ब्राह्मण, ब्राह्मण्य आणि ब्राह्मण्यवाद हे आज चर्चेचे विषय झाले आहेत. या तीनही बाबी एकच आहेत म्हणुन त्या तिरस्करणीय आहेत असा आक्षेप अनेकदा नोंदवला जातो. ब्राह्मण्यवादाचा "संसर्ग" इतर जातीयांनाही होवु लागला आहे असेही म्हणण्यात येते. यावर ब्राह्णण समाजाचा आक्षेप आहे असे दिसते. ब्राह्मण्य हा जणु काही एक रोग आहे असा अर्थ त्यातुन निघतो, त्यामुळे काही ब्राह्मणही "मी ब्राह्मण आहे पण बाह्मण्यग्रस्त नाही" असे म्हणु लागतात. खरे तर ही एक विपरीत स्थिती आहे आणि त्यावर चर्चेची निकड आहे.
Friday, November 25, 2022
ब्राह्मण्य
वर्चस्ववादाचे साधन... भाषा!
सांस्कृतिक दहशतवादाची परंपरा
आपल्या जगाला नवीन नाही. भाषाही वर्चस्ववादाचे जगभरचे नेहमीच एक साधन राहिलेले
आहे. विशिष्ट भाषा श्रेष्ठ, अतिप्राचीन आणि शास्त्रीय असे दावे जगातील अनेक भाषा करत
आल्या आहेत. प्रसंगी असे वाद विकोपालाही जात असल्याचे आपण पाहतो. भारतात संस्कृत
भाषेने असे वर्चस्ववादाचे कार्य निरलसपणे केल्याचे आपल्याला दिसते. खरे तर संस्कृत
ही अर्वाचीन भाषा असून ती ग्रांथिक कारणांसाठी कृत्रीम रित्या बनवली गेली. पण तिला
साक्षात "देववाणी" चा अनादि दर्जा दिला गेला. वेद तर ईश्वराचे नि:श्वास
बनले. खरे तर वेदांची भाषा आणि संस्कृत ही एकच भाषा नव्हे. वैदिक भाषेत पाचशेच्या
वर द्राविडी, मुंडा व आस्ट्रिक शब्द व काही
व्याकरणाची रुपे आलेली आहेत. प्राकृत शब्दसंग्रह आणि व्याकरण याचा तर फार मोठा
प्रभाव आहे आणि त्याच वेळेस अवेस्त्याची भाषा, म्हणजे प्राचीन पर्शियनचाही एवढा
प्रभाव आढळतो कि वेदातील ऋचा थोडा ध्वनीबदल जरी केला तरी त्यांचे पर्शियन भाषेत
रुपांतर होऊ शकते. थोडक्यात वैदिक संस्कृत ही एक मिश्र अथवा संकरीत भाषा आहे.
भाषातज्ञ मायकेल विट्झेलसारखी विद्वान मंडली तर वेदांची भाषा प्राकृताचीच एक शाखा
असल्याचे मत हिरीरीने मांडत आहेत.
बरे ही जिवंत भाषा नव्हे. वैदिक
भाषा जुन्या काळातच संस्कत येणा-यांनाच अनाकलनीय झाल्याने ती समजावून सांगण्यासाठी
निरुक्त-निघंटुची निर्मिती झाली. संस्कृत व वैदिक या दोन्ही भाषांत प्रचंड फरक
आहे. अगदी वेदांतील काही वर्णही संस्कृतात नाहीत. संस्कृतचा पुरावा इस. १५० पेक्षा
मागे जात नाही. ही भाषा पुरातन नव्हे. तरीही हिरीरीने याबाबत प्रचार प्रसार करत
संस्कृतला "भारतीय संस्कृतीचा चेहरा" म्हणण्याच्या प्रथा चालु
झाल्या...त्या आजतागायत चालु आहेत.
वर्चस्वतावादासाठी जे जे संस्कृतात
पारंगत तेच काय ते विद्वान व प्राकृतात पुरातन काळापासून जनव्यवहार व
साहित्यव्यवहार करणारे ते हलके, दुय्यम अशी
विभागणी केली गेली. स्त्री-पुरुष भेदाचाही जन्म संस्कृत साहित्याने घातला. उदा.
सर्व संस्कृत म्हणवणा-या नाटकांतील स्त्रीपात्रे प्राकृतातुनच बोलतात...मग ती
स्वर्गीची उर्वशी असो कि एखादी महाराणी का असेना! संस्कृत संवाद फक्त कथित
उच्चभ्रु पुरुषांना! म्हणजे संस्कृत भाषेचा वापर समाज विभागण्यासाठी निरलसपणे केला
गेला. स्त्री-पुरुष भेदभावासाठीही तिचा वापर केला गेला.
संस्कृत भाषेने प्राकृत भाषकांच्या
मनात अखंडित न्युनगंड निर्माण करायचे अखंड कार्य केले. "संस्कृत देवांनी केली
मग प्राकृत काय चोरांपासून झाली?" असे एकनाथांनी दरडावून विचारले असले तरी त्याचा फारसा उपयोग झालेला
दिसत नाही. वैदिक मंडळीने संस्कृतचाही
उपयोग एका हत्याराप्रमाणे केला. प्राकृत भाषा संस्कृतोद्भवच आहेत असे एवढे बिंबवले
गेले आहे कि त्या भ्रमातून बाहेर निघणे आजही अनेकांना अवघड जाते. वास्तव हे आहे कि
संस्कृत ही प्राकृतोद्भव भाषा असून सनपुर्व ३०० ते सन १५० या काळातील तिच्या
प्राकृताची एक शाखा म्हणून विकसन झाल्याचे असंख्य शिलालेखीय व नाणकीय पुरावे
उपलब्ध आहेत. तिचा विकास अनेक स्थळी झाला व शेवटी पाणिनीने सन २५० मद्ध्ये तिला
व्याकरणात बांधले. अशी ही अर्वाचीन भाषा ग्रांथिक कारणासाठी निर्माण झाल्याने ती
जनभाषा कधीच नव्हती. संस्कृत मद्ध्ये साहित्य निर्मिती होत असतांना त्यावेळचे
पुरातन प्रेमी प्राकृतात साहित्यनिर्मिती करतच होते...महाकाव्ये लिहितच
होते...इतकी कि प्राकृत साहित्यसंपदा हजारोंच्या घरात भरते. ही परंपरा नवनवे बदल
स्विकारत अव्याहतपणे चालू राहिली आहे ती प्राकृतच्या प्रवाही व कालसुसंगत बदल
स्विकारत गेल्याने.
