Thursday, February 23, 2017

आत्मभानाशिवाय...

Displaying 16729372_1093454427444536_3128006194971761931_n.jpg


आत्मभानाशिवाय भारतीय वंचित समाजाची प्रगती अशक्य!


(कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठात "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर : एक विचार" या विषयावर मी इतिहासाच्या व सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान दिले. त्याचा हा सारांश.)

सामाजिक व आर्थिक वंचिततेचे मुळकारण इतिहास वंचितेत आहे. इतिहास नाही असा एकही समाजघटक नाही. प्रत्येक समाजघटकाने सांस्कृतिक व आर्थिक इतिहास घडवत ही राष्ट्रीय संस्कृती घडवलेली आहे. दुर्दैवाने आपल्याकडे इतिहास म्हणजे राजा-महाराजांच्या युद्ध, कपट-कारस्थानांचा इतिहास म्हणजेच इतिहास मानला जातो व तसा लिहिला जातो. खरा इतिहास घडवणारे इतिहास वंचितच राहिल्याने आज समाजातील वंचित-शोषित घटकांना आत्मभान नाही. जोपर्यंत समाजाला आत्मभान येत नाही, तोपर्यंत समाजाला आत्मसन्मान मिळणार नाही व शोषणही थांबणार नाही. आणि हे आत्मभान मिळविण्यासाठी आणि इतरांना ते देण्यासाठी, इतिहासाशिवाय दुसरे कोणतेही साधनं वा माध्यम नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आत्मभान असणारा समाजच ख-या अर्थाने प्रगती सधत असतो त्यामुळे आपला लढा हा सामाजिक आत्मभानासाठी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

अहिल्याबाई होळकर दुष्काळी मराठवाड्यातील एका धनगर कुटुंबातील साधी मुलगी. त्यांचे सासरेही मेंढपाळ. मामांकडे आश्रित म्हणून राहतांना ते मेंढ्या वळत. त्यांना संधी मिळाली तर त्यांनी आधी माळव्यावर हुकुमत निर्माण केली. इतकी कि खुद्द बाजीराव पेशव्यांनी त्यांच्याकडे उत्तरेचा कारभार सोपवत सुभेदारी दिली. अहिल्याबाई होळकर त्यांची सून झाली आणि एक वंचित-शोषित महिला, जीवनातील अपार दु:खे सोसत जागतिक पातळीवर पोहोचली. वंचिततेही संध्या मिळाल्या तर काय होऊ शकते याचे हे उदाहरण. पण आज आमच्या हाती सर्व आधुनिक सुविधा असुनही आम्ही त्यांच्या एक लक्षांशही काम करत नाही याची आपल्याला खंत वाटायला हवी.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्वातंत्र्याच्या भारतातील आद्य उद्गात्या होत्या. ज्या कालात महिलांना गोषातच रहावे लागे, शिक्षणावर बंदी होती त्या काळात मल्हाररावासारख्या ख-या पुरोगाम्याने अहिल्येला शिकवले. नुसते लिहिणे-वाचणे नव्हे तर अहिल्यादेवी भालाफेकीत इतक्या तरबेज झाल्या कि खुद्द टिपू सुलतानानेही त्याबाबत गौरवोद्गार काढले. "तत्वज्ञ महाराणी"  हा किताब त्याने अहिल्यादेवींना दिला. अहिल्यादेवी तेथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी अन्य महिलांनाही लष्करी शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र काढले. महिलांच्या लष्करी प्रशिक्षणासाठी जगात निघालेले हे पहिले विद्यालय. त्या काळात देशभर संतती नसलेल्या विधवांची मालमत्ता सरकार दरबारी जमा करायचा कायदा होता. अहिल्यादेवींनी तो कायदा रद्द तर केलाच पण विधवांना दत्तक घेण्याचीही कायदेशीर तरतूद केली. महेश्वरला वस्त्रोद्योगात आघाडीवर आणत असतांनाच महिला विणकरांनाही प्रोत्साहन दिले. त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. ती मोडून काढण्यासाठी त्यांनी स्वत:च्या मुलीचा प्रौढ विवाह करुन स्वत: आदर्श घालून दिला. एवढेच नव्हे तर जो तरुण माळव्यातील दरवडेखोरांचा उपद्रव नष्ट करीन अशा कोणाही युवकाशी तिचा विवाघ लावून देईन असे दरबारात घोषित करून जातीची अटही काढून टाकली. हे काळाच्या फार पुढचे पाऊल होते हे आम्ही कधीच लक्षात घेतले नाही.महिला सबलीकरण म्हणजे काय हे त्यांनी अठराव्या शतकात कृतीतून दाखवले. आजच्या सरकारांनाही त्यापासून शिकायला हवे.

