Friday, June 29, 2012

वारीसंगे चालताना…(वारीचा इतिहास सांगणारा हा माझा लेख आजच्या महाराष्ट्र टाईम्समद्धे प्रकाशित झाला आहे).

श्री विठ्ठलाच्या दैवत माहात्म्याचा इतिहास किमान इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकापर्यंत मागे जातो. श्री विठ्ठल म्हणजे दैवतप्रतिष्ठा प्राप्त केलेला पौंड्रवंशीय कुरुब - धनगरांचा महान शिवभक्त आणि सम्राट. पौंड्रपुर म्हणजे आजचे पंढरपुर ही त्याची राजधानी. वारीची प्रथाही श्री विठ्ठलाला दैवत माहात्म्य प्राप्त झाले , त्या काळाइतकीच जुनी आहे , असे म्हणता येते. म्हणजेच वारीचा इतिहास हा २२०० वर्षे इतका जुना असल्याचे म्हणता येईल. अर्थात आज ज्या पद्धतीने वारी निघते तशी ती पुरातन काळी निघत नव्हती , एवढे नक्की. कालौघात श्री विठ्ठलही शैवाचा वैष्णव बनला. नामदेवांपासून ते तुकोबारायांपर्यंतच्या संतांनी श्री विठ्ठलाला कृष्ण-विष्णू रुपातच पाहिले. त्यामुळे वारीचे स्वरुपही बदलले. या वारीच्या इतिहासाचा आपण येथे आढावा घेऊ या ...
श्री विठ्ठल हा मूळचा धनगर-कुरुबांचा देव होता , हे मत डॉ. रा. चिं. ढेरे यांनी त्यांच्या ' श्री विट्ठल : एक महासमन्वय ' या महनीय ग्रंथात मांडले आहेच. आजही सोलापूर जिल्हा व त्यास लागून असलेल्या कर्नाटकच्या भागात धनगर-कुरुबांची संख्या लक्षणीय आहे. धनगर-कुरुबांच्या जीवनशैलीचे निरीक्षण केले तर एक महत्त्वाची बाब लक्षात येते व ती म्हणजे आषाढ महिन्यात (अगदी आजही) विविध दिशांना आपल्या मेंढ्यांच्या कळपासह गेलेले धनगर आषाढ महिन्यात परत येतात. पावसाळा संपला की कार्तिक महिन्यात ते पुन्हा चाऱ्याच्या शोधात आपले पशुधन घेवून चहूदिशांना बाहेर पडतात.
पौंड्रपुर तथा पंढरपूर ही त्यांची राजधानी असल्याने व त्यांचे आद्य आराध्य दैवत श्री विठ्ठलही तेथेच असल्याने त्यांचे सर्वप्रथम एकत्र होण्याचे स्थान असणे स्वाभाविक होते. श्री विठ्ठलाच्या आशीर्वादाने आपले पशुधन वाढेल , ही श्रद्धा या प्राथमिक वारीचे कारण बनली. विठ्ठल ही देवता किमान सहाव्या शतकापर्यंत फक्त धनगर-कुरुबांची आराध्य देवता होती , असे आपल्याला दिसते. याचाच अर्थ असा की वारीचा प्रारंभ धनगरांनी केला. ही वारी आपल्या पशुधनासहितची होती. तिचे स्वरूपही काहीसे प्राथमिक होते.
सहाव्या शतकापर्यंत या अवैदिक विठ्ठलाचा बोलबाला अन्य समाजांतही होवू लागला. विठ्ठल हे नाम अगदी ब्राह्मणही धारण करू लागले. सहाव्या शतकातील एका ताम्रपटात ' जयद्विठ्ठ ' नामक ब्राह्मणाला गावाचे दान दिले आहे , अशी नोंद आहे. हा ब्राह्मण पंढरपूरचाच होता. मध्वाचार्यांनी (इ.स. ११९९-१२७८) ज्ञानेश्वरपूर्व काळातच आपल्या आठ बालयतींपैकी तिघांना विठ्ठलाची मूर्ती पुजेसाठी दिली होती , असे श्री. द. रा. बेंद्रे सांगतात. याचाच अर्थ असा की , श्री विठ्ठल ही देवता आता फक्त धनगरांपुरती मर्यादित न राहता त्याचे प्रभावक्षेत्र विस्तारित होवू लागले होते. याच काळात विठ्ठलाचे मूळचे शैव रूप जावून त्यास क्रमश: वैष्णव रूप प्राप्त होवू लागले. आषाढी-कार्तिकीला आता फक्त धनगर-कुरुबच नव्हे , तर कुणबी , ब्राह्मण ते अन्य बलुतेदार-अलुतेदारही सामील होवू लागले. ज्ञानेश्वरांच्या मातापित्यांनीही पंढरीची वारी केली होती , असे नामदेव महाराज म्हणतात. आता विठ्ठल हे सर्वच समाजाचे दैवत बनू लागल्याने आषाढी-कार्तिकीचे परिप्रेक्ष बदलले... अर्थातच वारीचे स्वरुपही पालटू लागले.
महाराष्ट्रातील तेराव्या-चवदाव्या शतकाचा कालखंड अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. वाढती सामाजिक विषमता , जातीनिष्ठ अन्यायांची परंपरा , वैदिक कर्मकांडांचे वाढलेले स्तोम यामुळे एक अभिनव संतपरंपरा सुरू झाली. या संतांनी एकही प्रख्यात वैदिक देवता आपल्या सामाजिक/आध्यात्मिक चळवळीसाठी न स्वीकारता अवैदिक विठ्ठलाला आपले मुख्य आधार मानले व समतेची चळवळ सुरु केली ... समतेची , मानवी करुणेची गुढी उभारली. राष्ट्रसंत नामदेव , चोखा मेळा , ज्ञानेश्वर , गोरोबा कुंभार , परिसा भागवत आदी संतांच्या मांदियाळीने वारीला एका सामाजिक चळवळीचे रुप दिले , ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात नवी क्रांती घडवणारी घटना होती. नामदेव अत्यंत उत्साहाने म्हणतात ... ' आले आले रे हरीचे डिंगर ... वीर वारीकर पंढरीचे '. संतच नव्हे तर सर्वच समाजासाठी श्री विठ्ठल हा पतीतपावन बनला , तो याच काळात. कारण स्वत: श्री विठ्ठलालाही वैदिक परंपरेने शूद्र मानलेले. त्यामुळे समतेच्या गुढीसाठी सर्वच संतांनी विठ्ठलाला आपले आराध्य मानले नसते तरच नवल होते.
त्यामुळे वारीचे स्वरुप आणखी बदलले. आषाढी-कार्तिकी या परंपरा कायम राहिल्या असल्या तरी एकादशीला महत्त्व मिळाले ते वैष्णव परंपरेमुळे. आता वारी निघू लागली ती टाळ-मृदंगांच्या साथीने ... भक्तिरसाने ओथंबलेली संतरचित भजने गात. भीमथडी चिंब भिजू लागली ती संतांच्या उत्कट आत्मोद्गारांनी. विठ्ठल हा त्यांचा नुसता देव नव्हे , तर सखा बनला. व्यथा-वेदनांवर केवळ फुंकर घालणारा नव्हे , तर प्रसंगी प्रत्यक्ष अवतरुन संकट-विमोचन करणारा मुक्तिदाता बनला. जनमानसातील श्री विठ्ठलाची प्रतिमाही त्यानुसार बदलत गेली. वारीला सर्वच जाती-पंथांच्या समाजांत एक महत्त्वाचे स्थान निर्माण होवू लागले. नामदेवांनी तर देशभर श्री विठ्ठलाची महत्ता पसरवली.
नामदेवांनंतर शंभर वर्षांनी (सन. १४५०) एकनाथांचे पणजोबा भानुदासांनीही वारीची परंपरा कायम ठेवली. परंतु या मधल्या काळात वारीची संतनिर्मित परंपरा काही प्रमाणात क्षीण झाल्याचे दिसते. एकनाथांच्या काळात महाराष्ट्रावर सुलतानी संकट आले होते. अशा अत्यंत अस्थिर व शोषित-अन्यायग्रस्त कालात एकनाथांनी वारकरी संप्रदाय पुनर्जिवित केला. असंख्य अभंग तर लिहिलेच , त्याखेरीज विपुल ग्रंथरचनाही करुन गुलामीतील स्वबांधवांना पुन्हा समतेच्या वारकरी चळवळीकडे आकृष्ट केले. फक्त समतेचाच नव्हे , तर फारसी-ऊर्दुच्या प्रभावाखाली जावू लागलेल्या मायमराठीचा नव्याने उद्घोष केला... वारी पुन्हा नव्या जोषात सुरू झाली.
एकनाथांच्या निर्वाणानंतर नऊ वर्षांनी जन्माला आले ते महान संत तुकोबाराय. त्यांनी सामाजिक वेदनांवर नेमके बोट ठेवत ज्या अजरामर रचना केल्या आहेत त्यांना तोड नाही. त्यांच्यानंतर अशा असामान्य प्रतिभेचा संत जन्माला आला नाही. तुकोबांनी त्यांच्या काळात वारकरी संप्रदायाला अपरंपार वाढवले. गुलामी राजवट नष्ट करणारे छत्रपती शिवराय घडले तो काळ निर्माण करण्याचे सर्व श्रेय तुकाराम आणि त्यांच्या पूर्व संतपरंपरेकडे नि:संशयपणे जाते.
तुकोबारायांनंतर वारीपरंपरेत आणखी एक अभिनव बदल घडला. तुकारामांचे चिरंजीव नारायणमहाराज यांनी तुकोबारायांच्या पादुका पालखीत ठेवून दिंडीची संकल्पना सन १६८५ मध्ये निर्माण केली. त्यात नंतर अनेक संतांच्या अशाच पालख्या त्यांच्या-त्यांच्या मूळस्थानापासून वा जेथे ते दिवंगत झाले त्या स्थानांपासून पंढरीला येवू लागल्या. आपल्या महान पूर्वसुरींना हे अभिनव अभिवादन होते. परंतु अशा दिंड्यांत शक्यतो ज्याची पालखी त्याच संताचे अभंग म्हणण्याची प्रथाही पडली. वारकरी संप्रदायही जातींत वाटला गेल्याचे चित्र दिसू लागले. आता आतापर्यंत ज्ञानेश्वरांच्या पालखी-दिंडीत तुकारामांचे अभंग म्हटल्यास पार मारामाऱ्या होत. सुदैवाने आता असे प्रकार घडत नाहीत. घडूही नयेत , कारण ज्या जातीअंताच्या महनीय कार्यासाठी संतांनी वारीप्रथेला अध्यात्म-समतावादी बनवले त्यांच्यावर हा केवढा अन्याय होइल ?
तुकोबारायांनंतर निळोबांनी वारकरी संप्रदायाची धुरा समर्थपणे वाहिली.
वारी आजही सुरु आहे. आधुनिक काळात तिच्यात बदल घडत आहेत , पुढेही घडत राहतील. परिवर्तनशीलता हाच जीवनाचा नियम आहे. वारीची पद्धत बदलेल , पण श्रद्धा तीच राहील. धनगर-कुरुबांनी २२०० वर्षांपूर्वी सुरु केलेली ही परंपरा नवनवे आशय घेत पुढे जात राहो , हीच सदिच्छा!  

