Saturday, August 27, 2022

धर्म आणि भयाची बाजारपेठ

  


 धर्म हा आजही कळीचा मुद्दा बनलेला आहे. जगभरचे संघर्ष, युद्धे, वैचारिक वादळे ही सारी अंतत: धर्म या मुलभूत मुद्द्याशी येऊन भिडताना दिसतात. धर्माचा इतिहास अतिप्राचीन आहे. किंबहुना मनुष्य प्राणी या भूतलावर अवतरला तेंव्हापासून जगभर धर्मकल्पनांची बीजे रोवली गेली. पुरातन मानवाने आपली बुद्धी पणाला लावत शिकारीसाठी जशी दगडां-गारगोट्यापासून हत्यारे बनवायला सुरुवात केली, खाद्यक्रिया सोपी व्हावी व जंगली प्राण्यांना दूरही ठेवता यावे यासाठी अग्नी शोधला. पुरातन मानव आजच्या मानवाएवढाच प्रतिभाशाली होता. सारे शोध गरजेतून लागत असतात आणि प्रत्येक काळातील माणसांची मानसिक गरज वेगळी असल्याने शोधही त्या वृत्तीला अनुरूप असेच लागत गेले. या शोधांची व्याप्ती वाढत वाढत आजवरच्या आधुनिक तंत्रयुगातील जीवन सुसह्य करू शकणा-या साधनांपर्यंत वाढत गेली आहे. हे शोध म्हणजे मानवाच्या ऐहिक व मानसिक गरजा होत्या. ऐहिक शोध हे बाह्य जीवन सुसह्य करण्यासाठी होते. सुरक्षेसाठी व सहज सोप्या जीवनयापनासाठी त्याला या शोधांची निकड भासली. पण केवळ तेवढ्याने भागणारे नव्हते. मानसिक गरजा याही अंगभूत प्रेरणांमधून जन्म घेतात.  आणि माणसाची ही प्रेरणा होती त्याला वाटणारी व अनुभवालाही येणारी जीवनातील असुरक्षितता, अनिश्चितता, आणि मृत्यू. तो या भयांनी गजबजलेला असतानाच टोळीचे सातत्य व संख्या वाढवण्यासाठी अधिकाधिक संतती ही त्याची गरज जशी होते तसेच जननक्रियेबद्दल गुढात्मक कुतूहलही होते. त्यावर कल्पना लढवत त्याने जेजे प्रेयस आहे व जेजे भयदायक आहे त्याला दैवतप्रतिष्ठा द्यायला सुरुवात केलीये. स्त्री अपत्य देते या जाणीवेतून मातृपुजेचा (योनीपुजेचा) आरंभ झाला. मृत्यूच्या अपार भयातून मृतांचे दफनविधी होऊ लागले. मृत्योत्तर जीवन असले पाहिजे ही कल्पना करून मृतासोबत ऐपतीप्रमाणे मृताला मरणोत्तर जीवनात कामाला येतील अशा त्याच्या प्रिय वस्तू व प्राणीही दफन केले जाऊ लागले. अशी पुरातन अनेक दफने जगभर मिळालेली आहेत.  दैनंदिन जीवन शत्रू, नैसर्गिक आपत्ती व हिंस्त्र प्राण्यांपासून सुरक्षित राहता यावे व खाद्य प्राण्यांची मात्र मुबलक शिकार मिळावी यासाठी त्याने शस्त्र जशी शोधली तशाच संरक्षक व अन्नदात्या देवतांच्या मूर्त किंवा अमूर्त प्रतीकांच्या कल्पना करून त्यांचीही पूजा सुरु केली. मनुष्य नेहमीच कल्पक होता. पुढे मृतांची दफनस्थळे भव्य वास्तूसमान बनू लागली. सामान्य टोळीवाले भव्य शिलावर्तुळांचा वापर दफनासाठी करू लागले. इजिप्तचे पि-यामिड ही दफनस्थानेच आहेत. काही दफनस्थळांच्या रचना तर आजही कोड्यात टाकणा-या आहेत. मृत्यूचे अनावर भय आणि मृत्योत्तर जीवनाची आशा हे आद्य धर्माचे कारण बनले. आजही धर्म असो कि मुलभूत विज्ञान, त्याचा मुख्य हेतू कोणत्या ना कोणत्या भयावर अथवा असुरक्षिततेवर मात करणे हाच राहिला आहे. शासनसंस्था, कायदेसंस्था, समाजसंस्था इत्यादी बाबींची निर्मितीही किमान सुरक्षितता मिळावी हाच राहिला आहे.

 

पण प्राचीन काळी लोकांनी देवतांचा व मृत्योत्तर जीवनाचा शोध लावला कारण ती त्यांची प्राथमिक मानसिक गरज होती. सनातन भयावर तो एक उतारा होता. माणसाच्या प्रतीभेचीही ती परिणती होती. त्यातूनच पुढे आपण अजरामर नसलो तरी आपल्या देवता अमर आहेत किंवा प्रचंड दीर्घायू आहेत हे कल्पना आली व शेवटी आपणच देवतांच्या आराधनेने अति-दीर्घायू किंवा अमर बनू शकतो ही कल्पना जन्मली. भारतात तपाच्या सहाय्याने हजारो वर्ष जगलेल्या साधूंच्या कथा जशा प्रेषित झाल्या तशाच सप्तचिरंजीवांच्या कथाही जन्माला आल्या. आजही हिमालयात शेकडो वर्ष जगणारे साधू हा चर्चेचा विषय असतोच. कोणीतरी पुण्यवान अमर झाला हे एक मानसिक समाधान तर होतेच पण स्वत:लाही तो एक प्रेरक घटक होता. पुण्य कसे मिळेल हा त्याचा प्रश्न त्यानेच सोडवला. चांगले वागणे म्हणजे पुण्य व वाईट-समाजविघातक वागणे म्हणजे पाप यातूनच देवतांना संतुष्ट करणे म्हणजे पुण्य व देवतांचा कोप ओढवून घेईल असे अवमानास्पद कृत्य म्हणजे पाप. या कल्पना समांतर विकसित होत गेल्या व आद्य धर्मांनी आपापल्या नैतिक धारणा ठरवल्या. यामागेही “भय” हा घटक कार्यरत राहिला असे आपण पाहू शकतो. जगातील सर्व तत्वद्न्यानेही या विश्वाचा, या जगण्याचा हेतू काय, ईश्वराचे स्वरूप काय याभोवती फिरत राहिलेली आहेत.

 

भयाच्या आत्यंतिक कल्पनेतून प्रतिक्रियात्मक मानसिक क्रिया होणे क्रमप्राप्तच होते. कोणाचे देव श्रेष्ठ हे ठरवण्यासाठी झालेल्या युद्धांचा इतिहासही पुरातन आहे. भयाची परिणती अनेकदा उन्मादी भावनेत होते. भयावर मात करण्यासाठी शोधलेला आपला धर्मच इतरेजनांत भय निर्माण करण्यासाठी वापरला जातो. वर्चस्वाची कल्पना भयभीत लोकांतच आधी जन्माला येते. राजसत्तेपासून या वर्चस्ववादाची सुरुवात होते. जगात नंतर धर्म बदलले, आदिम देवता तर अनेकवेळा बदलल्या, विस्मरणातही गेल्या. खरे तर अगणित देवतांचा मानवी इतिहासात मृत्यू होऊन गेला आहे. वैदिक धर्मात एकट्या ऋग्वेदातच पाचशेच्या वर देवता आहेत. आज त्यातील एखाद-दुसरी सोडली तर बाकी कोणाच्या लक्षातही नाही. भारतात आदिम काळापासून अनेक देवतांचा उदय झाला आणि त्याही नष्ट झाल्या. कुशाणकाळातच पूजनीय असलेल्या असुर-असुरकन्या, विशाख, राक्षस-राक्षसी, अनाहिता, ऐरोदतीसारख्या अनेक देवता आज हिंदू धर्मात मृतवत झालेल्या आहेत. ग्रीक-रोमन देवतांचेही तेच झाले. देवतांनाही मृत्यू असतो हे इतिहासानेच सिद्ध केले आहे. या देवता आता पुराकथांमध्ये स्थान ठेवून असल्या तरी त्यांना कोणी वाईट म्हटले तर जगातील कोणाच्याही भावना दुखावत नाहीत. पण या देवतांमुळे अनेक युद्धेही झालेली आहेत एवढा अहंकार आपापल्या इष्ट देवतांबद्दल होता. आजही तेच अहंकार कायम आहेत फक्त दैवते बदलली आहेत. जी टिकली त्यांची मूळ चरित्रे एवढी बदलली गेली आहेत कि मूळ रूपाचा अंदाजही लागू नये. हाही देवतांचा मृत्यूच कि!

 

पण धर्मांचा उपयोग भयावर मात करण्यासाठी होतच राहिला आहे. दुस-यांत भय निर्माण करणे हाही स्वाभाविक हेतू त्यांचा बनलेला आहे. धर्माच्या नावावर जेवढी हिंसा झाली, जेवढे शोषण झाले त्याला इतिहासात तोड नाही. भयावर मात करण्यासाठी निर्माण केला गेलेला धर्म हाच भयाचे कारण झाला. आमचेच तत्वज्ञान व संस्कृती कशी श्रेष्ठ आणि पुरातन आहे हे सांगण्याची स्पर्धा तर जगभरचीच.

