Wednesday, June 5, 2013

नक्षलवादाचे समर्थक हे देशशत्रू होत!


नक्षलवादाबद्द्ल मी या स्तंभात दोनेक महिन्यांपुर्वी लिहिले होते. नक्षलवादी हे देशशत्रू असल्याने त्यांचा बिमोड करायचा तर लष्करी कारवाईला पर्याय नाही अशी स्पष्टपणे म्हटले होते. अलीकडेच छत्तीसगढमद्धे नक्षल्यांनी केलेल्या भिषण हल्ल्यानंतर सरकारला आणि समाजालाही काही प्रमाणात जाग आली व या विषयावर व्यापक चर्चा सुरू झाली. असे असले तरी या प्रकरणाची दुसरी भयानक बाजू म्हणजे नक्षलवादाचे छुपे व उघड समर्थकही या निमित्ताने उजेडात येवू लागले. हे समर्थक सामान्य नसून विचारवंत, समाजसेवक आणि राजकीय नेतेही आहेत ही त्यातील सर्वात गंभीर बाजू आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या विरोधातील कठोर कारवाईला सरकारला अनेक अवरोधांचा सामना करावा लागेल असे दिसते!

डा. प्रकाश आंबेडकरांनी कबीर कला मंचाच्या शितल साठे व सचिन माळी या संशयित नक्षलवाद्यांच्या शरणागती सोहळ्यात त्यांच्या बाजुने सहभाग घेतला होता. फुले-आंबेडकरी विद्रोही चळवळीत काम करणारे नक्षलवादी कसे असू शकतील या प्रश्नामुळे   लोकांची सहानुभुतीही उभयतांच्या बाजुने होती. प्रत्यक्षात ते दोघेही अन्य अनेकांबरोबर नक्षलवादी गोटात वावरणारे होते असे पुरावे पुढे येवू लागताच अनेकांची बोलती बंद झाली. त्यानंतर ही छत्तीसगढमधील भिषण घटना घडली. वाहिन्यांवर व वृत्तपत्रांत या विषयावरील चर्चेला उधान आले. अरुंधती रायसारख्या बुकर विजेत्या, पण स्फोटक वक्तव्ये करुन प्रसिद्धीच्या झोतात रहायची सवय लागलेल्या लेखिकेने नक्षलवाद्यांचे वर्णन "बंदुका हाती घेतलेले गांधीवादी" असे केले. प्रकाश आंबेडकरांनी तर त्यावर कळस चढवला. "बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत:च घटना निरर्थक व फाडुन टाकायच्या लायकीची आहे असे म्हटले होते...घराणेशाही आल्यामुळे लोकशाही अस्तित्वात राहिलेली नाही...मतपेट्या निरर्थक झाल्या आहेत..." अशा आशयाचे स्फोटक विधान एका वाहिनीवरील चर्चेत केले. या चर्चेत माझाही सहभाग होता. नक्षलवादावर तोफ डागल्याने ही मंडळी अस्वस्थ झाली.  प्रकाश आंबेडकरांचे मेव्हणे श्री. मिलिंद तेलतुंबडे हे महाराष्ट्रातील माओवादी (नक्षलवादी) समन्वय समितीचा म्होरक्या असून सध्या फरार आह हेही वास्तव लक्षात ठेवावे लागणार आहे. मेधा पाटकरांनी याच चर्चेत जरी नक्षलवाद्यांच्या हिंसेचे समर्थन केले नसले तरी नक्षलवादी चळवळीला मात्र पुरती सहानुभूती दाखवली. मध्यंतरी एका वृत्तपत्राने "आंबेडकरी चळवळ नक्षलवादाच्या वाटेवर" असल्याच्या बातम्या छापल्या होत्या. मराठवाड्यातील तरुण वर्ग, जो पुर्वी एकमेकांना "जयभीम" असे अभिवादन करत असे तो आता एकमेकांना "लाल सलाम" घालू लागल्याच्याही वार्ता येत आहेत. पुणे शहरात नक्षलवाद्यांनी तळ ठोकला असल्याचे विधान केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच केले आहे. एकुणातच नक्षलवादी चळवळीला विचारवंतांचे आणि काही जनसामान्यांचे जे समर्थन मिळु लागलेले दिसते त्याची कारणे शोधणे क्रमप्राप्त आहे.