27 comments:

 1. मला जर अगोदरचे वेगळे संदर्भ माहित नसते तर मला हा लेख खूप आवडला असता. माझ्या मनात जे काही खूप प्रश्न आहेत त्याची उत्तरे माल्वयाची आहेत. ज्ञानेश महारावाचा लेख खूप पुरवी वाचला होता..त्यात थोडे वागलेच संदर्भ होते, नंतात बुद्ध लोकांचा आवडता संदर्भ म्हणजे बुद्ध परंपरा.......वगैरे वगैरे..............यासाठी पुरातत्व खात्याकडील पुराव्या न महत्व द्यावे लागेल......विठ्ठल मंदिरदगडाची , दगडावरील कोरीव कामे काहीतरी सांगतीलच................विठ्ठल मूर्ती किती वर्षापूर्वीची आहे हे तर नक्कीच कळू शकेल............

  ReplyDelete
 2. ( माझ व्याकरण व वाचन जरा कमी आहे तरीही हे उत्तर लिहीत आहे काही कमी जास्त असल्यास क्षमस्व )

  सर लेख अत्यंत सुंदर आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व संताचे कार्य आपण लिहिले आहेत फक्त ज्ञानेश्वर महाराज सोडून पण वार्कार्यात त्यांची जी महती आहे ती कोणीही जुगारू शकत नाही नामदेव महाराजांनी हि त्यांची माती अभंग द्वारे वर्णित केली आहे पांडुरंग हा जसा मायबाप आहे तसे
  ज्ञानेश्वर महाराज हे आम्हा समस्त वारकऱ्याचे माउली आहेत. बाकी लेख सुंदर आहे पण फक्त पांडुरंग हा धनगराचा देव होता हे चुकीचे वाटते संत नामदेव स्वत आरतीत म्हणतात कि युगे आठवीस विटेवरी उभा | तुम्हास माहीत असेन शंकराचार्य यांनी सुधा विठ्ठलावर लिहिले आहे | सार्थ श्री पांडुरंगाष्टकम् ||

  महायोगपीठे तटे भीमरथ्याः |
  वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः |
  समागत्य तिष्ठंतमानंदकंदं |
  परब्रम्हलिंगं भजे पांडुरंगम्‌ ||१||
  त्यामुळे तुम्ही जो कालखंड दिला आहे त्यात गफलत वाटते
  पादुरांगाच्या शिरावर लिंग आहे म्हणजे हा शैव व वैष्णव याचा समन्वय साधणारा आहे उलट पक्षी शैव दर्शनास येत नसत नरसी मेहता हे त्याचे उदहरण आहे
  बाकी आपण जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे जाती व्यवस्था असो अथवा सामजिक विषमता किव्ना अंधश्रद्धा याचायाव्र पहिले प्रहार हा संतांनी केला आहे

