Saturday, May 7, 2011

दिवस तसेही...दिवस असेही...(प्रकरण ९)

साहेबाच्या देशात!

हीथ्रो विमानतळावर विमान उतरले तेंव्हा अपेक्षेप्रमाणे ढगाळ वातावरण होते. जो सळसळता उत्साह मला नेदरल्यंडमद्धे जाणवला होता तसा उत्साह येथे जाणवला नाही. पण विमानतळ होता अवाढव्य आणि आधुनिक. कस्टमने येथेच पहिल्यांदा अडवले. माझ्याजवळ लोहभुकटॆएचे नमुने होते. त्यांना वाटले ही गर्द तर नाहीना? मी त्यांना समजावून सांगितले पण त्यांना लोहभुकटी नावाचे उत्पादन असते हेही समजेना. मी म्हणलो चुंबक आणा...आणि पहा...आणि गर्द वजनाने एवढी जड असते का? तेंव्हा कोठे माझी सुटका झाली. हसुन त्यांनी मला निरोप दिला.

इंग्लंडच्या अंडरग्राउंड रेल्वेसेवेबद्दल खूप ऐकले होते. आता प्रवास करतांना मजा आली. मी किंग्ज क्रोस येथे उतरलो. मला किंग्ज क्रोस रेल्वे टेर्मिनसवरुनच पुढील प्रवास करायचा होता...पण अर्थात दुस-या दिवशी. मी जवळच एक होटेल शोधले आणि रुम घेतली. फ़्रेश होवुन बाहेर पडलो. सायंकाळ झली होती. मी बकिंगह्याम राजवाड्यच्या परिसरात आलो. राणीचे जगप्रसिद्ध गार्डसजा एक घोड्यावरुन ऐटीत जाणारा जथा पाहिला, व्हाईट हाल पाहिला आणि परत फिरलो. येथे एक मोठी गैरसोय दुर झाली ती म्हणजे भारतीय रेस्टारंटस्ची कमतरता नव्हती त्यामुळे मनसोक्त जेवण झाले.

दुस-या दिवशी ट्रेन खरे तर दुपारी होती. मला अजुनही काही जागा पहाता आल्या असत्या...उदा. वेस्टमिनिस्टर ब्रीज. पण मी बाहेर न पडता पुढील भेटीसाठीची तयारी करत बसलो. त्यामुळे थेम्स नदी माझ्या दर्शनाला मुकली. आणि मी पुन्हा पुन्हा भविष्यात येथे येणारच होतो...या गोष्टी नंतरही पहाता येतील असा विश्वास होताच...(अर्थात तो कधी खरा झाला नाही ही बाब वेगळी.) मला जायचे होते नाटिंगह्यम कौंटीत. रात्रीपर्यंत एका विवक्षीत स्टेशनवर पोहोचुन रात्री तेथे मुक्काम करुन सकाळी पुढचा प्रवास करायचा होता.

एक महत्वाची बाब येथे नमूद करणे आवश्यक आहे. नेदरल्यंड, इंग्लंड वा अमेरिकेत बव्हंशी कारखाने विकेंद्रितच आहेत. अगदी खेड्यापाड्यांतही विखुरलेले आहेत. त्याउलट महारष्ट्रातच काय संपुर्ण भारतात पराकोटीचे केन्द्रीकरण झालेले आहे. यामुळे एक प्रकारचा बकालपणा आपण वाढवला आहे. मी गडचिरोलीसारख्या दुरच्या भागात करखाना काढला याचा मला सार्थ अभिमान वाटु लागला आणि नेते व उद्योजकांनी यात पुढाकार घावा आणि संतुलित विकास साधावा असे प्रकर्शाने जानवु लागले. परतल्यानंतर मी याबद्दल काही लेखही लिहिले...पण....

रात्री एका खाजगी निवासात (घरगुती) मुक्काम करून दुस-या दिवशी ट्याक्सीने माझा प्रवास सुरु झाला. या आठवनी १५ वर्षांपुर्वीच्या आहेत आणि मी डायरी ठेवत नसल्याने मला गावांची नावे आठवत नाहीत पण ट्याक्सीच्या प्रवासात शेरवूड हे रोबिनहूडमुळे प्रसिद्ध झालेले अरण्य लागले. मी ते उत्सुकतेने पाहिले पण माझी निराअशा झाली...सह्याद्रीतील अरण्ये पाहिलेला मी माणुस...

