरी कोठे माहित आहे? आज बासू आला. तो श्रेयाचा एके काळचा नवरा होता. आता प्रौढ झाला असला, प्रसिद्ध समजा असला तरी त्याच्यातील ती जुनी व्यक्ती जीवंतच आहे. मग त्याचे तिच्यावरील प्रेम का जीवंत नसेल? तिच्यासोबतचे क्षण आणि रात्री त्याला का आठवत नसतील? मला पाहून तो किती जळाला असेल? तरीही त्याने यायचे धाडस केलेय. मला भेटायचेही. मग तो श्रेयालाही भेटायचा का प्रयत्न करणार नाही? काय सांगावे, ते भेटलेही असतील. पुण्यात. आपण नसतांना. त्यांने त्यांच्या जुन्या क्षणांना भांडत भांडत, एकमेकांवर दोषारोप करतही कसे साजरे केले असेल? पुन्हा त्याच्या खाले जातांना तिला काय वाटले असेल? उन्माद, फसवनूक कि अजून काही? मग आपल्याशी संभोग करतांना तिला अपराधी वाटले नसेल असे थोडेच आहे? वाटलेही असेल. आपल्याला जाणवले नाहे किंवा तसा कधी विचारही केला नाही म्हनून. पण स्त्री...
    बंगला आला आहे. सर्वत्र झाडीची निवांत सळसळ आहे. श्रेया टी.व्ही. वर कसलीतरी मालिका पाहत असावी. या निरवतेत सारेच आवाज मोठे होऊन जातात. तिलाही मी आल्याचे कळवावे लागत नाही. कारचा आवाज सर्व आवाजांवर मात करून उरतो. ते दार उघडते. तिच्या चेह-यावर गंभीरता आहे. कलाकाराच्या चेह-यावर स्वमग्न असतांना असते तशी. मी जवळ जातो. तिला मिठीत घेतो. एवढा आवेग नाहीय हे खरे पण तिला मिठीतून सोडावे असेही वाटत नाही. काय असेल तिच्या मनाच्या मला अज्ञात असलेल्या कोप-यांत? तिला सांगू ...कि नकोच...? सांगितले तर काय प्रतिक्रिया असेल तिची? सांगितल्यानंतरची आपली रात्र कशी असेल? किंबहुना पुढच्या रात्री? कि तिला काहीच वाटणार नाही? आपण उगाचच कल्पना करतोय काय? आपलाही लेखक व्हायला लागलाय काय? एकाएकी मी तिला आवेगाने मिठीत घेतो, तिचे ओठ माझ्या ओठांत चिरडतो. मला तिला काहीतरी सांगायचे आहे. ते मला सांगता येत नाहीहे. माझा तिच्याशीच संवाद शाब्दिक कधीच विशेष राहिलेला नाही. आम्ही देहातून एकमेकांशी बोलतो. ती एक क्षण आपले मस्तक मागे घेते. "तू आजकाल फार विचित्र वागतोहेस..." म्हणते आणि मला आवेगाने चुंबनात गुरफटवते. मी तिला उचलतो आणि बेडरुमची वाट चालू लागतो...तिला ते अपेक्षीतच आहे....

* * *

    दोनेक वर्ष गेलीत. माझ्या कार्यालयात माझ्यासाठी एक पार्सल वाट पाहतय. तेही मला अनपेक्षीत होतं. कारण बसुच्या नव्या "Polynesians of Konkan" या सांस्कृतिक क्षेत्रात खळबळ उडवणा-या कादंबरीच्या प्रकाशनाची बातमी वाचली खरी पण त्याच्याशी मी एवढा असहकार पुकारल्यानंतर तो मला तिची प्रत पाठवेल हा विचार मी केलेला नाही. मी निवांत होत अत्यंत उपहासाने ते पार्सल हाती घेतो. "यशस्वी लेखक व्हायचा फोर्म्युला म्हणजे तथ्यांची तोडमोड" हे मला माहित झालंय. मी पार्सल उघडतो. कव्हर वृत्तपत्रात आलं होतं त्यापेक्षा प्रत्यक्षात अधिक सुबक होतं हे खरं. कादंब-या मी मुळात वाचत नाही. एक वाचली होती तिचा अनुभव भयानक होता. तरीही मी सहज काही पाने चाळतो....
    पुस्तक हातातून गळून पडते...



* * *
     (प्रपंच दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली माझी कथा)

1 comment:

  1. Too good. The end has few questions and few answers ! The flow was impeccable .

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...