 

पण मुख्य हेतू होता भयावर मात करणे हा. ते शक्य झाले आहे काय या प्रश्नाचे उत्तर आजही “नाही” असेच आहे. अलीकडच्याच कोरोनाच्या जागतिक साथीच्या दरम्यान या भयाचा उद्रेक किती चहुअंगाने झाला होता हे आपण अनुभवले आहे. जीवनातील असुरक्षितता, मृत्यू कधीही आणि कसाही येऊ शकतो या जाणीवेने मनुष्य आजही ग्रासलेला आहे. शास्त्रज्ञही माणसाला अमर बनवता आले नाही तरी त्याला दीर्घायू कसे करता येईल या संशोधनांमध्ये व्यस्त आहेत.  बुवा-बापूचे पीक आले आहे. मन:शांती कशी साधता येईल, अधिकाधिक यश कसे मिळवता येईल, सुखाची प्राप्ती कशी होईल आजारांवर कशी मात करता येईल इत्यादि बाबींवर प्रवचने झोडणारे, सत्संग चालवणारे, योगाभ्यासाचे अनभ्यासी धडे देणारे आज उदंड झाले आहेत. भयाची बाजारपेठ अवाढव्य होती व आहे. आता या भयातून उत्पन्न झालेल्या भयाचे काय करायचे हा प्रश्नच आहे!

-संजय सोनवणी

Sunday, August 21, 2022

असे होते यशवंतराव!

 ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य बरखास्त होइस्तोवर सर्व भारतीय सत्तांना (अगदी कंपनी सरकारलाही) आपल्या नाण्यांवर एका बाजुने पातशहाचा उल्लेख फारसीत करावाच लागत असे. परंतू भारतात एकमेव वीर जन्मला तो म्हणजे यशवंतराव होळकर ज्यांनी पातशाही सार्वभौमतेलाही धुत्कारत दोन्ही बाजुला आपलाच छाप असलेली नाणी १८०८ साली पाडली. यामुळे पातशहा तर अस्वस्थ झालाच पण इंग्रजही अस्वस्थ झाले. शेवटी इंग्रजांनीच मध्यस्थी करुन यशवंतरावांना नव्याने पातशाही आज्ञेप्रमाणे नाणी जारी करायला राजी केले. (संदर्भ: हिंगणे दफ्तर, तिसरा खंड, संपादक सदाशिव आठवले.)

Friday, August 19, 2022

शेतीवरील बोजा कमी करण्यासाठी...


 


शेतीचे भविष्य आजच्या वर्तमानतील परिप्रेक्षात पाहिले तर ते अंध:कारमय वाटावे अशी स्थिती आहे. जागतिक विकसनशील देश, विकसित देश आणि महासत्ता बनू पाहणारा आपला देश यांची तुलना केली तरी आपल्या शेतीची वाटचाल आत्मनाशाच्याच दिशेने सुरु आहे से स्प्ष्ट दिसते. याचे कारण म्हणजे आजही सुमारे ५५% लोकसंख्या शेतीवर अवलंबून असल्याने व शेती मुळात किफायतशीर उद्योग राहिला नसल्याने शेतक-यांचे अर्थजीवन दिवसेंदिवस ढासळतच चालले असल्याचे आपण पाहतो. सन २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करू हे आश्वासन कोठल्याकोठे विरून गेले आहे.  मुळात उत्पन्न दुप्पट करणे कसे शक्य करता येईल याबाबत कसलेही ठोस धोरण नाही. अलीकडेच जे कृषीकायदे आणले गेले होते ते शेतक-यांच्या लाभाचे व हिताचे नसल्याने व्यापक आंदोलन झाले व ते कायदे मागे घेण्याची नामुष्की सरकारवर कोसळली. देशातील शेतमालाचे भाव सामान्यांच्या आवाक्यात रहावे म्हणून शेतमालाच्या आयात-निर्यातीवर वेळोवेळी बंधने घातल्याने अथवा आयात-निर्यात कर कमी-जास्त केल्याने शेतकरी भरडला जातो. त्यात पिढ्यानुपिढ्या शेतजमीनीचे तुकडीकरणच होत राहिल्याने उत्पादकता तर घटतेच आहे पण ती कसणे आता अशक्य होत जाणार आहे हेही उघड आहे. भुमीहीन शेतमजुरांची अवस्थाही बिकट होत जाणार आहे. मुळात शेतमजुरी हा अर्धवेळ रोजगार आहे. शेतीचे भवितव्य असे चिंताजनक होत चालले आहे. अशा स्थितीत शेतीवर अवलंबून लोकसंख्या ५५ टक्क्यांवरून ३० टक्क्यापर्यंत कशी आणायची हा यक्षप्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहे.

 

जागतिकीकरणाचे लाभ बिगरशेती उद्योगाला मिळाले खरे पण शेतीक्षेत्र सर्वार्थाने त्यापासून वंचित राहिले. देशी-विदेशी भांडवल शेती वा शेतीआधारीत उद्योगांत मोठ्या प्रमाणावर येईल यात अनेक सरकारी कायदेच अडथळा असल्याने तसेही झाले नाही. शेती ही समस्या नसून सरकारचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोण हीच मोठी समस्या बनून बसला आहे कि काय असे वाटावे अशी एकुणातील स्थिती आहे.

 

म्हणजे शेतीचे क्षेत्र वाढवायचे असेल तर त्यावरही कमाल शेतजमीन मर्यादा कायद्यामुळे ते होऊ शकत नाही. बिगर शेतक-याला शेतजमीन शेतीसाठी विकत घेता येत नसल्याने बाहेरचे भांडवल येण्याचीही शक्यता नाही. आणि शेतकरी आधीच कर्जबाजारी असल्याने तो स्वत: नवे भांडवल शेतीत आणू शकण्याची शक्यता नाही हा एक तिढा आहेच. शेतमालाच्या बाजारपेठेवर सरकारी नियंत्रणे असल्याने खुल्या अर्थव्यवस्थेचे त्याला कसलेही लाभ नाहीत. आपलेच सरकार आपल्या व्यवसाय स्वातंत्र्यावर बंधने घालते आणि ते आम्ही सहन करतो हा अजब प्रकार देशात घडत आला आहे. त्यात साठवणीसाठी पुरेशी शितगृहे व गोदामे नसल्याने वाया जाणा-या शेतमालामुळे होणारे नुकसान वेगळेच. उदा. २० ते ३०% फळ-फळावळ व भाजीपाला केवळ साठवणूक क्षमतेच्या अभावामुळे वाया जातो.



याशिवाय महत्वाची बाब म्हणजे आपल्याकडे शेतमालावर प्रक्रिया करून, त्यांचे आयुष्यमान व दर्जा वाढवून विकण्यासाठी प्रक्रिया उद्योगच नाहीत. भारतात आजमितीला केवळ ३% शेतमालावर प्रक्रिया करता येईल एवढ्याच क्षमतेचे कारखाने आहेत. खरे तर ग्रामीण भागात असे लघु ते मध्यम उद्योग वाढले तर शेतमालाची मूल्यवर्धाक्ता होऊन शेतक-यांचा लाभ वाढू शकतो. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मित्यी होऊन ग्रामीण तरुणांचे केवळ शेतीवरील अवलंबित्व दूर होऊ शकते. स्थानिक रोजगार उपलब्ध झाल्याने शहरांकडील विस्थापन थांबून विकेंद्रित विकास साधता येऊ शकतो. वाया जाणा-या शेतमालाचे प्रमाण कमी होउ शकते. याचा राष्टीय सकल उत्पन्न व उत्पादन वाढण्यात हातभार लागून शेतक-यांचे एकूण उत्पन्न वाढू शकते. शेतीवरील भार कमी होऊ शकतो. शेतीच शेतीला तारू शकते.

 

शेतीने अनेक दिग्गज नेते दिले. पण अभावानेच त्यांनी आपली नाळ शेतीशी कायम ठेवली. भारतात दरवर्षी एवढ्या इंजिनियर्सचे पीक येते पण त्यांनी शेतमाल प्रक्रियेसाठी सोपी तंत्रे शोधण्याचे मु्ळीच काम केले नाही. अगदी निर्जलीकरणासारख्या जगभर वापरल्या जाणा-या प्रक्रियापद्धतींची साधी तोंडओळखही करून दिली गेली नाही. आपण शिक्षणपद्धतीतून समाजाला पुढे नेण्यासाठी कल्पक विद्यार्थी घडवण्यात सपशेल अपेशी ठरलो आहोत याचा दुसरा काय पुरावा असू शकतो?