पण कालौघात शिस्तबद्ध प्रचार करत
संस्कृतला देववाणी म्हणवत-बिंबवत तिचे
माहात्म्य वाढवले...भाषिक वर्चस्वतावादासाठी (ती इतरांना शिकू न देता) तिचा निरलस
वापर केला. प्राकृतवाद्यांच्या मनात शिस्तबद्ध न्यूनगंड निर्माण केला गेला. जनसामान्याच्या
प्राकृत भाषा या संस्कृतोद्भवच आहेत असे धादांत असत्य समाजमनावर बिंबवले गेले. पण
एवढी श्रेष्ठ भाषा वापरातून नाहीशी कशी झाली याबाबत संगतवार अभ्यास कोणी केल्याचे
दिसत नाही. संस्कृतचा उपयोग फक्त भाषिक/ सांस्कृतिक संशोधकांपुरताच उरलेला आहे हे
एक वास्तव आहे. लोक जेवढा ल्यटीन, सुमेरियन, ग्रीक, इजिप्शियन, पाली या प्राचीन पण मृत भाषांचा अभ्यास याच कारणांसाठी करतात
तेवढाच संस्कृतचाही करतात. त्यापलीकडॆ संस्कृतचे स्थान नाही. खरे
तर विविध भाषांच्या संकराने संस्कृत निर्माण केली गेली. तिचा उद्देश ग्रांथिक
अचूकता साधने हा होता आणि त्या दृष्टीने ती नक्कीच श्रेष्ठ भाषा होती हे खरे असले
तरी ती भाषा सर्व भाषांची जननी आहे असा जो अशास्त्रीय आव निर्माण केला गेला तो
मात्र निश्चितच निन्दनीय आहे.
खरे तर भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे व मानवाच्या
त्याच आदिम प्रेरणांतून जगभरच्या भाषा निर्माण झालेल्या आहेत. कोणतीही भाषा
कोणत्या विशिष्ट स्थानावर निर्माण झाली आणि मग ती जगभर पसरली या मताला फारसे महत्व
देता येत नाही. पण भाषा देवांनी निर्माण केली व मानवाला शिकवली असे धर्मवादी
पुरातन काळापासून सांगत आलेले आहेत. पृथ्वीतलावर पहिले संभाषण आदम व इव्हने केले व
नोहाच्या नौकेच्या प्रवासाच्या अंतिम थांब्यानंतर टॉवर ओफ बाबेल येथे नौकेतुन
उतरतांना सर्व मानवांची भाषा एकच होती असे बायबल (जेनेसिस ११.१-९) मानते. पुढे
लोकसंख्या वाढली तरी माणसाने सर्व पृथ्वी व्यापण्याचा देवाचा आदेश मानला नाही.
त्यामुळे देवानेच हस्तक्षेप करुन भाषागट निर्माण केले व त्यानंतरच माणसाने पृथ्वी
व्यापायला सुरुवात केली. (इसाया ४५.१८) थोडक्यात या मानवी गटांनी मुळच्याच भाषेला
जगभर विविध रुपात नेले असा हा बायबलचा दावा. हे येथे विस्ताराने सांगायचे कारण
म्हणजे याच "एकस्थाननिर्मिती"च्या बायबली मिथ्थकथेचा पगडा आजही
पाश्चात्य भाषाशास्त्र ते भौतिकी शास्त्रावर आहे. पाश्चात्य भाषाविदांनी
इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांत जन्माला घातला त्यामागेही हीच वर्चस्वतावादी वृत्ती
होती. या सिद्धांतानुसार मध्य आशियातील स्वत:ला आर्य म्हणवणा-या लोकांनी आदिम संस्कृत
जन्माला घातली आणि हे लोक जसे भारतासह मध्य आशिया ते युरोपपर्यंत पसरले ही भाषाही त्यांनी
त्या त्या भागात प्रचलित केली. प्रत्येक भाषेच्या उत्पात्तेच्या अनेक मिथक कथा
जगभर आहेत. आपली भाषा देवाने निर्माण केली या मताचा पगडा जगभर आहे. पण जगातील
कोणतीही भाषा स्वतंत्र मात्र नाही, ती परस्पर विनिमयातूनच वर्धिष्णू राहिली आहे या
तथ्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.
खरे म्हणजे भाषेचा जन्मच मुळात कसा होतो याविषयी आजही मानवी
समाज अज्ञ आहे. त्या संदर्भात अनेक सिद्धांत मांडले गेले असले तरी त्यात अजून एकमत
नाही. जीवनव्यवहारातील गुंतागुंत आणि भाषेचे विकास हातात हात घालून चालतात याबाबत
मात्र एकवाक्यता आहे. जगातील सर्वच भाषा प्राचीन काळापासून परस्पर भाषांशी
देवाण-घेवाण करतच विकसनशील राहिल्या आहेत. जिवंत भाषा कालसापेक्ष बदलत राहतात.