  ReplyDelete
 3. मा. संजय सोनवणी यांसी,

  आजकाल जेव्हा जेव्हा ब्लॉग उघडतो तेव्हा माझ्या आवडत्या विषयांवर आपण लेख लिहिलेला दिसतो. मी थोडासा पुरातत्वशास्त्राचा विद्यार्थी आहे, आणि रा. चिं. ढे-यांचं पुस्तक वाचल्यावर विठ्ठल आणि त्याचा इतिहास, या दैवताचं विष्णुरूप होणं याविषयी मला अधिकाधिक रस वाटू लागला आहे, म्हणून ही प्रतिक्रिया.
  मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने विठ्ठलमूर्ती अतिशय इंटरेस्टिंग आहे. हाती शंख, कमळ, गोपाळकाठी धारण करणारा, पाठीवर शिंके सोडलेला आणि मुकुटावर शिवलिंग धारण करणारा (उदा. माढे येथील मूर्ती-ही तर खरेच "सुन्दर ते ध्यान" आहे.) हा देव. त्याचं "बाळ दिगंबर" कृष्णात झालेलं रूपांतरही सुरेख आहे.
  "रुप पाहतां तरी डोळसु । सुंदर पाहतां गोपवेषु ।
  महिमा वर्णितां महेशु । जेणें मस्तकीं वंदिला "
  पण याचं पूर्वरूप खरंच धनगर-गुराख्यांच्या देवाचं होतं हे अतिशय सखोल संशोधनाने सिद्ध झालं आहे(ढेरे आणि इतर). म्हणूनच असेल कदाचित, या देवाची कल्पना बालकृष्णरूपात करणं स्वाभाविक आणि सोपं झालं असावं. धनगर लोकगीतात अजूनही "ब्रमल (वीर?वीरभद्र?)-इटल" या देवांचा उल्लेख येतो. पैकी ब्रमल हा लिंगरूप आहे, तर इटल गरुडवाहन (हा नंतरचा बदल असावा का? कल्पना नाही.)
  मुकुटावर शिवलिंग हा नक्कीच शैव-वैष्णव समन्वयाचा प्रकार आहे. वैष्णव परंपरेत शिव हा सर्वश्रेष्ठ वैष्णव मानला जातो, आणि अशा भक्तश्रेष्ठाला मी मस्तकी मिरवतो असे विष्णूने सांगितले आहे (बार्शी येथील भगवंत). याचप्रमाणे 'विष्णुपदी' गंगा शिव मस्तकी धारण करतो. कथा अशीही सांगतात, की एका राक्षसाचा वध करण्यासाठी विष्णूने 'मल्लिकार्जुन' शिवाचे रूप घेतले, ते म्हणजेच विठ्ठलरूप. शैव-वैष्णव समन्वयाचे हेही एक उदाहरण आहे. भक्त पुंडलिक हा पंढरपुरात शिवरूपात पूजला जातो, हा एक मुद्दा. अजून एक मुद्दा म्हणजे व्यंकटेश, वीरभद्र आणि विठ्ठल यांतील विलक्षण साम्य. ढे-यांनी यावर फार छान लिहिलं आहे. ज्ञानदेवही म्हणतात,
  "हें चोविसा मूर्तींचें उध्दरण । शिवसहस्त्रनामासी गहन ।
  हेंचि हरिहराचें चिंतन । विश्ववंद्य हे मूर्तितें ।
  तो हा देवादि देव बरवा । पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा ।
  बापरखुमादेवीवरु पंचविसावा । चोविसा मूर्ति वेगळा"
  बाकी विठ्ठल हा खरेच बुद्ध आहे का, आणि बौद्ध परंपरेचे विठ्ठलाशी नाते हा सखोल अभ्यासाचा विषय आहे, पण असो. सध्या मजपाशी सन्दर्भ नाहित आणि आवर्जून अभ्यासाला बसायचा मला लहानपणापासून कंटाळा आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. thanks.......really need more study..

   Delete
 4. अश्विनजी, विकासजी, गेल्या वर्षी आषाढी एकादशीलाच माझा विट्ठलावरील एक प्रदिर्घ लेख म.टा.त प्रसिद्ध झाला होता. तो या लिंकवर वाचायला मिळेल.

  http://sanjaysonawani.blogspot.in/2011/07/blog-post_04.html

  या लेखातुन बरेच अनुत्तरीत प्रश्न सुटायला मदत होईल. माझे याच विषयावरचे "विठ्ठलाचा नवा शोध" हे सुगावा प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. त्यात मी विठ्ठलाला अगदी संतांनीही बुद्ध रुपात कसे पाहिले यावर प्रकाश टाकत कारणमिमांसा केली आहे. जनाबाई म्हणतात..."होवूनिया कृष्ण कंस वधियेला...आता बुद्ध झाला सखा माझा.", तर नामदेवही म्हणतात "गोकुळी अवतारु...सोळा सहस्त्रां वरु...आपण योगेश्वरु बौद्धरुपी". याची कारणमिमांसा दोन प्रकारे करता येते...१. महाराष्ट्रात इसपु दुसरे शतक ते आठवे शतक या काळात बौद्ध धर्माची गडद छाया होती, म्हणुन विठ्ठलालाही या कालात बौद्ध रुपात पाहिले गेले असने शक्य आहे. २. पाचव्या-सहाव्या शतकापासुनच बौद्धाला पुराणकारांनी विष्णुचा अवतार ठरवुन टाकण्याचे मौलिक(?) कार्य सुरु केले होते. संत विठ्ठलाला विष्णुरुप मानु लागले असल्याने बुद्धाबरोबर विठ्ठलाची सांगड घालण्यात त्यांना काही वावगे वाटले नसावे. संतांचा मुख्य भर हा विठ्ठलाला कृष्ण-विष्णु मानण्यावरच असल्याने अशा काही अत्यल्प संदर्भांवरुन विट्ठल्मंदिर हे मुळचे बौद्धविहार हे मत मुळीच टिकत नाही कारण जगभरात कोठेही बुद्धाच्या कर-कटी स्वरुपाच्या मुर्ती नाहीत. गोपवेशातील तर नाहीतच नाहीत.
  पुरातत्वीय पुराव्यांनुसार चंद्रभागेतीरी पुरातन हातकु-हाड संस्क्रुतीचे अवशेष मिळाले आहेत. आताचे पंढरपुर सातवाहन काळीही अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले आहे. इटल-ब्रमलचा खुलासाही मी वर लिंक दिलेल्या लेखात केलेला आहे. एवंच डा ढेरे व माझ्या नि:ष्कर्षांत मोठा फरक आहे...अर्थात त्यंचे कार्यही अतुलनीय आहे यात शंका नाही.

  हर्शलजी, आपण शंकराचार्यविरचित म्हणुन ज्या स्तोत्राला उद्गृत केले आहे तो त्यांचा नसुन त्यांच्या नांवावर खपवण्यात आला आहे. वैष्णव पंथाची निर्मिती फार उशीराची आहे. त्यांनी तिरुपतीसहित अनेक शैव स्थानांना अट्टाहासाने वैष्णव बनवुन टाकले. तिरुपती बालाजी हेही मुळचे शैव स्थान पण रामानुजाचार्यांनी चलाखी करुन त्यालाही वैष्णव ठरवले हाही इतिहास आहे. पुंडरिकाचे मंदिर हे प्रत्यक्षात शिवमंदिर असुनही भक्त पुंडरिकाची बनावट कथा निर्माण करुन टाकली. आपणही वर दिलेली लिंक पहावी ही विनंती.
  धन्यवाद

  ReplyDelete
  Replies
  1. This comment has been removed by the author.

   Delete
  2. मा. संजयजी,
   आपला लेख मी वाचला. विठ्ठल जर बुद्धरूपात पहिला गेला असेल तर त्यामागे तो विष्णुचा नववा अवतार म्हणून हाच अर्थ असावा. एक कथा आहे, की भक्त पुंडलिकाला कोणते 'अनुच्छिष्ट' रूप दाखवावे या विचारात पडलेल्या श्रीकृष्णाने अखेर त्याला बुद्धरूप दाखविले. यावर कथाकार लिहितो, " आठ अवतारात आठ रस दाखवून झाले, म्हणून नववा (करुण) रस करुणामय बुद्धरूपाने दाखवला."(कल्पना कशी आहे?) याचा परिणाम असेल कदाचित, काही जुन्या मराठी पोथ्यात बुद्ध अवतार म्हणून विठ्ठलाचे चित्र दिले आहे. अर्थात हे मत पुराणावर आधारलेले आहे, आणि बुद्धास विष्णुचा अवतार मानणे हा त्याचाच परिणाम आहे."संत विठ्ठलाला विष्णुरुप मानु लागले असल्याने बुद्धाबरोबर विठ्ठलाची सांगड घालण्यात त्यांना काही वावगे वाटले नसावे." हे अगदीच मान्य. बाकी गोपवेष हा अगदी स्वच्छ पुरावा आहे यात शंका नाही.
   चंद्रभागेतीरी अशुलियन अवशेष मिळाले हे मला माहिती नव्हते. ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. बाकी वैष्णव-शैव दुव्यांबद्दल मी वर लिहिलेच आहे. व्यंकटेशाची नाग भूषणे, जटाजूट, तृतीय नेत्र,आणि शंख-चक्रादी वैष्णव चिन्हांचा अभाव ही शैव लक्षणे योगविष्णूची आहेत हे कसे सिद्ध केले गेले ही गोष्ट ढेरे यांच्या पुस्तकात दिली आहे.
   ढेरे यांनी 'पांडुरंग' हे 'पंडरगे' या क्षेत्रनामाचे रूप आहे असे म्हटले आहे. 'पंडरगे' हा कानडी शब्द आणि विठ्ठलू तर 'कानडा' आणि 'कर्नाटकु!' पांडुरंगमहात्म्य हे जे स्थलपुराण आहे, त्यातला पांडुरंग हा शब्द क्षेत्रवाचक असावा असे मला वाटते. अर्थात त्यापूर्वी पौन्ड्रक वासुदेवाची कथा परत एकदा वाचावी लागेल. आणि पौण्ड्र समाजाबद्दलही. अर्थात माझे वाचन अगदीच त्रोटक आहे!