शेतीवर अवलंबून असलेली जनसंख्या ५५% वरून किमान ३०%वर आणणे ही आपल्या अर्थव्यवस्थेची पहिली जबाबदारी आहे. समजा शेतीआधारीत उद्योग वाढवता येत नसतील तर एकच पर्याय आहे व तो म्हणजे मोठ्या प्रमाणात बिगरशेती उद्योगक्षेत्र वाढवत तेवढा रोजगार निर्माण व्हायला पाहिजे. रोजगार पाहिजे तर तेवढ्याच लोकांना कौशल्य प्रशिक्षण लागेल. उद्योगक्षेत्र वाढवायचे तर त्यासाठी नवे लघु, मध्यम ते मोठे उद्योजक आहेत त्याच समाजातून पुढे यायला हवेत. त्यासाठी तंत्रज्ञान व भांडवलाची आवश्यकता असेल. नव-उद्योजकांना कर्ज खडे करणे मुश्किल तेथे बाकी भांडवल कसे उभे केले जाणार हा प्रश्न आहे. त्यासाठी आमच्याकडे मुळात योजनाच नसल्याने आमचा भर विदेशी गुंतवणुकीवरच आहे. पण उद्योगसुलभतेत आमचा क्रमांक ब-यापैकी खाली असल्याने तेही अल्प प्रमाणातच येते आहे. भविष्यात जास्त आले तरी एवढ्या मोठ्या संख्येने ते रोजगार उत्पन्न करू शकणार नाही हे उघड आहे. भारतीयालाच नवा उद्योग सुरु करायचा असेल तर एवढ्या सरकारी कागदोपत्री परवानग्या लागतात की जवळपास एक वर्षाचा वेळ आणि अकारण पैसा त्यातच वाया जातो. शेतीत आहेच तसाच उद्योग जगतातील सरकारी हस्तक्षेप कमी होत नाही तोवर शेती व औद्योगिक प्रगतीची शक्यता नाही. जी होईल ती अगदी दहा टक्क्यावर जरी गेली तरी शेतीवरील बोजा हटण्याची त्यामुळे शक्यता नाही.

 

याचाच अर्थ असा की शेतीवरील बोजा सध्या तरी हटवता येईल अशी कोणतीही योजना दृष्टीपथात नाही. किंबहुना अन्य क्षेत्रातील रोजगारच गेल्या दोन वर्षांपासून कमी होत चालल्याने बोजा वाढण्याचीच शक्यता आहे. या स्थितीत सुधारणा करायची तर शेतीपुरक, म्हणजे अगदी निर्जलीकरणापासून ते पशुपालनापर्यंत, लघुत्तम पातळीवर का होईना, पण आधुनिक तंत्रज्ञान सुलभतेने वापरत उद्योग स्वत:च कसे वाढवता येतील हे पहायला पाहिजे. आपले नैसर्गिक साधनसामुग्रीचे स्त्रोत औद्योगिक प्रक्रियेत कसे आणता येतील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कृषीसेवा क्षेत्रात अजुनही अनेक क्षेत्रे अस्पर्श आहेत. ती शोधत त्यात व्यवसायांच्या संधी निर्माण करायला हव्यात. यासाठी योजनाबद्ध धोरणांची व व्यवसाय-पूरक धोरणांची गरज आहे.


शेतीचे भवितव्य हे एका अर्थाने देशाच्याच अर्थव्यवस्थेचे भवितव्य आहे. शेतीवरील बोजा हटवायला आम्हालाच पुढे यावे लागेल. नोकरीच्या मानसिकतेतून बाहेर पडत उद्योग-व्यवसायाची मानसिकता बनवावी लागेल. त्यासाठी व्यापक सामाजिक प्रयत्नांची गरज आहे. सरकार तसे धोरण बनवणार नसेल तर ते बदनवायला भाग पाडावे लागेल. मुठभरांचाच भांडवलवाद जाऊन बहुसंख्यांकांचा भांडवलवाद समोर आणावा लागेल. सरकार-अवलंबी भूमिकेतून स्वावलंबी भूमिकेत शिरत आपले उत्थान घडवावे लागेल. सरकारचे भूमिका आणि धोरण यात महत्वाची जबाबदारी पार पाडू शकते पण तसे करायची सरकारची स्वत:हून तयारी कधीच नसते. केवळ आश्वासने, गोंडस घोषणा, वेगवेगळ्या आयोगांच्या नेमणूका, कर्जमाफ्या वा वीजबिलमाफ्या आणि निवडणुकांत वाटले जाणारे धन यावरच वंचित लोक संतुष्ट होऊ पाहतात. यातून शेतीवरचा बोजा कमी होण्याची शक्यता नाही. ही आत्मघातकी अल्पसंतुष्टता आम्हाला त्यागावी लागेल. शेती हा नाईलाजाने केला गेलेला उद्योग राहिला तर शेतीचेच भविष्य अंधारात जाईल हेही लक्षात घ्यावे लागेल.

-संजय सोनवणी

रहस्यमय तिबेटचे व्यापारी मार्गांवर स्वामित्व!


 


तिबेटचा इतिहास हा खूप रहस्यमय आणि गूढ मानला जातो. हिमालयाच्या उत्तरेस हिमालयाच्या आणि कुनलुनच्या पर्वतरांगांनी वेढलेलेअल्पाईन काळात भूहालचालींनी निर्माण झालेलेअत्युच्च व विस्तीर्ण तिबेटचे पठार आहे. त्याचे क्षेत्रफळ २० लाख चौ. किमी. असून सरासरी उंची ४,२५० मी. आहे. त्याला जगाचे छप्पर’ म्हणतात. जगातील अनेक महत्त्वाच्या नद्यांचे उगमस्थान या पठारावर आहे. सिंधूसतलजत्सांगपो (ब्रह्मपुत्रा)कालीगंडककोसीइरावतीसॅल्वीनमेकाँगयांगत्सी व ह्वांग हो या नद्या याच पठारावर उगम पावतात. इतर जगापासून हा विस्तृत भूप्रदेश तुटलेला असल्यामुळे साहजिकच तेथील धर्म व लोकजीवन हे रहस्यमय वाटल्यास आश्चर्य नाही. पण इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकात तिबेट हा महासत्ता बनला होता व चीनपासूनही खंडणी वसूल करत होता आणि याचे कारण म्हणजे तिबेटचे मध्य आशिया आणि लदाखमधून जाणा-या व्यापारी मार्गांवर असलेले स्वामित्व आणि त्यामुळे वाढलेले सामर्थ्य. नेपाळ हा देशही बराच काळ त्यांच्या ताब्यात होता.

चिनी इतिवृत्तकार तिबेटमधील चारसहा भटक्या टोळ्यांचा उल्लेख करतात. या टोळ्या पशुपालनावर उपजीविका करीत आणि त्यांना चिअँग म्हणत. चिअँग जमातीचे वर्चस्व इ.स. पू. २०० च्या सुमारास तिबेटवर होते. त्यांनी चीनच्या ईशान्येकडील काही मुलूख पादाक्रांत करून बॉन या नावाचा निसर्गपूजेवर आधारित धर्म प्रचारात आणला. निसर्गपूजेबरोबरच हे लोक भुताखेतांची आराधना करीत. ह्या जमातीने आपल्या राज्याच्या सीमा हिमालयाच्या पायथ्यापासून कोकोनार सरोवरापर्यंत वाढविल्या. यातील एक कर्ता पुरुष पुग्याल हाच तिबेटचा पहिला राजा असावाअसे तिबेटी दंतकथा सांगतातपरंतु बौद्ध धर्माच्या इतिवृत्तानुसार न्यात्‌रीत्सेन पो (न्यात्रीसेनपो) हाच ऐतिहासिक दृष्ट्या पहिला राजा होय.  याच घराण्याचा बत्तीसावा राजा  साँगत्सेन गाम्पो (सातवे शतक) हा पराक्रमी होता. त्याने राज्यविस्तार केला. तसेच बौद्ध धर्माच्या अध्ययनाकरिता आपल्या एका मंत्र्यास हिंदुस्थानला धाडले. त्याच्याच कारकीर्दीत तिबेटमध्ये बौद्धमठजोखांगचे प्रसिद्ध देवालय व पोताला राजवाडा यांच्या बांधकामास सुरुवात झाली. त्याने चीनवर स्वारी करून तेथील राजकन्येबरोबर विवाह केलाशिवाय नेपाळी राजकन्येशीही त्याने लग्न केले होते.

याच काळात उत्तर भारतात कनौज येथे हर्षवर्धन राज्य करत असताना त्याने चीनच्या दरबारी आपले शिष्टमंडळ व्यापार वाढवण्यासाठी पाठवले होते. यावर तांग घराण्याचा राजा तायझोंग याने हर्षाच्या दरबारी आपलेही एक शिष्टमंडळ वांग झुआन्त्सो याच्या नेतृत्वाखाली पाठवले. पण वांग कनौज येथे पोचेपर्यंत हर्षाचा मृत्यू झाला होता आणि अर्जुन नावाच्या त्याच्या एका मंत्र्याने उठाव करून सत्ता आपल्या ताब्यात घेतलेली होती. हर्षाच्या मृत्यूबाबत अनभिद्न्य वांग सन ६४८ मध्ये कनौज येथे पोचला पण अर्जुनाने या तीस सदस्यांच्या शिष्टमंडळावर हल्ला चढवला. त्यामुळे वांगला जीव वाचवून तिबेटला पळून जावे लागले. त्याने तेथे ७००० नेपाळी आणि १२०० तिबेटी सैन्य जमा केले आणि कनौजवर स्वारी केली. त्यात त्याने कनौज उध्वस्त तर केलेच पण अर्जुनालाही ठार मारले. तेथून त्याने मगध प्रांतावर स्वारी केली आणि दोन हजार कैदी व बुद्धाचा एक पवित्र अवशेष सोबत नेला. तिबेटने आपल्याला या युद्धात मदत केली म्हणून चीनचा राजा तायझोंग एवढा खुश झाला कि त्याने तिबेटचा राजा साँगत्सेन गाम्पोचा भव्य पुतळा उभारला. पण चीन-तिबेटची ही मैत्री फार काळ टिकली नाही. त्यात तिबेटचे अरबांशीही युद्ध सुरु झाले आणि दुसरीकडे चीन. त्यामुळे अविरत संघर्षानंतर सन ७०७ मध्ये पुन्हा एकदा शांततेचा तह झाला आणि या तहाचे प्रतीक म्हणून सन ७१० मध्ये चिनी राजकन्या जिन्चेंग तिबेटचा राजा ख्रिडे-त्झुंग-बृत्सान याला विवाहात दिली गेली होती. त्याच वर्षी जिन्चेंग तिबेटमध्ये आली. ही राजकन्या काही वर्ष तिबेटमध्ये आपल्या पतीबरोबर राहिल्यानंतर झाबुलीस्तानचा राजा तेगिन झिबिल याच्याकडे तिचा तातडीचा संदेश आला म्हणूण त्याने चीनचा राजा हुएनत्संगकडे सन ७२४ मध्ये एक शिष्टमंडळ पाठवले.