कोणताही बदल न स्वीकारणा-या बंदिस्त भाषा मात्र कालौघात मृत होतात. संस्कृतचेही
तेच झाले आहे. प्राकृत भाषा मात्र
सातत्याने बदल रिचवत आजही वापरात आहेत कारण त्या प्रवाही राहिलेल्या आहेत. दैनंदिन
व मानसिक व्यवहारांना अभिव्यक्त करण्यासाठी भाषा असते. तिची उपयोगीता एवढीच आहे.
तिचा वापर वर्चस्वता वा श्रेष्ठतावाद निर्माण
करण्यासाठी करणे हा सांस्कृतिक दहशतवादाचा भाग आहे हे आपल्याला समजावून घ्यावे
लागेल.
-संजय सोनवणी
घोडे: व्यापार व युद्धाचे महत्वाचे साधन!
घोडे: व्यापार व युद्धाचे महत्वाचे साधन!
व्यापारी मार्गावरून बहुमूल्य आणि जीवनोपयोगी वस्तूंचा जसा व्यापार केला
जात असे तसाच प्राण्यांचाही व्यापार मोठ्या प्रमाणावर होई. प्राचीन काळात
सर्वप्रथम ज्या प्राण्याचा व्यापार सुरु झाला तो प्राणी म्हणजे घोडा. खरे तर या
प्राण्याच्या उत्पत्तीचा इतिहास किमान पाच कोटी वर्ष मागे जातो. त्याच्यात विविध
भागात क्रमविकास झाला तशाच अनेक जातींचे घोडेही नामशेष झाले. मानवाच्या रानटी अवस्थेत घोडे भक्ष्य म्हणून मारले जात असत. अजूनही
दुष्काळात काही देशांत ते खाण्यात येतात. घोड्याच्या कातड्यापासून तंबू, पेहेरावाचे कपडे, सरंजाम इ. करीत असत. पण पुढे घोड्याचे अन्यही उपयोग लक्षात आले. वेगवान सवारी,
मालवाहतुक, रथासारख्या वाहनांना वेगाने ओढून नेणे आणि त्याचा युद्धातील उपयोग
यामुळे हा प्राणी सर्वत्र लोकप्रिय झाला असला तरी त्याला माणसाळवले गेले ते मात्र
खूप उशीरा. तेही मध्य आशियात. कुत्रा, उंट व गाय मात्र त्याच्या खूप पूर्वीच मानवी
जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली होती.
मध्य आशियात स्टेपेसारख्या विशाल गवताळ प्रदेशामुळे तेथे जंगली
घोड्यांचे अस्तीत्व पुरातन काळापासून होते. मध्य आशियातील भटक्या पशुपालक
टोळ्यांनी त्याला प्रथम माणसाळवले असे उपलब्ध
पुरातत्वीय पुराव्यांवरून सिद्ध झाले आहे. घोडा हा लवकरच भटक्या पशुपालकांच्या
जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला. इतका कि अश्वांसहितची अनेक मानवी दफने मध्य आशियात
मिळून आलेली आहेत. त्याला धर्म व खाद्य जीवनातही तितकेच महत्वाचे स्थान मिळाले.
मध्य आशियातील अनुकूल हवामानामुळे व चा-याच्या उपलब्धतेमुळे घोड्यांची संख्याही
अवाढव्य होती. मध्य आशियातून व्यापारी मार्गावरून व्यापार करणा-या अन्य प्रदेशातील
व्यापा-यांच्याही लक्षात त्यांचे महत्व आले आणि त्यांनी घोड्यांचा वाहतुकीसाठी जसा
वापर सुरु केला रसा मोठ्या प्रमाणावर त्यांचा व्यापारही सुरु केला. विविध भागात
घोड्यांच्या पैदाशीही सुरु झाल्या. मानवाच्या उन्नतीशी त्याने लवकरच नाते जुळवले.
इसवी सनपूर्व १५०० पर्यंत घोडे पार सुमेरपर्यंत पोचल्याचे उल्लेख मिळतात. इतकेच
काय सनपूर्व १४०० मध्ये किक्कुली नावाच्या मित्तानी येथील
एका प्रशिक्षकाने घोड्यांच्या प्रशिक्षणासाठी एक पुस्तिकाच लिहिली.
भारतात मोठ्या प्रमाणावर घोड्यांची पैदास करण्यासाठी उपयुक्त हवामान
नसल्याने घोडे नेहमी आयात केले जात. स्थानिक प्रजातीही पुढे विकसित झाल्या असल्या
तरी खोरासान, मर्व व बुखारा येथून अफगाण व्यापा-यांकरवी आयात केलेले घोडे हाच
भारतीय सैन्य दळांचा मुख्य स्त्रोत राहिला.
भारतात घोड्यांचा प्रवेश मध्य आशियातून अफगाणिस्तान मार्गे आलेल्या
आर्य म्हणवून घेणा-या लोकांमुळे झाला असे साधारणपणे मानण्यात येते. ही घटना इसपू
बाराशे ते इसपू एक हजारच्या दरम्यानची आहे. भारतीयांना अश्वाचा परिचय झाला तो असा.
तत्पूर्वीच्या सिंधू संस्कृती काळात भारतात घोड्याचे अस्तित्व सापडून येत नाही.
