Wednesday, June 5, 2013

परकीय सत्तांची नाणी आणि त्यांवरील भाषा


नाण्यांवर राजनामाक्षरे उठविण्याची पद्धत ग्रीकांमुळे भारतियांना माहित झाली. ब्यक्ट्रियन राजांनी इसपू १८५ च्या दरम्यान ग्रीक अक्षरांकीत नाण्यांबरोबरच काही खरोष्टी लिपीतील प्राकृत भाषांत राजनाम असलेली नाणी पाडायला सुरुवात केली. आधीची दोन नाणी आपण आपण गेल्या लेखात पाहिलेली आहेत. इसपू १७४ पासुन पहिल्या अपोलोडोटसने मात्र सर्रास द्वैभाषिक नाणी पाडायला सुरुवात केली. येथे पुन्हा लक्षात घ्यायचा मुद्दा असा आहे कि नाण्यांवरील भाषा ही शिष्टभाषा असते. बोलीभाषांना नाण्यांवर कोणीही स्थान देत नाही. उदा. ब्यक्ट्रिया हा ग्रीसपासून दूर असला, स्थानिक भाषा ही पुर्व इराणी असली तरी त्यांनी नाण्यांवरील आपली ग्रीक भाषा कायम ठेवलेली आहे. त्यामुळे दुस-या प्रांतांसाठी नाणी पाडतांना ग्रीक भाषा तर कायम ठेवलेलीच दिसते पण सिंध व पंजाब प्रांतातील तत्कालीन शिष्ट भाषेला, म्हणजेच प्राकृताला स्थान दिलेले दिसते. पश्चिमोत्तर भारतात खरोष्ठी लिपी प्रचलित असल्याने साहजिकच अशोकाच्या कळापासुनचे या भागातील लेख हे खरोष्ठी लिपीत व प्राकृत भाषेत आहेत.

अपोलोडोटसच्या नाण्यांवर   "महाराजासा अपालदातसा त्रतरसा" असा मजकूर उमटविण्यात आला आहे. मात्र धर्मप्रतीके सर्वस्वी ग्रीक आहेत.
मिन्यंडर आपल्याला प्रसिद्ध "मिलिंदपन्ह" या ग्रंथामुळे माहित आहे. भिक्खु नागसेन आणि राजा मिलिंद (मिन्यंडर यांच्यातील प्रश्नोत्तरात्मक असा हा ग्रंथ आहे. मिन्यंडरच्या नाण्यांवरुन मात्र त्याने धर्म बदलला असे दिसत नाही. ग्रीक धर्मप्रतीके त्याने कायम ठेवलेली दिसतात. त्याच्या नाण्यांवर ग्रीक व प्राकृत भाषांतील मजकूर खरोष्ठी लिपीत आहे. तसेच प्राकृत मजकूर "मिलिंद" या भारतियीकरणाशी सहमत नाही. त्याच्या नाण्यांवर "महाराजसा त्रतरसा मेनांम्द्रसा" असा मजकूर खरोष्ठी लिपीत उमटविलेला आहे.

 

(मिन्यंडरचे नाणे)

शक नाणी

यानंतर इसवी पुर्व पहिल्या शतकात पश्चिमोत्तर भारतावर शकांची सत्ता स्थापन झाली. शक हे मध्य आशियातुन भारतात टोळ्यांनी घुसले. ब्यक्ट्रियनांशी (ग्रीकांशी) त्यांचे सर्रास रक्तसंबंध होत. ग्रीक धर्माचा प्रभाव त्यांच्यावर होता जो नाण्यावरील प्रतिमांतुन ठळकपणे सामोरा येतो. मौस (मोगा) हा त्यांचा भारतातील पहिला राजा. त्याची नाणी सापडली असून काही नाणी फक्त ग्रीक भाषेत आहेत तर काही द्वैभाषिक आहेत. या नाण्यांवरील प्राकृत मजकूर (लिपी खरोष्ठी) "राजतिराजसा महातसा मोआसा" असा आहे.शक राजा अझेस (दुसरा) याच्या नाण्यांवरील प्राकृत मजकूर "महाराजसा राजराजसा महातसा अयसा" असा आहे. पदव्यांमधील शब्दबदल लक्षणीय असून  त्यावर आपण नंतर सविस्तर चर्चा करु.

