Sunday, December 8, 2019

शैक्षणिक मानसशास्त्र (1)



मुलाचे शिक्षण जन्माला आल्यापासून सुरु होते. भारतीय "गर्भसंस्कार"वाले ते मातेच्या उदरातच सुरु होते असे मानतात. खरे तर बालकाच्या जनुकांतच त्याच्या पितृ-मातृ परंपरेचे अंश विद्यमान असल्यामुळे "गर्भातही मुलावर संस्कार" करता येतात ही बाब अवैज्ञानिक झाली. गर्भाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मातेलाच आहार-विहारादि काळजी घ्यायला लावणे हा वेगळा व्यावहारिक पण महत्वाचा भाग झाला. पण गर्भात असतांना गर्भावर कसल्याही प्रकारचे संस्कार करता येत नाहीत.


पण चक्रव्यूह कसा भेदायचा हे ज्ञान अभिमन्युला गर्भातच बहेरचे बोलणे ऐकून झाले हे मानणे जेवढे अवैज्ञानिक तेवढेच गर्भसंस्कारात्मक संज्ञाही अवैज्ञानिक.

शैक्षणिक मानसशास्त्र हे नंतर येते, सर्वप्रथम येते ते जन्माला आल्यानंतर व्यावहारिक जगात प्रवेश केल्यानंतर विकसित होऊ लागलेले अपत्याचे मानसशास्त्र. किंबहुना काय शिकायचे आणि काय नाही, काय स्विकारायचे आणि काय त्यागायचे हे सारे त्याचे मानसशास्त्र जन्माला आल्यापासून ठरवू लागते. जसजशी त्याची वाढ होऊ लागते तसतसे भवतालाचे प्रभाव, संस्कार आणि दाखवली जाणारी स्वप्ने, कशाचा विरोध/तिरस्कार करायचा याबाबत होणारे परस्परविरोधी असले तरी उपदेशांचे मारे, येणारे अनुभव याच्या एकुणातील परिपाकातून शाळेत जायच्या आधीच मुला-मुलीचे विशिष्ट मानसशास्त्र तयार केले जात असते. या घडणीत शास्त्रशुद्धपणा असण्याचे कारण नाही.

याच वयात खरे तर आई-बाप आपली अपुरी स्वप्ने अपत्यावर लादण्याच्या प्रयत्नांत असतात. मुलगा व मुलगीने कसे वागावे याचेही भेदात्मक भाव याच वयात निर्माण केले जातात. याच वयात वर्चस्वतावादी अथव न्यूनगंडात्मक भावनांचा उदय निर्माण करायला हातभार लावला जातो. कोणात खेळायचे, कोणात नाही याच्याही सीमारेषा याच वयात निश्चित केल्या जातात.

याचाच अर्थ असा की शिक्षण सुरु व्हायच्या खूप आधीच शिक्षण सुरु झालेले असते. आई-बाप, नातेवाईक आणि वय काहीसे वाढते तेंव्हा भवतालचा समाज हे शिक्षण देत असतो. मुलाची मानसिकता जन्मल्या दिवसापासून घडवली जाते ती अशी.

शाळेत गेल्यानंतर या संस्कारात्मक मानसिकतेचा प्रभाव मुलांवर एवढा निर्माण झालेला असत कि त्यातून बाहेर पडणे अनेकांना नंतर अवघड जाते. अपत्यांचे आरोग्यदायी संगोपन हा विषय आजकाल महत्वाचा बनला असला तरी मुळात मुलाचे मानसशास्त्रीय संगोपन हा विषय जागतीक पातळीवरही आजही दुर्लक्षित राहिलेला आहे.

याची फळे भावी नागरिकांना आणि म्हणून समाजाला चाखावी लागतात. खरे तर शिक्षणात हाही एक विषय असलाच पाहिजे. पण ते अजुनही जागतीक समुदायाला सुचलेले नाही. किंबहुना हा विषय मानवी भावनात्मक-काव्यात्मक विषय बनवला जातो. आई-बाप हेच पहिले प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शिक्षक असले तरी त्यांनाच मुळात प्रशिक्षण नसल्याने ते अगदी वाईट शिक्षक बनून जातात. अपवाद क्वचितच असतात. जाणीवांचा सकारात्मक विस्तार कसा करावा हे आई-बापाला क्वचितच माहित असते. अनेक पुर्वग्रह, मग ते अंधश्रद्धात्मक असोत, लैंगिक जाणीवांबद्दल असोत कि सामाजिक भेदात्मक असोत, या पुर्वशालेय वयातच घट्ट बनवायचे प्रयत्न या विस्कळीत शिक्षणातून झालेले असतात आणि त्याचे अपरिहार्य बळी ठरते ते बालक.

पुर्वशालेय काळातच मुलांचे मानसशास्त्र पक्के व्हायला सुरुवात होते. यासाठी खरे तर शिक्षणातच हा विषय अंतर्भुत व्हायला हवा. पुर्वशालेय शिक्षण आणि मानसशास्त्र याचे अनेक पैलू आहेत. आपण त्यांचा विचार करत राहू.

1 comment:


  1. अतिशय उच्च दर्जाचा, विचार करण्यास प्रवृत्त करणारा लिहील्याबददल संजय सर आपले अभिनंदन. हाच इनोव्हेटिव्ह दृष्टीकोन आयुष्याला व भविष्याला मार्गदर्शक ठरेल. मी मी म्हणणाऱ्या विचारवंत, परिवर्तनवादी, बुध्दीजीवी व चळवळ कोठे अडकून पडले हेच त्यांना अजुनही कळत नाही. मुक्त विधायक सर्वंकष उर्ध्वगामी नाविण्याचे चिंतन हेच आपले वैशिष्टय आपल्या अनेक लेखांवरुन दिसून येते. प्रस्थापित सनातन व प्रस्थापित पण विखुरलेले पुरोगामी यांना धक्का /जागे करण्याची क्षमता आपल्या चिंतनात दिसून येते.

    ReplyDelete

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...