पण एक होते...तो ऐतिहासिक ठेवा...अवघ्या ३-४०० एकरमधला...ब्रिटिशांनी अफलातुन जपला होता. भारतीयांना सौदर्यद्रुष्टी नाही या विचारावर शिक्कामोर्तब होत होते. पोहोचलो. एका शांत खेड्यात एका बाजुला तो अवाढव्य कारखाना होता. येथे लोहभुकटी बने. त्यांना आमच्या इलेक्ट्रोलिटिक पद्धतीने बनणा-या अतिशुद्ध लोहभुकटीची आवश्यकता होती. त्याचे नमुने मी बरोबर आणलेलेच होते. त्यांचे आटोम्यशन तंत्रद्न्यान मला पहायचे होतेच. कंपनीचा मालक पक्का खनदानी ब्रिटिश. त्याचे कार्यालयही त्याची साक्ष देणारे...पुरातनपणाचा ब्रिटिशी हव्यास जागोजागी जाणवणारा...त्या अत्याधुनिक कारखान्यात! बोलणे अति-सभ्य पण कोरडे. पण त्याने स्वत: त्याचा कारखाना फिरवून दाखवला...२ तास लागले. मग चर्चा...मी नमुने दिले. ते त्याने तात्काळ त्याच्या प्रयोगशाळेत पाठवले...२० मिनिटांत रिपोर्टही आला. आमच्या लोहभुकटीची शुद्धता ९९.१०% एवढी निघाली. स्वारी खूश झाली. पहिली ओर्डेर त्याने नोंदवली १ टनाची...ही नमुना ओर्डर होती. ती जर व्यवस्थित आली तर पुढे अर्थातच मागणी वाढणार होती. मग त्यांच्या तंत्रद्न्यानाबद्दल चर्चा. खरे तर मला ते तंत्रद्न्यान घेण्यात रस नव्हता कारण मी वेगळे स्वस्त तंत्रद्न्यान स्वत: विकसीत करुन व्यापारी दर्जाची लोहभुकटीचे तंत्रद्न्यान विकसीत केलेले होतेच. पण त्यांचे तंत्रद्न्यान समजावुन घेणे आवश्यक होते. ते काम त्याच्या तंत्रद्न्यांनी चोख बजावले.

परततांना मी ट्याक्सीने नव्हे तर ट्रेनने आलो. खेड्यातील ते रेल्वे स्थानक अफलातुनच होते. ब्रिटिश साम्राज्य वैभव आणि ती खानदानी कलाकुसर त्या छोट्या रेल्वेस्थानकावरही जाणवत होती. विशेष गर्दी अशी नव्हतीच...किंबहुना तुरळक प्रवासी होते. मी परत लंडनला आलो तेंव्हा मध्यरात्र झाली होती. मी अहोटेलवर गेलो आणि ताणुन दिली. सकाळी पुन्हा अम्स्तर्ड्यामला परतायचे होते. कारण त्याच रात्री मला के.एल.एम. ची डेट्रोईट फ़्लाईट पकडायची होती.

डेट्रोईटला मला अनेक कामे होती. संजय कुलकर्णी हा माझा आधी झालेला पत्रमित्र आणि नंतर फोनेमित्र मला भेटणार होता. तो तेथील एका लोहभुकटी बनवणा-या मोठ्या कारखान्यात तंत्रद्न्य (पावडर मेटालर्जिस्ट) म्हणुन काम पहात होता. गम्मत सांगतो...हा प्रत्यक्ष कधी न पाहिलेल्या माझ्या रिसेप्शनिस्टच्या प्रेमातही पडला होता आणि तिला फोन करुन तासंतास बोलत असे. मी या फोनिक-प्रेमिकांच्या या प्रणयाराधनाला कधीच आक्षेप घेतला नाही. पण हे प्रकरण पुढे थांबले आणि या रिसेप्शनिस्टने पुढे लग्न केले...पण संजय नावाच्याच माणसाशी. अर्थात तो मी नव्हेच हे येथे नमूद करणे आवश्यक आहे.

मी दुस-या रात्री फ़्लाईट पकडली. आता मी जरा सरावलो होतो. तेंव्हा आंतरराष्ट्रीय उड्डानांत स्मोकिंगसाठी वेगळे भाग असत. आता ते बंद झाले आहे. दुर्दैव. दुसरे काय? मी छानपैकी पेयपान करत सिगारेटचा आस्वाद घेत हा प्रवास केला. डॆट्रोईट तळावर मला घ्यायला संजय कुलकर्णी आला होता. तोवर मी अमेरिकन लोकांचे स्नेहपुर्ण आणि क्यज्युअल वागणे पाहिले होते. त्यांनी माझे सामान तपासायचेही कष्ट घेतले नाही.

संजयच्या कारमधुन आम्ही एका सबर्बमधील त्याच्या अपार्टमेंट्मद्धे आलो. तेथे एका फ्ल्यटमद्धे तो अन्य २-३ मित्रांबरोबर रहात असे. वाटेत आमच्या गप्पा सुरुच होत्या. डेट्रोईट शहर अवाढव्य असुन वाहन निर्मितीत अग्रगण्य आहे हे माहित होतेच. शिवाय येथे निग्रो लोकांची संख्या मोठी. संजय त्यांना "कल्लु" म्हणे. डोन हार्वे हा आमचा अमेरिकेतील वितरक. तो दोन दिवसांनी भेटायला येणार होता व त्याच्याबरोबर मला ४-५ संभाव्य खरेदीदारांची गाठ घालुन देणार होता हेही मला त्यानेच सांगितले.