सिंधू संस्कृतीचे लोक जरी मध्य आशिया ते सुदूर मेसोपोटेमिया पर्यंत व्यापार करत
असले व त्यांना अश्व माहित असला तरी भारतात तत्कालीन स्थितीत घोड्यांची पैदास
करण्यात सिंधू संस्कृतीच्या लोकांनी रस घेतला नाही. पण वैदिक लोक हे मुळचे मध्य
आशियातील असल्याने त्यांचे जीवन घोड्याभोवती फिरताना दिसते. अश्वांना उद्देशून
ऋग्वेदात अनेक सूक्ते आहेत. एवढेच काय “अश्वमेध” यद्न्याच्या रूपाने त्यांनी
त्याला आपल्या धार्मिक व खाद्य जीवनातही सामाविष्ट करून घेतले. वैदिक आर्य युद्ध प्रसंगी घोडे जुंपलेला रथ वापरीत. अश्वारोही व घोडदौडीला ऋग्वेदात ‘आजी’ हा शब्द
वापरला आहे. वैदिक लोक वायव्य भारतात प्रथम स्थायिक झाल्याने त्या भागातील भारताच्या वायव्य
सरहद्दीवरील कांभोज, केकय, गांधार, आरह सिंधुदेश, पारसीक या भागात घोड्यांची पैदास सुरु झाली व तेथील
घोडे उत्तम प्रतीचे मानले जात असत. कौटिल्यानेही आपल्या अर्थशास्त्रात या प्रदेशातील घोड्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले आहे. स्वात
खो-यातील दफनांच्या जनुकीय विश्लेषणातून त्या लोकांचे मध्य आशियाशी असलेले मुळचे
जैविक नाते स्पष्ट झालेले आहे.
पुढील काळात हत्तीदलाएवढेच महत्व अश्वदलाला आले. तरीही
भारतातील घोड्याची गरज आयातीद्वारेच भागवावी लागे. किंबहुना युरोपात व आफ्रीकेतही
घोड्यांचा प्रसार झाला तो पुरातन मार्गांवरील व्यापारामुळेच. मध्य आशिया हा
भारताचा प्रमुख अश्व-पुरवठादार बनला. व्यापा-यांचा त्यात लाभच होता. ते अश्वांच्या
मोबदल्यात येथून विविध प्रकारची वस्त्रे पुढील व्यापारासाठी घेऊन जात असत.
अफगाणिस्तानातील अश्व-व्यापारी बुखारा येथून घोडे घेऊन येत असत. बुखारा हे रेशीम
मार्गावरील अत्यंत महत्वाचे व्यापारी शहर तर होतेच पण घोड्यांच्या उत्पत्तीस्थानाला
लागुनच असल्याने घोड्यांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करणे सोपे जात असे. येथे चीन
ते युरोपपर्यंतचे व्यापारी घोडे खरेदी करत असत. या सर्व काळात सातत्याने युद्धे
होत असल्याने घोड्यांची गरजही सर्वत्र मोठ्या प्रमाणात भासत असल्याने घोड्यांचा
व्यापारही तेजीत असे. घोड्यांबरोबरच उंट, खेचरे, अशा ओझेवाहू प्राण्यांचाही व्यापार
केला जात असे.
तेराव्या शतकात घोड्यांच्या व्यापारात पूर्व
इराणमधील खोरासान प्रांतातील भटके लोकही सहभागी झाले. या भागातही घोड्यांची पैदास
मोठ्या प्रमाणावर होत असे. चेंगीझखानाच्या हल्ल्यांमुळे व्यापारावर अवकळा आली असली
तरी इराणमधील इल्खानीद घराण्याने रेशीम मार्गांचे पुनरुज्जीवन करण्याचा चंग
बांधला. खोरासानमधून काश्गरपासून येणारा व पुढे थेट इस्तंबूलपर्यंत जाणारा थेट रेशीम
मार्ग होता. येथूनच बुखारा, हेरात, काबुल, कंदाहार मार्गे थेट दिल्लीपर्यंत जाणारा
प्राचीन व्यापारी मार्ग होताच. हेरात हेही घोड्यांच्या पैदासीचे केंद्र म्हणून
तोवर उदयाला आलेले होते. किंबहुना घोडे-बाजार हा बरकत देणारा महत्वाचा व्यापार
बनला होता. वायव्य व उत्तर भारतात अफगाणी घोडेव्यापारी घोड्यांचे मोठे बाजार भरवत
असत अशा नोंदी मिळतात. अरबी घोड्यांचे महत्वही याच काळात वाढत गेले. गझनी व खिलजी घराण्यांनी
या व्यापारावर पूर्ण नियंत्रण आणून आपला आर्थिक स्त्रोत वाढवण्याचा प्रयत्न केला.
इस्लामी सत्ता भारतात कायम झाल्यानंतर खोरासान हेच घोड्यांचे मुख्य पुरवठादार
बनले. अल्लाउद्दिन खिलजीने तर घोडे व्यापा-यांसाठी विशेष हुकुमनामा जारी केला
होता. त्याच्या आदेशानुसार सर्व स्थानिक व बाहेरून येणा-या व्यापा-यांचे नाव-पत्ते
नोंदवणे सक्तीचे तर केलेच पण घोड्याचा दर्जा व किमती ठरवण्याचा अधिकारही शाही
चाकरांकडे गेला. यात जोही कोणी नियमभंग करेल त्याला शिक्षांचीही तरतूद केली.
यावरून घोड्यांचा व्यापार किती मोठ्या प्रमाणावर होत असेल आणि त्यात लबाडीही कशी
घुसली असेल याची कल्पना येते. सैन्यदले, खाजगी रक्षक आणि सामान्य नागरिकांची
मागणीही किती मोठ्या प्रमाणात वाढली असेल हेही लक्षात येते.
घोडे हे मोगल सैन्याचे बलस्थान होते. घोड्यांमुळेच
मोगल सत्ता विस्तारली असे काही इतिहासकार मानतात. त्यामुळे मुघलांनी अश्वबाजाराला
प्राथमिकता तर दिलीच पण घोड्यांच्या पैदाशीकडेही लक्ष पुरवले. खुश्कीच्या
मार्गासोबतच सुरत, खंबायतसारख्या बंदरावरूनही घोडे भरलेली जहाजे येत असत.
