Saturday, April 7, 2012

महार कोण होते ? – एक परीक्षण

महार कोण होते ? – एक परीक्षण
-संजय क्षीरसागर
Posted on April 7, 2012 by admin
नुकतेच श्री. संजय सोनवणी यांचे ‘ महार कोण होते ? ‘ हे पुस्तक वाचनात आले. त्या पुस्तकात ( खरे तर त्याला पुस्तक म्हणणापेक्षा एक छोटेखानी ग्रंथच म्हणायला हवे ) महाराष्ट्रातील महार जातीच्या उगमाची / निर्मितीची साधार आणि मुद्देसूद चर्चा केली आहे. तसे बघायला गेल्यास याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अस्पृश्य विषयक ग्रंथात या विषयावर यापूर्वी लेखन केलेले आहेच. पण मग प्रश्न असा निर्माण होतो कि, संजय सोनवणी यांनी आपल्या महार विषयक ग्रंथात नवीन काय लिहिले आहे ? या ठिकाणी प्रथम आंबेडकर व सोनवणी यांच्या लेखनामागील भूमिकेची दखल घेणे योग्य ठरेल.
आंबेडकरांनी आपला अस्पृश्यविषयक ग्रंथ लिहीला, त्यावेळी अखंड भारतातील अस्पृश्य वर्ग त्यांच्यासमोर होता. हिंदू धर्म हा भारतातील प्रमुख धर्म असूनही व बव्हंशी अस्पृश्य हे हिंदू असूनदेखील त्यांना मुख्य समाजप्रवाहातून बाजूला का ढकलले आहे, याचा त्यांना शोध घेणे गरजेचे वाटले. त्या दृष्टीने त्यांनी आपला अस्पृश्य विषयक ग्रंथ लिहिला. त्याउलट सोनवणी यांनी निव्वळ महाराष्ट्रातील महार समाज डोळ्यासमोर ठेऊन आपल्या ग्रंथाचे लेखन केले आहे. उभयतांच्या भूमिकेतील हा महत्त्वाचा फरक या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर सोनवणी आणि आंबेडकर यांनी लिहिलेल्या ग्रंथांचे महत्त्व लक्षात घेणे गरजेचे आहे. आंबेडकर यांचा अस्पृश्य विषयक ग्रंथ हा आता खऱ्या अर्थाने कालबाह्य झाला आहे हे उघड आहे. जरी त्यांची ग्रंथलेखनामागील दृष्टी व्यापक असली व त्यासाठी त्यांनी अविश्रांत श्रम घेतले असले तरी त्यांच्या या ग्रंथाचा आजच्या काळात काहीही उपयोग नाही. कारण ; त्या ग्रंथात त्यांनी ज्या काही संकल्पना मांडल्या आहेत त्या सर्व मोडीत निघालेल्या आहेत. हि बाब त्यांच्या अनुयायांना खटकेल याची मला कल्पना आहे, पण जे सत्य आहे ते आता स्वीकारलेचं पाहिजे. आंबेडकरांनी आपल्या अस्पृश्य विषयक ग्रंथाचे लेखन करत असताना भारतातील सर्व अस्पृश्य गणल्या गेलेल्या जाती, अस्पृश्य का बनल्या किंवा मानण्यात आल्या याचे विवेचन केले आहे. परंतु, याच ठिकाणी त्यांचा काहीसा गोंधळ उडाल्याचे दिसून येते. एकाचवेळी, सर्व भारतातील विशिष्ट वर्गातील लोक अस्पृश्य कसे बनले याचे त्यांनी जे काही विवेचन आपल्या ग्रंथात केले आहे ते कोणत्याही कसोटीवर टिकण्यासारखे मुळीच नाही.
त्याउलट, सोनवणी यांनी अस्पृश्यतेचे मूळ शोधताना प्रथम ऋग्वेदमधील पुरुषसूक्त हे कसे प्रक्षिप्त आहे, हे त्याच्या अर्थासहित स्पष्ट केले आहे. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे ‘ महार ‘ या शब्दाची व्युत्पत्ती त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे या प्रयत्नात त्यांना अभूतपूर्व यश प्राप्त झाले आहे. सोनवणी यांचे समकालीन असोत किंवा त्यांच्या आधीचे लेखक असोत, या सर्वांनी महार या शब्दाची व्युत्पत्ती शोधण्यासाठी संस्कृत भाषेचा आधार घेऊन मोठी घोडचूक केली आहे असे माझे स्पष्ट मत आहे. अर्थात, या दोषापासून आंबेडकर देखील अलिप्त नाहीत हे देखील नमूद करावे लागेल. याचे कारण म्हणजे, संस्कृत हि एक अतिशय प्राचीन भाषा असल्याचा समज फार पूर्वी पासून भारतीय लोकांच्या मनी रुजलेला आहे. त्यामुळे, संस्कृत खेरीज इतर भाषांकडे किंवा त्यांच्या प्राचीनत्वाकडे या सर्वांचे लक्ष गेलेचं नाही. त्याउलट, सोनवणी