Thursday, October 29, 2015

वेद आणि वेदाज्ञाखरे तर वेद तीनच आहेत. सामवेदाला स्वतंत्र वेद मानता येत नाही कारण तो ऋग्वेदातील ऋचांचे गायन करण्याबाबतचा वेद आहे. अथर्ववेद तसे पहायला गेला तर ऋग्वेदविरोधीच आहे. तो विशेषकरून जादु-टोण्याची वेद आहे. या वेदात यतुकर्मे असून यज्ञोपयुक्त सुक्ते आजीबात नाहीत. ऋग्वैदिक देवतंचे स्थानही यात अध:पतीत झालेले आहे. यजुर्वेद मात्र पुर्णतया याज्ञिक कर्मकांडाने भरलेला आहे. यज्ञ ही वैदिकांची मुख्य धर्मसंस्कृती मानली तर अथर्ववेद त्यात मुळीच बसत नाही. आणि या वेदाला चवथा वेद उशीरापर्यंत मानले जातच नव्हते यातच या वेदाला वैदिकच किती मानत होते हे दिसते. अथर्वन ब्राह्मण भारतात आजही अत्यल्प आहेत एवढे सांगितले की पुरे.

भारतात वेदाज्ञा, वेदमान्यता याचे स्तोम मध्ययुगात तरी खूप होते असे दिसते. किंबहुना भारतातील कोणत्याही विचारधारेला वेदमान्यतेचे नाटक करावे लागे. त्याखेरीज तत्कालीन विद्वान त्या तत्वधारेला महत्वच देत नसत!

प्रत्यक्षात कोणत्या वेदमान्यता आहेत हे मात्र तपासून पहायचे कष्ट तत्कालीन विद्वानांनीही घेतलेले दिसत नाहीत.

कारण-

१) ऋग्वेदात समाजरचनेबाबत कसलेही दिग्दर्शन नाही. अगदी वर्णव्यवस्थेचेही.
२) सामाजिक नीतिनियमांबाबत ऋग्वेद प्रचंड परस्परविरोधी आहे. म्हणजेच नैतिकतेचा मापदंडही ऋग्वेद नाही.
३) ऋग्वेदात अन्य विरोधी समाजघटकांबाबत अत्यंत हिंसक आणि विद्वेषी घोषणांची/कृत्यांची रेलचेल आहे.
४) ऋग्वेद सांख्य, वैशेषिक आदि तत्वज्ञानांच्या विरोधात आहे.
५) ऋग्वेद मुर्तीपुजेच्या विरोधात आहे.
६) यजुर्वेदात मुर्तीपुजेचा ठाम विरोध आहे.
७) ऋग्वेदात विवाह आणि अपत्यजन्म (त्यातही पुत्रजन्म) महत्वाचा आहे. संन्यास ऋग्वेदाला मान्य नाही.

यापुढे जाऊन ऋग्वेद अथवा अन्य कोणताही वेद जे सांगत नाहे त्या धर्माज्ञा वेदमान्य म्हणून वैदिकांनी कोणत्या वैदिक अधिकाराने काढल्या हा खरा प्रश्न आहे. गुरू ही संकल्पना खुद्द वेदांत नाही. आश्रम संकल्पनाही वेदांत नाही. मग या संकल्पना वेदमान्य का मानल्या गेल्या?

केवळ वैदिकांनी सांगितल्या म्हाणून?

त्या नंतरच्या वैदिक धर्मातील सुधारणा असू शकतात असे आपण म्हणू. पण वेदमान्यता आहे तर वेदांतच मुळात त्याला आधार काय बरे?

तो त्यांनी गुह्यसुत्रे ते स्मृत्यांतही दिलेला नाही. श्रौत हे वेदांनाच आधारस्तंभ मानणारे कडवे वैदिक तर स्मार्त हे स्मृत्यांनाच मुख्य आधारस्तंभ माननारे वैदिक! स्मार्तांनी पंचायतन घेतले तो त्यांचा नाईलाज. पण तात्विक आधारस्तंभ काय तर स्मृत्या. याबद्दल सविस्तर मी क्रमश: लिहिणंच...पण मुख्य प्रश्न हा आहे कि वेदमान्यता या गोष्टींत कोठे आहे?