घोड्यांचे महत्व एवढे वाढले कि भारतातील परंपरागत हत्तीदल पार मागे फेकले गेले.
युद्ध ही व्यापारासाठी एक महत्वाची संधी असते हे
विधान घोड्यांचा जो व्यापार होत राहिला त्यावरून खरे वाटते. भारतात आधी घोडा आला
तोच “वैदिक” आर्यांमुळे. व्यापारी मार्गांवरून जी मानवी स्थलांतरेही झाली त्यातील
नोंदले गेलेले हे पहिले स्थलांतर. पुढेही मध्य आशियातून शक, हूण, कुशाण व मोगलांची
आक्रमणे झाली. या आक्रमणामध्ये घोड्यानी मोठी भूमिका अदा केल्याचे आपल्याला दिसते. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत तरी घोडे हे व्यापाराचे आणि युद्धांचेही
महत्वाचे साधन राहिलेले आहे.
-संजय सोनवणी
Sunday, November 20, 2022
सांस्कृतिक श्रेष्ठतावाद: विनाशास निमंत्रण!
आमच्या राष्ट्राची संस्कृती श्रेष्ठ आहे असा दावा जगातील सर्वच
राष्ट्रे करत असतात. राष्ट्रीयतेच्या भावनेला चेतवण्यासाठी हा असा भावनिक श्रेष्ठतावाद
नेहमीच उपयुक्त ठरलेला आहे. जगातील एकही राष्ट्र या श्रेष्ठतावादाला अपवाद नाही.
आमची संस्कृती श्रेष्ठ होती म्हणजे नेमके काय असा प्रश्न विचारला तर इतिहासातील
महापुरुषांचे,
साहित्याचे, महाकाव्ये व मिथ्थकथांच्या
पुराणतेचे दाखले सहज दिले जातात. थोडक्यात आमचीच संस्कृती सर्वांत अधिक
पुरातन आहे म्हणून ती श्रेष्ठ आहे असे ठसवायचा प्रयत्न होत असतो. राष्ट्रांतर्गत
शालेय शिक्षणापासून या श्रेष्ठतेचे, पुरातनतेचे ज्ञान (?) दिले जात असते. पुरातनता म्हणजे श्रेष्ठता असा दावा खरे
तर सांस्कृतीक परिप्रेक्षात टिकत नाही, तरीही श्रेष्ठतावाद जपण्यासाठी त्याची गरज असल्याने तो
निर्माण केला जातो. पण आजच काय, पुरातन काळीही कोणत्याही राजकीय भूभागाची संस्कृती
पूर्णतया स्वतंत्र व बाह्य प्रभावांपासून अलिप्त होती असे दिसत नाही. या
सांस्कृतिक श्रेष्ठतावादाने आजचेही अकादमिक क्षेत्रही ग्रासलेले असून त्यांच्या
लेखनावर त्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो त्यामुळे त्यांचे संशोधन निकोप आहे असे
म्हणता येण्यासारखी स्थिती नाही.
आधुनिक काळात आपल्याला
अठराव्या शतकात जन्माला घातल्या गेलेल्या आर्य सिद्धांताने माजवलेल्या
श्रेष्ठतावादाची सहज आठवण होते. या सिद्धांताने आधुनिक काळात वेगळाच संस्कृती
संघर्ष निर्माण केला. हा संघर्ष “वांशिक” पातळीवर पोचल्याने त्याची भयावहताही
वाढली. या सिद्द्धांनुसार ‘आर्य’ नामक इंडो-युरोपियन भाषा बोलणारा एक मानवगट उरल
पर्वताच्या प्रदेशात अथवा उत्तर धृवानिकट इसपू २५०० च्या आसपास उदयाला आला आणि
काही कारणांनी स्थलांतरित होऊन अन्यत्र विखरत टोळ्या-टोळ्यांनी युरोप ते भारतीय
उपखंडात पसरला. पुरा-संस्कृत भाषेचे जन्मदाते हेच ‘आर्य” असून ही भाषाही ते जेथे
जेथे गेले तेथे त्यांनी पसरवली. या टोळ्यांनी तेथील अडानी-आदिवासी अन्य वंशीय
लोकांना पराजित केले व त्यांना दास-दस्यू बनवले असे या सिद्धांतात मांडले गेले होते.
याच टोळ्यांनी पूर्व इराणमध्ये वेद व अवेस्ता तसेच ग्रीसमधील महाकाव्ये-मिथ्थकथा ते ल्यटिन भाषेला
जन्म दिला. या भाषा शेवटी पराजित स्थानिय लोकांना अपभ्रंश करून का होईना स्वीकाराव्या
लागल्या असे या सिद्धांतातून सांगितले जाते. आर्य हा यच्चयावत विश्वातील श्रेष्ठ
वंश असून अन्य वंश म्हणजे, सेमेटिक, द्राविडीयन, मंगोलाईड, ऑस्ट्रीक इ. हिणकस आहेत
हा सिद्धांत सोबतीने चालत गेला हे उघड आहे.