   Delete
 5. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 6. सर तुम्ही दिलेल्या लिंक वरील लेख वाचला तरीही काही मुद्दे खटकत आहेत शैव पूर्ण रुपात मूर्तीपूजा करीत नाही लिंग रुपात पूजन होते मग विठ्ठल है शैव रूपी असणे चुकीचे वाटते वैष्णव हे
  सागुंरुपात्मक मूर्तिपूजक आहेत किवा द्वैत त्यमुळे तिरुपती विठ्ठल हि वैष्णवाची दैवत असावीत
  तुमचं म्हणणे आहे कि शंकराचार्य हे शैव होते पण त्यानीच पंचायत पूजा घरा घरात आणली आजही आमच्या घरतिल देवतेत अश्याच प्रकारातील पूजा आहेत म्हणजे रामानुज वैष्णवाचे स्तपान्कर्ते ठरवणे हे मला तरी अयोग्य वाटते पाडुरंग अष्टक एखाद वेळेस शापक असू शकेन. पण मग ते कोणी व केव्हा लिहिले हे पहावे लागेन
  पुराणात बौद्ध हा शब्द आला आहे पण तो बहुतेक बद्ध इति बोद्धा असा आहहे म्हणजे जो बद्ध आहे ज्याने बाकीच्या अवतरण प्रमाणे काहीही केले नाही जो फक्त बगतो आहे. हे तुम्हास थोड कल्पनाविलास वाटेल पण पुरानाना प्रमाण मानून हे मी लिहितो आहे त्याच प्रमाणे पुंडलिकाची कथा तुम्ही भाकड कथा आहे असे म्हणतात ते मंदिर हि शिव मंदिर असू शकेन त्यात पण बहुतेक समाधी स्तःल अश्हाच ठिकाणी आहेत अगदी द्यानेश्वर महाराजाच्या मंदिराचे तेच आहे आणि सर्व संतांनीही पुंडलिकाला सर्व श्रेष्ठ दर्जा दैला आहे म्हणजे या ७ ८ शे वर्षात नक्कीच हि गोष्ट घुसाड्यात नाही आलीये
  मी रा ची ढेरे चे पुस्तक १२ वर्षपूर्वी वाचले आहे त्यातील काही गोष्टी निताश्या आठवत नाही पण तुमाच हा लेख वाचल्या नंतर तुमचे आणि त्याचे पुस्तक जरूर वाचीन

  ReplyDelete
  Replies
  1. हर्शलजी, पंढरपुरची मुख्य देवता पौंड्रिकेश शिव असून विट्ठल ही मानवाचे दैवतीकरण दुय्यम देवता होती हे मी लेखात लिहिलेच आहे. विट्ठल हा शिव नसुन शिवभक्त आहे. आदी शंकराचार्यांबद्दल खुम मित्थके उत्तरकालात बनवण्यात आली. पंचायतन पुजा ही शांकरदिग्विजय या कोणा अनाम गृहस्थाने लिहिलेल्या ग्रंथात येते पण त्यातील कथा कोणी विश्वासार्ह मानत नाही. तसेच शंकराचार्यांच्या नांवावर अनेक गोष्टी सहज समाजमान्यता मिळावी म्हणुन खपवल्या गेल्या. यावर मी "आता एकच शंकराचार्य हवेत" या किस्त्रीममद्धे लिहिलेल्या विस्ट्रुत लेखात लिहिले आहे. लेख मोठा आहे, पण तो scan करुन येथे टाकायचा प्रयत्न अवश्य करेल, म्हनजे शंकराचार्य पीठांची स्थपना व अवनती नेमकी कशी झाली याचा इतिहासही लक्षात येईल. शंकराचार्य हे शिवापेक्षाही जगदंबेला अधिक मानत असत. दोघांवर लिहिलेली त्यांची स्तोत्रे नितांत मधुर आहेत.

   शिवमंदिरे ही प्रय: पर्वत शिखरांवर वा नदीकाठीच असतात आणि पुंडरिकेशाचे मंदिर नदीतीरीच आहे.

   Delete
 7. संजय सर, महावीर सांगलीकर यांनी विठ्ठलाचा जैन धर्माशी संबंध जोडायचा प्रयत्न केलेला दिसला.
  ही त्यांच्या ब्लॉगवरील "वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे?" लेखाची लिंक:
  http://shodh-bodh.blogspot.in/2012/06/blog-post_3665.html

  त्यासाठी विठ्ठलमंदीराची व्यवस्था विठ्ठलदास या जैन परिवाराकडे काल-परवापर्यंत होती हा दाखला त्यांनी दिला आहे. हा विचार नवा नक्की आहे पण पुराव्यांचे बळ त्यात दिसले नाही. जैन व वारकरी संप्रदायाचे साम्य त्यांनी नियमांच्याद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो नक्कीच स्तुत्य आहे. पण प्रत्यक्ष पुरावे त्यांच्या लेखात जाणवले नाहीत. त्यांच्या तर्कपद्धतीचे कौतुक करता येईल. पण पुरावे दिले तर एक वैचारिक मंथन होण्यास भरपूर वाव आहे.

  तुम्हाला शक्य झाले तर या विचारांच्या अनुषंगाने थोडे मतप्रदर्शन करु शकलात तर आपला आभारी राहीन.
  धन्यवाद

  ReplyDelete
  Replies
  1. सागरजी, वारकरी संप्रदायाचे जनकत्व आपल्याकडे ओढण्याचा अनेक धर्मियांनी प्रयत्न केले आहेत. आजच लोकसत्ताच्या रविवार पुरवणी लोकरंग (पान ८) यात डा. आ. ह. साळुंखे यांच्या प्रसिद्धीच्या वाटेवर असलेल्या "तथागत बुद्ध आणि संत तुकाराम" या पुस्तकातील संक्षिप्त प्रकरण प्रसिद्ध झाले आहे. त्यात डा. साळुंखे म्हणतात कि वारक-यांची दिंडी आणि बौद्ध चारिका यात साम्य आहे. महावीरजीही वारी आणि जैन परंपरा-वेशभुषा-आहारपद्धती यात साम्य असल्याचे तर्काने दाखवुन देतात. जैन आणि बौद्ध तत्वधारा या प्राचीन आहेत व कालौघात सर्वच धर्मांनी तत्वप्रनाल्यांची (अगदी पुजाही) उधार-उसनवारी केली आहे. तुकारामांनी संत बहिणाबाईंकडुन अश्वघोषाच्या वज्रसुचीचा अनुवाद करवून घेतला होता (आपण तो नव्याने लवकरच प्रकाशित करणार आहोत.) हे खरे असले तरी स्वत: तुकारामांनी विठ्ठलाला एकदाही बुद्ध रुपात पाहिलेले नाही. जैन स्वरुपातही पाहिलेले नाही. परंतु अहिंसा/शाकाहार/मद्यनिषेधादि बाबी समन परंपरेतुन आल्या असणे मला शक्य वाटते. मुलत: समन परंपराही अवैदिकच आहे. शिवाय शैव व जैन तत्वांत अधिक साम्ये आहेत हेही मी अन्यत्र एका लेखात दाखवून दिले आहे. असे असले तरी वारकरी संप्रदायाचे मुलभुत तत्वद्न्यान व मान्यता आणि समन मान्यता यांत खुप भेदही आहे. उदा: परमात्मा हा स्वयंप्रकाशी असुन तीच द्रष्टेपना व दृश्यपणा यांचा आश्रय आहे. (हे तत्व ब्रह्मसुत्रांतुन घेतले आहे.). हेच एकरुप आत्मतत्व देव-देवी (शिव आणि शक्ति) या रुपाने आविष्कृत होते. (हे मत ब्रह्मसुत्रांना व समन परंपरेला सोडुन आहे.) सृष्टी ही परमात्म्याने निर्माण केली असून परमेश्वराच्या अंगातुन असंख्य जीव उधळतात. (एकनाथी भागवत) मानवी जीवन हे अनुभवांचे साधन असून कोणता अनुभव घ्यायचा हे जीवाच्या इच्छेवर अवलंबुन असते. (कर्मविपाक वा दैवी इच्छेला येथे स्थान नाही.) द्वैत वा अद्वैताला न मानता चिद्विलासवाद (म्हणजे मुळ अद्वैतच द्वैतरुपाने प्रकटुन अद्वैताचे शोभा वाढवने.) मान्य करणे. भकती हेच मोक्षाचे श्रेष्ठ साधन आहे हा शैववाद स्वीकारला असुन त्याला फक्त जैन धर्माचा पाठिंबा आहे. बौद्ध मत मुलात आत्मा-मोक्ष-इश्वरादि संकल्पनांवर विश्वास ठेवत नाही.
   थोडक्यात वारकरी तत्वद्न्यान हे परंपरागत तत्वद्न्यानांपेक्षा भिन्न असून जरी त्यांनी अल्प-स्वल्प उधार-उसनवारी केली असली तरी विट्ठल हा मुळचा बौद्ध वा जैन हे सिद्ध होत नाही. (आता आज किती वारक-यांना आपल्याच संप्रदायी तत्वद्न्यान माहित आहे हा अत्यंत वेगळा मुद्दा झाला.)

