Sunday, April 29, 2012

पाणिनी नेमका कोण. कुठला व कधीचा? (भाग ३)



पाणिनीचे कुलनाम व व्यक्तिनाम


आपण पाणिनी संबधातील दंतकथा तसेच पाश्चात्य तद्न्यांची मते मागील भागात संक्षेपात पाहिली आहेत. त्यावरुन तरी पाणिनीची निश्चित अशी कालनिश्चिती करता आलेली नाही हेही आपण पाहिले आहे.

पाणिनीचा काळ जितक्या मागे नेता येतो तेवढा मगे नेण्यात भारतीय विद्वानांना अधिक रुची असल्याने त्यांनी पाणिनी हा सनपुर्व आठव्या शतकात वा त्याहीपुर्वी झाला असल्याचेच मत डा. वासुदेवशरण अग्रवालांसारख्या विद्वानांनी साधारणपणे मान्य केल्याचे दिसते. पाणिनीसारख्या महान व्याकरनकाराच्या काळाबाबत एवढा (किमान एक हजार वर्षांच्या काळाचा) गोंधळ असावा ही बाब नक्कीच भुषणावह नाही.
महत्वाची बाब म्हणजे पाणिनीचा व्याकरणकार म्हणुन वा अन्य कोणत्याही संदर्भातील उल्लेख ब्रुहत्कथा (कथासरित्सागर व ब्रुहत्कथामंजिरी) व ह्यु-एन-त्संग याच्या प्रवासवर्णनाखेरीज अन्य अभिजात म्हटल्या जाणा-या साहित्यात येत नाही ही सुद्धा बाब लक्षात घेण्यासारखी आहे. कात्यायन, पतंजली, भट्टोजी दीक्षित यांनी पाणिनीच्याच व्याकरणाचा भाष्य/वार्तिकाच्या माध्यमातुन विस्तार केला असल्याने त्यांच्या लेखनात मात्र अपरिहार्यपणे पाणिनीचा उल्लेख मिळतो.

कात्यायन व पतंजलीचे मात्र तसे नाही. पतंजलीचा भर्तुर्हरीच्या "वाक्पदीय" ग्रंथाच्या प्रारंभीच्याच श्लोकात पतंजलीचा आदरपुर्वक निर्देश केला आहे. कात्यायनाचा उल्लेख स्कंदपुराणात आला आहे. (या पुराणात कात्यायनाच्या पित्याचे नांव याद्न्यवक्ल्य व पुत्राचे नांव "वररुची" असे दिले आहे, हे मी येथे नमुद करुन ठेवतो, कारण कात्यायनावरील पुढील लेखात यावर चर्चा करायची आहे.)

असे का झाले असावे हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मुळात भारतात पाणिनी नांवाच्या अन्य कोणी व्यक्ति झाल्याचे एकही उदाहरण नाही जसे ते आपल्याला अगदी कात्यायन-पतंजलि नांवाबाबतही दिसुन येते. प्रसिद्ध माणसांच्या नांवांवांच्या असख्य पुनराव्रुत्त्या झाल्या आहेत, पण "पाणिनी" या नांवाबाबत तसे झाल्याचे दिसुन येत नाही. पाणिनी हे गोत्रनाम असावे असे बौधायन म्हनतो. परंतु या नांवाचे गोत्रही अस्तित्वात नाही हे आपण "गोत्र-रन्तावली" या ग्रंथावरुनही स्पष्टपणे पाहु शकतो.

भट्टोजी दीक्षीतांनी दिलेली व्युत्पत्ती . "पणीचे पुरुषापत्य तो पाणिन व त्याचा नातु जो तो पाणिनी" अशी आहे. ही व्युत्पत्ती ग्राह्य धरायची तर "पणी" ही कोणी इतिहासप्रसिद्ध व्यक्ती असायला हवी, कि ज्यामुळे एक वंशनामच सुरु होईल...पण तसेही नाही.

मग पणी कोण ह प्रश्न उपस्थित होतो व पाणिनीचा काळ ठरवण्याआधी हे कोडे उलगडायला हवे असे मला वाटते.