ऋग्वेदात जाती नाहीत. ऋग्वेदात वर्ण नाहीत. बरीचशी उपनिशदे वैदिक नाहीत तर वेदविरोधी आहेत. दर्शनांचीही तीच गत आहे. आणि ते तात्विक विरोध दूर ठेवले तरी अमुकला मान्यता तमुकला नाही असे वेदांत कोठेच नमूद नाही. मग वेदमान्यता ही यांची कल्पनाशक्ती होती काय यावरही विचार करायला हवा.

हे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत हे लक्षात घ्या. ज्या बाबींचा मुळात उल्लेखच वेदांत नाही त्या वेदमान्य कशा? वेदमान्य म्हणून वैदिकांसाठी अनुकरनीय कशा? आणि वैदिकांनीच वेदांत जे मान्य आहे ते अव्हेरले असेल (उदा. गोमांसभक्षण) तर ते तरी वैदिक राहिलेत काय?

विचार करा. वैदिकतेचे स्तोम या देशात खूप माजवले गेलेले आहे. त्या स्तोमाने वैदिकांसह सर्वांचाच होम केला आहे.

विचार करा!

2 comments:

  1. वैदिक धर्मात काय आहे , त्याचा आणि संजय सोनावणी यांचा काही संबंध आहे का ? कारण त्यांचा धर्म वैदिक आहे का ? ते स्वतःच म्हणतात की काळाच्या ओघात अनेक स्थित्यंतरे होत होत ऋग्वेद आणि वैदिक धर्माची रचना झाली , अनेक गोष्टींची ग्जागा दुसऱ्या गोष्टीनी घेतली , धर्म वेगळा आणि चालीरीती वेगळ्या ,
    सरांनी या लेख मालिकेची सुरवात सुंदर केली , पण नंतर तेच तेच सुरु झाले . नाविन्य काही नाहीच . सर्व धर्मच असेच आहेत , संस्कृती आणि धर्म एक नाही हे मान्य आहे ना ? वैदिक विचार आणि लिखाण यातही फरक असणारच . संघ म्हणजे वैदिक्ता नाही किंवा वैदिकतेच्या रक्षणाची जबाबदारी संघाची नाही , परंतु याबाबत कुशलतेने सतत आर्य वैदिक आणि ब्राह्मणवर्ग असा घोळ घालत बहुजानाना एका विशिष्ठ विचारांचे बाळकडू पाजायची जबाबदारी संजय सारणी उचलली असावी , किंवा त्याना सर्व गोष्टींचा उबग आला असावा . इतिहासकार हा सर्व समावेशक असतो , तसे त्यांच्या कडे काहीच दिसत नाही , त्यापेक्षा संभाजी ब्रीगेद्वाले बरे !

    ReplyDelete
  2. भगवद्गीतेतही तीन वेदांचाच उल्लेख आहे. गीतेने वेदांना ईश्वरीय ज्ञानाच्या दृष्टीने डबक्याची उपमा दिलेली आहे. मुन्डकोपनिषदानेही तरून जाण्याच्या दृष्टीने यज्ञयागांना फुटक्या नावा असे म्हटले आहे. वेद हे कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सांगितल्याप्रमाणे फक्त संवरण म्हणून उपयोगात आणले आहेत.आ. ह.साळुंखे यांनी या बाबत चांगलेच विश्लेषण केलेले आहे. वेदाच्या वजनाचा त्यांच्या दुर्बोधतेच्या सहाय्याने हितसंबंधियांनी चांगलाच उपयोग करून घेतलेला दिसतो."नास्तिको वेद्निन्दक:'' ही उक्ती प्रसिद्धच आहे. ईश्वराचे अस्तित्व एकवेळ नाही मानले तरी चालेल, पण आस्तिक ठरण्यासाठी वेद मानलेच पाहिजेत. म्हणूनच तर स्मृती वेदांच्याच भाग बनतात.आणि स्मृतीवचने वेदांच्या नावावर खपविले जाऊ शकतात.

    ReplyDelete