   Delete
  2. संजय सर,
   सविस्तर उत्तर दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचे विश्लेषण वाचून यापुढे आता कोणी वारकरी संप्रदायाचे मूळ दुसर्‍या धर्मांत शोधणार नाही. साम्य असणे आणि संपूर्ण धर्म अंगिकारणे यातला फरक नेमका तुम्ही दाखवून दिलेला आहे. :)

   महाराष्ट्राला स्वतःचा असा कित्येक हजार वर्षांचा इतिहास आहे. उत्तरेत जन्माला आलेल्या जैन-बौद्ध इत्यादी धर्मांचा प्रभाव महाराष्ट्रातील संप्रदायांवर पडण्यापेक्षा वारकरी संप्रदायातील परंपरा (ज्या वारकरी संप्रदाय अस्तित्त्वात येण्याअगोदर कित्येक शतके महाराष्ट्रात प्रचलित असणे शक्य आहे) त्यांचाच प्रभाव उत्तरेतील धर्मांवर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जसे जैन-बौद्ध मते वारकरी संप्रदायाचे मूळ त्यांच्या धर्मांत दाखवून देत आहेत. तसेच त्यांच्या धर्माचे मूळ महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातही शोधता येऊ शकते. आणि त्यात बराच वावही आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात झालेल्या २३व्या सातवाहन राजाने - गौतमीपुत्र सातकर्णीने- एक भव्यदिव्य इतिहास घडवून शकांचे नाशिक येथील युद्धात समूळ उच्चाटन केले. तेव्हापासून सातवाहनांचे साम्राज्य अगदी भरभराटीस आले होते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात निर्मिलेल्या महाकवि गुणाढ्याच्या महान बृहत्कथा या ग्रंथाची निर्मिती महाराष्ट्रात झालेली होती हे आता सिद्ध झालेले आहे.
   ज्या प्रदेशाला स्वतःची सिद्ध झालेली संस्कृती असते त्याला संप्रदाय निर्माण करावे लागत नाहीत. तर ते आपोआप होतात. वारकरी संप्रदाय हा व्यक्तीप्रणित कधीच नव्हता. व उस्फूर्त्पणे आकाराला आलेला संप्रदाय आहे. उलट जैन-बौद्ध हे व्यक्तीप्रणित आहेत.

   धन्यवाद

   Delete
 8. हो हे खरे आहे कि , विठ्ठला सारखी बुद्धाची मूर्ती जगात कुठेच नाही. पण तिरुपती मंदिर हे सुद्धा बुध मंदिर आहे हे सिद्ध करणारे एक पुस्तक मी खूप दिवसापूर्वी वाचले होते....जगन्नात मंदिराबद्दल स्वामी विवेक नंदानी सांगितले होते कि हे बुद्ध मंदिर आहे....त्यांचे त्या विषावरील भाषण महाजालावर उपलब्ध आहे. हा घोळ संस्कृती मिश्रणातून झाला असावा...................नाहीतर आज अनेक मंदिराची मशिदी आणि मशिदींची मंदिरे झालेली आहेतच कि. मंदिर -मशीद हे संस्कृती मिश्रण होवू शकत नाही हे मान्य पण काही काळापूर्वी बुद्ध आणि वैदक धर्मात स्पर्धा आणि वैर होतेच कि........काही बुद्ध विहार मध्ये महादेवाच्या पिंडी आज पण आपल्याला दिसतात.....भुलेश्वर (पाटस पुणे) हे महादेवाचे मंदिर आहे पण त्याच्या वरचा घाभार्यावरची नक्षी त्यामध्ये बुद्ध मुर्त्या स्पस्तपणे दिसतात. आमच्या गावातील, सिरसाव ताल परंडा, बार्शी जवळ....लक्षी मंदिराच्या गाभार्याच्या दर्वाज्यावारती बुद्ध किवा जैन (पुढच्या खेपेला गेल्यावर फोटो काढून टाकेन इथे) यांची मूर्ती स्पस्त दिसते......असे आक्रमण प्रेत्येक धर्माचे एकमेकावर झालेले दिसते....त्यामुळे फक्त विठ्ठल मूर्ती कशी आहे त्यावर फक्त विचार न करता.....मंदिराचा पुरातात्वाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवा......शैव धर्मात शंकराची मूर्ती विश्नुसारखी कशी? महादेवाची पूजा लिंग स्वरुपात करतात मग मूर्ती का?
  मला वाटते ज्या ज्या वेळी धर्म बदलत गेले तसे या मंदिरामध्ये असणारी दैवते पण बदलत गेली असावीत...आणि अचारानामध्ये सरल्मिसळ झाली. I am sorry there is no consistency in my comment.