आपल्याला "पणी" कोण हे शोधायला फार दुर जाण्याची खरे तर आवश्यकता नाही. पणी हे गोत्रनाम नसुन सिंधुकाळापासुन अस्तित्वात असलेल्या अवैदिक समाजसमुहाचे नाव होते. या समुहाला आर्येतर समुह मानले असुन हा समुह वैदिक समाजाचा अन्य असुरादि समुहांप्रमानेच शत्रु होता हे ऋग्वेदातील असंख्य ऋचांवरुन स्पष्ट होते. उदा.
"जही न्यत्त्रिणं पणिं हि ष: I-(. ६.५१.१४)
(खादाड, कंजुस व दुष्ट अशा पणींचा तुम्ही नाश करा.)

"परि त्रुंधि पणीनामारया ह्रुदया कवे I अथेमस्मभ्यं रंधय:I (. ६.५३.५)
(हे पुषा कवे, तु आपल्या आरीच्या टोकाने पणींची ह्रुदये टोचुन विंधुन काढ आणि अशा प्रकारे त्यांना तु आमच्या अधीन कर.)

वरील निर्देशांवरुन वैदिकजन पणींचा द्वेष करत होते, प्रखर शत्रुत्व पाळत होते हे स्पष्ट होते. ऋग्वेदातुनच मिलणा-या माहितीनुसार पणी हे व्यापारी व्रुत्तीचे होते. यास्काने आपल्या निरुक्तात "पणिर्वणिग्भवति" (पणी म्हणजे व्यापार करणारा...पणी म्हणजे वाणी अशी उकल केलेली आहे. "पण व वण" हे शब्द मुलात जलवाचक असल्याने त्यांचा सागरमार्गे व्यापार होत असे, असे अनुमान निघते. पणी हे बलाढ्य नगरांत रहात, ते धनाढ्य असुन विपुल पशुधन त्यांच्याकडे असे अशा अर्थाचे असंख्य उल्लेख पणींच्या संदर्भात मिळतात. ऋग्वेदात "पणी-सरमा"संवाद दहाव्या मंडलातील १०८व्या सुक्तात येतो. ऋग्वेद पणींना असुर संबोधले आहे. युरोपातील सागरी व्यापारातील बलाढ्य असा जो फोनिशियन समाज होता तो समाज भारतीय पणींचेच वंशज होत असेही मानण्यचा प्रघात आहे. पणी लोक लिंगपुजक होते हेही ऋग्वेदावरुन स्पष्ट दिसते असे डा. अ.स. आळतेकर यांचे स्पष्ट अनुमान आहे.

ऋग्वेदिक जन पुर्वी जरी पणींचा द्वेष करत असले तरी यद्न्य धर्माच्या अपकर्ष काळात त्यांना पणींकडुन दान घेण्याचीही वेळ आली होती. दानस्तुती सुक्तांत असे अनेक दाखले मिलतात. बुबु नांवाच्या गंगेकाठावरच्या उदारह्रुदयी पणीकुलाचा शिरोभागी असलेल्याने हजारो प्रकारची कल्याणकारी औदार्यव्रुत्ती दाखवली असे (६.४५.३१-३२) मद्धे आवर्जुन नमुदही केलेले आहे.

पणी वंशात जन्माला आला म्हणुन पाणिनी हीच व्युत्पत्ती वरील विवरणावरुन निघते आणि तीच स्वीकारार्ह अशी आहे कारण पाणिनी या नांवाची समाधानकारक व्युत्पत्ती देवु शकेल असा अन्य एकही पुरावा उपलब्ध नाही. म्हनजेच बौधायन म्हणतो त्याप्रमाणे पाणिनी हे गोत्रनाम नसुन वंश अथवा कुळनाम आहे. हे व्यक्तिनाम नाही. पणी लोक सिंधु नदीचे खोरे ते गंगेच्या खो-यापर्यंत पसरले होते हेही वरील पुराव्यांवरुन सिद्ध होते. पुढे हे देशभर पसरले असणे सहज शक्य आहे...कारण पणी लोक हे मुळचे व्यापारी व्रुत्तीचे लोक होते.
मग पाणिनीचे नांव काय?

