Saturday, June 8, 2013

संस्कृतचा उदयकाल मागे का नेला गेला?इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांत सर्वप्रथम मांडला तो फ्रांझ बोप्प या जर्मनाने. (१७९१) तत्पुर्वी विल्यम जोन्स या इंग्रज भाषाविदाने संस्कृत व अन्य युरोपियन भाषांतील साम्य दर्शवली होती. बोप्प पासून फ्रेडरिक शुगेल ते म्यक्समुल्लर या सर्वांनी इंडो-युरोपियन भाषामूळ सिद्धांताला विकसीत केले...हे सर्व जर्मनच होते हा योगायोग नाही.

या सिद्धांतप्रक्रियेत सुरुवातीला ब्रिटिश (अथवा अन्य युरोपियन) अभावानेच होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या सिद्धांतावर उडी घेतली ती भारतीय विद्वानांनी. टिळक हे त्यातील अग्रणी होत. या सिद्धांतामुळे आपण केवढा गंभीर अनर्थ करीत आहोत याची जाण म्यक्समुल्लरला खूप लवकर आली व त्याने आपला "आर्य-वंश" सिद्धांत मागे घेतला...पण एतद्देशिय विद्वान मात्र त्या सिद्धांतालाच चिकटुन बसले.

पुढे आर्य वंश सिद्धांत सर्व पुराव्यांनिशी खोडला गेला असला तरी इंडो-युरोपियन भाषा गटाचे खूळ मात्र कायम राहिले. यातुनच आर्य भारतात आले नाहीत पण भारतातुन युरोपात निर्गमित झाले असाही सिद्धांत पुढे आला. हे किंवा ते सिद्ध केल्याशिवाय इंडो-युरोपियन भाषागटमूळ सिद्धांत सिद्ध होत नाही हे उघड होते.

ग्रीक-ल्यटीन व अन्य युरोपियन व मध्य आशियायी भाषा व वैदिक संस्कृत भाषेतील शब्द व काही प्रमाणातील व्याकरण साधर्म्य हे अलेक्झांडर काळापासून आहे, त्यापेक्षा पुरातन नाही हे सिद्ध करायला अगणित भौतिक पुरावे असतांनाही केवळ जर्मानिक वंशाभिमान व त्याची पुरातनता सिद्ध करण्यासाठी वैदिक संस्कृताची भाषा पुरातन ठरवण्याचा घाट रचला गेला.

एवढेच नव्हे तर त्यासाठी अवेस्त्याचा काळही (जो इसपू सहावे शतक असा सर्वमान्य होता) मागे नेण्याचा घाट घातला गेला. कारण तसे केले नाही तर "पुरातनता" बाधित होत होती. संस्कृतापासून प्राकृत हा येथील विद्वानांचा ग्रह युरोपियन अभ्यासकांनीही जपल्याने आणि संस्कृत-प्राकृत व्याकरण हे भिन्न का आहे याचा मुलभूत विचार न केल्याने ज्या संस्कृत व्याकरणाच्या अवस्थेला काही प्रमाणात त्यांचेच (आणि अवेस्त्याचेही) व्याकरण कारणीभूत होते तिकडे दुर्लक्ष केले गेले.

 तसे करणे सर्वांनाच सोयिस्कर होते. त्यासाठी वेदांची हजारो वर्षांची मुखोद्गतता (Oral Tradition) अवैज्ञानिक असली तरी स्वीकारली गेली. अवेस्ता मात्र वेदांच्या खुप शतके आधीच लिप्यांकित झाला होता या वास्तवाकडेही दुर्लक्ष केले गेले.

वैदिक धर्माला पुन्हा राजकीय पतलावर आणनारा पूष्यमित्र शुंग यानेही आपल्या राजकारभारात संस्कृतचा कसलाही वापर केला नाही (कारण ही भाषाच अस्तित्वात नव्हती) तर मग जे त्याने अश्वमेध यज्ञ केले ते कोणत्या भाषेतल्या वेदातून हा प्रश्न विद्वानांना पडला नाही, कारण वैदिक संस्कृत पुरातन काळापासून अस्तित्वात होतीच हे गृहितक. भले त्य गृहितकाला एकही पुरावा उपलब्ध नाही. सातवाहनांनी नाणेघाट शिलालेखात वैदिक यज्ञांचे वर्णन संस्कृतात न करता प्राकृतात का केले असावे हा प्रश्न हालाच्या "गाथा सप्तशती"चे संपादक स. आ. जोगळेकर यांनाही पडलेला आहे हेही येथे लक्षात घ्यायला हवे.

नाण्यांवरील "यण" सातकर्णी हा "यज्ञ" सातकर्णी होय हे कोणत्या भाषाशास्त्रीय पुराव्यावर सिद्ध होते हेही या विद्वानांनी स्पष्ट केले नाही.

तत्सम, तद्भव आणि देश्य या संज्ञांची उकल अशी आहे:

तत्सम: प्राकृतातील जे शब्द जसेच्या तसे संस्कृतात घेतले गेले ते तत्सम.
तद्भव: प्राकृतातील जे शब्द (भिक्खू) सौम्याकित वा मृदूल अथवा विभिन्न प्राकृतांतील वेगळ्या उच्चारणांचे एकीकरणत्व साधण्यासाठी (भिक्षू) परिवर्तीत केले गेलेले शब्द.
देश्य: ज्या प्राकृत शब्दांचे संस्कृतीकरण करत त्यांना संस्कृत व्याकरणात बसवता येणे असंभाव्य असनारे शब्द.

थोडक्यात संस्कृत शब्दांचे प्राकृत रुपांतरण झालेले नसून प्राकृत शब्दांचे रुपांतरण झालेले आहे हे स्पष्ट आहे. एवढेच नव्हे तर ल्यटीन, ग्रीक, ब्यक्ट्रियन, अवेस्तन या भाषांतील (राज्यकर्ते तिकडचे असल्याने) शब्द व व्याकरणाचेही काही अंश वैदिक व नंतर पुढे पाणिनिय व्याकरणात घुसले असल्याचे आपल्याला पहायला मिळते.

थोडक्यात, जे मी या प्रदिर्घ लेखमालेत सिद्ध करणार आहे त्याचा हा सारांश. याला छेद देणारा भौतिक पुरावा असल्यास अवश्य कळवावे. चर्चेचे स्वागत आहे.

(क्रमश:) 

3 comments:

  1. धन्यवाद सर, खूप मोलाची माहिती दिल्याबद्दल, तुमच्या लेखमालेची वाट पाहत आहोत....!

    ReplyDelete
  2. धन्यवाद सर, खूप मोलाची माहिती दिल्याबद्दल.....

    ReplyDelete