संजयने त्याच्या दुस-या मजल्यावरील फ्ल्यटमधील एक रुम माझ्यासाठी तयार करुन ठेवली होती. काही दिवस मराठीचा संबंध तुटलाच होता. येथे घरच्यासारखे वाटत होते. त्यामुळे मी खूश होतो. डेट्रोईतला मराठी माणसे भरपूर होती. त्यामुळे येथे वेळ चांगला जाणार याची खात्रीच होती. तसे झालेही. रोज आम्ही तेथील एका भारतीय रेस्टारंटमद्धे जेवण करत असू. भारतीय फुड अमेरिकन लोकांतही लोकप्रिय आहे हे पहातच होतो.

दुस-या दिवशी संजय ज्या कारखान्यात काम करत होता त्याला भेट दिली. मला तो कारखाना मुळीच आवडला नाही. उत्पादन पद्धती अत्यंत ढिसाळ व कमी दर्जाची पावडर बनवणारी होती. कारखान्याचा मालक एक उमदा तरुण अमेरिकन होता. त्याने सन्मानार्थ मला पार्टीही दिली. मी त्या रात्री चर्चा करतांना संजयला एक प्रपोजल दिले...

मी अमेरिकेतच कारखाना काढतो...तांत्रिक बाबी आणि येथील व्यवस्थापन तू पहा. संजय तर खुशच झाला. ही कल्पनाच रोमांचक होती आणि संभाव्यतेच्या सर्व कक्षेत बसत होती. अमेरिका ही मेटल पावडर आयात करणारा सर्वात मोठा देश आहे. माझ्याकडे तंत्रद्न्यान होतेच. मशिनरी भारतात बनवून येथे आनता आली असती म्हणजे भांडवली खर्च कमी झाला असता. तसेही अमेरिकन कंपन्या भारतीय मंडळीला स्वस्तात वापरुन घेत...फक्त विनिमय दरातील तफावतीमुळे ते अल्प वेतन नुसते परवडतच नसे तर भरपूर जमा शिल्लक राही. अमेरिकन लोक हे मुळात उधळे, कर्जावर जगणारे...बुधवार आला कि "i am broke" म्हणत गळे काढणारे. क्रेडिट कार्डांच्या राशीवर जगणारे. ही जी महामंदी अलिकडे आली तिचे मला काहीच आस्चर्य वातत नाही कारण "America is rich country with poor people & India is poor country with rich people." हा सिद्धांत मी अनुभवाने आधीच बनवला होता. अलीकडेच मी एका अमेरिकन चित्रकार मित्र महिलेला ५०० डालरची मदत करून आत्महत्येपासून वाचवले आहे. आमची कधीच प्रत्यक्ष भेट नाही हे येथे लक्षात घेणे गरजेचे आहे हेही मी येथे नमूद करून ठेवतो. असो.

आम्ही चक्क दुस-या दिवशी एका ब्यांकेला भेट दिली...म्यानेजरने (ती महिला होती.) तात्काळ तिने अकाउंट ओपनिंग पासून ते आर्थिक सहायाबद्दलचे कागदपत्र दिले. हे आपल्याकडे १० दिवस हेल्पाटे मारल्याखेरीज त्यावेळी होत नसे. त्याच दिवशी आम्ही कारखाना चालू करता येईल अशा जागाही पाहिल्या. मला अमेरिकेने मुळीच प्रभावित केले नाही आणि आजही माझ्या या मतात बदल होउ शकलेला नाही, ते कसे हे मी पुढे सांगेलच.

डॆट्रोईट शहर हे जगप्रसिद्ध आहे...पण तसे त्या वैभवाचे चित्र मला त्यावेळीस तरी आढळले नाही. लोक वखवखलेले, संधीसाधू आणि बकरे शोधण्यात व्यग्र असे वातले. तेथील महाराष्ट्रीय मंडलीही काही विशेष वेगळी नव्हती. त्यांच्या-त्यांच्यातही असंख्य दुरावे होते...एकतेचे नाटक करत असता हेही मे अनुभवले आणि खिन्न झालो. संस्क्रुतीची जपणुक केवळ आपले वेगळेपण दाखवण्यासाठी असून त्यांत विशेष काही अर्थ नाही हेही लक्षात आले. ज्या आहेत त्या व्यर्थ वंचना. पण येथे कारखाना काढायचा आणि तो यशस्वी करायचा हे मात्र माझ्या मनाने पक्के घेतले.

