Saturday, February 25, 2017

मानसिकता बदलाची गरज!


Image result for the worlds in my future



शिक्षणाचा मुळ हेतू असतो व तो म्हणजे काय शिकले पाहिजे हे विद्यार्थ्याला समजावे. त्यासाठी सुरुवातीला त्याच्यासमोर सर्व विषय तोंडओळखीसाठी ठेवले जातात. त्यातून आपल्या आवडीचे नेमके काय आहे हे विद्यार्थ्याने समजावून घ्यायचे असते. त्यासाठी त्याला जी मदत अथवा मार्गदर्शन लागेल ते पुरवायची जबाबदारी शिक्षकाची असते. त्यासाठी शाळेत प्रत्यक्ष जायची गरज नाही. इंटरनेटचे माध्यम त्यासाठी पुरेसे आहे. पण आपली चूक ही होते कि तोंडओळखीलाच आपण शिक्षण समजतो. त्यातील परिक्षेतील यशापयशावरच आपली बुद्धीमत्ता मोजतो. फसगत झाली आहे ती येथेच आणि त्यामुळेच दर्जेदार प्रगल्भ नागरिक आम्ही घडवू शकलेलो नाही. आमच्या शिक्षण पद्धतीचा पायाच चुकल्याने आम्ही आज एका अत्यंत दयनीय परिस्थितीत येऊन पडलो आहोत.

मागील लेखावर खुप वाचकांनी संपर्क साधला. विद्यार्थ्यांकडेच शिक्षणाची मालकी जावी म्हणजे नेमके काय याबाबत खूप प्रश्न विचारले. येथे सर्वच वाचकांसाठी आधी ही संकल्पना थोडक्यात सांगतो.  पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे "काय शिकावे" हे प्रत्येक विद्यार्थ्याला समजेपर्यंतच प्राथमिक शिक्षकाची मदत अपेक्षित आहे. यासाठी रुढ शाळांचीही गरज नाही. जे पालक सक्षम आहेत तेही हे काम पार पाडू शकतात. शाळेत जाऊनच शिकता येते अशा शिक्षणाच्या बालिश कल्पनांतून आम्हाला बाहेर पडावे लागेल. आपल्याला नेमका कशात रस आहे, आवड आहे हे समजल्यानंतर विद्यार्थ्याने स्वत:च स्वत:चा अभ्यासक्रम तयार करावा वा निवडावा व त्याला हव्या त्या शिक्षण संस्थेला ओनलाईन सबमिट करावा ही यात पहिली पायरी आहे. सध्या सर्व शैक्षणिक संस्था आपापला अभ्यासक्रम लादत असतात. त्यात प्रत्येक विद्यार्थ्याचा कल-आकलनक्षमतेचा विचार होणे असंभवच असते. या पद्धतीत शिक्षणसंस्था अथवा  सरकारांचा कसलाही सहभाग असणार नाही तर जो अभ्यासक्रम विद्यार्थी ठरवेल त्याला मान्यता देत त्यानुसारच त्याच्या परिक्षा घेणे अभिप्रेत आहे. थोडक्यात या पद्धतीत शिक्षणाची मालकी/मक्तेदारी सरकार अथवा शिक्षणसंस्थांकडॆ न राहता व्यक्तिगत विद्यार्थ्याकडे जाईल.

यावर घेतला जाणारा प्रमुख आक्षेप म्हणजे यामुळे एक गोंधळाची स्थिती निर्माण होईल. प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम वेगळा असल्याने त्याच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या बनवाव्या लागतील. पुन्हा त्या तपासण्याची कटकट. वरकरणी हा आक्षेप खरा वाटू शकतो. परंतू मुळात रुढ शाळाच राहणार नाहीत. त्यामु्ळे रोजचे शिकवत बसण्याचे शिक्षकाचे काम मर्यादित होऊन जाईल. फार फार तर आवश्यकता भासल्यास मार्गदर्शन करावे लागेल. तेही प्रत्यक्ष समोरासमोर नाही. शिवाय अमूक संस्थेत परिक्षा द्यायच्यात म्हणून त्याच संस्थेतील शिक्षकाकडून मार्गदर्शन घ्यावे हेही बंधन नसेल. त्यामुळे व्यक्तिगत विद्यार्थ्याची प्रश्नपत्रिका बनवता येणे जड जाईल असे समजायचे कारण नाही. शिवाय स्वत: विद्यार्थ्याने समजा अभ्यासक्रम बनवला नाही तरी त्याला विविध अभ्यासक्रमांचे असंख्य पर्याय उपलब्ध असतील. त्यातून विद्यार्थी हवा तो किंवा अनेकांतील एकेक भाग निवडू शकेल. 

शिक्षणाची मालकी बदलण्याची गरज काय हाही एक प्रश्न उपस्थित होतो. आधीच म्हटल्याप्रमाने सध्या शिक्षण "लादले" जाते. त्यात विद्यार्थ्याला स्वत:ची अशी काहीच निवड नसते. रुढ प्रथेप्रमाणे तो "सब घोडे बारा टक्के" या न्यायाने शिकतो व असंख्य सुशिक्षितांपैकीच एक स्पर्धक शिक्षित बनतो. पण यात त्याचा स्वत:चा असा काहीच ठसा नसतो. ज्ञानप्राप्तीचे त्याचे मार्गही मर्यादित असतात. किंबहुना शिक्षणपद्धतीच अशी आहे कि ती ज्ञानप्राप्ती अथवा कौशल्य प्राप्ती होऊच देत नाही. एखाद्या गराज मेक्यनिकला कारमधील जेवढे समजते त्याच्या दशांशानेही ओटोमोबाईल इंजिनियर झालेल्या विद्यार्थ्याला समजत नाही हा जो प्रत्यक्ष अनुभव येतो तो त्यामुळेच. आपली शिक्षण पद्धती ज्ञान नाकारते. ती फक्त घोकंपट्टी माहिती देते.  माहिती किंवा परिक्षापद्धतीतील स्मरणशक्ती म्हणजे ज्ञान नव्हे हे आम्हाला अजून समजायचे आहे.

