Saturday, June 9, 2012

खरे स्वातंत्र्य हा गुलाम कधी उपभोगणार?


यावज्जीव मनुष्य प्रयत्न करत असतो तो आहे या स्थितीपासून स्वातंत्र्य मिळवत अधिकाधिक मानसिक/आर्थिक आणि सत्तेचे अधिकाधिक अवकाश प्राप्त करण्यासाठी. आहे ती स्थिती सुखावह न वाटणे हे मानवी मनाचे एक अव्यवछेदक लक्षण आहे. मग ती स्थीती कोणतीही असो. एकपट धन असणारा दुप्पट धनाची अपेक्षा बाळगत असतो हे पुरातन औपनिषदिक विधान या परिप्रेक्षात ध्यानात घ्यावे लागते.  याला "हाव" हा शब्द पुरेसा नसून तो मानवी मनोभुमिकेवर अन्याय करणारा आहे. खरे तर आपले स्वातंत्र्य, आपले अवकाश सीमित न राहण्यासाठी, किमान ती टिकुन राहण्यासाठी रक्षणात्मक अशी जी आर्थिक/सत्तात्मक/ धर्माधारीत तरतुद मनुष्यमात्र करत असतो, वा स्व-वाच्छित व्यवस्था बनवण्याच्या नादाला लागलेला असतो त्यालाच आपण मानवी स्वातंत्र्याचा अविरत चालत असलेला संघर्ष म्हणतो. परकीय सत्तांशीचा स्वातंत्र्य संघर्षही खरे तर याच मुलभुत भावनांच्या विकारांवर आधारीत असतो. परंतू वैश्विक परिप्रेक्षात स्वकीय आणि परकीय अशी मुळात तरतुदच नसते. जे स्वकीयांच्या म्हणुन स्वातंत्र्याच्या बंडात असतात तेच आपापल्या व्यवस्थेतीलही पारतंत्र्याच्या भावना देणा-या कथित परकियांच्या विरुद्ध पवित्र्यात उभे राहायला सज्ज होतांना दिसतात. त्यामुळे स्वकीय आणि परकीय या शब्दांना जरा तारतम्यानेच घ्यावे लागते.

भारतावर शक, हुण, कुशाणांनी अनेक शतके राज्ये केली. ते तसे परकीयच होते. ग्रीकांनीही काही काळ सीमावर्ती प्रदेशांवर शासन केले. ते येथे असे मिसळुन गेले कि आज त्यांचे स्वतंत्र आस्तित्व दाखवता येणे अशक्यच आहे. मुस्लिमांनी (यात अनेक वंशीय मुस्लीम होते...तुर्क, पर्शियन ते मोगल) भारतावर अनेक शतके सत्ता गाजवली. ते परकीय आहेत, अन्यायकर्ते आहेत म्हणुन राजपुतादिंनी त्या सम्राटांना आपल्या कन्या देण्यात अनमान केल्याचे दिसत नाही. किंबहुना मोगल साम्राज्य टिकण्यात राजपुतांचा मोठाच वाटा होता हे अमान्य करता येत नाही. याची सांस्क्रुतीक परिणती अशी झाली कि मोगल हे रक्ताने जवळपास ७५% भारतीय बनले. याची खंत शाह वलीउल्लाह सारख्या धर्मांध व्यक्तीला एवढी पडली होती कि १७३६ ते पुढेही त्याने भारतातील मुसलमान अजलाफ (हीण) काफिर झाले असुन शुद्ध इस्लाम आणायचा असेल तर जिहाद करायला हवा आणि हा जिहाद शुद्ध इस्लामी रक्ताचाच मनुष्य करु शकतो असा प्रचार करत त्याने भारतावर आक्रमण करण्यासाठी नादिरशहा ते नंतर अब्दालीला प्रेरीत केले. किंबहुना १८५७ च्या बंडाची प्रेरणाही शाह वलीउल्लाहच्या तत्वद्न्यानात होती हे शेषराव मोरेंनी सिद्ध करुन दाखवलेच आहे.