डोन हार्वे आला. तो तेंव्हा सत्तरीतला व्रुद्ध. मुळचा ब्रिटिश. मला भेटुन खुपच खूश झाला आणि आमच्या उत्पादनाला येथे खूप मार्केट असल्याने तो आता केवळ आमच्याच कंपनीवर फोकस करत आहे असे त्याने सांगितले. मी त्याच्या बरोबर निघालो. त्याने भाड्याची कार आनली होती. जे अंतर तोडायला भारतात किमान १७ तास लागले असते ते अंतर आम्ही चक्क ६-७ तासांत ओलांडले. माझा पुणे-गडचिरोली प्रवासानुभव...) रस्तेच तसे. जेथे हरणे खुप तेथे शेकडो मैल अशी उंच तारेची कंपाउंडे कि हरीण रस्त्यावर येवुन अपघात घडवणार नाही.

अजून एक गम्मत. मी डोनला विचारले...फावल्या वेळेत तो काय करतो?
तो म्हणाला " मी इंग्रजी शिकवतो...."
पक्का ब्रिटिश...आणि अमेरिकन इंग्रजी म्हणजे खरा केरकचरा...
मी प्रथमच जगप्रसिद्ध "पटेल्स मोटेल" या संकल्पनेशी परिचित झालो. त्याच्या गावात मी
मोटेलमद्धे उतरलो. भारतीय अन्न मिळाले नाही तर मेक्सिकन खायचे हे मी आता शिकलो होतो त्यामुळे त्या आघाडीवर चिंताच नव्हती. म्हणजे तेथील भारतीय फुड हे आपल्यासारखेच असते या भ्रमात राहण्यात अर्थ नाही...

नंतर आम्ही ५-६ विविध कंपन्यांना भेटी दिल्या. पण त्यातील एक अविस्मरणीय भेट सांगतो...जेथे माझी मात्रुभुमी मला भेटली आणि मी जन गन मन रडत म्हनालो. उर अभिमानाने भरून आला.

भेट होती एका सिंटर्ड उत्पादने बनवण्यासाठी लागणारी मशिनरी बनवणा-या कारखान्याला. कारखान्यात जातांना लक्ष गेले नाही. भेट झाली...चर्चा झाल्या...बाहेर जायला पडलो...

डोनने मला थांबवले. निर्देश केला. पाहतो तर काय...

अमेरिकन झेंड्याचा बाजुलाच दुस-या पोलवर तिरंगा फडकत होता.

"In your honor Sanjay."

डोन म्हणाला. मी स्तब्ध झालो. विश्वासच बसेना. हात कपाळी गेला आणि मी त्या भुमीवर माझ्या तिरंग्याला अभिवादन करत राष्ट्रगीत म्हटलो...डोळ्यांतुन अश्रु झरत राहिले...डोन स्तब्धपणे माझ्याकडे पहात राहिला. राष्ट्रगीत संपले तसा त्याने वडीलाप्रमाणे हात हाती धरला. मी भरून पावलो. या यश्किश्चित
माणसासाठी हा तिरंगा फडकावला गेला...माझ्या देशाचा सन्मान केला गेला...

नंतर असाच अनूभव पुढे मी जपानमद्धेसुद्धा घेतला.

जगण्याचा अर्थ मला अशाच घटनेने दिला.

आणि आजही माझा देश माझी माणसे हीच माझी जगण्याची प्रेरणा आहे.

4 comments:

  1. चित्र शैलीतील विलक्शन कथा.हरकुन टाकणारी.. माझी माणसे.. माझा देश हीच जगण्याची प्रेरणा..किती छान..थेम्स दर्शणाला मुकली..अप्रतिम...

    ReplyDelete
  2. संजय सर, विदेशवारी ने भारावणारेच बव्हंशी असतात. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही स्वतःच्या कर्तृत्त्वाचा ठसा विदेशी भूमीत उठवला हे या अनुभवातून जास्त ठळकपणे मला जाणवले. त्याअनुषंगाने आलेली त्या त्या ठिकाणची वर्णने व तेथील लोकांच्या शिस्तबद्धतेचे थोडे कौतुकच वाटले. आपण भारतीय अल्पसंतुष्टी असतो त्यामुळे एका मर्यादेबाहेर जास्त भरारी मारणे हे क्वचितच कोणाला जमते. तुम्ही त्यातलेच एक आहात हे प्रामाणिकपणे नमूद करु इच्छितो

    ReplyDelete
  3. Sir, Tumhi khup apratim lihita.. me tumcha khup alpavadhit khup motha chahta zalo ahe.

    ReplyDelete
  4. सर, जरी मला तुमचे सर्वच विचार पटत नसले तरी बरेच पटतात.
    खूप मस्त लिहिलंय आपण ह्या लेखात !

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...