यांनी महार या शब्दाचा उगम संस्कृतच्या सहाय्याने न घेता इतर भाषांच्या आधारे शोधण्याचा प्रयत्न केला व त्यात त्यांना यश प्राप्त झाले. तत्कालीन प्राकृत, पाली भाषेच्या आधारे महारक्ख या शब्दातून महार या शब्दाची निर्मिती झाल्याचे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. प्रस्तुत मराठा जातीच्या नावाचा उगम देखील प्राकृत भाषांमध्येच असल्याचे अलीकडे सर्वांनी मान्य केलेले आहेच. त्या पार्श्वभूमीवर सोनवणी यांनी महार शब्दाच्या उगमाविषयी जी संकल्पना मांडली आहे ती नक्कीच स्विकारण्यासारखी आहे. सोनवणी यांनी महार या शब्दाचे मूळ शोधल्यामुळे कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. उदाहरणार्थ, महार नावाची जात हि काही पूर्वापार अस्तित्वात नव्हती. हा एक पेशा होता. पुढे व्यवसायाची जात बनवण्याच्या काळात या रक्षक पेशाची जात बनवण्यात आली. याचा अर्थ असा होतो कि, त्यावेळी रक्षकाचे कार्य करणारे जे कोणी होते – अगदी ब्राम्हण देखील — ते सुद्धा महार म्हणूनच ओळखले जाऊ लागले. अर्थात, सध्याच्या काळात महार या शब्दाचा उच्चार करताना जी भावना इतर वर्गांच्या मनामध्ये असते ती भावना त्यावेळच्या लोकांच्या मनात प्रचलित नव्हती हे निश्चित ! तसेच महार हे अस्पृश्य नसल्याचे देखील कित्येक पुरावे अगदी अलीकडच्या इतिहासात देखील मिळतात.
शिवकाळात महार लोक सैन्यात होते हे सर्वांनाच माहिती आहे. आता शिवाजी हा लोकोत्तर किंवा दूरदृष्टीचा राजा होता असे म्हणून त्याने जे काय केले ते अलौकिक होते असाच सर्वांचा समज आहे. परंतु, मनुष्य कितीही अलौकिक असला वा दूरदृष्टीचा असला तरी प्रचलित नियमांना एका विशिष्ट प्रमाणाच्या बाहेर तो विरोध करू शकत नाही हे एक सत्य आहे ! त्या दृष्टीने पाहिल्यास, शिवाजीच्या काळात किल्ल्यांवर महारांची नेमणूक केली जात असे. त्यावेळी किल्ल्यावरील शिबंदीसाठी पाण्याची व्यवस्था असे हे सर्वजण जाणतात. परंतु, महारांसाठी स्वतंत्र पाणवठ्याची सोय असल्याचा उल्लेख कुठेही आढळत नाही. याचा अर्थ काय होतो ? तसेच महार लोकं हे मेटकरी होते. शिवाजीचे कित्येक सरदार व मंत्री ब्राम्हण असून, त्यावेळी जर अस्पृश्यता किंवा महारांच्या विषयी विटाळाची कल्पना तत्कालीन लोकांच्या मनात असती तर या सर्व उच्चवर्णीय लोकांनी शिवाजीला सांगून, महारांना किल्ल्यांवर मेटकरी म्हणून न नेमण्याची मागणी केली असती. कारण, येता – जाता महारांच्या अंगावरून जाणे त्यांना रुचण्यासारखे नव्हते. पण असे घडल्याचे दिसून येत नाही, याचा अर्थ असा होतो कि शिवाजीच्या काळात महार हे अस्पृश्य नव्हते. संभाजीच्या काळात देखील यात काही बदल झाल्याचे दिसून येत नाही. तसेच या ठिकाणी मुद्दाम लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, महार व्यक्ती गावच्या पाटलाचे पद भूषवित असे. याचा स्पष्ट आणि उघड अर्थ असा आहे कि, महार हे निरक्षर नव्हते. भले त्यांना संस्कृत येत नसेल पण तत्कालीन प्राकृत भाषेचे त्यांना पुरेपूर ज्ञान होते. पेशवेकाळात देखील या परिस्थितीमध्ये फारसा फरक झाल्याचे दिसून येत नाही. पेशव्यांच्या सैन्यात महार पथके असल्याचे अनेक उल्लेख मिळतात. ‘ सामना ‘ या वृत्तपत्रात काही महिन्यांपूर्वी बातमी प्रसिद्ध झाली होती. सांगली जिल्ह्यातील एक महार सरदार नानासाहेब पेशव्याच्या सैन्यात होता. स. १७६१ च्या पानिपतच्या युद्धात त्या महार सरदाराने पराक्रम गाजवल्यामुळे नानासाहेब पेशव्याने त्याला वतन म्हणून एक / एकाहून अधिक गावे दिल्याचा उल्लेख त्यात आलेला होता. याचा अर्थ उघड आहे कि, स. १७६१ पर्यंत महार हे अस्पृश्य आहेत असे खुद्द पेशवे देखील मानत नव्हते आणि पेशवे हे स्वतः ब्राम्हण होते !