  ReplyDelete
  Replies
  1. विकासजी,
   शैव-वैष्णव यांच्यातील समन्वयाबद्दल मी वर लिहिले आहे. आपण याला संस्कृति मिश्रणही म्हणू शकतो. शिव आणि विष्णू यांच्यातील मूर्तीशास्त्रीय साम्य हा भाग काहीसा गुंतागुंतिचा आहे. विष्णूने शिवाचे रूप घेतल्याचे अनेक उल्लेख दिसतात, त्याचा परिणाम म्हणून हरी-हर अशी संयुक्त मूर्ती निर्माण झाली. महाभारतात हरी-हरांची पूजा केल्याने काय फल मिळते याची चर्चा आहे.याचाच परिणाम म्हणून पुढे हरी-हर ऐक्य, किंवा समरूपता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अनेकांनी काम केले. शिवलीलामृत सांगते,
   "यम सांगे दुतांप्रती ॥ शिवद्वेषी जे पापमती ॥
   ते अल्पायुषी होती ॥ नाना रीती जाचणी करा ॥
   शिव थोर विष्णु लहान ॥ हरि विशेष हर गौण ॥
   ऐसे म्हणती जे त्यालागून ॥ आणोनि नरकी घालावे"
   काही बुद्ध विहारात शिवलिंगे दिसतात ही माहिती मला नवीन आहे. पण अशा गोष्टी दोन धर्मांचा परस्पर परिणाम झाल्याने होणे साहजिक आहे. जसे तिबेटी बुद्ध परंपरेत तारा, उग्र तारा या तांत्रिक देवतांचा समावेश आणि त्याच देवतांचे पूर्व भारतीय हिन्दू परंपरेत वाढलेले महत्त्व.
   भुलेश्वर मंदिराचा मी अभ्यास केला आहे. या मंदिराचे मुख्यत्वे दोन भाग पडतात. एक आतील मंदिर आणि दुसरा त्याला झाकणारा बाहेरचा भाग (ज्याला आपण वरचा गाभारा म्हटले आहे). आतील मंदिरावर रामायण-महाभारत युद्ध, नृत्य करणा-या अप्सरा, यक्ष, काली (चामुंडा) इत्यादि मातृका असे कोरीवकाम आहे. बाहेरचा भाग हा केवळ यूनिक आहे, कारण इथले कोरीव काम माझ्यामते तरी बाकी कुठे नाही. इथे पुढील देवता आहेत- महेश्वरी, कौमारी, गणेशानी (स्त्री गणेश), वैष्णवी, ब्राह्मी. याचे फोटो माझ्याकडे आहेत. या सर्व मुख्य देवतांच्या शक्ति आहेत, आणि यांच्या इतक्या सुरेख मूर्ती माझ्या पाहण्यात इतरत्र नाहीत. या मन्दिराबद्दल अजून तपशील देता येतील, विस्तारभय म्हणून आत्ता देत नाही.
   लिंगपूजा ही मूर्तिपूजेपेक्षा पुरातन आहे. शिवमूर्ती अपवादात्मक रित्या का होईना, पूजल्या जातात. मूर्तीशास्त्रात शिवाच्या विविध मूर्ती, उदा. अन्धक-वध मूर्ती, लिंगोद्भव मूर्ती, सदाशिव मूर्ती, गंगाधर मूर्ती इत्यादि कशा तयार कराव्यात आणि त्यांची मोजमापे याचे अत्यंत डिटेल मार्गदर्शन आहे. शिवाची काही रूपे (भैरव, कालभैरव, वीरभद्र) ही मूर्ती आणि लिंग अशा दोन्ही रूपात पूजली जातात. परन्तु लिंगपूजा ही मूर्तिपुजेपेक्षा पुण्यप्रद आहे, असे अनेक जुन्या ग्रंथात सांगितले आहे. ते लिंगापूजेच्या पुरातनत्वामुळे असावे.
   बाकी चूक-भूल द्यावी घ्यावी. धन्यवाद.

   Delete
  2. अश्विनजी, अत्यंत समर्पक प्रतिसाद. विष्णुबद्दल थोडक्यात सांगतो...विष्णु या शब्दाचा मुलार्थ म्हणजे "विस्तारित ...वर्धिष्णु असनारे लिंग." (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी). वेदांतील इंद्राचा दुय्यम सखा असलेला विष्णु आणि सागरशयनी/लक्ष्मीपती मानला गेलेला विष्णु एकच नाहीत. त्यामुळे "विष्णुसहित शिव आणिला पम्ढरी" या संतमतात काही गोंधळ नाही. आता जरा घाईत आहे. नंतर सविस्तर चर्चा करुयात. विष्णु आणि नारायण यावरही बोलुयात.

   अभ्यासपुर्ण चर्चा पुढे नेत असल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार.

   Delete
 9. थोडेसे जगन्नाथ मंदिरविषयी, अगदी थोडक्यात. (विकासजींच्या कमेन्टचा सन्दर्भ)
  इसवी सनपूर्व १ मध्ये खारवेल या कलिंग राजाने मगधाचा दोनदा पराभव केला आणि पुरी येथे मंदिर बांधून त्यात जिननाथाची(?) स्थापना केली. अशोकाने कलिंग येथे बांधलेला दंतपुरा/राजपुरा (पुरीचे जुने नाव) स्तूप त्याने नष्ट केला असावा, पण त्याचे पुरावे मिळत नाहीत ("may be destroyed" चौधरी, २०१०). इ.स. पूर्व २ मध्ये सातवाहनांनी कलिंगांचा पराभव केला. त्यापूर्वी जिननाथ हा नीलमाधव झाला होता. सातवाहनांनी धर्म, चन्द्र, संरक्षण, यम, कुबेर आणि वासुदेव यांची या मंदिरात स्थापना केली. इ.स. ९ मधे लिहिलेल्या ओडिसी लेखक मुरारीमिश्र याच्या 'अनर्घरघव नाटकम' या नाटकात समुद्रकिनारी पूजल्या जाणा-या पुरुषोत्तमाचा उल्लेख येतो. हा पुरुषोत्तम नक्कीच विष्णू आहे. इ.स. १२ मध्ये अनंतवर्मन छोड़गंग देव याने पुरुषोत्तम मंदिर बांधले असा उल्लेख कृष्णमिश्र या लेखकाने केला आहे. इ.स. ११९ मध्ये कुषाण राजा हविष्क आणि वासुदेव (इ.स. १४६) यांनी शिव (ईशान) आणि विष्णू यांची पूजा सुरु केली. हविष्काच्या नाण्यावर शंख-चक्रादी चिन्हे दिसतात. म्हणजे चतुर्भुज विष्णूपूजा सन ११९ पासून सुरु झाली. म्हणजेच कलिंगांचा नीलमाधव (कृष्ण?) हा विष्णू मध्ये रूपांतर पावला.
  यानंतर ओड़िसावर अनेक राजसत्ता आल्या. मथर, रणदुर्जय, नाग यांनी काही काळ राज्य केले. नाग राजे शिवभक्त होते, आणि त्यांनी यमाचे यमेश्वरात आणि इशानाचे इशानेश्वरात रूपांतर केले. यानंतर मुद्गल, विग्रह या सत्ता आल्या. विग्रहांनी वराह विष्णूची पूजा सुरु केली आणि लोकनाथाचे मंदिर बांधले. शैलोद्भव राजांनी माधवभक्ति पूर्ण ओडिसात प्रसारित केली. यानंतर आले भौम राजे. हे शक्तिपूजक होते, आणि यांनी विमलेचे मंदिर बांधले. नंतरचे भूमकार हे बौद्ध राजे होते, आणि त्यांनी वासुदेवाच्या जागी बौद्ध त्रिरत्नाची स्थापना केली. यानंतर आलेल्या सोमवंशी राजा ययातिने परत जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची मुख्य मंदिरात स्थापना केली. राजा भानुदेव (सन १३०६) याच्या ताम्रपटावर 'जगन्नाथ' हे नाव प्रथम येते. असो.
  सांगण्याचा मुद्दा हा, की जगन्नाथ मंदिराचा इतिहास हा जवळजवळ १५०० वर्षांचा आहे, आणि त्यात अनेक स्थित्यंतरे आहेत. अशोकाचा 'कदाचित' नष्ट झालेला स्तूप आणि भूमकार राजांचा काळ हे दोन बौद्ध दुवे सोडले, तर मुख्यत्वे ही स्थित्यंतरे शैव-शाक्त-वैष्णव अशी आहेत. याबद्दल अजून सविस्तर मी माझ्या ब्लॉगवर लिहीन कधीतरी.
  संदर्भांच्या कमतरतेने काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व. धन्यवाद.

  ReplyDelete
 10. सर खूप छान लेख आहे..

  बिरोबा हे धनगर समाजाचे आराध्य दैवत असून, अनेकदा बीरदेव ( बिरोबा / बिरप्पा ) व विट्ठल यांचे मूर्ति आसपासच दिसून येईल ...( महाराष्ट्रात व शेजारच्या कर्नाटक राज्यात ही... पट्टणकोडोली ( कोल्हापुर ) येथे तर 'श्री विट्ठल बिरदेव' यात्रा तर फार मोठी असते... गोकाक ( कर्नाटक ) येथील बीरप्पा (बिरदेव) मंदिरात बीरप्पा शेजारी विट्ठलाची मूर्ति आहे. ) ... हे असे का ? असे ' कानडा विट्ठल बिरदेव संबंध' आता थोड़े फार समजले.

