Thursday, June 27, 2013

वैदिक भाषेचा इतिहास! (भाग १)

नाण्यांवरील भाषा निवडीत असतांना शासक शिष्ट व राजभाषेचाच वापर करत असतात. आपण इसपु साडेतिनशे ते इ.स. चे दुसरे शतक या काळातील (कनिष्कासहित) लिप्यांकित नाण्यांवरील भाषा पाहिल्या आहेत. ग्रीक, गांधारी ते प्राकृत भाषा विपुलपणे वापरल्या गेल;या असल्याचे आपल्याला स्पष्ट दिसते. प्रत्येक विभागातील (व काळातील) प्राकृत भाषांत वैविध्य असल्याचेही आपण पाहिले आहे. या प्रकरणात आपण पश्चिमोत्तर भारतातील नाण्यांवर नजर टाकणार आहोत. याच भागात वेदांची निर्मिती झाली अशे मान्यता असल्याने या भागांतील भाषा नेमक्या काय होत्या व त्याही संस्कृताच्या दिशेने कशा वाटचाल करू लागल्या हे पाहणेही आपल्याला आवश्यक आहे.

जी भाषा आधीच अस्तित्वात असते, शिष्ट भाषा म्हणुन मान्यता पावलेली असते तिच्यातच कालानुरुप विकास होत जात असतो...म्हणजेच ती अधिकाधिक संस्कारित होऊ लागते. त्याउलटचा प्रवास होत नसतो. वैदिक भाषा ही किमान सनपूर्व १५०० वर्ष जुनी आहे व तीच पाणिनोत्तर कालात अभिजात संस्कृत म्हणुन ओळखली जावू लागली हे विद्वत्मत आहे. परंतू प्रत्यक्ष पुरावे मात्र त्याविरोधात जातात हे स्पष्ट करण्यासाठी आपण प्रत्यक्ष उपलब्ध असलेली, विविध राजवटींची आणि वेगवेगळ्या काळातील नाणी येथे अभ्यासत आहोत हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपल्याल कोनत्याही नाण्यावर येथवर तरी वैदिक भाषा अथवा पाणिनियन भाषेचे रुप आढललेले नाही. पाणिनी अथवा वैदिक भाषा जर अस्तित्वात असती, शिष्ट भाषा (लोकबोली नव्हेत) म्हणुन मान्य असती तर इसपू ३५० ते सन २०० या काळात कोठेतरी त्या भाषेचे रुप आढळले असते. एवढेच नव्हे तर पूष्यमित्र शृंग, जो वदिक धर्माश्रयी होता, त्या घराण्याच्या काळात तरी किमान वैदिक सम्स्कृतचे अस्तित्व दिसायला हवे होते पण तसेही ते दिसत नाही हे आपण शृंगांवरील स्वतंत्र लेखात पाहिले आहे. त्यच्याच वंधकालात हेलिओडोरस याने विदिशा येथे जो गरूडस्तंभ उभारला त्यावरील भाषा ही प्राकृतच होती हे मी या लेखात स्पष्ट केले आहेच. असो.

इसपू १५० च्या आसपास मध्य आशियातुन प्रथम गांधार व नंतर काश्मिर ते तक्षशिला भागात मौएस (Maues) या सिथियन राजाने राज्यविस्तार केला. येथुनच भारतात शक (सिथियन) लोकांच्या सत्ता स्थापित होऊ लागल्या. मौएस राजाने जी नाणी जारी केली तीही द्वैभाषिक होती. ग्रीक आणि प्राकृत भाषा त्याने वापरल्या. प्राकृत भाषा खरोष्ठी लिपीत लिहिलेली असे. एका बाजुला ग्रीक देवता झियस तर दुस-या बाजुला पंख असलेल्या नाइके या ग्रीक देवतेचे छाप आहेत. प्राकृत मजकुर असा आहे: "राजतिराजसा मोआसा" किंवा "राजतिराजसा महातसा मोआसा".
येथे लक्षात घ्यायची बाब अशी कि तत्पुर्वीच्या याच भागातील अन्य घराण्यांच्या नाण्यांवर "राजने" असे संबोधन वापरले जात असे. त्याच्यातच पुढे झालेली सुधारणा म्हनजे "राजतिराजसा" होय. राजा हा शब्द विविध भागांत राज्नो, रणो वगैरे स्वरुपांतही वापरला गेला आहे.

यानंतरच्या इसपु ५० च्या शक राजा स्पालाहोरस (Spalahores) च्या नाण्यांवर संबोधन अधिक प्रगत झालेले दिसते.
 
हा वोनोनेसचा बंधु होता. त्याच्याही नाण्यांवर झेउसच्या प्रतिमा असून खरोष्टीतील मजकूर आहे..."महाराजाभ्राता ध्रमिकासा स्पालोहोरासा". येथे आपल्याला संबोधनाची प्रागतिक अवस्थ दिसते, जी आधीच्या नाण्यांत दिसून येत नाही, असे असले तरी भाषा मात्र प्राकृत आहे. ध्रमिकासा हा शब्द येथे धार्मिक या अर्थाने आला आहे. मागधीतील धम्म तक्षशिलेच्या प्रदेशात ध्रम असा उच्चारिला जात होता. याच शब्दांची प्रागतिक आणि प्रमाणित अवस्था म्हनजे धर्म होय.

तसेच राजने, राजतिराजसा, राजादिराजसा या नाण्यांवरील राजसंबोधनाचा प्रवास पुढे संस्कृतात राजाधिराज असा झाला आहे हेही आपल्या सहज लक्षात येइल. प्रादेशिक उच्चारपद्धत्या कशा बदलतात हे आपल्याला गांधारी भाषा आणि सिंधी प्राकृत भाषेवरूनही लक्षात येते. नोंदविल्यानुसार प्रांतात सापडलेल्या इसपु ३५० च्या नाण्यांवर प्राकृतातील "नेगम" हा शब्द गांधारी भाषेत लिहितांना "नेकम" असा होतो. गांधार या शब्दाचेच गांधारी रुप "कंदाहार" असे होते. या उच्चारबदलाबाबत आपण पुढे सविस्तर चर्चा करणार असल्याने येथे एवढे पुरे. परंतू  कालौघात भाषिक रुपे कशी बदलत गेली एवढे येथे लक्षात घेतले तरी पुरे.

कोणत्याही भाषेचा प्रवास हा मागुन पुढे असा जात असतो. तो पुढे जाऊन मागे आणि मुलस्थानी येत पुन्हा पुढे त्याच दिशेने जात नसतो. ऋग्वेदाचा भुगोल हा दक्षीण अफगाणिस्तान आहे. याच भागात किमान पाचशे वर्ष ऋग्वेदरचना सुरु होती असाही विद्वानांचा कयास आहे. ऋग्वैदिक भाषा ही ऋचारचनेसाठी वाकवली (बदलवली) असे गृहित धरले तरी ती भाषा प्रादेशिक असनार हे उघड आहे. कोणत्याही प्रदेशात एकाच वेळीस एकाच भाषेशी निगडित अशा बोलीभाषा अस्तित्वात असतात (महाराष्ट्रात जशी व-हाडी, खानदेशी, कोकणी बोली आहे तसे) तसेच ऋग्वैदिक भुगोलात असनार हेही उघड आहे. किंबहुना ते वास्तव आजही आहे. परंतू ऋग्वैदिक भाषेचे अस्तित्व वा त्याचे प्रागतिक स्वरुप याच भागातील कोणत्याही नाण्यावर अथवा शिलालेखातही दिसून येत नाही. कोणत्याही नाण्यावर वैदिक प्रतीकेही नाहीत हे आपण इसपू सातव्या शतकापासुनच्या चिन्हांकित नाण्यांतही पाहिले आहे.

किमान बुद्धकाळापर्यंत तरी वैदिक सम्स्कृती उत्तरेतच नव्हे तर देशभर पसरलेली होती व प्रभावी होती असा आपला एक सर्वसामान्य समज आहे व त्याला विदेशी ते भारतीय प्राच्यविद्या तज्ञांनी बळच दिलेले आहे. आपण त्यांचे म्हनणे सत्य आहे असे गृहित धरले तर मग अनेक प्रश्न उपस्थित होतात. सम्राट अशोक बौद्ध धर्मीय होता म्हणुन त्याने संस्कृतला राजाश्रय न देता प्राकृतालाच दिले हा तर्क क्षणभर खरा मानला तरी त्याचे सर्वच लेख प्रमाणित पालीत नसून प्रदेशनिहाय प्राकृतात आहेत. गांधार भाषेतही त्याचे लेख आहेत. दक्षीणेकडील त्याचे लेखही तिकडील स्थानिक प्राकृतांत आहेत. तरीही मी अशोकाचे शिलालेख चर्चेत न घेता ज्या सत्ता बौद्ध धर्माच्या कक्षेबाहेरील होत्या त्यांचाच विचार प्रामुख्याने येथवर केला आहे. (अद्याप सातवाहन व पश्चिमी क्षत्रप आपण विचारात घेतलेले नाहीत.) त्यात पंजाबातील यौधेय गणांची नाणी (सन ५० नंतर) सोडली तर थोडाफार संस्कृत म्हणता येईल असा एकही नाणकीय लेख मिळत नाही. यौधेय नाण्यांवर शिवपुत्र मानल्या गेलेल्या स्कंदाच्या प्रतिमा आहेत हेही येथे नोंदवून ठेवतो. कुशाणकालात मात्र मिश्र संस्कृत (शब्दांचे सुलभीकरण...व्याकरण मात्र प्राकृत) भाषेतील लेखन येवू लागते. हे लेखन बुद्धिस्ट आहे.  एकही वैदिक धार्मिक अथवा व्यावहारिक लेख  अथवा लेखन या काळात आढळुन येत नाही. इसपु ३५० ते इ.स. १५० पर्यंतची ही अवस्था आहे. या पाचशे वर्षांच्या प्रदिर्घ काळात ऋग्वैदिक भाषा अथवा पाणिनीय संस्कृत जर कोठेही भौतिक पुराव्यांनी दिसून येत नसेल तर आजवरच्या दाव्यांवर गांभिर्याने विचार करावा लागणार आहे.

मिश्र संस्कृताची सुरुवात होते ती पहिल्या शतकाच्या पुर्वर्धात. तिचे संस्कृत व्याकरणीय रुप बदलतांना दिसते ते दुस-या शतकात (रुद्रदामनचा शिलालेख, सन १५०.) प्रगत संस्कृतचे खरे पुरावे मिळू लागतात ते गुप्तकालानंतर...इ.स. चवथ्या शतकापासून.

याचा सरळ अर्थ असा होतो कि इसपुच्या पहिल्या शतकापासून प्राकृतात जे बदल घडतांना दिसतात ते क्रमश: संस्कृत भाषाशाखेला जन्म देणारे ठरले. हे परिवर्तन एकदिश झालेले नाही तर एक भाषाशाखा म्हणुन झाले. कारण प्राकृत भाषा एकदिश प्रवास करत आजच्या ठिकानाला आलेल्या आहेतच. वेळोवेळी प्राकृताची स्वतंत्र व्याकरणे येत राहिलेली आहेतच. कच्छायन हा आद्य प्राकृताचा व्याकरनकार आहे हे मी येथे सिद्ध करुन दाखवलेच आहे. त्यामुळे प्राकृताचे संस्कृत बनले हे म्हनणेही सरसकट विधान होईल. प्राकृताचीच एक शाखा म्हनजे संस्कृत असेच विधान अधिक संयुक्तिक राहील.

आता जे गंभीर प्रश्न उभे राहतात त्यावर विचार करने आवश्यक आहे.

पहिला प्रश्न म्हणजे ऋग्वेद (आणि अन्य वेद व त्याचे ब्राह्मणादि उपांगे आहेत) आज ज्या भाषेत आहे ती भाषा स्वतंत्र होती काय? आणि होती तर ती एवढ्या प्रदिर्घ काळात कोठे लुप्त झाली होती? आणि समजा काही कारणांनी एखादी भाषा प्रदिर्घकाळ लुप्त झाली असेल तर ती सरळ सरळ पुनर्वापरात न येता उत्क्रांतीच्या अवस्थेतुन का प्रकट झाली?

ऋग्वेदाचा काळ हा किमान सनपुर्व १५०० वर्ष हा मानला जातो. अनेक विद्वान हाच काळ सनपुर्व अडिच हजार ते पाच हजार वर्ष एवढा खेचत असतात. ऋग्वेदाचा मानीव काळ हा येथे आपल्या चर्चेचा विषय नाही. अगदी अलीकडचा, म्हणजे इसपु १५०० वर्ष हा काळ जरी गृहित धरला तरी समस्या त्याच राहतात. त्या कशा या आपण आता येथे पाहू:

१. इंडो-युरोपियन भाषा बोलणारा "आर्य" समूह इराणमार्गे भारता टोळ्याटोळ्याने उतरला व सिंधु खो-यातील स्थानिकांना पराजित करुन येथे स्थिर झाला. सुदास वंशाच्या कालात ऋग्वेदरचना सुरु झाली व ती पुढे पाचशे वर्ष चालली. या आर्यजनांनी त्या परिसरातील मुळ रहिवाशांना (द्रविडांना) दक्षीणेकडे सरकायला भाग पाडले व देशभर आपल्या आर्य संस्कृतीचा प्रचार केला....या सिंधु संस्कृतीचे अवशेष सापडेपर्यंतच्या मान्य कल्पना होत्या. यातुन निघणारे नि:ष्कर्ष व समस्या:

अ. याचा अर्थ ऋग्वैदिक भाषा ही अत्यंत स्वतंत्र आणि आयात झालेली होती व ती आर्यांसोबत येथे प्रवेशली होती. असे असेल तर ऋग्वैदिक भाषा मुळात होती तशीच होती हे मान्य करायला विशेष हरकत असायचे कारण नाही.

ब. आक्रमक आर्यांनी एतद्देशियांना पराजित करुन सत्ता स्थापन केल्या आणि वैदिक संस्कृती प्रसार केला हे मत मान्य केले म्हणजे राजभाषा ही आक्रमकांची बनली व ती सावकाश का होईना लोकांचीही बनली हेही मान्य व्हायला हरकत नाही. समजा तसेही नसेल, तर मग म्हणजे राजसत्तांनी आपली भाषा न लादता जनभाषा तशाच राहु देत आपला राजकारभार चालवला. भाषांची कालौघात देवाण-घेवाण होते तेवढी झाली. ऋग्वेदात असंख्य द्राविड, मुंड, कोल ई.भाषांतील शब्द येतात ते यामुळेच. हाही तर्क आपण खरा धरून चालु.

पण...

वैदिक धर्मसत्ता पुढे जैन-बौद्ध धर्मामुळे बोथट झाली व प्रादेशिक जनभाषांनी उचल खाल्ली म्हणुन संस्कृत भाषा जनव्यवहारातून (अथवा राजव्यवहारातून) बाहेर पडली हा जो पुढचा तर्क दिला जातो ही मात्र फार मोठी समस्या आहे.  याचे कारण म्हणजे मुळात अशोकाचे राज्य स्थापित होईपर्यंत बौद्ध धर्म हा राजधर्म बनलेलच नव्हता. संपुर्ण समाज अथवा समस्त वैदिक ब्राह्मण/क्षत्रीय/वैश्य (ज्यांना वैदिक भाषा व वेदांचा अधिकार होता व प्रशिक्षण होते) ते बौद्ध झाले व वैदिक भाषेचा त्याग केला याचे एकही उदाहरण नाही. समजा तसे जरी झाले असते तरी त्यांनी बौद्ध धर्म आपल्या भाषेत तेंव्हाच (इसपू पाचशे ते साडेतिनशे या काळात) काही प्रमाणात का होईना नेला असता. पण प्रत्यक्षात चित्र असे आहे कि ज्याला संस्कृत म्हणता येईल अशा भाषेत दुस-या शतकात बुद्धचरित येईपर्यंत संस्कृतचे नामोनिशान दिसत नाही. बौद्धांनी जाणीवपुर्वक संस्कृत टाळायचीच होती तर ते बुद्ध निर्वाणानंतर सातशे वर्षांनी संस्कृत अंगिकारते झाले हे म्हणने बौद्धांवर अन्याय करनारे आहे.

दुसरी समस्या यातुनच निर्माण होते ती अशी कि या सातशे वर्षाच्या काळात बौद्ध धर्मिय सोडुन अनेक जानपदे, छोटी राज्ये, ते निगम अस्तित्वात असतांना एकही राजा/जानपद/निगम वैदिकाश्रयी नव्हते कि काय? (जैन धर्मिय साहित्याला व राजसत्तांनाही हाच नियम व अनुक्रम लागु पडतो हेही येथे नोंदवून ठेवतो.) बरे, डा. अजय मित्र शास्त्री जोशी, वा. वि. मिराशींसारखे संशोधक तर सातवाहन हे वैदिकाभिमानी ब्राह्मण होते असे सिद्ध करतात, मग सन २२० पर्यंत त्यांचेही लेख संस्कृतात का नाहीत?

आपण पाहिले कि परसत्तांनी जरी आपल्या नाण्यांवर येथील प्राकृताला स्थान दिले असले तरी आपली ग्रीक/गांधारी भाषांना सोडले नाही. आपल्या दैवतप्रतिमांना, येथील शिव, पार्वती, बुद्धाला स्थान देत असतांनाही त्यागले नाही. मग येथील आजचे विद्वान ज्या सत्तांना वैदिक सत्ता म्हणुन सांगतात ते संस्कृताभिमानी नव्हते कि काय?

मग एकाएकी चवथ्या शतकापासून संस्कृत (अगदी वैदिक भाषाही) एवढ्या महत्पदाला कशी पोहोचली? तेथेवर ही भाषा (इसपु पहिले शतक ते चवथे शतक) उत्क्रांतीचे स्वरुप का दाखवते? एक भाषा त्यागली दुसरी स्वीकारली असे दिसत नसून एकाच भाषेतून सावकाश उत्क्रांती झालेली जर स्पष्ट दिसत असेल तर आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांतही खोटा ठरतो आणि इंडो-युरोपियन भाषा सिद्धांतही.

आपण येथे अत्यंत गंभीर मुद्द्यावर आलो आहोत. आजही इंडो-युरोपियन भाषा सिद्धांत भाषाशास्त्रात महत्वाचा मानला जातो व त्यावरच आधारीत नव-प्रेमेये मांडली जातात. हा सिद्धांतच मुळात एक-स्थान-भाषानिर्मिती व्युहावर आधारीत आहे. कोनत्यातरी एका ठिकानी मुळ (proto) ईंडो-युरोपियन भाषा बोलणारे लोक स्थायिक होते आणि ते कालौघात अफगाणिस्तान, इराण, युरोप आणि भारतात प्रवेशले  आणि त्यतून काहे साम्ये असलेल्या आजच्या इंडो-युरोपियन भाषा बनल्या असा हा सिद्धांत आहे. आजच्या या सिद्धांताला म्यक्स्मुल्लरच्या काळात जे वांशिक संदर्भ होते ते आज प्रकटपने विचारात घेत जात नसले तरी जागतिक पातळीवर मान्यता आहे. आणि म्हणुणच याकडे अधिक गांभिर्याने पाहिले जायला हवे.

एकार्थाने इंडो-युरोपियन भाषा सिद्धांत हा आर्य-आक्रमणाचे असो कि नुसते प्रवेशनाचे असो, समर्थन करत असतो.

समजा हाही सिद्धांत खरा आहे तर मग पुढील समस्या निर्माण होते ती अशी कि मग या भाषेचे भौतिक पुरावे का मिळत नाहीत? इसपु १५०० ते इसचे चवथे शतक, १९०० वर्षांच्या काळात ही भाषा नेमके काय करत होती?

येथे एक लक्षात घ्यायला हवे ते हे कि ऋग्वैदिक भाषा ही संस्कृत नसून संस्कृतची पुर्वावस्था आहे अशी मान्यता आहे. एका अर्थाने वैदिक भाषा ही मिश्र संस्कृत (Hibreed) आहे. तिचा विकास ही पाणिनिय अभिजात संस्कृतमद्धे झाली अशीही मान्यता आहे. पाणिनीचा काळ याच विद्वानांनी इसपू आठवे शतक असाही ठरवला आहे. समजा हे खरे आहे तर मग पाणिनीय सम्स्कृतातील साहित्य एकदम चवथ्या शतकात कसे अवतरायला लागते? मधल्या कालात तिचे अस्तित्व का दिसत नाही?

अकराशे वर्षांचा काळ का लागला? आणि या भाषेचा या प्रदिर्घ काळातील एकही भौतिक पुरावा का मिळत नाही?

अवेस्ताची भाषा ही संस्कृतच्या (वैदिक भाषेच्या) जवळ जाणारी भाषा मानली जाते. या भाषेचे इसपु सहाव्या शतकापासुनचे सर्व भाषाविकासाचे सलग पुरावे लिखित स्वरुपात उपलब्ध आहेत. प्राकृताचे सलग पुरावे इसपु सहावे शतक ते आजतागायतचे सलग उपलब्ध आहेत. तसेच प्राकृताचे एक शाखा म्हणुन इसपुच्या पहिल्या शतकापासून संस्कृतात बदलत गेल्याचे सलग पुरावे उपलब्ध आहेत.

म्हणजेच आर्य आक्रमण सिद्धांत अथवा इंडो-युरोपियन भाषासमुह सिद्धांत अत्यंत चुकीचा आहे. त्याचे मुलाधार चुकीचे आहेत. वेद हे मौखिक परंपरेने जसे निर्माण झाले तसेच्या तसे हजारो वर्ष जतन केले हाही आविर्भाव असत्य आहे.

मग प्रश्न निर्माण होतो तो असा कि मूळ वेद कोणत्या भाषेत लिहिले गेले? वेद रचनेचा कालखंड आपण अगदी इसपु १५०० एवढा जरी मानला तरी त्याही भाषेचा एकही भौतिक पुरावा मिळत नसल्याने "एके सांगितले...दुस-याने मानिले" असा प्रकार सर्वच भाषाविदांनी केलेला दिसतो. म्हणजे मौखिक परंपरेने वेद व वेदांगे जतन केली गेली हे ते अज्ञानमुलक आणि अत्यंत अविश्वासार्ह विधान होय.

उदाहरणार्थ जर वेद आहेत त्याच भाषेत रचले गेले, वेदांगेही त्याच भाषेत रचली गेली, त्याचे व्याकरणही त्याच भाषेत रचले गेले, अगदी निघंटुसारखे शब्दार्थकोशही त्याच भाषेत रचले गेले...तर ती कोणत्यातरी समाजाची भाषा असायला हवी अशी अपेक्षा बाळगने चुकीचे नाही. वेदाधिकार हा त्रैवर्णिकांना अपरिहार्यपने असल्याने या त्रैवर्णिकांना ती भाषा अवगत असायलाच हवी कारण त्याखेरीज हे अध्ययन होणे असंभाव्य आहे हे अमान्य करता येत नाही. आणि हेच त्रैवर्णिक समाजात शिष्ट असल्याने त्यांची भाषा हीच समाजाची भाषा असेही सहज म्हणता येते. मग प्रश्न पुन्हा तोच कि या भाषेचे अस्तित्व असल्याचे भौतिक पुरावे दुस-या शतकापर्यंत कोठेही का मिळत नाहीत? 

याचा अर्थ असा घ्यायचा का कि ही भाषाच मुळात तत्पुर्वी अस्तित्वात नव्हती?

होय. याचा अर्थ तसाच आहे. एवढाच नव्हे तर याचा सांस्कृतीक अर्थ असा आहे कि वैदिक धर्माचा अथवा आर्य आक्रमकांचा या भुमीवर कधीच विजय झाला नव्हता. भाषा हेच कोणत्याही संस्कृतीच्या प्रकटीकरनाचे मुख्य साधन असते. दुस-या शतकापुर्वी या भाषेचे कसलेही पुरावे नसल्याने व प्राकृतातून संस्कृत कशी विकसीत झाली याचे मात्र भौतिक पुरावे मुबलकपणे उपलब्ध असल्याने
आपल्याला भारतीय संस्कृतीचाच फेरविचार करावा लागणार आहे.

या लेखमालिकेत आपण आपल्या संस्कृतीचा शोध घेत राहु.


( To view previous articles pls click here: http://sanjaysonawani.blogspot.in/search/label/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF

3 comments:

 1. संजयजी आपल्या संशोधनाने हेच सिद्ध झाले की
  कोणी वंदा अथवा कोणी निंदा
  असत्य ठासून सांगणे हाच आमचा धंदा.
  आणि यामुळेच खरा इतिहास मागे पडला. आपल्या सारख्यांमुळे सत्य मात्र पुढे येते.

  ReplyDelete
 2. संजयजी,
  खूप छान फोड केली आहे. विचार नवा आहे. पचायला जड जाईल. (त्यात जमाना फास्टफूडचा आहे. अस्सल खाद्य पचणे आणखी अवघड! ) पण तुम्ही लिहा. लेखन ब्लॉग पुरते मर्यादित राहणार नाही हे सुद्धा पहा. या सिद्धांतांचे पुस्तक पाहायला मला आवडेल.

  ता. क. : सत्य हे कडूच असले पाहिजे असा बहुधा आपल्या कडे नियमच असावा!

  ReplyDelete