एकूण, महार हे स. १७६१ पर्यंत तरी अस्पृश्य नसल्याचे तुरळक का होईना पण भरभक्कम असे पुरावे आढळतात. श्री. संजय सोनवणी यांनी आपल्या महार विषयक ग्रंथात याविषयी भरपूर चर्चा केलेली आहेच. आता या ग्रंथावर आक्षेप घेणाऱ्या काही लोकांचे असे मत आहे कि, सोनवणी यांनी महार नेमके कधी अस्पृश्य झाले याविषयी कसलीही चर्चा केल्याचे आढळून येत नाही. त्यांच्या या आक्षेपात तथ्य नाही असे नाही, परंतु सोनवणी हे महार समाजातील नसूनसुद्धा त्यांनी अतिशय मेहनत घेऊन स. १७६१ पर्यंत तरी महार समाज हा अस्पृश्य नसल्याचे आपल्या ग्रंथात साधार स्पष्ट केले आहे. महार शब्दाच्या उगमाच्या कोड्याची देखील त्यांनी उकल केलेली आहे. हे सर्व लक्षात घेता, त्यांनी नेमके महार हे अस्पृश्य कधी बनले हे स्पष्ट न केल्याची बाष्कळ आणि निरर्थक चर्चा न करता महार समाजातील लोकांनी किंवा आत्ताच्या नवबौद्धांनी, महार हे नेमके कधी अस्पृश्य झाले याचा शोध घेणे गरजेचे आहे. शेवटी आपणही आपल्या समाजाचे काहीतरी देणे लागतो याची जाणीव महार व नवबौद्धांनी आपल्या मनात बाळगली पाहिजे.
सोनवणी यांच्या ग्रंथावर महत्त्वाचा आक्षेप महार समाजातून व विशेषतः नवबौद्धातील काही तथाकथित विचारवंतांनी असा घेतला आहे कि, आंबेडकर यांनी जो काही अस्पृश्यांचा इतिहास लिहिला आहे तोच प्रमाण आहे. सोनवणी यांचा इतिहास आम्हाला मान्य नाही. मुळात इतिहास हा आंबेडकर किंवा सोनवणी यांचा नसून महारांचा आहे हे या लोकांनी लक्षात घेतले नाही. त्याशिवाय खुद्द आंबेडकर हे स्वतः मूर्तीभंजक असून देखील याच नवबौद्धांनी त्यांच्या मूर्तीपूजेचे / व्यक्तीपूजेचे स्तोम माजवले आहे. परंतु प्रस्तुत लेखाचा हा विषय नाही. मुळात बाबासाहेबांनी महार या शब्दाचा उगम न शोधल्यामुळे महार हे पूर्वीपासून अस्पृश्य होते किंवा पूर्वाश्रमीचे बौध्द होते असा त्यांचा समज झाला. त्यांचा अस्पृश्य विषयक ग्रंथ याच समजावर आधारीत आहे. बाबासाहेबांच्या या विचारसरणीचा परिणाम त्यांच्या धर्मांतरावर देखील झाल्याचे दिसून येते. भारतातील सर्वचं अस्पृश्य हे धर्मांतरीत झाले नाहीत. महाराष्ट्रातील अस्पृश्य पाहिले गेल्यास, महार जातीचा अपवाद केल्यास इतर जातींमधील तुरळक लोकांनीच धर्मांतर केल्याचे दिसून येते. महार समाज देखील पूर्णतः धर्मांतरीत झाला नाही हे देखील एक सत्य आहे. एकूण, अस्पृश्य विषयक ग्रंथात आंबेडकर यांनी जी संकल्पना मांडली ती मुळातचं चुकीची असल्यामुळे त्याचा थेट परिणाम त्यांच्या धर्मांतरावर झाल्याचे दिसून येते. आंबेडकरांचे हे एक अपयश मानता येईल, पण हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. या ठिकाणी चर्चा होत आहे ती, सोनवणी यांच्या ‘ महार कोण होते ?’ या ग्रंथाची ! माझ्या मते, प्रस्तुत परिस्थितीमध्ये आंबेडकर यांचा ग्रंथ, गृहीतके, विचार कालबाह्य झालेले आहेत हे आता उघडपणे आणि प्रकटपणे मान्य करण्यातचं महार आणि नवबौद्ध समाजाचे हित आहे. याचे कारण म्हणजे, त्यांचा जो पूर्वेतिहास आहे तो पराभूत टोळ्यांचा नसून एका गौरवशाली रक्षक आणि लढवय्या परंपरेचा आहे. अस्प्रुष्यतेचा इतिहास अगदीच प्राचीन नसून अलीकडचा आहे. स, १७६१ पर्यंत महार हे अस्पृश्य नव्हते हे तर आता पुराव्यांनिशी सिद्ध झालेले आहेचं. मग पुढील १०० – १५० वर्षात असे काय घडले कि महार हे अस्पृश्य म्हणून ओळखले जाऊ लागले याचा शोध घेणे गरजेचे आहे.