पाणिनीला वाहीक, शालंकी, दाक्षीपुत्र व शालातुरीय अशा संद्न्या आहेत. या संद्न्यांत त्याचे कोठे व्यक्तिनाम सापडते काय हे आपण तपासुन पाहुयात.

वाहीक म्हणजे वाहीक (बाल्हीक) प्रदेशात राहणारा. वाहीक हा एके काळी गांधार प्रदेशाचा भाग होता. पाणिनी मुलचा त्या प्रदेशातील म्हणुन त्याला बाहीक म्हणने स्वाभाविक आहे, परंतु ते व्यक्तिनाम नाही.
दाक्षीपुत्र या संद्न्येवरुन पाणिनी दाक्षी/दक्षी या स्त्रीचा पुत्र असा अर्थ निघतो. यावरुन आपण पाणिनीच्या आईचे नांव दाक्षी होते असे म्हणु शकतो.

शालातुरीय म्हणजे शलातुर गांवचा निवासी. पाणिनी शलातुर येथे बराच काळ होता हे अष्टाध्यायीवरुनच स्पष्ट होते. पण यातुन व्यक्तिनामाचा बोध होत नाही.

मग शेवटचे उरते व ते म्हणजे "शालंकी".

या नांवाची व्युत्पत्ती लागत नाही असा विद्वानांचा निर्वाळा आहे. परंतु येथे हे लक्षात घ्यायला हवे कि भारतातील अनेक व्यक्तिनामांची व्युत्पत्ती साधता येत नाही. उदा. अत्री, गर्ग, वशिष्ठ, पुरु इ. व्यक्तिनामे ही प्राय: अर्थनिष्पादकच असतात असे नाही. पण तसे असले तरी शालंकी हा शब्द निरर्थक आहे असे मात्र म्हनता येत नाही.. "शाल+अंकि" म्हणजे शाल व्रुक्षांच्या सोबतीतील, वा शालांची गणना करणारा अशी या शब्दाची व्युत्पत्ती लागते. शालंकी शब्दाचे कठपुतळी...बाव्हले असेही अर्थ परिभाषाकोषत येतात.

शालंकी हे एके काळी व्यक्तीनाम म्हणुन प्रसिद्ध होते हेही खालील उदाहरणांवरुन स्पष्ट होईल...
शालंकी हे नंदीचे एक नांव आहे.
विश्वामित्राच्या १०० पुत्रंपैकी एकाचे नांव शालंकायन होते.
शालंकायनजा हे सत्यवतीचे एक नांव. तिच्या पित्याचे एक नांव शालंकायन असे होते.
शालंकायनी हा एक गोत्रप्रवर्तक ऋषीही मानला गेलेला आहे.
पाणिनीला "शालंकी" ही संद्न्या नसुन तेच त्याचे व्यक्तीनाम असावे असाच नि:श्कर्ष या विवेचनावरुन निघतो. गुजरातेतील सोळंकी घराणे या द्रुष्टीने पहायला हवे. व्यक्तिनामे कधी आडनांवे बनतात ही भारतीय परंपराही येथे लक्षात घ्यायला हवी.


(पाणिनीला दिलेल्या सर्व संद्न्या...ज्यांचा आपण वर विचार केला त्या कात्यायनाच्या वार्तिका व पतंजलीच्या महाभाष्यातील आहेत.)


आता आपल्याला पुढील भागात पाणिनीची कालनिश्चिती करायची आहे.





4 comments:

  1. तुम्हाला संस्कृत हा शब्द टाईप करता येऊ नये याचे आश्चर्य वाटले.

    ReplyDelete
    Replies
    1. आपणासही संपुर्ण लेखात "संस्क्रुत" हा शब्द कसा टंकित केला आहे एवढेच दिसले याचे मलाही आश्चर्य वाटले. मी जी संगणक प्रणाली वापरत आहे त्यात खुप संस्क्रुत शब्द टंकित होत नाहीत. अर्थाकडे लक्ष द्या...एवढेच काय ते मागणे. धन्यवाद.

      Delete
  2. अहो, वाचताना खूप ठेचा लागत आहेत. तुम्ही बराह का वापरत नाही. त्याची ९.० पर्यंतच्या आवृत्त्या फुकट आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. संस्कृत....आता जमेल असे वाटते. धन्यवाद.

      Delete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...