       या शिष्टमंडळाने चीनच्या राजाला कळवले की, चीनची राजकन्या तिबेटचा त्याग करून (म्हणजे पतीला सॊडून) काश्मीरमध्ये आश्रय घेऊ इच्छिते. राजकन्या जिन्चेंगने काश्मीरच्या राजाकडे आधीच गुप्तपणे दोन चिनी दूत पाठवले असून त्यांच्या मार्फत पाठवलेल्या संदेशात काश्मीर आणि चीनच्या स्नेहार्द संबंधांचे गुणगाण केले. "मला तिबेटचा त्याग करायचा असून काश्मीरमध्ये आश्रय घ्यायचा आहे. आपण माझा स्विकार कराल काय?" या तिच्या प्रश्ना्वर काश्मीरच्या राजाने (तारापीडाने) उत्तर दिले की "राजकन्येतू खुशाल येथे ये. तुला हवी ती मदत आणि सहकार्य आम्ही करु." तिला उत्तर पाठवून त्याच वेळीस काश्मीरच्या राजाने झाबुलीस्तानच्या राजाला कळवले की “चीनची राजकन्या तिबेटचा त्याग करू इच्छिते आणि माझ्या राज्यात शरणार्थी म्हणून येवू इच्छितेपण तिबेटी सैन्य तिचा पाठलाग करण्याची शक्यता आहे. जर तिबेटी सैन्याने तिला अटकाव करण्यासाठी पाठलाग सुरु केला तर त्यांना रोखण्यासाठी माझ्याकडे पुरेसे सैन्य नाही. त्यामुळे झाबुलीस्तानच्या राजाने आपल्याला काही सैन्यशक्तीची मदत करावी." या प्रकरणात जिंचेंगचे शेवटी काय झाले हे इतिहासाला माहित नाही. तारापीडाचा या घटनेनंतर मृत्यू झाला आणि त्याचा धाकटा भाऊ ललितादित्य महान सत्तेत आला.

ललितादित्य मुक्तापिडाने भारतातून व बाल्खमधून अरबांना हाकलून परत येताना गिलगीट बाल्टीस्तान व लदाखही आपल्या स्वामित्वाखाली आणले. तिबेटी सत्तेला हे मोठे आव्हान होते. ललितादित्याच्या मृत्युनंतर काही काळात लदाख, बाल्टीस्तान आणि गिलगिट स्वतंत्र झाले. खरे तर तिबेटमधील सीमावर्ती अनेक राज्ये स्वतंत्र बनली. चंगेजखानाने चीन जिंकून आपले साम्राज्य प्रस्थापित करून सारे प्रांत एका छत्राखाली आणल्यानंतर आता तिबेटवर खंडणी देण्याची वेळ आली. पण चंगेजखान क्रूर असला तरी व्यापारी मार्ग व व्यापार सुरक्षित असावेत यासाठी त्याने व्यापारी मार्गांच्या सुधारणांवर खूप लक्ष दिले. चंगेजखानाच्या मृत्युनंतर त्याचा नातू गोदान याने तिबेटमध्ये आपली सत्ता स्थापन केली. विखुरलेली राज्ये पुन्हा आपल्या स्वामित्वाखाली आणली. पंधराव्या शतकात मंगोलियाने तिबेटवर आक्रमण करून आपली सत्ता आणली. थोडक्यात तिबेट अशांत राहिला. लदाखमधील राजवटी पुन्हा स्वतंत्र झाल्या.

लदाख आणि तिबेटमधील व्यापारी संबंध पूर्वापार होते. लदाख हा नैसर्गिक मिठाचा सर्वात मोठा उत्पादक व निर्यातक होता. पश्मीना लोकरीतही त्यांची मक्तेदारी होती. शिवाय कस्तुरी, चहा, काश्मीरमधून येणारे केशर व शाली इत्यादीचा मोठा पुरवठा लदाखमधून होत असे. तिबेट स्वाभाविकपणे त्यांचा मोठा आयातदार होता. लेहवरून ल्हासाला जाणारा व्यापारी मार्ग हा चांग चेन्मो खो-यातून जाई गारटोकच्या दिशेला वळत असे. गारटोक हे खेडेसदृश असले तरी त्याच्या स्थानामुळे ते व्यापाराचे पुरातन केंद्र होते. हा मार्ग युद्धासाठी सैनिकी हालचालींना सुद्धा वापरला गेला आहे. त्यातील काश्मीरचा सेनानी जोरावरसिंगची तिबेटवर स्वारी हा हाही एक इतिहास आहे. नंतर तिबेटला साम्यवादी चीनने अक्षरश: गिळंकृत केले. भारताशी सीमा संघर्ष सुरु झाल्यानंतर लेह-ल्हासा हा व्यापारी मार्ग बंद केला गेला. मध्य आशिया आणि तिबेटशी होणारा व्यापार थांबल्याने काश्मीर-लदाखची अर्थव्यवस्था गडगडने स्वाभाविक होते. त्यामुळेच जोरावरसिंगने लदाख पुन्हा जिंकून काश्मीर राज्याला जोडले व तिबेटवर स्वारी केली. तो थरारक इतिहास आपण पुढेल भागात पाहूयात.

-संजय सोनवणी

 

Sunday, August 14, 2022

तेजस्वी व्यक्तित्व- संजय नहार!

  


आज(15 August) माझे मित्र संजय नहार यांचा वाढदिवस. ते वंदे मातरम, सरहद संघटना आणि सीमावर्ती राज्यांतील दहशतवादाने बाधित विद्यार्थ्यांसाठीच्या सरहद शिक्षणसंस्थेचे संस्थापक आहेत, सीमावर्ती राज्यांतील तणावग्रस्त माणसे जोडत देश जोडण्याचे ते काम करत आले आहेत हे सर्वांना माहित आहेच. या प्रवासाचा मी जुना साक्षीदार आहे. असा मानवतेचा प्रवास आणि तोही अमानवतेने भरलेल्या जगात सोपा नसतो याची जाणीव सर्वांना आहेच.

जेंव्हा १९८४ सालच्या दरम्यान आमची पहिली भेट झाली तेंव्हा मी आज का आनंद या वर्तमानपत्रात काम करत होतो. इंदिराजींची हत्या झालेली होती. शिखांविरुद्ध जनक्षोभ उसळला होता. संपादक श्याम आगरवाल यांच्यासोबत मी सायकल सोसायटी ते अन्य शीखबहूल भागात त्या शोकसंतप्त वातावरणात फिरत होतो. बहुदा दुस-याच दिवशी एक माझ्यासारखाच फाटका पण स्वप्नांचे तेज डोळ्यांत घेऊन एक युवक आज का आनंदच्या कार्यालयात आला एक प्रेसनोट घेऊन...वंदे मातरम अशांत पंजाबमध्ये धावुन जाणार होती. पत्रकार म्हणून मी संशयानेच पाहिले. प्रश्न विचारले खूप आणि आम्ही मग शेजारच्याच कुंदन दवेंच्या अमृततूल्यमधील वन बाय टू चहा पीत बोलत राहिलो. आम्ही मित्र झालो तो हा लक्षात राहिलेला दिवस आमच्या मैत्रीच्या सुरुवातीच्या काळातला.

पंजाब एवढा पेटलेला होता की खरोखर तेथे कोणी महाराष्ट्रीय, प्रामाणिक भावना व इच्छा असली तरी जाईल असे मला खरेच वाटले नव्हते. पण संजय नहार आणि त्यांचे कार्यकर्ते गेले...एकदा नाही ...अनेकदा....एका कार्यकर्त्याचे प्राण गेले तर संजय नहार कसेबसे वाचले. अशी प्राणांतिक संकटे त्यांच्यावर पुढेही अनेकदा कोसळली. संत नामदेवांनी पंजाब एके काळी प्रेमाने जिंकला होता. त्यानंतर सातशे वर्षांनी तोच पंजाब महाराष्ट्राच्या संजय नहारांनी पुन्हा एकदा जिंकला. घुमान साहित्य संमेलन ही त्या प्रेमाची सर्वोच्च परिणती होती. आज पंजाब आतंकवादातून बाहेर पडला हे जसे रिबेरो, गिल, विर्क यांसारख्या बहाद्दर पोलिस अधिका-यांमुळे घडले तसेच संजय नहारांच्या रचनात्मक, वैचारिक आणि सहृदयतेच्या संदेशामुळेही घडले. नहारांनी हा इतिहास घडवला. आणि याचा मी साक्षीदार आहे.

