काय झालं, आम्हाला जळगांव जिल्ह्यात असतांना शाळेत रेव्हरंड टिळकांनी लिहिलेली एक प्रार्थना होती.
"मेंढपाळ हा प्रभु कधी ने हिरव्या कुरणी मला
कधी मनोहर जलाशयावर घेऊनी मज चालला"
कधी मनोहर जलाशयावर घेऊनी मज चालला"
खरे तर मेंढपाळात प्रभु कसा असतो हे मला पहिली-दुसरीत समजणे शक्य नव्हते. तिसरीत आलो ते पार पुणे जिल्ह्यात आणि आमच्या वरुडे गांवाजवळच शिंगाडवाडी. तेथे धनगरांची वस्ती.
मेंढपाळ दिसला की मला ती प्रार्थना आठवे. धनगर मला प्रभुच वाटायचा. ती कोकरं, मेंढरं आणि त्यांच्यात हरवलेला धनगर पाहुन हरखुन जायला व्हायचं. धनगर हा प्रभु नसतो...ती वर्चस्वतावादी समाजाची एक रम्यात्मक कल्पना आहे हे मला समजायला वेळ लागला. असे असले तरी माझ्या कल्पनेतील धनगर हा सृजनाच्या महोत्सवाचा सर्जक वाटला.
धनगर समाजावर माझे अतोनात प्रेम आहे. मी धनगरांची बाजु लावून धरतो म्हणुन बहुतेक लोक मला धनगरच समजतात आणि चक्क "जातीयवादी"ही म्हणतात. मला त्यांची पर्वा नसते हे तर उघडच आहे. का मी एवढे प्रेम करतो? केवळ यशवंतराव होळकरांसारखे अद्वितीय पुरुष या समाजातुन आले म्हणुन की काय? केवळ धनगरांचा इतिहास हाच मानव जातीचा इतिहास आहे म्हणून की काय? ते खरे तर दुय्यम भाग आहेत. केवळ ते वंचित, शोषित आहेत म्हणुनही माझे त्यांच्यावर प्रेम नाही.
मी सर्वांवर प्रेम करतो पण धनगरांवर जास्त करतो हे वास्तव आहे. हा माझा दुजाभाव आहे असे अनेक मित्र मला म्हणतात पण मला तो दुजाभाव असला तरीही प्रिय आहे. याचे कारण एवढेच आहे की मला मानवतेच्या जेवढ्या खुणा येथे जतन केलेल्या दिसल्या त्या अन्य समाजांत त्या प्रमाणात नाही.
साधेपणा, भोळेपणा आणि केवळ माणुसकीची जाण यापोटी स्वत:चे नुकसान धनगर सहज करुन घेतो. निसर्गाशी आणि खुलेपणाशी त्याची जुळलेली नाळ आजही कायम आहे. या गोष्टी मला आवडलेल्या आहेत. पण त्याच वेळीस मुजोर समाज त्यांना दाबत त्यांच्या नैसर्गिक आशा-आकांक्षाची जेंव्हा गळचेपी करतो तेंव्हा मला संताप येतो.
धनगरांनी आपली मुल्ये कायम ठेवत आधुनिक जगातील विकासाचा केवळ भागीदार नव्हे तर नेतृत्व करावे असे मला वाटते. त्या नेतृत्वाचा त्यांच्याकडे चंद्रगुप्तापासुनचा इतिहास आहे.
आज अंधार आहे हे खरे असले तरी उजाडतच नाही असेही नसते. मग ते पुन्हा नेतृत्व करत मानवतेचा, समतेचा इतिहास पुन्हा रचु शकणार नाहीत असे नाही. आणि ही क्षमता धनगर समाजात आहे यावर माझा विश्वास आहे.
त्यांना कोणाचे उसणे नेतृत्व घेण्याची गरज नाही. फक्त इतिहास आणि क्षमता नव्याने समजावून घेणे गरजेचे आहे. ही सर्जकता नव्याने उफाळून येईल असे मला वाटते खरे.