Thursday, May 12, 2011

त्यांना मी फक्त तालीबानी म्हणु शकतो...

मानवी स्वभाव हा खरोखरच अतूलनीय आहे. त्या स्वभावात स्रुजनापेक्षा विध्वंसकताच अधीक आहे. त्याची स्रुजने जीही काही इतिहासाने नोंदवली आहेत ती त्याच्या हिंस्त्रतेचे प्रतिमान म्हणुनच सिद्ध होतात. उदा. आदिमानवाचा इतिहास आपल्याला समजतो तो त्याच्या दगडी हत्यारांतुन आणि मारुन खाल्लेल्या प्राण्यांच्या अवशेषांतुन. जगाचा इतिहास हा बव्हंशी युद्धांचा, द्वेषाचा आणि विश्वासघातांचा आहे. करुणेचे-प्रेमाचे-स्नेहाचेही क्षण आहेतच पण ते वाळवंटात एखाद-दुसरे ओयासिस असावेत तसे. जे करुणेचे महामानव झाले ते ग्रंथांत बंदिस्त झाले. त्यांचे अंतही सुखद नव्हते. राम-लक्ष्मनाला शरयू नदीत प्राणार्पण करावे लागले, क्रुष्णाला यादवीत झालेला स्वकियांचा अंत पहात अत्यंत तिय्यम पद्धतीचा म्रुत्यु भोगावा लागला, येशु ख्रिस्ताला स्वकियांच्याच विश्वासघाताने क्रुसावर चढावे लागले. पण ते ग्रंथात नुसते बंदिस्त केले गेले नाहित तर त्यांच्याच नावावर हिंसेचे आगडोंब उठवले गेले. त्यांच्या वचनांवर, जीवनावर आणि तत्वद्न्यानावर अनुयायांची खरी प्रीति होती असे नसून आदिम मानवी हिंसक भावना कधी मेल्याच नाहीत असे यावरून दिसते. त्यामुळेच सर्वच महामानवांची नावे घेत द्वेष आणि हिंसा (मग ती वैचारीक असो कि शारीरिक...) याचे उद्रेक जगभर उसळत असतांना आजही आपल्याला दिसतात.

आजचेही वास्तव काय आहे? ओसामा बिन लादेन हे भुत अमेरिकेनेच उभे केले. रशियाला शह देण्याच्या नादात आपण एक नवा भस्मासूर उभा करत आहोत याचे भान त्यांना राहिले नाही. (हीच चुक भारतात इंदिराजींनी भिंद्रानवालेच्या बाबतीत केली होती.) शेवटी काय झाले? हिंसा. वर्ल्ड ट्रेड सेंटर उध्वस्त करून अमेरिकन दहशतवादाला लादेनने उत्तर दिले. आणि आता लादेनला ठार मारून आपली संपलेली इज्जत अमेरिकेने पुन्हा प्राप्त करून घेतली.

अशी असंख्य उदाहरणे देता येतील. प्रत्येक राष्ट्र, समाज, समुदाय कमीअधीक प्रमाणात दहशतवादी बनत आहेत. अहिंसक मार्ग वापरणारे (उदा. तिबेट) कसलाही वाली नसलेले शोषित बनले आहेत आणि उर्वरीत जगाला हिंसेचेच अविवेकी वेड असल्याने असे अहिंसक लोक आणि त्यांबद्दलची आपली कर्तव्ये याबद्दल मूक आहेत.

हिंसेचे, तोडफोडीचे, न्रुशंततेचे वेड असणारे प्रत्यही प्रत्येक समाजात अवशिष्ट असतात. त्यांना हवा असतो एक नेता जो त्यांच्या भावनांना वाट करून देईल. त्यांना पुरेपुर वापरून घेईल. त्यांना असे मालक हवेच असतात. कारण स्व-बुद्धी नावाची जी काही बाब असते ती ते वापरायला अक्षम असतात. आर्य वादाचा आधार घेत ज्यु द्वेषाची लाट निर्माण केली हिटलरने...आणि नसता अभिमान चेतवत सारा जर्मनी बेचिराख करून घेतला...स्वता:ही मेला. म्हणुन अमेरिका शहाणा होता असे नाही...त्यांनी जो जपानमद्धे विध्वंस घडवला तो मानवाची मान सर्वदा खालीच राहील या योग्यतेचा होता. कम्युनिस्टांनी मार्क्सचा समतेचा सिद्धांत कोणत्या विक्रुत पद्धतीने राबवला आणि म्हणुनच अवघ्या ८०-९० वर्षांत कम्युनिझम फाटे फोडत फोडत आता पार माओवादाच्या हिंसक दहशतवादावर आला आहे याचे वर्तमान जग साक्षी आहे.