  आणि सोलापूर जिल्हा व त्यास लागून असलेल्या कर्नाटक राज्यात धनगर / कुरुबांची संख्या लक्षणीय आहेच...

  धनगर समाजाची अनेक देव शेजारील कर्नाटक राज्यात दिसून येईल....उदा. चिंचनी मायाक्का.

  बिरोबा / बिरप्पा व बल्लारबाचे मंदिर मी स्वतः कर्नाटक राज्यात बेल्लारी येथे पाहिलेली आहे...बल्लारबाच्या नावावरून बेल्लारी असे नाव आहे, असे येथील एका ज्येष्ठाने सांगितले आहे... आणि बेल्लारी येथे धनगर ( कुरुबा व कुरुमाही आंध्र प्रदेश जवळ असल्याने ) समाज फार मोठा आहे...

  आणि यळकोट यळकोट जय मल्हार मधील 'यळ' म्हणजे सात असा आहे...सात ( ७ ) कोट वा सात कोटि. व या शब्दाचे नाते थेट तिरुपतिपर्यंत आहे, असेही एका ज्येष्ठाने सांगितले आहे.

  कर्नाटक व आंध्र प्रदेश येथे कुरुबा व कुरुमा अर्थात धनगर समाज फार मोठा आहे... मैलार / मैलार लिंगा ( मैलार अर्थात मल्हार ) मंदिर येथे आहे...


  हे सर्व सांगन्याचे कारण एवढेच की, यांचे संबंध एकमेकांशी आहे ...आणि हे संबंध आता शोधले पाहिजे...सांगितले पाहिजे....

  सर असेच लिहित जावे...

  धन्यवाद !

  ReplyDelete
 11. आदरणीय जेष्ठ साहित्यिक डॉ.रामचंद्र ढेरे यांनी विठ्ठल हि मुळची गवळी-धनगर समाजाची होती. असे म्हंटले आहे. आणि विठोबा आणि बिरोबा हे धनगर मान्यते प्रमाणे सक्खे भाऊ होते. आणि बर्याच गवळी-धनगर कुटुंबामध्ये विठ्ठल हे नाव पिढी जात चालत आलेले दिसून येयील. उदा -माझे नाव विठ्ठल होते, माझ्या आजोबांचे विठ्ठल आणि त्यांच्या आजोबांचे विठ्ठल. म्हणजे प्रत्येक पिढी मध्ये हे नाव गायी -राखणाऱ्या धनगर समाजामध्ये दिसून येते.

  विठ्ठल खोत

  ReplyDelete
 12. How can I upload pictures here? wanted to upload photos inside Bhuleshwar temple....which look like Jain or Buddha

  ReplyDelete
  Replies
  1. Vikas ji, you can send pics on email so that I can upload the same here (with credit to you)

   sanjaysonawani@gmail.com

   Delete
 13. मुळातच भारतीय संस्क्रती पूर्णपणे शैव होती .. आपल्या लेखांच्या जोगे अंदाजित जातीत जास्त २२०० - २५०० इ.स पूर्व पासून जे बाहेरील हल्ले, घुसखोरी , व नितीकातेची कमालीची वैचारिक घडून आणलेला बदल (देवते पासून ते जाती ग्रह समश्येपर्यंत ) हे भारतातव मिळवण्या साठी व स्वतःचीच चालती ठेवण्यासाठी त्यांना बदलून किंवा नाहीच जमले तर स्वतः हि मिळवून घेऊन जे ठरवले तेच सध्या करण्या पर्यंत.. .. हि तर शैव समाज , भारतीय, मुल निवासी , यातील एकरुपतेला तेढ करण्या शिवाय काहीच केले नाहि बाहेरील घुसखोरांनी व येथील समाजास पत्र शुद्र म्हणून जगभर नामाविले .. याचा असा अर्थ काढावा काय ? सर. गोंधळ उडतोय... (तुमच्या लिखानशी ए माझ्या उत्तराचा संबंध जरी नाही वाटला तरी माझ्या ए सामुहिक विषयाचा एक उदाहर आपला लेख आहे असे मला उदाहरर्थ वाटले. काही गैर वाटल्यास क्षमस्व . तरी आपल्या लिखाण मुळे सूर गवसतोय . ए बद्दल धन्यवाद :) )

  ReplyDelete
 14. विठ्ठलाची वारी पूर्वी फक्त पशुपालक समाजापुरती मर्यादित होती याला नेमका संदर्भ काय आहे ?
  पालखी कोणत्याही संतांची निघाली तरी त्यात अभंग प्रामुख्याने तुकारामांचेच म्हटले जातात . ज्या संतांची पालखी त्याच संतांचे अभंग म्हणणे असे कुठेही आढळत नहि.
  ज्ञानदेवांच्या पालखीपुढे तुकोबांचे अभंग म्हटल्यास मारामारी व्हायची हि अत्यंत चुकीची माहिती आहे .
  जो वाद होता तो आरतीवरून होता . त्याचाही संदर्भ वेगळा आहे .
  ज्ञानदेव आणि तुकाराम यांची पालखी पूर्वी एकत्रच निघायची . पुढे आर्थिक वादावरून वेग वेगळ्या पालख्या निघू लागल्या . पालखी वेगळी झाल्यावर ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याचे भजन वगैरेचे नियोजन वासकर मंडळी करत असत . यांच्या घरात तुकोबांचा वीणा आहे असे हे मानतात . ते स्वताला तुकोबांचे विद्या वंशज म्हणवतात (तुकाराम - -निळोबा - मल्लाप्पा वासकर अशी परंपरा ) त्यामुळे यांना तुकोबंविषयी आढी नाही हे निश्चित .
  तुकोबांची सर्वत्र प्रचलित आरती रामेश्वर भट्ट यांनी लिहिलेली आहे . हे रामेश्वर भट्ट तुकोबांचे कडवे विरोधक होते .काही ब्राह्मण शुद्र असलेल्या तुकोबांच्या पाया पडतात वगैरे तक्रारी यांनी वरच्या अधिकार्यांकडे केल्या होत्या असे बहिणा बाईंच्या अभंगावरून दिसते . पुढे हे तुकोबांचे शिष्य शले. देहूकर आणि अनेक वारकरी त्यामुळे यांना संत मानतात तर वासकारांच्या मते रामेश्वर हे संत नाहीत . त्यामुळे त्यांच्या फडावर ते रामेश्वर रचित आरती न म्हणता निळोबांनी लिहिलेली तुकोबांची आरती म्हणतात . त्यामुळे या वासकरांनी रामेश्वर रचित आरती म्हणण्याची चाल बंद केली पुढे वारकर्यांनी मागणी केल्यावर निळोबा रचित आरती म्हणण्याची पध्दत सुरु केली . तुकोबांची आरती लिहिणारे रामेश्वर व निळोबा हे दोघेही ब्राह्मण हेही लक्षात घेतले पाहिजे .
  रामेश्वर हे आधी तुकोबांचे विरोधक असून नंतर त्यांना तुकोबांचे महत्व पटले यामुळे त्यांनी तुकारामांना मानण्याला वेगळे महत्व आहे असाही एक मतप्रवाह आहे .
  सोपानदेव वगैरे इतर संतांच्या पालखीत सुध्दा मुख्यत्वे तुकोबांचे अभंग असतात . हरिपाठ ज्ञानदेवांचा म्हणतात आणि आरती ज्ञानदेव आणि तुकाराम अशा दोन्ही होतात .

  ReplyDelete
 15. अण्णा - अहो अजून सगळे स्वप्नात वावरत आहेत आज एकविसावे शतक चालू आहे

  आबा - आता काय सांगायचे राव

  आण्णा- तो काळ येड्या ना अजून एड करायचा होता ! असा कधी देव असतो काय कुठे ?

  आबा - हे तुम्ही स्पष्ट तरी बोलत आहात पण ते संजय सोनवणी बघा -ते पण म्हणतात की ते देव मानत नाहीत - आणि आता पण ते शहाण्याना एड करायला बघतात !