याला अर्थात पार्श्वभूमी होती ती युरोपमधील प्रबोधनयुगाने निर्माण
केलेल्या यंत्रयुगाची आणि सोबतच ज्ञानक्षेत्रात झालेल्या आधुनिक विस्फोटाची. त्यामुळे
युरोपियनांना आपण श्रेष्ठ असल्याचा साक्षात्कारही झाला आणि आपला इतिहास खूप मागे
खेचण्याची स्पर्धा लागली. युरोपियनांना
सेमेटिक वंश गटाशीची सांस्कृतीक मुळे तोडायची होती. जर्मनांना जर्मनांच्या
सांस्कृतीक एकीकरणासाठी "जर्मननेस" शोधायची गरज होती. डॆव्हीड
ह्युमसारख्या अठराव्या शतकातील श्रेष्ठ तत्वज्ञाने "गोरेतर सारेच हीण
आहेत" असे स्पष्ट प्रतिपादित केले. काहींची मजल तर काळे हे युरोपियन व
एप्सच्या संकरातून निर्माण झालेले निर्बुद्ध आहेत अशी मांडणी करण्यापर्यंत मजल
गाठली. यात सेमिटिक नाळ तोडण्याचे प्रयत्न सुरु होतेच. भारत हीच आर्यांची मुळभुमी
आहे असे मानण्याकडे या काळात कल होता. त्यासाठी व्होल्तेयरसारख्या तत्ववेत्त्याने
तर चक्क भारतीय ब्रह्म आणि अब्राहमात साधर्म्य शोधत बाप्पा अब्राहम हा भारतीय होता
अशी मांडणी केली. रेनान या फ्रेंच विद्वानाने येशु ख्रिस्त हा सेमिटिक नव्हे तर
"आर्य" होता असे प्रतिपादित केले. थोडक्यात एनकेनप्रकारेन युरोपातील
धर्म-संस्कृतीचे मुळ सेमिटिक नाही हे त्यांना सिद्ध करायचे होते. आर्य सिद्धांत
त्यासाठी आणला गेला आणि जगभर सांस्कृतिक-वांशिक संघर्षाने कळस गाठला.
“आर्य” सिद्धांताने हिटलरसारख्या क्रूरकर्म्याला जन्म दिल्याने आता ‘आर्य
हा वंश आहे.” हा सिद्धांत मागे पडला असला तरी हेच वांशिक तत्वज्ञान सध्या
"इंडो-युरोपियन भाषागट" या भाषिक सिद्धांतातून मांडले जात असते. त्यासाठी
अगदी जनुकीय शास्त्रही वेठीला धरून त्यातून सोयीस्कर अर्थ काढले जात असतात. शेवटी आपलीच
संस्कृती पुरातन व वर्चस्वशाली होती असेच अशा सिद्धांतनांतून ठसवायचे असते. या
सिद्धांताने युरोपचा इतिहास बराच मागे जात असल्याने तेथील विद्वानांनी यावर उड्या
मारणे स्वाभाविक होते. भारतीय हिंदुत्ववादीही स्वत:ला “वैदिक आर्यांचे वंशज” समजत वैदिक
संस्कृतीचा काळ जितका मागे नेता येईल तितका मागे नेत आर्य सिद्धांताला कोणत्या ना
कोणत्या प्रकारे चिकटुन राहतात. १९२० साली भारतात सिंधू संस्कृतीचे अवशेष
सापडल्यावर कथित आर्यांपेक्षाही प्रगत लोक आधीपासूनच भारतात राहत होते हे सिद्ध
झाल्यावर या संस्कृतीचे विध्वंसक ते निर्माते असे उलट-सुलट दावे आर्य सिद्धांत
समर्थकांनी सुरु केले हा तर श्रेष्ठतावादाचा गंड कोणत्या स्तरावर जाऊ शकतो याचे
विस्मयकारी उदाहरण. आता शास्त्राच्याच पायावर समस्त वंश सिद्धांत बाद झाला असला
तरी त्याची अभिव्यक्ती कोणत्या ना कोणत्या लेबलखाली जगभर सुरूच आहे. म्हणजे
सांस्कृतिक श्रेष्ठतावादाचा विस्तार हा जागतीक पातळीवर कसा पसरू शकतो आणि विध्वंसक
होतो याचे हे डोळ्यात अंजन घालणारे उदाहरण आहे आणि तरीही अजून लोकांचा
श्रेष्ठतागंडाचा हव्यास सुटत नाही हे मानवजातीचे दुर्दैव आहे.
संस्कृती म्हणजे नेमके काय? मानवी अभिव्यक्तीची
सुरुवात जेथून झाली तेथुन संस्कृतीचा जन्म झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
भाषा, धर्म, तत्वज्ञान, कायदे, शिल्पकला, चित्रे, काव्ये-महाकाव्ये, मिथ्थकथा, वास्तूकला, खाद्यकला, संगीत, नृत्य-नाटके, समाजरचना इत्यादिंतून
संस्कृतीचे प्रकटन होत असते. किंबहूना सर्व प्रकारच्या मानवी कृत्रीम
अभिव्यक्तींतून जे काही निर्माण होते त्याला संस्कृती म्हणतात. किंबहुना मनुष्य
स्वत:च्या सुखासाठी, सोयीसाठी जेही काही कृत्रीमपणे निर्माण करतो ती संस्कृती. आणि संस्कृती
ही स्थिर असते काय? त्याचे उत्तर स्पष्टपणे "नाही" असेच द्यावे लागेल.
संस्कृती ही प्रवाही असते. कालसापेक्ष चौकटींतुन तिचा प्रवाह पुढे पुढे जात राहतो.
परस्पर संपर्काने संस्कृतीही एकमेकावर प्रभाव टाकत असतात. अमुक शोध अमुकच भागात लागला होता कारण तेथील लोकच
बुद्धीमान होते असा काही समज असला तरी मग जगातील प्रत्येक भागात वेगवेगळे शोध
लागलेले आहेत आणि त्या दृष्टीने समस्त मानव समाजच बुद्धीमान आहे असा अर्थ मात्र
कोणी घेत नाही. भाषाही पुरातन काळापासून अशाच देवान-घेवाणीच्या पद्धतीने विकसित
झाल्या आहेत. जगात प्राचीन काळीही कोणतीही भाषा पूर्णतया स्वतंत्र आणि पहिलीच
म्हणता येईल अशी नव्हती हे इतिहासातूनच आपण पाहू शकतो.