नक्षलवादी चळवळीबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ही चळवळ शोषितांची असून त्यांना क्रांती घडवून सत्ताबदल घडवायचा आहे हा होय. नक्षलवादी हे तत्वनिष्ठ-ध्येयनिष्ठ तरुणांचा विद्रोह असून त्यांना समतेचे राज्य प्रस्थापित करायचे आहे. भारतात आदिवासींचे अतोनात शोषण झाले असल्याने त्यांच्या हक्कासाठी लढणारे नक्षलवादी हे हिरो आहेत असा एक समज तरुणांचा करवून दिला गेला आहे. प्रत्यक्षातील स्थिती वेगळी आहे जी लोकांसमोर आणली जात नाही. नक्षल्यांनी केलेल्या हत्याकांडांत सर्वाधिक बळी आदिवासींचेच पडलेले आहेत! आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी शासनाने ज्या योजना आखलेल्या आहेत त्या लाभार्थींपर्यंत पोहोचू न देण्यात नक्षल्यांचाच दहशतवादी हात आहे. दुर्गम भागात रस्ते, शाळा, इस्पितळे, जी खरे तर आदिवासींच्याच हिताची आहेत ती, बांधायलाही विरोध आहे. खरे तर नागरिकांचा आर्थिक विकास हाच माओवाद्यांना मान्य नाही. आदिवासींचा विकास व्हायचा तर उद्योगधंद्यांची वाढ अपरिहार्य आहे. पण औद्योगिकरण म्हणजे "वर्गशत्रू भांडवलदारी" अशी साम्यवादाची मांडणी असल्याने औद्योगिकरणाला त्यांचा विरोध आहे. त्याचवेळीस आदिवासी भाग तसेच अन्यत्रही औद्योगिकरणास असंख्य स्वयंसेवी संस्था सातत्याने विरोध करत असतात व विकासात खिळ घालत असतात हेही एक वास्तव आहे..

येथे हा प्रश्न पडतो कि विकास हवाय पण उद्योग नकोत...हे कसे शक्य आहे? माओवाद्यांकडे अथवा या स्वयंसेवी संस्था अथवा तथाकथित विचारवंत असलेल्या नक्षलसमर्थकांकडे यासाठी नेमकी कोणती पर्यायी व्यवस्था आहे? त्यांची उत्तरे खूप सोपी पण उथळ असतात. "साधनसंपत्तीचे फेरवाटप" हाच त्यांना समतेचा व जनकल्याणाचा मार्ग वाटतो. पण साधनसंपत्तीचे फेरवाट्प म्हनजे काय याची नीटशी व्याख्या त्यांना करता येत नाही. साम्यवादी पद्धतीने जगात जेथेजेथे असे प्रयोग केले गेले ते साफ कोसळले हे त्यांना माहित नसते कि काय? सोव्हिएट रशियाचे पतन नेमके का झाले? खुद्द चीनने राज्यव्यवस्था साम्यवादी (माओवादी) ठेवत अर्थव्यवस्था मात्र भांडवलशाहीवादी ठेवलेली आहे हे सत्य त्यांना माहित असुनही फसलेले प्रयोग येथे करू पाहण्याचा अथवा अशा मागण्या करून उथळ पुरोगामी म्हणुन मिरवण्याचा त्यांचा  इरादा नेमका काय आहे?

आणि नक्षलवाद्यांच्या सुरात सुर मिसळत डा. बाबासाहेबांचे एक प्रसंगोपात्त विधान आधाराला घेत घटनेलाच (व लोकशाहीलाच) आव्हान देण्याचे प्रकाश आंबेडकरांचे काय कारण आहे? नक्षलवाद्यांचा भारतीय लोकशाहीवर व म्हणुणच घटनेवर विश्वास नाही हे स्पष्ट आहे. "मतपेटी नव्हे-बंदूक" ही त्यांची घोषणा प्रसिद्धच आहे. जबाबदार नेते व विचारवंत स्वत:च घटनेवर अविश्वास व्यक्त करत नक्षलवाद्यांना समर्थन पुरवत असतील तर आपण भविष्यासाठी अराजकाचा एक गंभीर धोका निर्माण करीत आहोत याचे भान सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे.