  - आता काय सांगायचं राव - कसली वारी अन कसला पांडुरंग - लोक धमाल करायला येतात हल्ली - आणि वारकरी दिलेले पदार्थ फेकून देत असतात - हा माज !- पुण्यात हिंडून बघितलं की डोकच सटकत -

  अण्णा - महाजनो येन गतः स पंथः ही जगाची रीत आहे !

  त्यात आणि संजय रावांच परत आहेच - पांडुरंग ! ! ! तो कोण ?शैव का वैष्णव ?

  आबा - यांना कुणीतरी पगारी ठेवलेलं दिसतंय !वैष्णवांच्या नावाने बेंबीच्या देठापासून बोंबलत रहा - आठवड्याचे हजार दहा हजार देईन असं असेल कदाचित -

  अण्णा - नक्कीच हो - त्या शिवाय कुणी न विचारता हा असा कसा ओरडत सुटतो सारखा ?

  समज की हो - पांडुरंग शैव आहे असे समजा -ठेवा एक नंदी आणून या आषाढीला - बघा काय म्हणतात वारकरी !- तुमचा कसा सत्कार करतील ते ?आहे का हिम्मत ?

  आबा - इकडे सांगायचं की मी मूर्तीपूजा मानत नाही - मी एकेश्वर पंथाचा आहे - कधी म्हणायचं - मी देव मानतच नाही - परत दुसऱ्याच्या मनात सारखा गोंधळ उडवून देत बसायचं !

  अण्णा - असते कुणा कुणाला आवड ! -आबा , मला एक -समजते तुमचे जर स्पष्ट मत असेल न - की या जगात देव नाही - तर नो प्रॉब्लेम - तुमच मत तुमच्यापाशी ठेवा ना - हे चांगले नाचत गात - अभंग म्हणत चालले आहेत त्यांच्या मागे का -लागता ह्या पांडुरंगाची एक गम्मत सांगतो - तुम्ही याला वैष्णव म्हणताना - हा खरा शैव् च आहे - फक्त मला माहित्ये !- तुम्ही याला शैव मानता का ? चूक ! हा लाखो भक्त वारकरी लोकांचा विष्णू आहे - त्यात परत विष्णू दोन आहेत हा एक गोंधळ ! लक्ष्मीपती विष्णू वेगळा -

  आबा - हा यांचा छंद आहे का ?अहो त्या देरे साहेबांच्या नखाची तरी सर आहे का यांच्या लिखाणाला - उगीच कुणाशीही जवळीक करायला जातात !त्यांच्या पुस्तकाना सारा महाराष्ट्र डोक्यावर घेतो आणि यांची पुस्तके किराणा दुकानदारही घेत नाही -

  आण्णा - ही खरच दळभद्री लोक आहेत -

  आबा - इतके रागावू -नका त्याना आपण एक संधी देवूया सुधारणा करण्याची !

  आण्णा - आधी छापतात का ते बघा - !

  ReplyDelete
  Replies
  1. ढेरेंना शिव्या देणारे लोक सुध्दा आहेत . इतरांनी दिलेले काही खायचे नाही आपला खर्च आपणच करायचा अशा प्रकारे चालणारे वारकरी आहेत . सर्व दिंड्या वर्गणी घेतात . वारीमध्ये पुण्यात जो दानधर्म होतो त्यामुळे खास सामील होणारे लोक आहेत . ज्यांना पोटासाठी असे करावे लागते त्यांना टोकाचा विरोध करू नये असेही अनेक वारकर्यांचे मत असते . पंढरपूरला पूर्वीही आषाढी वारीसाठी खास भिकारी येत असत .
   वारीमाधली गर्दी बघून पूर्वी यांना नवे ठेवणारे लोकच आता वारीत आपल्याला अनुयायी मिळतील का हे बघायला इकडे येत असतात .

   Delete
 16. अभयाजी,

  आपले विचार अत्यंत चिंतनीय आहेत ,

  अभिनंदन

  त्याच वेळेस आपण अती परंपरा जपणारे आहोत असे वाटत नाही का ?

  वारकरी शिस्त पालन करत असतात हा इतिहास होतो आहे हे सत्य आहे

  काही दिवसांनी गणपती उत्सवा सारखी त्याची वाट लागू नये अशी अनेकजण इच्छा दर्शवितात

  गणपती उत्सवाने असे निन्दनीय रूप कसे आपलेसे केले हा पण एक अभ्यासाचा भाग आहे

  वाढते व्यापारीकरण हे जुन्या परताना विकृत वळण देते

  तुळशी माळ काढून ठेवून अभक्ष्य भक्षण करणारे अनेक आहेत

  गुटका खाणारे अनेक आहेत

  त्यातच संजय सर बुद्धिभेद का करत असतात तो प्रश्न अनुत्तरीतच राहतो - एक परंपरा आहे - तिचा परंपरा म्हणून आदर करण्यात समाजाचे मानसिक निरोगीपण सिद्ध होते ,

  आणि ऐन उत्सवात पांडुरंग हा शैव का वैष्णव ही चर्चा आपण मनाने निरोगी नाही हे सिद्ध करते


  दुसरी गोष्ट ,

  शिवाजी महाराजांनी किंवा पेशव्यांनी या चळवळीला राजाश्रय दिल्याचे किंवा खर्चापोटी काही रक्कम दिल्याचे माझ्यातरी वाचनात णाआःएए.

  या वारकरी चळवळीला लोकाश्रय असेल पण राजाश्रयाची उणीव कधीच भासली नाही !हे या चळवळीचे वैशिष्ठय म्हणता येईल याबाबत कुणी तज्ञाने लिहिले पाहिजे !

  मग हजारो वर्षांच्या शिस्त बद्ध चळवळीला आजच इतकी प्रसिद्धीची आणि काही प्रमाणात राजाश्रयाची का गरज वाटावी ?

  हाच मला त्या दिंड्यांच्या मुख्याना प्रश्न विचारावासा वाटतो !

  आरोग्यसेवा आणि त्यांना थांबण्यासाठी मिळणारी हक्काची मैदाने यावर वाढत्या शहरी करणाचे सावट पडणार नाही इतके पाहिले पाहिजे असे सांगावेसे वाटते

  धन्यवाद !

  ReplyDelete
 17. नाम स्मरणाने मन जागे करतांना पंढरपुरात मात्र अत्यंत गर्दी सोयी सुविधांचा अभाव, स्थानिक डॉक्टर्स बाहेरगावी निघून जाणे, नगरपरिषदेवर अतिशय वाढता ताण, गलिच्छपणा फसवेगिरी इ. अनेक प्रकार इतर यात्रा किवा गर्दीप्रमाणेच होत असतांना एखाद्या ठिकाणी एवढी माणसे केवळ झापडबंद श्रध्देपायी एकाच ठिकाणी जमाववी. इकडे महाराष्ट्रात दुष्काळ, पाण्याविना वणवण हिंडणारे लोक,भ्रष्टाचार, सामाजिक, जातीय विषमता महिलांचय हत्या गर्भहत्या इ. अनेक समस्या असतांना दुसऱ्या बाजूला वारकरी मात्र नेमाने मायबाप विठठलाच्या नावाने रिंगण खेळणे इतर भजन किर्तनात दंग असणे हेही वस्तुस्थितीचे भान नसल्याचे जाणवते. धर्म किंवा देवाची श्रधदा ही कधीतरी मनाची माणुकीची कर्माची उत्तुंग जाणीव व समजदार होण्यासाठी असतात.स्थितीवादी लोकांना कधी कळेल.संबधितांनी कृपया उगाच शिस्तीच्या गोडगोड प्रतिक्रिया जास्त न देता खऱ्या व त्यांना जाणवलेल्या प्रतिक्रिया दिल्यास खरे प्रबोधन होईल.(आपल्याला व्यवस्थापन व स्वच्छता शिकायला युरोपियन लोकांचा सल्ला व पैसा नको असेल तर)

  ReplyDelete