परिवर्तन हा जसा निसर्गाचा नियम तसाच तो संस्कृतीचाही नियम आहे.
प्रत्येक संस्कृतीत आहे ती अथवा होती तीच संस्कृती श्रेष्ठ होती असे दावे करत आजही
तीच राबवायचा वा थोपवण्याचा प्रयत्न होत असतो. असे प्रयत्न धर्मनेत्यांकडून जसे
होतात तसेच राजसत्तांकडूनही होत असतात. पण जगण्याच्या, वस्त्र-प्रावरणाच्या,
धार्मिक प्रथा-परंपरांच्या, उत्सवांच्या, राजकीय-आर्थिक व्यवस्थेच्या पद्धतींत
इतिहासात इतकी परिवर्तने झालेली आहेत कि कोणत्या काळाची संस्कृती श्रेष्ठ होती आणि
ती नेमकी कशी होते हे सांगता येणे अशक्य व्हावे, भारतात केवळ दोन हजार
वर्षांपूर्वी पुजल्या जाणा-या अनेक देवता जशा धर्मजीवनातून बाद झाल्या आहेत तसेच अनेक
उत्सवही संपूर्ण विस्मरणात गेलेले आहेत. त्याचाही खेद न करता संस्कृतींचे
प्रवाहीपण स्वीकारत ती वर्धिष्णू कशी राहील हे पाहणे जागतिक नागरिकांचे कर्तव्य
आहे, श्रेष्ठत्वतावाद नेहमीच विनाशाला जन्म देतो हे लक्षात ठेवले पाहिजे.
-संजय सोनवणी
Saturday, November 19, 2022
श्रद्धा-आरुषी-नैना हत्याकांडे आणि समाजभान!
अलीकडेच दिल्ली येथे मुळच्या पालघर येथील सव्हीस वर्षीय श्रद्धा वालकर हत्या प्रकरण घडले. या प्रकरणातही क्रौर्याने परिसीमा गाठली. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाने गळा आवळून तिची हत्या केली आणि तिच्या देहाचे ३५ तुकडे केले. हे तुकडे करायला त्याला दहा तास लागले. मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी त्याने तीनशे लिटर क्षमतेचा एक फ्रीजही विकत घेतला आणि त्यात हे तुकडे ठेवले. पुढील तीन आठवडे रोज पहाटे तो रोज एक-दोन तुकडे काळ्या प्लास्टिकच्या थैलीत घालून महरौली, गुरूग्राम इ. जंगलामध्ये फेकून त्याची विल्हेवाट लावत होता. अगदी देहरादूनमध्येही त्याने काही तुकडे फेकले अशी माहिती मिळते. तिचे मस्तक मात्र त्याने फ्रीजमध्येच ठेवले होते आणि तो रोज तिचा चेहरा पाहत असे. खुनाची घटना घडली ती १८ मे २०२२ रोजी. म्हणजे तब्बल पाच महिने या घटनेचा कोणालाही तपास लागला नाही.
श्रद्धाच्या कुटुंबीयानी ती बेपत्ता असल्याची तक्रार माणिकनगर पोलीस स्टेशनला दिली होती. आफताबला चौकशीसाठी दोनदा बोलावन्यातही आले होते पण त्याने आपण आता एकत्र राहत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. पण शेवटी पोलिसांनी त्याच्यावरच तपास केंद्रित केला आणि शेवटी त्याने आपणच श्रद्धाचा खून केल्याचे कबुल केले. केस सबल करता यावी यासाठी पोलिसांनी नार्को टेस्टचे मागणी केलेली आहे.
या प्रकरणात रोज धक्कादायक माहिती उजेडात येत आहे. हे दोघे गेली चार वर्ष संपर्कात होते आणि हत्येआधी गेली दोन वर्ष लिव्ह-इन नात्यात राहत होते. आफताबने तिला विवाहाचे आमिष दाखवले होते असेही सांगण्यात येते. हा खून अत्यंत थंड डोक्याने करण्यात आला हे उघड आहे. या खुनामुळे लिव्ह-इन रिलेशनशिप मधील धोक्यांची चर्चाही जोरात सुरु झालेली आहे.
या हत्याकांडामुळे अमेरिकेतील जेफ्री दाह्मेर नामक सिरीयल किलरने केलेल्या निघृण हत्यांची व त्याने प्रेतांचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवून ते चक्क खाल्ल्याच्या प्रकरनही चर्चेत आले. या सिरीयल किलरने किमान १७ हत्या थंड रक्ताने, अगदी शौक असल्याप्रमाणे केल्या होत्या. त्याला पकडले गेले पण त्याला त्याच्याच एका सहकैद्याने तशाच थंड रक्ताने मारहाण करून ठार मारले. हा दैवगत न्याय झाला असला तरी दाह्मेर असा का वागला यावर मानसशास्त्रद्न्य त्याच्या बालपणातील घटनांपासून वेध घेत आहेत.
या प्रकरणामुळे भारतात मागे घडलेल्या अशा प्रकरणांचीही चर्चा सुरु होणे स्वाभाविक होते. 2008 मध्ये झालेली आरुषी-हेमराज या दुहेरी रहस्यमय हत्याकांडाने देशात खळबळ उडवली होती. या घटनेतील आरोपी कोण या प्रश्नाने सारेच चक्रावले होते. शेवटी आरुषीचे माता-पिता नुपूर आणि राजेश तलवार यांनीच ही हत्या केली असा सीबीआय न्यायालयाने निष्कर्ष काढून दोघा आरोपीना आजन्म कैदेची शिक्षा सुनावली. नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये संशयाचा लाभ देत दोघांना मुक्त केले. आजही आरुषी-हेमराज हत्याकांड हा रहस्यमय विषय राहिला आहे आणि त्यावर “तलवार” नावाचा चित्रपटही आला होता. आजही आरुषी आणि हेमराजचे खरे हत्यारे कोण हा प्रश्न सुटलेला आहे असे म्हणता येणार नाही. पण याही हत्याकांडात थंड रक्ताने हे खून केले होते हे स्पष्ट आहे.