भविष्यात शिक्षण पद्धती जगभर बदलणार आहे ती अशी. कारण भविष्यात जी नवनवीन तंत्रज्ञाने येणार आहेत त्यावर स्वार व्हायचे असेल तर रुढी-परंपराग्रस्त शिक्षण निरुपयोगी ठरणार आहे. यासाठी आपल्याला बदलांसाठी सज्ज रहावे लागेल अन्यथा आपण मागे पडू, दुय्यमच राहू ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण यासाठी आधी आपल्याला आपली मानसिकता बदलावी लागेल. एवढेच नव्हे तर आपल्या समाजरचनेतही सुसंगत बदल घडवून आणावे लागतील. आज आपण सर्वच क्षेत्रात मागे आहोत. जग हीच शाळा बनवायचे तर तशी आधुनिक साधनेही विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध कशी होतील हेही पहावे लागेल. आज आपल्याकडे ग्रामीण भागात आजही १५-१६ तासांचे रोज लोड शेडिंग असेल तर आपण आधुनिक पद्धती अंगिकारु शकण्याची शक्यता नाही. आपली अर्थरचना ही अत्यंत विषमतामुलक आहे. अजुनही वंचितांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणता येणे आम्हाला शक्य झालेले नाही. अजुनही काही पुराणपंथी संघटना कालबाह्य गुरुकुल पद्धतीचे गोडवे गातांना दिसतात. अभ्यासक्रमांत नको त्या बाबी घुसवण्याचे प्रयत्न होतात. इतिहासाच्या बाबतीत तर ही बाब काळजी करावी एवढे गंभीर रुप धारण करून बसली आहे.

म्हणजेच आपण जुने हवे कि नवीन याचाच निवाडा धडपणे करू शकलेलो नाही. मग भविष्याची आव्हाने आम्ही कशी पेलणार आहोत व सक्षम भावी नागरिक कसे घडवणार आहोत याबाबत आम्ही अंधारातच असणे स्वाभाविक आहे. "नोकरीसाठी शिक्षण" हा मुलमंत्र असला तरी आजच नोक-यांसाठी ते निरर्थक झाले आहे. डबल ग्रैजुएट होऊनही आमच्या विद्यार्थ्यांना पुन्हा स्पर्धा परिक्षा द्याव्याच लागतात, कारण आपल्या व्यवस्थेचाच घेतलेल्या शिक्षणावर व त्यात मिळवलेल्या मार्कांवर विश्वास नाही. मग ज्यावर खुद्द सरकारचाच विश्वास नाही ते शिक्षण घेण्यासाठी आम्ही आटापिटा का करतो हा प्रश्न आम्हीच स्वत:ला विचारायला हवा. 

शिक्षण हे विद्यार्थीकेंद्री करत त्यालाच त्याची निवड करू देत प्राविण्य संपादन करू देणे भविष्यासाठी आवश्यक आहे. पण आमचा विद्यार्थी जगण्याच्या कौशल्यात अशिक्षितापेक्षाही कमी पडतो. अशिक्षित बेरोजगार अभावानेच सापडतील पण सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कोटींत जाते. हे का हेच जर आम्हाला समजले नाही तर आम्ही कोणते भविष्य घडवणार आहोत? जगाचा मार्ग अत्यंत वेगाने आधुनिकतेकडे चालला आहे. सर्वच क्षेत्रांत अभिनव संकल्पना राबवल्या जात आहेत. आजच असंख्य जागतिक विद्यालये व विद्यापीठे जगातील कोठल्याही विद्यार्थ्याला प्रवेश देत त्याच्या सवडीने व कलाने शिक्षण उपलब्ध करुन देत आहेत. इंटरनेट हेच एकमेव माध्यम त्यासाठी आहे. हळुहळु पारंपारिक विद्यालये बंद पदणार आहेत. शिक्षकांच्याही भुमिका बदलणार आहेत. आज आहे तशी, एकदा चिकटलो कि रिटायर होईपर्यंत चिंता नाही, अशी स्थिती उद्या राहणार नाही. शिक्षकांनाही  आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे लागणार आहे. नव्या बदलासोबत स्वत:ला आधी बदलावे लागणार आहे. ज्यांच्याकडे अब्जावधीचे भांडवल नाही पण शिक्षणाची दृष्टी आहे असे लोक घरात बसून उद्या अधिक कार्यक्षम शाळा-विद्यालये चालवणार आहेत. 

हे घडणारच आहे. फक्त वेळीच बदल घदवायचा कि नेहमीप्रमाणे सर्वात शेवटी आधीच गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये घुसायचा प्रयत्न करायचा हा निर्णय आपल्याच हातात आहे!

No comments:

Post a Comment

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...