थोडक्यात शाह वलीउल्लाहलाही भारतीय मुसलमान आपले नाहीत, स्वकीय नाहीत म्हणुन भौगोलिकद्रुष्ट्या परकीय पण धार्मिक द्रुष्ट्या स्वकीय वाटल्या अशा मुस्लिम सत्तांना आक्रमणाचे निमंत्रण द्यावे वाटले. त्यातून जो इतिहास घडला तो आपणा सर्वांना माहितच आहे. नाझी हिटलर जर द्वितीय महायुद्धात जिंकला असता आणि सुभाषबाबुंनी भारत जिंकला असता तर आजचा आपला वर्तमान खुप वेगळा असता...किंबहूना हे लिहायला मी एक्तर जन्माला तरी आलो नसतो वा कधीच मारला गेलो असतो. अर्थात इतिहासात जर-तरला विशेष स्थान नसते हे खरे आहे. परंतु या "जर-तर" वर आधारीत वैचारिक सिद्धांत मांडणा-यांची कमतरता नसते. -अगा जे झालेची नाही त्याची वार्ता कशाला- हे या मंडळींना बहुदा माहित नसते. गांधीजींना नथुरामने ठार मारले नसते तर....असे बावळट सिद्धांत मांडत त्यांच्या हत्येची भलामन करणारे नथुरामी या देशात आजही खुप आहेत. हिटलर मेला असला तरी त्याची मानसिक गुलामी करणारे कथित आर्यवादी या देशात कमी नाहीत.

स्वकीय आणि परकीय या तर्तुदी परिस्थितीसापेक्ष बनत जातात त्या अशा. हिटलर परकीय असला तरी तो स्वत:ला व जर्मनांना आर्यवंशीय मानत असल्याने तो येथील आर्यवाद्यांना आपला वाटतो तो असा. पण हा तीढा दिसतो तसा सोपा नाही. मानवी प्रेरणा याच मुळात कोणत्या ना कोणत्या गुलामीत राहण्याच्या असतात कि काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. या सर्व तरतुदींमागे मानवी स्वार्थांच्या अविरत मशाली तेवत असतात...भडकत असतात. स्वातंत्र्यात असणारेही कोणत्यातरी पारतंत्र्याच्या भावनेत असतात...कोणी धार्मिक पारतंत्र्याच्या भावनेत असतो तर कोणी राजकीय. कोणी प्रांतीय सापत्नभावाच्या भावनेत असतो तर कोणी आर्थिक... कोणी जातीय...परस्पर संघर्ष एवढा तीव्र होत असतो कि शेवटी कोणीच स्वकीय नाही हा साक्षात्कार घेत मानसिक नैराश्याचे बळी होतांना दिसतात.

पण मुळात स्वातंत्र्याचा अर्थच कळालेला नसल्याचे हे लक्षण आहे. मुळात निसर्गाने प्रत्येक मानवाला एक स्वतंत्र असे व्यक्तित्व बहाल केले आहे ते विसरत कोणत्या तरी विचारसमुहाचा गुलाम होण्यात मानवाला धन्यता वाटत असते हे आपण सहज निरिक्षण केले तरी पाहु शकतो. या सर्व दबावांपासुन दुर रहात आपले स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करणारे नसतात असे नाही...पण ते कितपत यशस्वी होत असतात?

मुळात मानवी जीवनधारणांचा नेटका अर्थ न समजल्याचे लक्षण म्ह्णजे कोनत्या ना कोणत्या विचार व्युहाची वा सत्तेची (मग ती र्थसत्ता असो कि धर्मसत्ता, संस्कृतीसत्ता असो कि राजसत्ता...) मानसिक गुलामी. या गुलामीमुळे मानव अनेक न पटणा-या गोष्टीही एक तडजोड म्हणुन करत जात गाळात रुतत जातो. किंबहुना तसे केले नाही तर आपल्याच अस्तित्वावर गदा तर येणार नाही ना असा प्रश्नही त्याला छळत असतो. एकार्थाने प्रत्येक व्यक्ती एक दुभंग जीवन जगत असतो. खाजगीत तो जे बोलु शकतो ते जाहीरपणे व्यक्त करायला त्याला एक तर जमत नाही वा खोटी नांवे घेत त्याला स्वता:ला वाचवण्यासाठी अभिव्यक्त व्हावे लागते. पण मग ती अभिव्यक्ती खरी कशी?  त्याचे अस्तित्व खरे कसे? "को अहम", मी कोण आहे? हा प्रश्न त्याला तरीही छळत असेल तर मग प्रतिप्रश्न असा आहे कि त्याने खरेच स्वत:ला समजुन घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे काय? इतरांनी लिहिलेली तत्वद्न्याने वाचुन वा ध्यानधारणादी करुन "मी कोण आहे?" या प्रश्नाचे उत्तर जर मिळाले असते तर आजवर यच्चयावत विश्वातील लोकांना ते सत्य समजलेही असते. ते समजत नाही याचे कारण म्हणजे मुळात तत्वद्न्याने हीच मानसिक गुलामी निर्माण करण्यासाठी निर्माण होत असतात याचे आपले भान सुटलेले असते.