मार्क्सवाद आणि बाबासाहेब यांची सांगड घालण्याचा प्रयत्न गेली अनेक दशके सुरू आहे. आनंद तेलतुंबडे सध्या त्यात आघाडीवर दिसतात. बाबासाहेबांनी आयुष्यभर जातीआधारीत विषमता आणि अस्पृष्यतेविरोधात संघर्ष केला हे जगजाहीर आहे व आज संपुर्ण नसली तरी घटनेच्या माध्यमातून समतेचा गाडा ब-यापैकी पुढे आलेला आहे. आज विषमतेचे जे वास्तव आहे त्याला भारतातील झपाट्याने संरंजामशाहीवादी होत चाललेली राजकीय व्यवस्था ही मूख्य कारण आहे. ही व्यवस्था कोसळवण्याचे सामर्थ्य मतपेटीतच अधिक आहे. पण त्यासाठी जनतेलाच जेवढे प्रबुद्ध केले जायला हवे ते केले जात नाही. स्वत: बुद्धीवादीच कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या/गोटांच्या आहारी जात संधीसाधू झाले असल्याने त्यांना असे प्रबोधन करणे अडचनीचे वाटते. "बंदुका उचला आणि गोळ्या घालत सत्ता व समाजव्यवस्था उलथवा" हे म्हणणे वरकरणी सोपे व रोमांचकारी वाटत असले, तरुणांना भडकवायला सोपे ठरत असले तरी हा मार्ग देशद्रोहाचा, सर्वसमाजविघातक आहे कारण यातून कोणाचाही विकास होऊ शकत नाही हे वास्तव समजावून घेणे आवश्यक आहे. उदारमतवादी समाजवादाचे बाबासाहेब समर्थक होते, मार्क्सवादाशी त्याचा काहीएक संबंध नाही एवढे बाबासाहेबांच्या लिखानातून स्वयंस्पष्ट असतांना त्यांच्या विचारांना मार्क्सवादाशी जोडणे किती विघातक आहे याचे भान या विचारवंतांना येत नाही हे दुर्दैव आहे. मार्क्सवाद हा मुळात अनैसर्गिक, मानवी प्रेरणांशी विसंगत व हिंसेला आपल्या तत्वज्ञानाच्या प्रचार-प्रसाराचे साधन मानणारा "मानवशत्रू वाद" आहे हे आपल्याला नीट समजावून घेतले पाहिजे. भारताला गांधीवाद आणि आंबेडकरवाद हे पर्यायी मानवतासापेक्ष वाद आपल्याच भुमीत जन्मले असतांना त्यांचीच पाठराखन करत पुढे जाण्याऐवजी भारतीय जनमानसाशी विपरीत अशा वादांना थारा देणे हे कसे विघातक आहे हे आपण अगदी जागतिकीकरनाच्या परिप्रेक्ष्यातही पाहू शकतो.