5 comments:

  1. पुढे व्यवसायाची जात बनवण्याच्या काळात या रक्षक पेशाची जात बनवण्यात आली. याचा अर्थ असा होतो कि, त्यावेळी रक्षकाचे कार्य करणारे जे कोणी होते – अगदी ब्राम्हण देखील — ते सुद्धा महार म्हणूनच ओळखले जाऊ लागले. अर्थात, सध्याच्या काळात महार या शब्दाचा उच्चार करताना जी भावना इतर वर्गांच्या मनामध्ये असते ती भावना त्यावेळच्या लोकांच्या मनात प्रचलित नव्हती हे निश्चित ! तसेच महार हे अस्पृश्य नसल्याचे देखील कित्येक पुरावे अगदी अलीकडच्या इतिहासात देखील मिळतात.
    भावू किती ब्राम्हण महार झाले.....त्यांची नवे अथवा पुरावा तरी द्या पुरावा नसल्यास तर्का द्वारे तरी स्पष्ट करा......

    ReplyDelete
  2.  <<<<<>>>>> आंबेडकरांचा ग्रंथ कालबाह्य कसा हे सांगु शकता का आपण जो पर्यंत नविन सिद्धांत पुढे येत नाही तो पर्यंत तो ग्रंथ कालबाह्य झाला आहे हे आपण कसे ठरवु शकतो सोनवणींचा हि सिद्धांत फक्त महार समाजा पुरताच मर्यादीत आहे. आणि आंबेडकरानी सम्पुर्ण अस्प्रुश्य समाजाचा इतिहास मांडला आहे त्यामुळे सोनवणींचा सिद्धांत अस्प्रुश्याना लागु होत नाही

    <<<<<<<< सोनवणी यांनी अस्पृश्यतेचे मूळ शोधताना प्रथम ऋग्वेदमधील पुरुषसूक्त हे कसे प्रक्षिप्त आहे, हे त्याच्या अर्थासहित स्पष्ट केले आहे. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे ‘ महार ‘ या शब्दाची व्युत्पत्ती त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे या प्रयत्नात त्यांना अभूतपूर्व यश प्राप्त झाले आहे. सोनवणी यांचे समकालीन असोत किंवा त्यांच्या आधीचे लेखक असोत, या सर्वांनी महार या शब्दाची व्युत्पत्ती शोधण्यासाठी संस्कृत भाषेचा आधार घेऊन मोठी घोडचूक केली आहे असे माझे स्पष्ट मत आहे. अर्थात, या दोषापासून आंबेडकर देखील अलिप्त नाहीत हे देखील नमूद करावे लागेल>>>>>>>पुरुषसुक्त कसे प्रक्षिप्त आहे हे फार आधी आंबेडकरानी शुद्र पुर्वी कोण होते ? या आपल्या ग्रंथात आधीच सिद्ध केलेले आहे. आंबेडकरानी आपल्या कालखंडात फक्त महत्वाच्या प्रश्नांवरच पुस्तके लिहीली मग तो अस्प्रुश्यतेचा शुद्रांचा पाकीस्तान संबधी तसेच जातिव्यवस्थे विषयी असे महत्वाच्या प्रश्नावरच पुस्तके लिहीली सेपरेट महार जातिचा इतिहास (व्युत्पत्ती ) लिहिण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत किंवा सोनवणींसारखे जाती जातीचा इतिहास लिहीण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत आणि त्यांच्याकडे प्रत्येक जातिचा इतिहास लिहायला वेळ ही नव्हता.

    <<<<<< १७६१ पर्यंत तरी महार समाज हा अस्पृश्य नसल्याचे आपल्या ग्रंथात साधार स्पष्ट केले आहे.>>>>>> चोखामेळा याना अस्प्रुश्य असल्या कारणामुळे विठ्ठलाच दर्शन नाकारल जात होत तो काळ 13 व्या शतकातील आहे

    <<<<<<<<< सोनवणी यांच्या ग्रंथावर महत्त्वाचा आक्षेप महार समाजातून व विशेषतः नवबौद्धातील काही तथाकथित विचारवंतांनी असा घेतला आहे कि, आंबेडकर यांनी जो काही अस्पृश्यांचा इतिहास लिहिला आहे तोच प्रमाण आहे. सोनवणी यांचा इतिहास आम्हाला मान्य नाही>>>>>>मुळात सोनवणी यानी लिहीलेला इतिहास हा अस्प्रुश्यांसी संबंधीत नसुन माहार या एका जातीशी संबंधीत आहे व आंबेडकरानी अस्प्रुशयांचा इतिहास लिहीला आहे त्यामुळे सोनवणीनी मांडलेल्या सिद्धांतामुळे आंबेडकरांच्या सिद्धांताला कोणातीच बाधा येत नाही

    <<<<< त्यांचा अस्पृश्य विषयक ग्रंथ याच समजावर आधारीत आहे>>>>>> पुर्णता चुक त्यांचा अस्प्रुश्य मुळचे कोण ह आ ग्रंथ ज्या शेकडो अस्प्रुश्य जाती हिंदु धर्मात आहेत त्यावर आधारीत आहे त्यातली एखाद दुसरी जात अस्प्रुश्य नव्हती हे सिद्ध केल्याने ? आंबेडकरांचा सिद्धांतांच खंडन होत नाही

    (सोनवणी महार समाज रक्षक अस्ल्याच मांडतात व महारक्षक वरुन महार झाल्याचे सांगतात पण महार हे मुळ गावातले असुन गावाबाहेर ते रक्षण करण्याकरता गेले यासाठी ते कोणताही पुरावा मांडत नाहीत तर दुसर्या बाजुला आंबेडकर हे महार समाजच नव्हे तर सम्पुर्ण अस्प्रुश्य समाज broken man असल्याच चे सांगुन सम्पुर्ण अस्प्रुश्य समाज ( फक्त महार नव्हे ) रक्षक असल्याचे सांगतात आणि त्यासाठी विविध देशातील इतिहासाचा संदर्भ देतात (त्यानी महार समाजाचा सेपरेट इतिहास न लिहील्यामुळे त्यानी त्याची व्युत्पात्तीही मांडली नाही

    ReplyDelete
  3. मुळात सोनवणी यांचा ग्रंथ आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथ ही तुलनाच होऊ शकत नाही, बाबासाहेब हे विलक्षण बुध्दिमत्ता अन् दुरदृष्टी असणारे विचारवंत होते त्यांनी त्यांच्या ग्रंथातुन मांडलेले विचार आणि केलेले संशोधन पुढील शेकडो वर्षे तरी कालबाह्य होणार नाहीत तरी हा अपप्रचार थांबवावा कारण हा अपप्रचार काही केल्या विवेकबुध्दी जागृत असणार्याच्या गळी उतरणार नाही... आता बाबासाहेबांनी महार या शब्दाची व्युत्पत्ती शोधली नाही असा तुमचा आक्षेप आहे, तर बाबांनी देशभरात ज्या 452 जाती अस्पृश्य म्हणून उच्चवर्णीयांनी घोषीत केल्या आहेत त्यावर विवेचन केले आहे. जर प्रत्येक जातीची व्युत्पत्ती कशी झाली यावर जर बाबा लेखन करत बसले असते तर अजून निदान 50-60 पुस्तके झाली असती. आता कुणीतरी एकजण उठला अन् महार कोण म्हणून सांगतो तर बाबा महार कोण हे शोधु शकले नाही असा अपप्रचार पसरवताय उद्या कुणी चांभार,मातंग,मराठा,माळी,कुणबी यावर लिहिल मग काय???? बाबा महार या जातीची व्युत्पत्ती शोधु शकले नाही असं तरी तुम्ही कशाच्या आधारावर म्हणताय तर त्यांनी ग्रंथात तसा उल्लेख केला नाही म्हणून बरं त्यांनी तसा उल्लेख केला असता तर बाकी 450 जातीच्या व्युत्पत्तीचा उल्लेख का नाही केला म्हणून अजून नाकं मुरडायला मोकळे.
    हो पण अशी विजोड तुलना केल्यानी तुमची 2-4 पुस्तकं विकल्या तरी जातील कारण बाबा या जगात फक्त देण्यासाठीच आहेत अजूनही आहेत अन् पुढेही असतील....

    ReplyDelete
  4. मुळात सोनवणी यांचा ग्रंथ आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथ ही तुलनाच होऊ शकत नाही, बाबासाहेब हे विलक्षण बुध्दिमत्ता अन् दुरदृष्टी असणारे विचारवंत होते त्यांनी त्यांच्या ग्रंथातुन मांडलेले विचार आणि केलेले संशोधन पुढील शेकडो वर्षे तरी कालबाह्य होणार नाहीत तरी हा अपप्रचार थांबवावा कारण हा अपप्रचार काही केल्या विवेकबुध्दी जागृत असणार्याच्या गळी उतरणार नाही... आता बाबासाहेबांनी महार या शब्दाची व्युत्पत्ती शोधली नाही असा तुमचा आक्षेप आहे, तर बाबांनी देशभरात ज्या 452 जाती अस्पृश्य म्हणून उच्चवर्णीयांनी घोषीत केल्या आहेत त्यावर विवेचन केले आहे. जर प्रत्येक जातीची व्युत्पत्ती कशी झाली यावर जर बाबा लेखन करत बसले असते तर अजून निदान 50-60 पुस्तके झाली असती. आता कुणीतरी एकजण उठला अन् महार कोण म्हणून सांगतो तर बाबा महार कोण हे शोधु शकले नाही असा अपप्रचार पसरवताय उद्या कुणी चांभार,मातंग,मराठा,माळी,कुणबी यावर लिहिल मग काय???? बाबा महार या जातीची व्युत्पत्ती शोधु शकले नाही असं तरी तुम्ही कशाच्या आधारावर म्हणताय तर त्यांनी ग्रंथात तसा उल्लेख केला नाही म्हणून बरं त्यांनी तसा उल्लेख केला असता तर बाकी 450 जातीच्या व्युत्पत्तीचा उल्लेख का नाही केला म्हणून अजून नाकं मुरडायला मोकळे.
    हो पण अशी विजोड तुलना केल्यानी तुमची 2-4 पुस्तकं विकल्या तरी जातील कारण बाबा या जगात फक्त देण्यासाठीच आहेत अजूनही आहेत अन् पुढेही असतील....

    ReplyDelete
  5. जितेंद्र अवचार सर 👍

    ReplyDelete

Classical Language Status: Marathi

  Why the Marathi language should get Classical Language Status?   The Marathi language has been spoken in Maharashtra and adjoining reg...