मनुष्य जन्मता:च एक संघर्षरत प्राणी आहे. निसर्गाने त्याला असंख्य जीवनावश्यक व स्वसंरक्षक साधने जी अन्य प्राणिजातीला बहाल केली आहेत ती नाकारलेली आहेत. त्यामुळेच डोनिकेनसारखा अभ्यासक मनुष्य हा मुळचा या भुतलावरील नाहीच अशी साहसी विधाने करत असतो. मनुष्याला आहे ती अपार बुद्धी आणि तीचेही वितरण सर्वच मानवप्राण्यात समान नाही. तिची मुक्त-स्वतंत्र वाढ होवू नये याचीही तरतुद माणसानेच धर्म/राज/अर्थसत्तेच्या रुपाने प्राचीन काळापासून करुन ठेवली आहे. "प्रश्न विचारु नका" अशी तंबी धर्मसत्ता देते तर कायद्याचा सन्मान करा असे कायदा बनवणारे धमकावतात. अर्थसत्ता तर शोषणासाठीच असते.

मग माणसाच्या संघर्षाचे परिमाण केवळ निसर्ग वा नियतीशीच्या संघर्षाशी मर्यादित रहात नाही तर तो संघर्ष मानवनिर्मित पारतंत्र्याशी येवून ठेपतो. असंख्य लोक यालाच नियती मानत तिचा निमुट स्वीकार करत जातात आणि आहे त्या बंदिस्त स्वातंत्र्यालाच मन:पूत स्वातंत्र्य समजतात तर असंतुष्ट लोक याहीपेक्षा अधिक चांगली स्थीति आणण्यासाठी बंडे पुकारतात. अव्यवस्थेत नवी अव्यवस्था आणु पहाणा-या या स्थित्या मानवाला दिल्या गेलेल्या बुद्धी नामक एकमेव हत्त्याराचे असे वाटोळे करत जातात. पण नैसर्गिक व्यवस्थेचे आपणच हत्या केली आहे याची जाण व भान मानवी समुदायाला रहात नाही. आपण बुद्धीचे विकसन करत चाललो आहोत कि अध:पतन यावर आपण कधी विचार करतो? आपण सुखकर जीवनासाठी संघर्ष करत, सतत संघर्षरत रहात अंतत: कोणत्या श्रेयाच्प्रत पोहोचत आहोत? थोडक्यात मानवजात सुखी नसेल, पण किमान समाधानी तरी आहे काय? कि आता हा प्रश्नच कालबाह्य झाला आहे? उदा. कल्यानकारी राज्याची संकल्पना आपण सोडुन दिली आहे. आपणच नवनवे कायदे आनण्याची मागणी करु लागलो आहोत. याचा अर्थ आपल्याला स्वत:चे स्वातंत्र्य जखडुन टाकणा-या यंत्रणेचीच कास धरावी वाटु लागलेली नाही कि काय?

आजचा माणुस हा मुळात मानवी व्यवस्थेचा अपरिहार्य गुलाम आहे. स्वकीय आणि परकीय ही त्याची टोळी काळातील आदिम भावना आजही पुरेपूर जीवंत आहे. किंबहूना छपुन राहुनही अभिव्यक्तिचे असंख्य मार्ग आज उपलब्ध झाल्याने ती बळावतच चालली आहे असे दिसते. या परिप्रेक्षात मानवी स्वातंत्र्य हे जसे विस्तारीत व्हायला हवे होते तसे न होता ते मात्र उलटपक्षी अधिकाधिक संकोचायला लागले आहे आणि याची समाजशास्त्रीय काळजी वाटणे स्वाभाविक आहे.

संघटनांचे म्हणावे तर त्या मानवी स्वातंत्र्याचा विस्तार घडवून आणण्याचा अविरत प्रयत्न करणा-या विविध परिप्रेक्षातील मानवी समुदायाच्या संस्था असाव्यात असाच मुळात "संघटना" या शब्दाचा अर्थ आहे. जे आहे त्या जातीय/वंशीय/धर्मीय/आर्थिक/राजकीय आणि सामाजिक अवकाशापेक्षा व्यापक अवकाश मिळावे यासाठी प्रयत्न करण्यासाठी असतात/असाव्यात. अंतिम उद्देश्य हा अवकाशांचे विस्तारीकरण करत एकूनातीलच मानवी समाजासाठी ते उपयुक्त व्हावे आणि इतरांची अवकाशेही स्वीकारत जात एकजीव अवकाश निर्मान व्हावे हा असावा.