कुशाण नाणी

भारतात कुशाणांची राजवट इसपू २० पासून जम बसवायला लागली असली तरी त्यांची सुरुवातीची नाणी ही सर्वस्वी ग्रीक भाषेत होती. कुशाणांवर पारशी धर्माचा प्रभाव होता हे त्यांच्या नाण्यांवरुन स्पष्ट दिसते. असे असले तरी कनिष्काच्या कालापासून शिवप्रतिमा तसेच बौद्ध प्रतिमाही नाण्यांवर दिसू लागतात. परंतु त्याच वेळीस त्याने पाडलेल्या अन्य नाण्यांचीच संख्या अधिक असल्याने त्याने झोरोस्त्ररियन धर्म बदलुन आधी शैव आणि नंतर बौद्ध धर्म स्वीकारला हे स्पष्टपणे म्हणता येत नाही. तसेच कुशाणांनी जरी लिपी ग्रीक वापरली असली तरी भाषा स्वत:चीच ठेवल्याचेही दिसते. द्वैभाषिक नाण्यांवर त्यांनी (सुरुवातीच्या काळात) प्राक्रुत भाषा व खरोष्ठी लिपीचा वापर केलेला दिसतो.   कुशांणांचा जसजसा साम्राज्यविस्तार होत गेला तसतशा त्यांच्या राजधान्याही बदलत गेलेल्या दिसतात. मथुरा, तक्षशिला, पेशावर व बेरगाम अशा त्या राजधान्या होत.

कजुल क्यडिफियसच्या नाण्यांवरील (पहिल्या शतकाचा पुर्वार्ध) प्राकृत मजकूर असा आहे..."कुजुला कसासा कुशान यवगुसासा ध्रमथिदासा" तर अन्य नाण्यावरील मजकूर आहे महाराजसा खुशाणसा यवुगासा खुशाण कटिसा"या नाण्यावरील प्राकृत मजकूर आहे, "खुशाणसा यवुसा कुयुला कफसा सचा ध्रमतिदासा"

यानंतर विम क्यडिफियस सत्तेवर आला. त्याच्या नाण्यांवर त्याचे स्वत:ची प्रतिमा, पारशी धर्मप्रतीके एक बाजुला तर दुस-या बाजुला शिवप्रतिमा असून काही एक भाषी आहेत तर काही द्वैभाषिक. द्वैभाषिक नाण्यांवरील मजकूर असा आहे...

"महाराजासा राजादिराजसा सर्वलोगा ईश्वरासा महिश्वरासा विम क्यथेफिसासा त्रतरा."
या नाण्यावर एका बाजुला विम क्यडिफियसची प्रतिमा असून दुस-या बाजुला नंदीसोबत उभा असलेला शिव आहे. त्याच्या एका हातात त्रिशुळ असून दुस-या हातावरुन मृगाजिन ओघळत आहे. विम क्यडिफियसने शिवप्रतिमा असलेली असंख्य नाणी पाडली आहेत, पण तेवढ्यामुळे त्याला शैव ठरवणे धाडसाचे ठरेल. कारण त्याच्य नाण्यांवर पारशी तसेच हेलिओ सारख्या ग्रीकदेवतंच्याही प्रतिमा दिसतात. शासनाच्या सोयीसाठी, प्रजेला आपुलकी वातावी यासाठी त्याने (व नंतरच्याही कुशाणराजांनी) शैवधर्म हा जनधर्म असल्याने शिवप्रतिमांना आणि नंतर शिवाच्या बरोबरीने बुद्धप्रतिमांनाही स्थान दिले हे उघड आहे.

ब्यक्ट्रियन राजांनी जरी आपल्याच धर्मप्रतिमा आपल्या नाण्यांवर मिरवल्या असल्या (आणि जे अत्यंत स्वाभाविक आहे) त्यांनी अस्तित्वात असलेल्या शिष्टभाषेला, म्हणजेच प्राकृताला नाण्यांवर स्थान दिले. उत्तर व पश्चिमोत्तर भारतात प्राकृत (स्थानभिन्नतांनी किंचित फरक असलेली) भाषाच आपल्या नाण्यांवर वापरली हे आपण ब्यक्ट्रियन नाणी ते कुशाण नाणी या पाचशे वर्षांतील प्रवासात पाहू शकतो. राजांच्या बिरुदावल्याही कशा बदलत गेल्या हेही आपण पाहू शकतो. प्राकृताचा हा असाच प्रवास प्राकृतातून संस्कृताची शाखा पुढे कशी विकसीत झाली हे आपण पुढील प्रकरणांतून पाहणार आहोत.

(क्रमश:)  

2 comments:

  1. Sir, apratim lekh aahe.....

    ReplyDelete
  2. फारंच महत्वाचा लेख. आपल्या या लेखावरून निदान त्या काळात तरी संस्कृत भाषा अस्तित्वात नव्हती हे दिसून येते, कारण आपण वर्णन केलेल्या कोणत्याच नाण्यावर संस्कृत भाषा दिसत नाही.

    ReplyDelete