पंजाब शांत होतो न होतो तोच १९८९मध्ये काश्मीरमध्ये पंडितांचे हत्याकांड आणि विस्थापन झाले. काश्मीर धुमसू लागला. हा माणूस तेथे धावला. विखारावर प्रेमाची फुंकर घालू लागला. हजरत बल मशीदीत, अगदी स्थानिक सरकारचा विरोध पत्करत शांततेसाठी नमाज पढला. विस्थापित पंडितांना भेटला. त्यांच्या दर्दभ-या कहान्या ऐकल्या. शासनाच्या बेपर्वायाही पाहिल्या. पुस्तक लिहिले..."उध्वस्त काश्मीर". तेंव्हा मी छोटा का होईना प्रकाशक झालो होतो. ते पुस्तक प्रकाशित केले. महाराष्ट्रात चर्चाही झाली. नहारांनी आपली रचनात्मक उर्जा काश्मीरकडे वळवली. सीमेवरील राज्यांत त्या वेळीस जवळपास काश्मीरसारखीच स्थिती होती. (आजही स्थिती तशीच आहे फक्त काश्मीरएवढी त्याची चर्चा होत नाही एवढेच.) सरहद संस्थेची पहिली चर्चा आणि तिच्या स्थापनेचा निर्णय नहारांनी माझ्या नळस्टोप येथील कार्यालयात घेतला. पहिले लेटरहेडही छापले. आजही ते पहिले डिझाईन माझ्या स्मरणात आहे.

मी तेंव्हा गडचिरोली येथे कारखाना काढला होता. नक्षलवादी भागात काढला तर काश्मीरला का नको हा प्रश्न संजय नहारांनी मला विचारला आणि त्यातुनच मी तिकडेही धाव घेतली. तेथीलही कारखाना झाला असता पण मला व्यावहारिक ज्ञान कमी. स्वभाव एवढा संतापी की मी फारुक अब्दुल्लांविरुद्धच काश्मीर टाईम्सला मुलाखत दिली. ती दुस-या दिवशी पहिल्या पानावर छापुनही आली. अब्दुल्लांच्या महाराष्ट्रातील इतर सहका-यांनी त्याची दखल घेतली आणि आपल्याच पक्षाच्या नेत्याकरवी मला पुढच्या तीन वर्षांत पुर्ण संपवण्याचा प्रयत्न केला. नहारांनाही (आम्ही दोघे संजयच असल्याने) माझ्यामुळे त्यांच्या रचनात्मक सामाजिक कार्यात त्रास झाला. पण नहारांनी तोही माझ्यासाठी झेलला आणि आपले कार्य नव्या दमाने चालुच ठेवले.

तर तसे एक पुस्तक होईल एवढे विस्ताराने सांगण्यासारखे आहे. पण या माझ्या मित्राच्या अलीकडेही हत्येचा प्रयत्न होऊनही महाराष्ट्र तसा गप्पच बसला. संत नामदेवांना या माणसाने पुन्हा राष्ट्रीय पटलावर आणले. काश्मीरमध्ये पर्यटन वाढावे, तेथील इतिहास, संस्कृती जगासमोर जावी, तेथील बेहालीतील नागरिकांना रोजगार तर मिळावाच पण त्याच बरोबर मुख्य भूमीतील लोकांचे प्रेमही मिळावे यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न केले. दहशतवाद्यांनी ्ठार मारलेल्या काश्मीरीच् नव्हे तर इशाण्येतेल राज्यांतील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शाळा-महाविद्यालयही काढले. माझ्या सुषमा वहिनी तर काश्मीरी मुलांची माय बनल्या. (सुषमा वहिनींबाबत मी सविस्तर नंतर लिहिनच)

संजय नहार यांच्याबद्दल काश्मीरी लोकांना काय वाटते याचे उत्तर माझ्या गेल्या भेटीत दोन प्रसंगात मिळाले. ज्या वाहनातून मी परिहासपुरला जायला निघालो त्या वाहनाचा चालक म्हणाला, "नहारसाब यहां चुनाव लडेंगे तो उन्हे बिना किसी तकरीर या प्रचार के चून दिया जायेगा.". असाच अनुभव परिहासपुरच्या भग्नावशेषांमधेही मिळाला. एक मराठी माणूस काश्मीरमध्ये केवळ सहृदयतायुक्त मानवतेच्या जीवावर लोकांच्या हृदयात स्थान मिळवतो हे अद्भूत आहे. अनेक काश्मीरी मुले शुद्ध मराठी बोलतात हेही त्यांचे यश, हे येथील मराठीप्रेमींनी लक्षात घेतले पाहिजे.

संजय नहारांचे मस्तक हे आजही रोज नव्या रचनात्मक संकल्पना, कल्पना. योजना आणि अजरामर उत्साह यांनी उसळणारा ज्वालामुखी आहे. हे झोपतात तरी कधी? का एवढी उमेद? स्वप्ने अनेकदा ढासळूनही, अगदी हत्येचे प्रयत्न होऊनही कोणती उमेद या माझ्या मित्राला अजरामर मानवतेची स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देते?

अशी कोणती उर्जा आहे जी विपरित स्थितीतही नाउमेद न होता चिरंतन उत्साहाने विपरिततेही सृजनाचे स्वप्न पाहते...कृती करते?

तसा मी त्यांचा एक वर्ष एक दिवसाने थोरला. खरे तर थोरला भाऊ म्हणून मी त्यांची जपणूक खूप शक्तीने करायला हवी होती. मला ते जमले नाही. त्यांच्या हत्येचा प्रयत्न होऊनही जेवढे रान उठवता आले नाही याची. उलट त्यांनाच माझ्या थोरल्या भावाच्या भूमिकेत जावे लागले. तेही विपरित स्थितीत याचा खेद आहे. पण पण नियती असते यावर माझा आता विश्वास बसू लागलेला आहे. आणि ती नियती आहे ती सर्जनाची, मानवतेची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची.

महावीर, बुद्ध आणि गांधीजींच्या तत्वज्ञानाला जगण्यातून नवे रुप देत नवा मार्ग संजय नहार बनवताहेत. आज ते कदाचित आपल्याला समजणार नाही. पण शेवटी आमचा महाराष्ट्र तिरडीवर पाय ताणल्याखेरीज कोणाला ओळखले हे मान्यच करत नाही. ही महाराष्ट्राची नियती आहे. तीही कधीतरी बदलेल.

आशा अनंत आहेत मित्रा...आणि स्वप्नेही

स्वप्न न पाहणारा माणूस आणि समाज मृतवतच असतो

आणि तू तर स्वप्ने रोज पाहतोस

आणि ती स्वप्ने सत्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न करतो आहेस...

आशा आहे समाजही असेच करेल...

स्वत:च्या चिरंतन सुखासाठी!

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मित्रा!

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि भविष्याची आव्हाने!

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपण पदार्पण केले आहे. भारतीय संस्कृती ही जगातील अतिप्राचीन संस्कृतींपैकी महत्वाची अशी एक संस्कृती मानली जाते. भारतीय उपखंडाचा पुरातत्वीय इतिहासक किमान दोनेक लाख वर्ष इतका जुना जातो. या प्रदीर्घ काळात या भूमीने असंख्य परिवर्तनांना तोंड दिले आणि पचवले देखील. येथे गणराज्यरूपाने जशी आदिम लोकशाही अवतरली तशीच वंशपरंपरागत पण नीतीने बांधील अशी राजेशाहीही अवतरली. स्वतंत्रतावादी ते राज-नियंत्रित अर्थव्यवस्थेची प्राचीन प्रारुपेही या देशात अवतरली. समता, बंधुता, सहिष्णुता ही महनीय मुल्ये भारतातील प्राचीन समण संस्कृतीने रुजवलेली होतीच. भारतीय राजांनी मध्य आशिया, इराणचा काही भाग तर आपल्या अंमलाखाली आणलाच पण जावा, सुमात्रा, सिंगापूर इत्यादी दक्षिणपूर्व आशियातील भूभाग काबीज केले आणि शेकडो वर्ष आपल्या सत्ता जशा राबवल्या तशाच भारतीय सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांचाही प्रसार केला. भारताने भारताबाहेर जसे पाउल ठेवले तसेच मध्य आशिया, पश्चिम आशिया, आफ्रिका, युरोपादि भागातूनही भारतात लोक आले. ग्रीक, शक, हुण, कुशाण, अरब, मंगोल, ब्रिटीश आदि शक्तींनी भारतात आपली राज्येही स्थापन केली. ब्रिटीशांनी तर समस्त भारत आपल्या सत्ताछत्राखाली आणला. राष्ट्र ही संकल्पना भारतात आधुनिक काळात अवतरली असली तरी भारत हे शिव-शक्तीप्रधान असल्याने ते सांस्कृतिक राष्ट्र म्हणून नेहमीच अस्तित्वात होते. जैन आणि बौद्ध संस्कृतीनेही या सांस्कृतिक ऐक्याला मोठा हातभार लावला. देशभर विखुरलेली जोतीर्लींगे आणि शक्तिपीठे या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे आधारबिंदू झाले. ब्रिटीशांची सत्ता उलथून टाकण्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अवघा भारत एकवटू शकला तोच मुळात सांस्कृतिक ऐक्य जनमानसात आधीच ठसलेले असल्यामुळे. त्यामुळे पूर्वी देश अनेक राजसत्तांमध्ये वाटला गेला असला तरी आधुनिक राष्ट्रवादाच्या व्याख्येत भारतीयांनी आपले सांस्कृतिक राष्ट्रवादाची व्याख्या मिसळून टाकली. जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून देश परकीय दास्यातून स्वातंत्र्य मिळवून उदयाला आला त्याला आता ७५ वर्ष होत आहेत. ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