युरोपात एकोणिसाव्य शतकापर्यंत स्त्रीया दास्यातच होत्या. काही लेखिका स्त्री स्वातंत्र्याबद्दल दबकत बोलत असल्या तरी त्यांचे सामाजिक स्थान दुय्यमच होते. युरोपातील महिलांना जोन माल्कममुळे अहिल्यादेवी माहित झाल्या. युरोपातील महिलांसाठी हे नुसते आश्चर्य नव्हते तर त्यांनी अहिल्यादेवींत आपले आदर्श पाहिले. इतके कि जोआना बेली या इंग्रज कवयित्रीने अहिल्यादेवींवर खंडकाव्य लिहिले. विदेशी साहित्यिकाने कोणाही भारतीयावर लिहिलेले हे पहिले खंडकाव्य. युरोपातील स्त्रीयांच्या स्वातंत्र्यलढ्याचा आदर्श निर्माण करणारी महिला अहिल्यादेवी असुनही आमच्यासमोर त्यांची प्रतिमा केवळ हातात पिंड घेतलेली साध्वी अशी निर्माण केली गेली. थोडक्यात खरा आदर्श पुसला गेला. भारतीय स्त्रीयांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली असती तर परंपरावाद्यांचे तेंव्हाच नाक ठेचले गेले असते व आज महिला अधिक आत्मसामर्थ्याने जगल्या असत्या. 

कोणाच्या हातून काही काढून घेतले तर त्याला पर्यायही दिला पाहिजे हे सूत्र अहिल्यादेवींनी घालून दिले. भिल्ल समाज त्याकालात यात्रेकरुंना लुटून उपजीविका चालवत. अहिल्यादेवींनी त्यांचे मन वळवून त्यांच्यावरच यात्रेकरुंच्या रक्षणाची जबाबदारी सोपवत यात्रेकरुंकडुन भिलकवडी नावाचा कर घ्यायची परवानगी दिली. एवढेच नव्हे तर त्यांना कसायला जमीनीही दिल्या. आज भारतातील वंचितांचे असंख्य पारंपारिक रोजगार नष्ट झाले अथवा केले गेले तरी त्यांना जगायचे अन्य पर्याय दिलेले नाहीत. आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्याच पारंपारिक व्यवसायांत पुरवले नाही. सर्वांना नोकरीची गाजरे तेवढी दाखवली. वंचितांचे अधिक वंचितीकरण होत त्यांची ससेहोलपट मात्र होत आहे. येथे अहिल्यादेवींचे आदर्श घेत पर्याय उपलब्ध करुन दिले पाहिजेत. पण या अहिल्याबाई सांगणे त्यांच्या अडचणीचे आहे.  

हा आपलाही नाकर्तेपणा आहे. काय मागावे हे समजत नाही. काय करावे हे मग कोठून समजनार? वंचित कुटुंबातून आलेल्याच मल्हारराव व अहिल्याबाईनी वंचिततेवर अपार आत्मभान व आत्मविश्वासाच्या बळावर मात करता येते हे प्रत्यक्ष जगण्यातून शिकवले. पण आम्हाला ते शिकायचे नाही. आम्ही कर्ते होण्याऐवजी भिकारी होऊ पाहत आहोत. सरकारचे कान धरून पर्यायांची मागणी करायला हवी. इतिहास आहेच, तो गौरवशालीच आहे, पण तो माहित करुन घेत आत्मभान जागवायला हवे. अहिल्यादेवींनी एक पुस्तक लिहिले नाही. पण अखंड भारताची  स्वप्ने पाहत त्यांनी काश्मिर ते कन्याकुमारी व सोमनाथ ते कामाख्यादेवींपर्यंत नुसती मंदिरे उभारत देश जोडला नाही तर रस्तेही बांधले, घाट-बारवांची निर्मिती करत ख-या अर्थाने राश्ढ्ट्र उभारणीचा पाया घातला. आपल्या राज्याच्या अथवा संस्थानाच्या बाहेर कोणी पहात नव्हते तो हा काळ होता हे लक्षात घेतले पाहिजे. धनगर घरात जन्माला आली पण अहिल्यादेवी सर्व राष्ट्राची आहे ती यामुळेच. तो आदर्श आजच्या युवक-युवतींनी घेतला पाहिजे.

-संजय सोनवणी

(साप्ताहिक चपराकमद्ध्ये प्रसिद्ध) 

2 comments:

  1. अप्रतिम लेख सर...

    ReplyDelete
  2. He aamhala kadhi sangitlach gela nahi.sir shikshnatun jo khota itihas sangitlya jato to thambavlya gela pahije.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...