भारतात धर्म आणि जातीव्यवस्था, भाषा आणि प्रांतवाद एन-केन प्रकारेन अशाच दहशतवाद्यांच्या हाती गेल्याचे चित्र आपल्याला दिसते. धर्म म्हणजे नेमके काय? या प्रश्नाची धड उकल आजतागायत झालेली नाही. religion आणि धर्म हे वेगळे शब्द आहेत याचे भान राहिले नाही. "तेंव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म?" असा प्रश्न क्रुष्ण विचारतो तेंव्हा तो कर्ण हा कोणा वेगळ्या धर्माचा होता या अर्थाने विचारत नसून व्यक्तिगत नैतिकता हाच धर्म या अर्थाने विचारत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. समुहाच्या समान श्रध्हा-समान दैवते-दैवत कल्पना आणि धर्माने मान्य केलेले काही जीवन नीयम म्हणजे धर्म नव्हे...असला तर त्याला religion म्हणता येईल. धर्म हा व्यक्तीची नैतीक धारणा ज्या नीतितत्वांवर होते त्याशी निगडीत आहे. आणि या तत्वांत विभेद असणारच. येथे धर्म ही श्रद्धेची वस्तु नसुन व्यक्तिगत नैतिकतेची बाब आहे. समाजाच्या समान नैतिक संकल्पनांचा आविष्कार म्हणजे धर्म. समष्टीतील समान नैतीक संकल्प्ना म्हणजे धर्म. हा धर्म खालून वर जात असतो. religion हा वरून खाली येत असतो. म्हणजे "मी सांगतो म्हणुन हा धर्म आणि मी देतो ती धर्मतत्वे...आणि त्यांचे पालन हेच काय ते बंधनकारक." पारलौकिक जीवनाबद्दल (शिक्षा-वा पुरस्कार) यांचे आश्वासन द्यायलाही धर्म कमी करत नाहीत.

याला आपण वरुन खाली येणारा धर्म असे म्हणु शकतो. हा धर्म बव्हंशी आदेशात्मक असून मानवी विचार-स्वातंत्र्य येथे पुरेपुर नाकारले गेलेले असते. येथे व्यक्तीला महत्व नसून मानवी स्व-धर्मीय विचारी लोकांना महत्व असते आणि जे नसतात ते आपसूक शत्रु...काफिर...पाखंडी ठरत असतात. त्यांच्याविरुद्ध धर्मयुद्ध तरी करायचे असते वा क्रुसेड वा जिहाद...

आणि मानवी दुर्दैव हे आहे कि हाच आणि असाच भावनाविचार, जातीय असोत कि व्यावसायिक संघटना, करत जात मानवी जीवन अजून नव्या कचाट्यात पकडत जात असतात. येथे मानवी स्वातंत्र्याचा -हास तर होतोच पण त्याहीपेक्षा भीषण स्थिती म्हणजे एकुणातले मानवी सौहार्द हरपलेले असते.

विरोधी विचार कोणत्याही स्थितीत नको असतो...मनुश्य हा गुलामच असून गुलामी हेच त्याचे भविष्य आहे...मग ही गुलामी आर्थिक असो...राजकीय कि वैचारिक...भले तो अधिक लोकांचा मालक बनेल...आणि असे बिंबवणारेही कोणाचे तरी गुलामच असतात...आणि ही गुलामीची गोलाकार श्रुंखला आहे त्याकडे लक्ष वेधण्याचा हा प्रकार आहे. मुलावर रागावलो कि मुलगा खेळणी तोडतो...नवरा बायकोवर राग काढतो...प्रत्येकाने आपापले गुलाम ठरवलेले आहेत आणि जेंव्हा आपण संघटना पक्ष आणि राष्ट्राचा विचार करतो तेंव्हा आपल्या गुलामीच्याच कक्षा वाढत गेलेल्या दिसतात...स्वातंत्र्याच्या नाहीत.

आणि हेच संपुर्ण मानवजातीचे अपयश आहे.

आपापल्या धर्माचे विरोधी संपवायचे तर प्रथम त्यांच्या धर्मातील त्रुटी दाखवा...त्यांच्या आराध्यांना बदनाम करा, तेही नाही जमले तर त्यांच्या समर्थकांविरुद्ध युद्ध करा...गुलाम करा आणि त्यांच्या सर्वच आराध्यांची विटंबणा करा. हा प्रकार सर्वच धर्मीयांनी सर्वच धर्मीयांबाबत दुर्दैवाने केला आहे. कधी हा वरचढ तर कधी तो वरचढ...एवढाच कालौघातील फरक आहे. परंतू मानवी प्रव्रुत्ती बदलल्या नाहीत याचे हे एक दिग्दर्शन आहे.

हिंदु धर्म नाकारणारे आणि नवा धर्म स्थापन करनारे आजही आहेत. मी ९वीत असतांना नवीन "जीवन-धर्म" स्थापन केला होता आणि चक्क तेंव्हाही मला ५-१० अनुयायी होतेच. कट्टर अनुयायी म्हणजे माझा जीवलग मित्र कै. प्रशांत पोखरकर. मी हिंदू नावाचा धर्मच आस्तित्वात नसल्याने मी हिंदू नाहीच असे लेखन आणि वर्तन पुर्वीच केले आहे. तसे पुस्तकही लिहिले आहे. मी पुरातन शैव धर्माचा आणि त्याच्या वर्तमानीय अस्तित्त्वाचा समर्थक आहे हे सर्वांना माहितच आहे.

आणि अलीकडेच नवा शिवधर्मही स्थापन झाला आहे. हा शिवधर्म म्हणजे नेमके काय आहे आणि धर्म म्हटले कि काही तरी नैतीक चौकट अपरिहार्यपणे येतेच तर मग ही नैतीक चौकट काय आहे आणि या धर्माचे नव्य कर्मकांड काय आहे हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. या धर्माला शैव आणि शिव या शब्दांबाबत कय म्हणायचे आहे हाही प्रश्न आहेच. म्हणजे हा शिवाजी महाराज प्रस्तुत धर्म म्हनायचेय कि सिंधु संस्क्रुतीपुर्व अशा शैव धर्माबद्दल बोलायचेय? माझ्या अभ्यासाप्रमाणे शिवाजी महाराजांनी कोणताही धर्म प्रचलित केला नसुन माझ्या पुर्व-विवेचनानुसार व्यक्तिगत, कसल्याही प्रस्थापित धर्मसम्कल्पनांच्या आहारी न जाता व्यक्तिगत-नैतिक-धर्माचे नुसते पालन नव्हे तर खरा "स्व-धर्म" (individual ideaology) प्रचलित केला होता.

नवा धर्म स्थापन करणे म्हणजे पराकोटीची नैतीक, आध्यात्मिक, (आध्यातिमिक म्हणजे दैवी नव्हे..) उंची अभिप्रेत असते. पराकोटीची क्षमाशिलता आणि दयाबुद्धीची गरज असते. स्त्री-पुरुष, मग ते कोणत्याही जाती-जमातीतील-धर्मातील असोत, त्यांच्याकडे पाहण्याचा औदार्यभाव आवश्यक असतो. द्वेषाला धर्मभाव म्हणुन कधीही थारा असत नाही. माझ्या मते शिवरायांनी याच सर्व भावना यावजीव जपल्या. पण तो त्यांचा धर्म होता. religion नव्हे. आणि अन्य धर्मातील उच्च ते स्वीकारणे यालाही धर्मच म्हणतात, सुफी पंथाने ते कार्य जसे केले तसेच वारकरी संप्रदायानेही केले. पण शिवाजी महाराजांच्या नावाने धर्म नव्हे तर religion कोणी स्थापन करत असेल तर तत्वद्न्यानात्मक पातळीवरुन त्याचा विरोध करणे क्रमप्राप्त आहे.

कारण धार्मिक माणुस सहसा शिव्या देत नाही. तो विचारांना विचारांनीच उत्तर देतो असा माझा समज (कि गैरसमज म्हणा...) आहे आणि असेही असेल कदाचित कि असे लोक मुळात धार्मिकच नसतात...(मग ते भले परंपरेने आलेले असोत कि नव्य स्वीकारलेले.)

महामानव हे कधीच कोणत्याही जातीच्च्या-संप्रदायाच्या-धर्माच्या-राष्ट्रांच्या मालकीचे नसतात...ते सर्वांचेच असतात...

आणी महामानवच चिकित्सेला वारंवार आव्हान देत असतात.

ज्यांना चिकित्साच नको...

त्यांना मी फक्त तालीबानी म्हणु शकतो...
धन्यवाद.

No comments:

Post a Comment