भारत आज ७५ वर्ष होत असतांना आधुनिक परिप्रेक्षात कोणत्या स्थानावर पोहोचला आहे हे आपण पाहतोच आहोत. अनेक क्षेत्रांत भारतीयांनी नेत्रदीपक कामगिरी करून जागतिक पटलावर आपला ठसा सोडला आहे. एक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करणारा देश म्हणून जग आपल्याकडे पाहते. किंबहुना हे सर्व भारतीयांचे स्वप्नही आहे. पुढील पंचवीस वर्षांनी आपण स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करू. तेंव्हा आमचा देश कोणत्या स्थितीला पोचलेला असावा व त्यासाठी नेमके काय करावे लागेल याचाही विचार या प्रसंगी करणे आवश्यक आहे कारण आपण एका महत्वाच्या टप्प्यावर पोचलो असतांना भविष्यातील आव्हाने पेलत आपल्याला राष्ट्राची स्वप्ने साकार करायची आहेत. आजच्या सामाजिक, आर्थिक आणि ज्ञानात्मक क्षेत्रातील राहून गेलेल्या तृटी कशा दूर करायच्या हेही आपल्यासमोरचे आव्हान आहे. एक विकासात्मक राष्ट्रीय मानसिकता निर्माण करायची असली तर आम्हाला यावर चिंतन करणे आवश्यकच आहे.

यात मला महत्वाचा वाटतो तो शिक्षणाचा मुद्दा. कोणताही समाज कोणत्या दिशेने जाणार आहे, तो भविष्यात कोठे आणि कसा असेल हे समजावून घ्यायचे असेल तर आजची पिढी नव्या पिढीला कशी घडवते हे आधी पहावे लागेल! समाजाची वर्तमान स्थिती नवागत नागरिकाच्या समग्र व्यक्तिमत्वावर परिणाम करत असते. समाजाच्या निराशा, स्वप्ने व जगण्याच्या प्रेरणा नकळतपणे या नवांगत नागरिकाच्याही प्रेरणा बनतात व तो त्याच परिप्रेक्षात व परिघात स्वप्न पहायला लागतो. आहे त्या समाजव्यवस्थेत अडथळ्यांवर मात करत ती स्वप्ने पुर्ण करण्याचे प्रयत्न करू लागतो. 

विद्यार्थ्याला साक्षर बनवत विविध ज्ञानशाखांशी परिचय करून देत भविष्यात त्याला कोणत्यातरी एक आवडीच्या ज्ञानशाखेत नवी भर घालण्यासाठी अथवा ती पुरेपूर आत्मसात करून समाजोपयोगी बनण्यासाठी अथवा एखादी नवीच ज्ञानशाखा स्वप्रतिभेने निर्माण करण्यासाठी त्याला तयार करणे म्हणजे शिक्षण!  

 

पण आपण आजच्या आपल्या व्यवस्थेकडे पाहिले तर जे चित्र दिसते ते अत्यंत निराशाजनक आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणजे, आम्ही मुळात मुलांना शिक्षणच देत नाही तर विद्यार्थ्याला केवळ साक्षर बनवण्यापलीकडे व एक बौद्धिक श्रमिक बनवण्यापलीकडे काहीही विशेष साध्य करत नाही हे आपल्या लक्षात येईल. मुळात आपली आजची शिक्षणव्यवस्था हीच मानवी प्रेरणांना विसंगत आहे. नैसर्गिक कलआणि त्यातच प्राविण्य मिळू देण्याच्या संधी आम्ही नाकारलेल्या आहेत. सर्वच प्रज्ञावंत होऊ शकत नाहीत हे सत्य मान्य केले तरी अशा बहुसंख्यांक विद्यार्थ्यांना जगण्याची कौशल्येसुद्धा शिकवण्यात आम्ही अजून खूप मागेच आहोत.

 

आज आपण पाहिले तर जागतिक पहिल्या २०० विद्यापीठांत आमचे एकही विद्यापीठ नाही. कोणत्याही ज्ञानशाखेत नवी भर घालणारे विद्वान व शास्त्रज्ञ आम्ही घडवले नाहीत. विदेशात जाऊन जे भारतीय अगदी नोबेलप्राप्तही होऊ शकले त्यांची गणना यात करण्याचे कारण नाही. ते येथेच असते तर ते तसे घडू शकले नसते कारण आपली व्यवस्थाच मुळात प्रतिभेला फुलारू देणारी नाही हे कटू वास्तव त्यातुनच अधोरेखित होते. भारताचा नव्या जगात ज्ञान-विज्ञानक्षेत्रात नेमका वाटा काय हे पहायला गेले तर निराशाजनक चित्र सामोरे येते ते यामुळेच! त्यामुळे शिक्षण हा मुद्दा आपल्यासमोर एक राष्ट्रीय प्रश्न म्हणून उभा असायला हवा कि ज्यायोगे पुढील २५ वर्षात आम्ही ज्ञानक्षेत्रात आणि म्हणूनच अर्थक्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवू शकू.

 

प्रगत राष्ट्रांत सध्या जोरदार चर्चा चालु आहे ती श्रमिकांची व कनिष्ठ कार्यांसाठी लागणा-या कर्मचा-यांची जागा यंत्रमानवांनी घेणे कितपत संयुक्तिक व नैतिक आहे यावर. औषधी उत्पादन, शेतकी ते अनेक रसायनी उद्योगांत अवाढव्य कारखाने यंत्रमानवांच्या वापराला पसंती देतांना दिसून येतात. काहींनी त्यांचा वापर सुरुही केला आहे. त्यात आता भर पडली आहे ती म्हणजे "कृत्रीम बुद्धीमत्ता" (Artificial Intelligence) या वेगाने विकसित होत चाललेल्या संकल्पनेची. या मागोमाग क्वांटम कम्प्युटर हे संकल्पनाही विकसित होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यातील भरारी घेऊ शकणा-या व जगण्याच्या पद्धतीच बदलू शकणा-या या क्षेत्रात भारतीय केवळ बौद्धिक श्रमिक म्हणून राबणार कि स्वप्रतीभेने या क्षेत्रात नवे अभिनव संशोधन करत जागतिक पातळीवरील बौद्धिक व आर्थिक प्रतिष्ठा प्राप्त करणार हे पुन्हा शिक्षणावरच अवलंबून आहे.  

      भविष्यातील शेतीचे स्वरूपही आमुलाग्र बदलणार आहे. आम्ही जुन्याच पद्धतीने शेती करत राहणार आहोत कि शेतक-यांनाच कॉर्पोरेट बनू देत अत्याधुनिक शेती करू देत त्यांचे जीवनमान सुधारणार आहोत हाही एक प्रश्न आपल्यासमोर आहे. भटके-विमुक्त तर आजही आपण या देशाचे नागरिक तरी आहोत कि नाही या प्रश्नाशी झगडत आहेत. त्यांनाही मुख्य धारेत आणत विकासाचे कृतीशील घटक बनवावे लागणार आहे.

      राष्ट्रीय मानसिकता विकासाभिमुख बनवायची असेल तर तसेच व्यक्तीगत कलाधारित मुक्त शिक्षण उपलब्ध केले गेले आणि कोणतीही विचारधारा त्यांच्यावर लादली नाही तर राष्ट्राची निकोप प्रगती होणे सहजसाध्य आहे. महासत्ता बनण्याचा राजमार्ग म्हणजे प्रगल्भ नागरिकांची संख्या आधी वाढवणे. परीघावरच्या प्रश्नांना महत्व देत आम्ही त्याच्याशी झगडण्यात वेळ वाया घालवला तर मात्र स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षातही आम्ही राष्ट्राभिमानाचा वृथाभिमान बाळगत त्याच त्या समस्यांशी झुंझत राहू.

      स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा!

 

-संजय सोनवणी

 (Published in Daily Punyanagari)

 

भारतीय स्वातंत्र्य: शत्रू कोण? नेता कोण?

  

भारतीय स्वातंत्र्य: शत्रू कोण? नेता कोण?

आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत. भारत समर्थ होत आहे तो घटनात्मक लोकशाही आहे म्हणून. या घटनात्मक लोकशाहीला नखे लावायची तयारी पुन्हा झालेली आहे. लोकशाहीवाद्यांचा लढा पुन्हा सुरू व्हावा असे वातावरण आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास फार मागे जातो. सुरुवात होते ती महाराजा यशवंतराव होळकर यांनी २२ मे १८०४ रोजी बुंदेलखंडात कूचजवळ कर्नल फॉसेट याच्या लष्करी तळावर अचानक भीषण हल्ला करून ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाविरुद्ध एल्गार पुकारून त्यांना हाकलण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हापासून. त्यावेळीस इस्ट इंडिया कंपनीची भारतात हातपाय पसरवायला सुरुवात झाली होती. बहुसंख्य रजवाडे इंग्रजांचे मांडलिक बनले होते. यशवंतरावांनी ब्रिटिशांविरुद्ध एल्गार पुकारून भारतातील सर्व रजवाड्यांना एकत्र यायची आवाहने करत स्वत: सातत्याने लढत राहिले. मुकुंदरा, भरतपूर युद्धात त्यांनी ब्रिटिशांना पार बस्तान गुंडाळायची वेळ आणली पण येथील रजवाडे त्यांना सामील झाले नाहीत. त्याचा फायदा घेत ब्रिटिशांनी आपले गमावू लागलेले स्थान पुन्हा प्राप्त केले. हा भारतीय स्वातंत्र्याचा पहिला लढा होता. दुसरा मोठा लढा १८५७ मध्ये दिल्लीचा बंडाला मुळात अनिच्छुक असलेला पातशहा बहादूरशहा जफरला नेता मानून उतरेतील संस्थानिक व ब्रिटीश सैन्यातील असंतुष्ट घटकांनी सुरू केला. भारतातीलच सैनिकी बळ वापरत ब्रिटिशांनी तो उठाव चिरडला. इंग्लंडच्या राणीचे राज्य आले १८८५ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि स्वातंत्र्य संग्रामाने नवे वळण घेतले. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला.

गांधींमुळे भारताला उशीरा स्वातंत्र्य मिळाले असा आरोप संघवादी कुजबूज मोहीम करत आलेली आहे. पण येथे प्रश्न केवळ भारतीय स्वातंत्र्याचा नव्हता. कोणाचे आणि कोणासाठी आणि कशा प्रकारचे स्वातंत्र्य हा खरे तर महत्त्वाचा प्रश्न होता. समजा महाराजा यशवंतराव होळकरांना अन्य संस्थानिकांनी साथ दिली असती तर भारताला १८१०च्या आधीच स्वातंत्र्य मिळाले असते. पण ते स्वातंत्र्य भारतीय संस्थानिक आपापल्या राज्यात स्वतंत्र राजे होण्यापर्यंत मर्यादित राहिले असते. हे स्वातंत्र्य सर्वसामान्य नागरिकांना द्यायचे की नाही हे त्या त्या राज्याच्या राजावर अवलंबून राहिले असते. लोकशाही त्यावेळीस भारतीयांसाठी विस्मृतप्राय झालेली होती. निर्माणकर्ते समाज, शोषित-वंचित, आदिवासी यांच्यापर्यंत ते स्वातंत्र्य कधीही पोहोचू शकले नसते. घटनात्मक स्वरूप तर आलेच नसते. आणि आले असते तरी प्रत्येक राज्याची स्वतंत्र घटना व कायदेव्यवस्था असल्याने भारतात तेवढी शेकडो हिंदू-मुस्लीम, शिखादी राष्ट्रे बनली असती. देशाला आजचे स्वरूप कालत्रयी मिळाले नसते.

हीच बाब १८५७च्या लढ्याबद्दल. जर उठाव यशस्वी झाला असता तर दिल्लीच्या पातशहाला नामधारी केंद्रीय सत्ता म्हणून स्थान देत सारे रजवाडे (तेही उत्तरेकडील) स्वतंत्र झाले असते. दक्षिणेकडे ब्रिटीश, फ्रेंच, पोर्तुगीज सत्ता कायम झाल्या असत्या आणि तेथील राजवटी जेव्हाही कधी स्वतंत्र झाल्या असत्या त्याही स्वतंत्रपणे कारभार करत प्रजेला मात्र स्वातंत्र्यापासून वंचित ठेवणाऱ्या झाल्या असत्या. म्हणजे भारतीय स्वातंत्र्य जरी १८५७च्या लढ्याने प्राप्त झाले असते तर ते प्रजेचे स्वातंत्र्य नसते हे उघड आहे. अखंड भारत ही वल्गना करणारे तेव्हा कोठे असते? ते प्रत्येक राजाच्या कच्छपी लागत त्याचे गुणगान करणारी काव्ये लिहित प्रजेवर धार्मिक गुलामी लादत राहिले असते. अखंड भारत ही संकल्पना त्यांना जशी प्राचीनकाळीही शिवली नाही तशीच स्थिती या देशात कायम राहिली असती. हिंदू राजा विरुद्ध हिंदू राजा, मुस्लिम राजा विरुद्ध हिंदू वा मुस्लिम राजा हे संघर्ष नित्याचे झाले असते. यात खरे नुकसान झाले असते ते येथील प्रजेचे. ज्ञान-विज्ञान, भविष्याची स्वप्ने या राजवटीच्या सत्तालोभी कारवायांमध्ये कोठल्या कोठे वाहून गेली असती. आजचा देश पहायलाही मिळाला नसता.

१८८५ साली काँग्रेसची स्थापना झाली. प्रथम तिची उद्दिष्टेही मर्यादित होती. राज्यकारभारात एतद्देशीयांना काही तरी स्थान द्या व त्यांचेही म्हणणे ऐकून घ्या या त्या मागण्या होत्या. लो. टिळक काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतरही ब्रिटिशांच्या अधीन (राणीशी एकनिष्ठ) भारतीय स्वराज्य अशीच संकल्पना राहिली. शिवाय या चळवळीला अत्यंत मर्यादित स्वरूप होते. तत्कालीन ब्रिटीश अखत्यारीतले शिक्षित-उच्च-शिक्षित भारतीयांपुरते ते मर्यादित होते. सर्वसामान्य जनतेला स्वराज्य म्हणजे काय आणि स्वातंत्र्य म्हणजे काय हे पटवणे त्यांना एवढे महत्त्वाचे वाटले नाही. त्यामुळे ते प्रयत्न मर्यादित राहिले. त्यातही जहाल-मवाळ-सशस्त्र क्रांतीवादी मंडळीचे गट होतेच व एकमेकांवर वैचारिक कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होतेच. पण संपूर्ण भारताचे स्वराज्य व्हावे ही भावना निर्माण करण्यात मात्र राष्ट्रीय काँग्रेस यशस्वी झाली. १९०५ साली झालेल्या बंगालच्या फाळणीचे पडसाद देशभर उमटले. स्वदेशीची चळवळही सर्वत्र पसरली. असे असले तरी सर्व देशवासियांना स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय आणि ते कशासाठी हे पटवण्यात अपयश आल्याने व कृती कार्यक्रम नीटपणे देता न आल्याने ही चळवळ मर्यादितच राहिली.

मोहम्मद अली जिना आधी काँग्रेसमध्ये सामील झाले पण लगोलग ते मुस्लिम लीगमध्ये जाऊन पुढे लीगचे अध्यक्षही बनले. त्यांनाही इतर काँग्रेसी नेत्यांप्रमाणेच तत्काळ संपूर्ण स्वातंत्र्य ही कल्पना पसंत नव्हती. मुळात स्वातंत्र्य मिळाले तर ते कोणाला आणि कसे मिळणार आणि नंतर स्वतंत्र राष्ट्राचे प्रारुप काय असणार याबाबत सर्वांचीच कल्पना धूसर होती. आणि धार्मिक प्रश्नांनी उचल त्यामुळेच घेतली गेली. त्यात पहिल्या महायुद्धाची सुरुवात झालेली होती. या युद्धामध्ये महात्मा गांधीसहित जवळपास सर्वच नेत्यांचे ब्रिटिशांना समर्थन होते. या काळात सशस्त्र उठावांची ब्रिटिशांना भीती होतीच पण तसे व्यापक उठाव झालेच नाहीत. जे झाले ते चिरडले गेले.

हिंदू-मुस्लिम सत्ता संघर्ष हा एक महत्त्वाचा भाग याच काळात उफाळून आला. ब्रिटिशांनी बहाल केलेल्या मर्यादित अधिकारांच्या सत्तेत मुस्लिमांचा अधिक वाटा असावा अशी मागणी त्यांनी रेटायला सुरुवात केली होती. त्यातूनच लो. टिळक यांनी मुस्लिमांना स्वतंत्र मतदार संघ देण्याचा करार लखनौ येथे केला. हिंदू-मुस्लिम सौहार्द निर्माण झाल्याखेरीज स्वातंत्र्य मिळण्यात काही अर्थ नाही असा मतप्रवाह प्रबळ असल्यानेच हे घडले खरे पण फाळणीची बीजेही याच करारात दडलेली आहेत असे अनेक विद्वानांचे मत आहे.

टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पटलावर आले आणि त्यांनी अद्भुत क्रांती केली. त्यांनी देशभरातील सामान्य लोकांनाही सहज वापरता येईल असे सत्याग्रहाचे शस्त्र दिले. स्वदेशीचा फक्त नारा देऊन ते थांबले नाहीत तर चरखा घरोघर पोचवला. भारतीय स्वातंत्र्याशी आपलाही काही संबंध आहे ही आसेतु-हिमाचल जाण निर्माण करण्यात त्यांना अभूतपूर्व यश मिळाले. राष्ट्र हे एक आहे, ही पूर्वी भारतात कधीही नसलेली भावना त्यांनी निर्माण केली. देशभर शोषित, वंचित समाजघटक व महिलाही खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यलढ्यात उतरल्या. हे स्वातंत्र्य मर्यादित घटकांचे नाही तर ते “माझे आणि प्रत्येकाचे समान पातळीवरील” स्वातंत्र्य आहे हा विश्वास गांधीजीनी निर्माण केला. स्वतंत्र भारताचे स्वरूप लोकशाही राष्ट्र असणार हे तर स्पष्टच झालेले होते. त्यामुळे त्यांच्या आंदोलनात देशभरातील स्त्री-पुरुष सामील होऊ लागले. १९२८ सालीच स्वतंत्र भारताची घटना तयार करण्यासाठी मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. १९२९ मध्ये लाहोर अधिवेशनात एका ठरावाद्वारे “संपूर्ण स्वातंत्र्य” हे ध्येय ठेवण्यात आले व २६ जानेवारी १९३० हा दिवस “पूर्ण स्वराज्य दिन” म्हणून साजरा केला जाईल असे ठरवले. जेव्हा सर्व भारतीय आता स्वातंत्र्यासाठी तयार आहेत हे लक्षात आले तेव्हा ८ ऑगस्ट १९४२ रोजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करत ब्रिटिशांना “चले जाव !”चा इशारा दिला व अभूतपूर्व आंदोलन सुरू झाले. सरकारने दडपशाही केली. लाखो लोकांना अटका केल्या. पण स्वातंत्र्याचे लोण आता सर्वत्र पसरले होते. आपले स्वातंत्र्य हे घटनात्मक स्वातंत्र्य असेल याची ग्वाही लोकांना मिळालेली होती.

स्वतंत्र भारत कसा असेल याबाबत गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कल्पना स्पष्ट होत्या. भारतात लोकशाही असेल, प्रत्येक सज्ञान व्यक्ती मतदाता असेल, सर्वांना समान अधिकार असतील” हा त्याचा पाया होता. हिंदू व मुस्लिम संस्थानिक याला विरोध करणार हे निश्चितच होते. पण संस्थानी प्रजेतही भारतीय स्वातंत्र्याची संकल्पना रुजवण्यात काँग्रेसने यश मिळवले. देश एकीकडे असा संपूर्ण स्वातंत्र्याकडे प्रवास करत असताना मुस्लिम लीग जशी अस्वस्थ होती तसाच एक या लढ्यापासून दूर राहणारा संघ परिवार हा घटकही होता. काँग्रेसच्या  कोणत्याही आंदोलनात सामील व्हायचे नाही (व ब्रिटीशांना सहकार्य करायचे) हे संघ नेतृत्वाने ठरवूनच टाकलेले होते. त्यामुळेच की काय रा. स्व. संघ भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात जसा सामील झाला नाहे तशीच सावरकरप्रणीत हिंदू महासभाही.

त्यामुळे मुंबई प्रांताच्या ब्रिटिश सरकारने “संघाने स्वत:ला ऑगस्ट १९४२च्या उपद्रवापासून स्वत:ला दूर ठेवले आणि स्वत:ला ब्रिटिश कायद्याचा सीमेत ठेवले.” या शब्दात संघाचा गौरव केला. ( From Plassey to Partition: A History of Modern India by Sekhara Bandyopadhyaya (2004)) हिंदू महासभेने मुस्लिम लीगशी युती करून सिंध, नॉर्थ-वेस्ट फ्रंटियर व बंगाल प्रांतात सरकारे स्थापन केली. (१९३७). मार्च १९४३ मध्ये सिंध प्रांत सरकारने पाकिस्तान स्थापनेचा ठराव केला. या ठरावाला वरकरणी विरोध केला तरी हिंदू महासभेच्या एकाही मंत्र्याने राजीनामा दिला नाही. (हे तीनही भाग आजच्या पाकिस्तान व बांगला देशात आहेत.) असे असतानाही १४ ऑगस्ट भारतीय फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्यासाठी भाजप सरकारच आवाहन करते हा विरोधाभास आहे. किंबहुना सरसंघचालक मोहन भागवत (व पूर्वी सावरकर) अखंड भारताच्या घोषणा करत असतात हा तर मोठा विनोद आहे. फाळणीला विरोध केला तो काँग्रेसने. “माझ्या प्रेतावरूनच फाळणीचा रस्ता जाईल.” असे महात्मा गांधी म्हणत. फाळणी टाळण्यासाठी जीनाशी कोणतीही तडजोड करायला गांधीजी तयार होते. त्याला ‘मुस्लिमांचा अनुनय’ म्हणून गांधीजींची हेटाळणी करणारे वीर हेच होते.

मुस्लिम प्रश्नाची दाहकता मोठी होती. बहुसंख्यांक हिंदूंसोबत मुस्लिम कसे जगणार हा प्रश्न तर होताच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न होता कथित अखंड हिंदुस्तानाची “घटना” काय असणार हा. फाळणी न झाल्याने संख्या जास्त झालेले मुस्लिम आपली तत्वे घटनेत घुसवणार व जो समतावादी सहिष्णू भारत निर्माण करायचा आहे त्यात अडथळा येईल हा मुद्दाही महत्वाचा होता. १९४०च्या Pakistan or the Partition of India या प्रसिद्ध ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले की, मुस्लिमांना स्वतंत्र राष्ट्र हवे असेल तर ते बळाच्या जोरावर थांबवता येणार नाही. पाकिस्तानची निर्मिती व्हायचीच असेल तर ती स्वतंत्र भारताची घटना तयार होण्याआधीच व्हायला हवी कारण नंतर विभाजन झाले तर ते देशाला महागात पडेल. भारतातील बहुसंख्य हिंदू जर मुस्लिमांना दडपणाखाली दुय्यम नागरिकत्व देतील अशी मुस्लिमांची भावना बनली असेल तर त्यांना एकाच राष्ट्राच्या छताखाली ठेवणे योग्य नाही. असे राष्ट्र बनू शकणार नाही.

गोळवलकर गुरुजींच्या १९३९ सालीच प्रसिद्ध झालेल्या “We Or Our Nationhood Defined”  या पुस्तकातील “मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व बहाल केले जाईल” हे विधान सुप्रसिद्धच आहे आणि त्या विधानाचा गंभीर परिणाम मुस्लिम मानसिकतेवर झाला हे वास्तव नाकारता येत नाही. वैदिक धर्मियांच्या वर्चस्वाखालील हिंदू राष्ट्रवाद तेव्हाही घातक ठरला आणि आज तर तो विकोपाला जाऊ पाहत आहे. प्रचंड हिंसा होऊन देशाची फाळणी झाली हे एक वास्तव आहे. महात्मा गांधींचा बळीही त्याच विखारी वातावरणाने घेतला व त्यातील मुख्य आरोपी नथुराम गोडसेचे पाठीराखे कोण होते आणि आजही त्याचा गौरव कसा करत असतात हे आता सारा देश जाणतो.

गांधीजीमुळे या देशातील जनतेला स्वातंत्र्याचा अर्थ उमगला. सर्वांनी स्वातंत्र्य आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. गांधीजी यशस्वी न होता अन्य कोणतेही घटक यशस्वी झाले असते तर या देशाचे आज स्वरूप काय राहिले असते हे वाचकांच्या लक्षात येईल. घटनात्मक लोकशाहीचे आहे तेवढेही राष्ट्र उरले नसते. असंख्य राष्ट्रांचा समूह एवढेच त्याचे स्वरूप राहिले असते. आणि प्रत्येक राष्ट्राची घटना वेगवेगळी तर असतीच पण परस्पर विरोधाभासीही असती. सर्वसामान्य जनतेला त्यात कितपत स्थान उरले असते याची शंकाच आहे. हिंदू राजांनी तर वैदिकांच्या कच्छपी लागून मनुस्मृतीलाच राज्यघटना बनवले असते. मुस्लिम राजवटी शरियतच्या राज्याच्या भानगडीत पडले असते. धर्मांधता, शोषणाची आणि अन्यायाची परिसीमा झाली असती.

आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत. भारत समर्थ होत आहे तो घटनात्मक लोकशाही आहे म्हणून. या घटनात्मक लोकशाहीला नखे लावायची तयारी पुन्हा झालेली आहे. लोकशाहीवाद्यांचा लढा पुन्हा सुरू व्हावा असे वातावरण आहे. सर्वसामान्यांना खरे स्वातंत्र्य मिळेल आणि समतेच्याच तत्वावर भारतातील सारे गुण्या-गोविंदाने वावरतील आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या दिशेने वाटचाल करतील असे कसोशीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्य नुसते इव्हेंट केल्याने टिकत नाही की टिकवता येत नाही. “घर घर तिरंगा” हा इव्हेंट आहे. मुळात भारत हे राष्ट्र कसे निर्माण झाले हे समजून घेण्यात आणि ते स्वातंत्र्य टिकवण्यात व बलशाली करण्यात खरे राष्ट्रप्रेम आहे. ते उरा उरात जागो आणि १५ ऑगस्ट १९४७ हा महन्मंगल दिवस ज्यांनी दाखवला याबाबत सर्व भारतीयांच्या मनात कृतज्ञतेचा भाव उमटो ही प्रार्थना

भारतीय स्वातंत्र्याचे शत्रू कोण आहेत हे सर्वांनी समजावून घ्यायचे आहे. प्रत्येक भारतीय हा स्वातंत्र्याचा नेता आहे ही भावना उरात जागवली पाहिजे.

सर्व भारतीय बांधवांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

संजय सोनवणी, हे संशोधक, लेखक आणि पत्रकार आहेत.

(Published in The Wire. https://marathi.thewire.in/75-years-of-indian-independence-who-is-the-enemy-who-is-the-leader#more

शेरशहा सुरी: एक कुशल प्रशासक

  शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषि...