ऋग्वेद हे जगातील सर्वात प्राचीन धार्मिक साहित्य मानले जाते हे खरे नाही. गाथांची रचना ऋग्वेदपुर्व आहे असे भाषाविद मायकेल विट्झेल यांनी सिद्ध केले आहे. त्याहीपुर्वी इसपू २४०० मधील पिर्यमिडमद्ध्ये कोरलेले "पि-यमिड टेक्स्ट" (Piramid Texts) हे सर्वात प्राचीन व लिखित स्वरुपात असलेले धार्मिक साहित्य आहे. उलट ऋग्वेद व अवेस्त्याचा तसा पुरातनत्वाचा लिखित पुरावा काहीएक उपलब्ध नाही. ऋग्वेदाची भाषा ही मुळची होती तशीच उरलेली नसून तीवर अनेक वेळा संस्कार झालेले आहेत. त्याकडे वळण्याआधी वैदिक भाषेबद्दल विद्वानांची विविध मते काय आहेत हे आपण प्रथम पाहू.
१) ऋग्वेदाच्या भाषेचे अवेस्त्याच्या भाषेशी निकटचे साम्य असून काही ध्वनी बदलले कि त्याचे सरळ वैदिक संस्कृतमद्ध्ये रुपांतर होऊ शकते. ....ऋग्वेदातील दहावे मंडल वगळता उर्वरित भागाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते कि त्यावर अनेक संस्करणे झालेली असून ती उणे केली तर एकाच कोणत्यातरी शुद्ध भाषेचा संबंध लागतो. ऋग्वेदाच्या संपादकांनी अन्य धार्मिक साहित्याच्या भाषेला काही प्रमाणात तरी आपलेसे केलेले दिसते. अशा भाषिक उधारीची अनेक उदाहरणे ऋग्वेदात आहेत. ऋग्वैदिक व्याकरणही अशा भाषिक प्रदुषनाने दुषित असल्याचे अनेक संकेत मिळतात. वैदिक भाषा ही पाश्चिमात्य भाषा होती, जशी अवेस्त्याची ज्यात र आणि ल हे वर्ण मिश्र होऊन जातात. ऋग्वेदातील व्याकरणही दोन भाषांचा संघर्ष दाखवते असा जे. ब्लोख यांच्या वैदिक भाषेबद्दलच्या कथनाचा सारांश आहे.
२) प्राकृत भाषांना कोणत्याही एकाच उगमापर्यंत नेता येत नाही. त्या किमान संस्कृत भाषेतून तर नक्कीच उगम पावलेल्या नाहीत, ज्याप्रमाणे भारतीय विद्वान आणि होप्फर, लास्सेन, ज्यकोबी वगैरे समजतात. वैदिक भाषेचा शब्दसंग्रह आणि व्याकरण हे प्राकृत प्रकृतीशी मिळते, अभिजात संस्कृतशी नाही, त्यामुळे संस्कृतमधुन प्राकृत भाषा विकसित झाल्या हे मत मान्य करता येत नाही असे रिचर्ड पिशेल स्पष्टपणे, अनेक उदाहरणे देत नमूद करतो.
३) प्राकृत भाषांतील अनेक शब्द व प्रत्यय संस्कृतपेक्षा वैदिक भाषांशी अधिक मेळ खातात. प्राकृत जर संस्कृत भाषेतून उत्पन्न झाली असती तर असे झाले नसते. वैदिक भाषा व प्राकृत भाषा पुरातन प्राकृतातुनच उत्पन्न झाल्या असाव्यात कारण त्याशिवाय असे साम्य आढळून आले नसते. वैदिक भाषेत ऋकाराऐवजी उकार, (वृंदऐवजी वुंद) अनेक ठिकाणी होणारा वर्णलोप (उदा. दुर्लभ ऐवजी दुलह) इत्यादि. वैदिक भाषा ही संस्कृताशी समकक्ष नसून प्राकृताशी समकक्ष अथवा प्राकृतसमान आहे असे हरगोविंददास टी. सेठ सप्रमाण दाखवून देतात.
४) अवेस्ता आणि ऋग्वेदाच्या भाषेमद्ध्ये तर ध्वनीशास्त्रदृष्ट्या पुष्कळ साम्य आहे. यज्ञ- यस्न, असूर-अहूर, देव-दएवा, सोम - हओम, सप्त - हप्त, मित्र- मिथ्र, मगवन- माघवन इत्यादि देवतानामांत तर साम्य आहेच पण अनेक मंत्रही ध्वनी बदलुन जसेच्या तसे वैदिक भाषेत रुपांतरीत करता येतात. मात्र इ व ओ या स्वरांचे अनेक प्रकार अवेस्तनमद्ध्ये होतात तसे ते वैदिक भाषेत होत नाहीत. फरक आहे तो वाक्यरचनेच्या व शब्दसंग्रहाच्या बाबतीत. शब्द समान असले तरी अर्थ विभिन्न झालेले दिसतात. सायनाच्या भाष्यानुसार जेंव्हा ऋग्वेदातील अनेक शब्दांचा अर्थ लावायला अडचण भासू लागली तेंव्हा पाश्चात्य विद्वानांनी अवेस्त्याच्या भाषेची मदत घेतली. अवेस्त्याची भाषा वैदिक भाषेला अधिक निकटची आहे याबाबत आता कोणाही विद्वानाच्या मनात शंका नाही. किंबहुना अवेस्ता आणि ऋग्वेदाच्या धर्मकल्पनांतही कमालीचे साम्य आहे.
५) अवेस्त्याची भाषा ही वैदिक भाषेपेक्षा अधिक पुरातन आहे असे मायकेल विट्झेल यांनी सिद्ध केले असून ऋग्वेदाच्या मुळ भाषेवर किमान पाच संस्कार झाले असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
६) ऋग्वेदातील १०. ७१.१-२ या ऋचांवरुन स्पष्ट दिसते कि वैदिक ऋषींनी नवीनच भाषा बनवली. जसे धान्य पाखडले जाते त्याप्रमाणे शब्द पाखडून भाषा बनवली असे ऋषी या ऋचांत म्हणतो. अनेक बोलीभाषांतून शब्द घेत ही नवी भाषा बनली असल्याचे निर्णायक पुरावे ऋ. ८.१.५.५ आणि ८.९५.५ या ऋचांतही मिळतात. पाश्चात्य विद्वानांनी संस्कृत आधी व प्राकृत बोलीभाषा हा क्रम दिला तो चुकीचा आहे असे मत डा. प्रमोद पाठक यांनी मांडलेले आहे.
७) म्यक्समुल्लर म्हणतात, "ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील पुरुषसूक्त हे भाषा आणि आशयाने खूप नंतरचे आहे. वसंत, ग्रीष्म हे ऋतू ऋग्वेदात अन्यत्र उल्लेखले गेलेले नाहीत. शूद्र शब्दही अन्यत्र येत नाही." (A History of Ancient Sanskrit Literature”, by F. Max Muller, 1859, page 570) याचा अर्थ एवढाच कि या सुक्ताची रचना वैदिक लोक/प्रचारक भारतात आले व वैदिक भाषेत सुधारणा करण्याच्या अंतिम टप्प्यात, ती अधिक सुडौल बनवल्यानंतर झाली आहे. कोलब्रुकसुद्धा म्हणतात कि या सुक्ताची रचना वैदिक भाषेला अधिक संस्कारित व शुद्ध बनवल्यानंतर ही रचना झाली आहे. (Miscellaneous Essays, Volume 1, By Henry Thomas Colebrooke, see footnote, 1837, page 309)
८) ऋग्वैदिक भाषेत जवळपास ६% शब्द हे द्रविड, मुंड च कोल भाषेतून आलेले आहेत.
वरील अल्प विवेचनावरून लक्षात येणारी महत्वाची बाब म्हणजे वैदिक भाषा ही संस्कृत नाही तर प्राकृताप्रमाणेच, पण एक स्वतंत्र, अनेक भाषांचा आधार घेत बनलेली भाषा आहे. सेठ म्हणतात त्याप्रमाणे ती भाषा कोणा एकाच प्राकृत भाषेतून निर्माण झालेली नाही, परंतु या भाषेवर स्थानिक प्राकृतांचा प्रभाव निश्चयाने आहे. परंतू ऋग्वेदाच्या धर्मकल्पना आणि ऋग्वेदाची भाषा यावर उत्तर अफगाणिस्तानात स्थापन झालेल्या पारशी धर्म व धर्मग्रंथाच्या भाषेचाही निकटचा संबंध असल्याने ऋग्वेदाची मुळ भाषा ही अवेस्त्याच्या निकटची, समकक्ष असणार हे उघड अहे. विट्झेल म्हणतात त्याप्रमाणे मुळ ऋग्वेदाच्या भाषेत अनेक वेळा बदल केले जात शेवटचे संस्करण हे इसपूच्या तिस-या शतकात किंवा त्याहीनंतर झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच ऋग्वैदिक भाषा ही मुळची अवेस्त्याच्या समकक्ष व भारतात आल्यानंतर त्यात मुर्घन्य वर्णांचा समावेश होत प्राकृत व्याकरण व शब्दसंग्रह घेत अनेक संस्करणांतुन गेलेली आहे. त्यामुळे वैदिक भाषेला आपण एकार्थाने मिश्र भाषा म्हणू शकतो.
ऋग्वेद हा पठणपरंपरेने जसाच्या तसा जपला गेला असता तर हे भाषिक वैविध्य व तेही प्राकृत व अवेस्त्यासमान, पण प्राकृतही नव्हे किंवा संस्कृतही नव्हे, अशा वैदिक भाषेत आले नसते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात कि वैदिक भाषेत जे शब्दवैविध्य व रचनासैलत्व आहे ते पाणिनीच्या संस्कृतातून गायब झालेले आहे. वैदिक भाषेवर अवेस्त्याची भाषा, भारतातील तत्कालीन प्राकृत भाषा यांचा एकत्रीत प्रभाव स्पष्ट दिसतो. स्वभावत:च दोन्ही भाषांतील शब्दही ध्वनीबदल करत वैदिक भाषेत आलेले असल्याने शब्दवैविध्यही दिसते. म्हणजेच वेळोवेळी ऋग्वेदाच्या भाषेवर संस्कार करण्यात आले आहेत. ही भाषा स्वतंत्र नाही. तिचे पितृत्व अनेक भाषांकडे जाते.
थोडक्यात अवेस्तन समकक्ष भाषेचा पाया घेत त्यावर इतर अनेक अन्य प्राकृत व द्रविड/मुंड/कोल या भाषांचे संस्कार करत जी अत्यंत वेगळी बनवली गेली ती (व नंतर वैदिकांनाही समजायला अवजड जायला लागली ती) सर्वस्वी नवीन व अर्वाचीन भाषा म्हणजे वैदिक भाषा!
त्यामुळे ऋग्वेद निर्मितीपासून होते तसेच्या तसे पाठांतराने जतन केले गेले या दाव्याला काही अर्थ नाही.