यही प्रकरणाआधीचे अशाच कोल्ड ब्लडेड मर्डरचे उदाहरण म्हणजे नैना साहनी प्रकरण. १९९५ मध्ये दिल्लीमध्ये राहणा-या सुशील शर्मा नामक इसमाने आपली पत्नी नैना साहनीची गोळी मारून हत्या केली आणि प्रेताचे तुकडे करून तंदूर भट्टीत जाळून प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही निघृण हत्या सुशील शर्माने केली कारण म्हणे त्याचा पत्नीच्या...म्हणजे नैनाच्या चारित्र्यावर संशय होता. आरोपी पुढे पकडला गेला आणि त्याला आधी फाशीची शिक्षा झाली जी नंतर जन्मठेपेत बदलण्यात आली.
भारतात अशा निघृण आणि थंड रक्ताने केलेल्या हत्यांच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. वरील तीनही प्रकरणे पाहिली तर स्त्री-पुरुष संबंध आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या या प्रकरणामागे असल्या व त्यातून अनेक हत्या झाल्या असल्या तरी खुन्यांनी खून करताना व प्रेताची विल्हेवाट लावताना जे थंड-रक्ती वर्तन केले आहे त्यात समान धागा दिसून येतो. लिव्ह-इन रिलेशनशिप आधुनिक जगाची गरज आहे काय? ते नैतिक आहे काय? हा समाजशास्त्रीय प्रश्न असून त्याची वेगळी साधक-बाधक चर्चा होऊ शकते. न्यायालयाने आधुनिक समाजरचनेची आवश्यकता पाहून लिव्ह-इन ला कायदेशीर स्वरूप दिलेले आहे. श्रद्धा खून प्रकरण झाले म्हणजे लिव्ह-इन वाईटच असा निष्कर्ष काढता येणार नाही. कारण नैना साहनी प्रकरण तर विवाहबंधनाने जोडलेल्या पती-पत्नीत घडले होते. विवाह केला होता म्हणून नैना साहनीची हत्या थांबली नाही.
आरुषीची हत्या निर्विवादपणे कोणी केली हे जरी आजही एक रहस्यच बनून बसले असले तरी आरुषी-हेमराजमधील संबंधांचा राग येऊन कोणी निकटवर्तीयाने ती केली होती हा निष्कर्ष आपण काढू शकतो. श्रद्धा-आणि आफताब लिव्ह इन मध्ये राहत असले तरी त्यांची भांडणेही विकोपाला गेली होती असे काही साक्षीदार सांगतात. पण हे काही हत्या करण्याचे कारण होऊ शकत नाही. पण तरीही असे क्रौर्य वारंवार उफाळून येताना आपल्याला दिसते.
आंतरजातीय विवाह केला म्हणून ऑनर किलिंग होण्याचे प्रकार तर आपल्याकडे खूप आहेत. 2015मधील ठळक घटना म्हणजे कोल्हापुरात अत्यंत निर्दयपणे मारले गेलेले प्रेमविवाहित दांपत्य इंद्रजित कुलकर्णी व मेघा पाटील. दांपत्याची हत्याही दोघांचे गळे चिरून थंड रक्ताने निर्घृणपणे केली गेली. हत्या करणारे मेघाचे सख्खे भाऊ होते.
मुळात नातेसंबंधातच अलीकडच्या जागतिकीकरणाच्या काळात अंतराय आला आहे हे आपण पाहतो. लोक समाजाभिमुख न होता झपाट्याने व्यक्तिवादी व स्वकेंद्रित होत चालले आहेत. अगदी पती-पत्नी-मुले यांच्यातील सुसंवादही कोठेतरी थांबल्यासारखा झालेला आहे. तसे पाहिले तर प्रत्येकाच्या आत एक अंधारी कोपरा असतो. तो हिंसक असतो,...तो विकृत असतो. कोणाचा कमी कोणाचा जास्त. शक्यतो लोक तो दिसू न देण्यासाठी सभ्यतेचे बुरखे घालतात. सामाजिक असण्याचा फायदा हा कि मनुष्य जरातरी दुस-यांबद्दल सोशिक होतो आणि कृत्रिम का होईना पण सौजन्याने वागतो. पण कधीतरी अशी वेळ येतेच कि त्यांचा कालांधार उजेडावर मात करायला धावून येतो. यालाच आदिम रानटी अवशेष आपल्यात शेष आहेत याचे पुरावे म्हणता येतात. आणि आजच्या स्थितीत विस्कळीत मानसिकतेच्या लोकांमधील सैतान जागे होण्याचा अपार संधी आहेत. त्या प्रत्यक्ष कृत्यातच बदलतात असे नाही. पण मग अन्य मार्गाने का होईना त्याची अभिव्यक्ती सुरु असतेच. अशा स्थितीत काही स्त्री-पुरुष कोणत्या ना कोणत्या उद्रेकी स्थितीत आपल्यावरील सारे सुसंस्कृतपणाचे ओढलेले मुखवटे ओरबाडून क्रूर होतात. मग अशा क्रूर घटना घडतात. आपणच सारे मिळून सामाजिक वातावरणच नितळ कसे बनवता येईल हे पाहिले पाहिजे.
-संजय सोनवणी
गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी
ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
महार कोण होते? महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे त...