आज जर तरुणांत माओवादाची ओढ निर्माण होत असेल, "जय भीम"ची जागा "लाल सलाम" घेत असेल तर त्याला जागतिकीकरणामुळे शहर व खेडी यांत पडत चाललेली व रोज रुंदावणारी दरी  कारणीभूत आहे याबद्दल शंका असण्याचे कारणच नाही. ग्रामीण भारताच्या स्वयंपुर्ण विकासासाठी जी अर्थनीति आवश्यक आहे तिचा आपल्याला पुरता अभाव दिसतो. त्यामुळे आपल्या साधनसंपत्तीचा आपल्या अर्थव्यवस्थेतच जो निभाव लागायला हवा तो न लागता त्याची उधळपट्टी होते आहे जी दीर्घकाळात आपल्यालाच हानीकारक ठरणार आहे. त्याचवेळीस तरुण पिढ्यांतच व्यवसायधंद्यांबाबतचे जे औदासिन्य आहे तेही या दुरवस्थेला कारण ठरत आहे. स्रूजनात्मक मानसिकतेचा अभाव असल्याने, तशी शिक्षणपद्धती आणि समाजभावनाही नसल्याने, रोज बेरोजगारांच्या झुंडीच वाढत आहेत. या हातांनी काम मागणे एवढेच कार्य होते आहे...काम देणारे हात पैदा होत नाहीत. बंदुकीची भाषा ही नेहमीच नाकर्त्यांची भाषा असते. व्यवस्थेतील दोष हे सर्वस्वी शासनामुळे निर्माण झालेत असे म्हणने एकतर्फी ठरेल...त्याला आपण जर सारेच जबाबदार असू तर ते दोष आपल्यालाच दूर करावे लागतील. त्यासाठी लोकशाही मार्गानेच सरकारवर दबाव आनावे लागतील. पण सर्वात आधी चिचारवंतांनी व समाजनेत्यांनीही आपले डोके ठिकाणावर ठेवले पाहिजे. आपण कळत-नकळत कशाचे समर्थन करत आहोत व त्याची भविष्यातील फळे काय असनार आहेत याची जाण ठेवली पाहिजे.

तसे प्रयत्न न करता, तसे तत्वज्ञान सातत्याने न मांडता व कृतीत न आणता नक्षलवादाचे आंधळे समर्थन जेही करतील त्यांना मी देशशत्रुच मानतो. देशातील प्रत्येक व्यक्तीचा, समाजघटकाचा विकास व्हायलाच हवा याबाबत शंका असण्याचे कारणच नाही. पण त्याच वेळीस व्यक्तीने आणि राजकीय व्यवस्थेनेही आपल्यात योग्य ते बदल घडवून आनले पाहिजेत!
(क्रमश:)

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

2 comments:

  1. मार्क्सवाद सगळीकडून संपला पण भारतात काही स्वयंघोषित हुशार मंडळी आहेत जी त्याला कवटाळून बसली आहेत. ह्यांच्या दृष्टीने पैसे मिळवणे हे पाप आहे. दुसऱ्याचे भले झालेले ह्यांना बघवत नाही. मग काय उपाय तर त्यांना खाली खेचा. कायम एकच भूमिका की कारखानदार कामगारांचे शोषण करतात. त्यांच्याकडून पैसे काढून गरिबांना द्या. थोडक्यात सगळ्यांनी गरीब व्हा. गेली ६५ वर्ष भारतात ह्याच विचारांचा पगडा आहे. त्याने फार काही झाले नाही. गेल्या २० वर्षात जरा बरे झाले पण गेल्या ९ वर्षात मनमोहन आणि सोनिया द्वयीने फार धूळधाण केली आहे. मुळात संपत्ती तयार कशी करायची ह्यावर हे लोक काहीच बोलत नाहीत. कारण तसा विचारच केला नाहीये आणि पटले तरी एकदा एखादा वाद स्वीकारला आणि तो फोल आहे हे कळले तर माणूस ते मान्य करायला तयार होत नाही. तसेच आहे. आपण गंडलो हे कोणी सांगत नाही. मग काय तर आपल्याच विचारसरणीला घट्ट चिकटून बसायचे आणि अजून अजून मागे जावून जास्त जहाल विचार भिनावायाचे. पण मुळात लोकांना काम मिळेल ह्यासाठी ह्यांचे प्रयत्न काय हे आता विचारायची वेळ अलि आहे. ह्या रशिया आणि चीन मध्ये ह्या मार्क्सवादने धुमाकूळ घातला आणि त्यांनीच आता त्याला पूर्ण बाजूला सोडले हे ह्यांना अजून दिसत नाही. हे नक्षलवादी आता खंडणीखोर झालेले आहेत. अगदी बरोबर लिहिले आहे तुम्ही.

    ReplyDelete
  2. हळू हळू का होईना, माझे म्हणणे मान्य होत आहे.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...