परंतू प्रत्यक्षात मात्र संघटना या प्राय: स्वता:चे, स्वता:च्या अनुयायांचे अवकाश नुसते सीमितच नव्हे तर संकोचत नेण्यात धन्यता मानत जातात हे एक वास्तव आहे. ही एक वंचना असते. या वंचनाखोरांच्या बहुलतेमूळे आजच्या सर्वच जागतीक समाजाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. पारतंत्र्य हे फक्त राजकीय नसते. त्याची परिमाणे असंख्य असतात. पण आपापल्या अनुयायांना या सर्वच संघटना (यात राजकीय पक्ष ते अगदी एन.जी.ओ. ही आले) या पारतंत्रातून बाहेर काढण्यास राजी नसतात कारण त्यांना अनुयायांना पारतंत्र्यात ठेवत थोडके का होईना स्वताचे स्वतंत्र अवकाश हवे असते. त्यासाठीच सारा आटापीटा चालू असतो. विचारांच्या कोलांटउड्या कराव्या लागतात...भागही पडते...कारण ती त्यांची त्यांच्या पारतंत्र्याची एक अपरिहार्य गरज असते...आणि म्हणुन भावनीक लाटेवर स्वार झालेल्या अनुयायांचीही.

पण अनुयायांचाही कधी ना कधी भ्रमनिरास होतो...संघटना फुटत जातात...राजकीय पक्ष फुटत जातात...आर्थिक संस्थाही फूटत जातात...

पण ज्यासाठी मुळात हा सारा मानवी संघर्ष सुरू असतो...ते म्हणजे स्वातंत्र्य...ते कोठे असते?

स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय आहे? कशासाठी आहे? मनुष्याचे एकमेव हत्यार, जे निसर्गाने त्याला दिले, ती म्हणजे बुद्धी, तीच जर बंदिस्त व्युहात गेली असेल...आम्ही म्हणतो तसाच विचार करा अशी धर्माद्न्या/राजाद्न्या/अर्थाद्न्या असेल आणि ती अगणित गुलाम स्वेछेने पाळत असतील तर माणसाला बुद्धी नावाचे हत्त्यार/साधन आहे हे कसे मानायचे? आणि नव्य विचार करतात असे म्हननारेही जर नवे बंदिस्त अवकाश (मग ते जातीचे असो कि धर्माचे, राजकीय व्यवस्थेचे असो कि अर्थव्यवस्थेचे) निर्माण करण्याच्या नादी लागणार असतील तर खरे स्वातंत्र्य हा गुलाम कधी उपभोगणार?

6 comments:

  1. DO you believe in GOD? Yes or no.......please no explaination......

    ReplyDelete
  2. Sanjayji, this article has global relevance. What you have said in the article is universally applicable. The exact same thing is happening in the USA and Europe as well. For some reason we humans are not happy with what we are. And in order to get over our own inferiority complex we start coming up with theories which are outright absurd most of the times (The Aryan theory for ex.).

    And because we are not confident about our abilities, we have to rely on rely on the past. Hence claims are made about origins of the race which are outright absurd. If one becomes self assured then it will be easy to see through the absurdness of this. You got this bang on like most of your writings.

    ReplyDelete
  3. Sanjay Sir, this article is good but there are many questions in my mind about India and it's freedom philosophy like as I read Indian empire's never invaded to any land in last 10,000 years but Indians were slaved more than 1000 years also one thing 'Mohmmaddians(Muslim)' are originally Indnians or they migrated from Arab countries also today's indian muslim's are the next generation of moghal dynasty or their soldiers generations because if you see the muslim populated area it was formerly moghal empire's region. Actually sir, there is no any religion hatred but it's my curiosity about muslim and their religion how they came in india and which purpose ?

    ReplyDelete
  4. Dear Narendra ji, Indian indeed did invaded other parts of the world. Satwahana's had won over Shrilanka and had married lankan princes. kanishka had won over China. Also Indian ruled Singapor, Java, Sumatra etc. Gandhar (Aphganistan) was once upon a time part of India.

    Most of the Indian Muslims are converted. (about 90%)

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...