Wednesday, May 18, 2011

कादंब-यांच्या जन्मकथा: डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर


Death Of The Primeminister ( Marathi )


Death Of The Prime Minister ( English )

ही कादंबरी मी जेंव्हा लिहिली तेंव्हा अवघ्या विशीत होतो. इंदिराजींची नुकतीच हत्त्या झाली होती. आपल्याकडे अफवा-बोलवा पसरवण्याचे प्रमाण कमी नाही आणि अनेकदा ते फ्यंटसीलाही लाजवेल एवढे कल्पक होते. जेंव्हा जक्कल-सुतारला फाशी दिली गेली त्यानंतर अफवा पसरली होती कि त्यांना फाशी दिलेलीच नाही उलट त्यांच्या अपार खुनशी बुद्धीमत्तेचा वापर करून घेण्यासाठी भारत सरकारने त्यांना पाकिस्तानात घुसवले आहे आणि तेथे त्यांच्याकरवी घातपात केले जाणार आहेत. फाशी दिली ही हुलच आहे. त्यावर विश्वास ठेवणारे कमी नव्हते आणि त्यात मीही एक होतो.

तर इंदिराजींची हत्त्या झाल्यानंतर अशीच अफवा पसरली कि आपली हत्त्या झाल्याचे नाटक इंदिराजींनी मुद्दाम केले असून ही विरोधक आणि खलिस्तानी दहशतवाद्यांना शह  देण्याची चाल आहे. प्रत्यक्षात ज्या स्त्रीवर गोळ्या झाडल्या गेल्या त्या इंदिराजींच्या डमी होत्या. इंदिराजींच्य ३ डमी असून धोकेदायक ठिकाणी जातांना त्या या डमींचा वापर करत असत. होती कि नाही फ्यांटास्टिक अफवा.

तत्पुर्वी माझ्या काही सामाजिक कादंब-या प्रसिद्ध झाल्या होत्या. मला फ्यंटसी आणि थराराचे आकर्षण होतेच. मी या अफवेचा वापर करत मराठीतील पहिलीच (फक्त माझी नव्हे) राजकीय थरारकथा लिहिली. याचे नामकरण मी "जेंव्हा पंतप्रधान मारले जातात..." असे केले होते पण माझ्या मित्रांनी मला इंग्रजी टायटल द्यावे असे सुचवले आणि मग हे "डेथ ऑफ  द प्राइम मिनिस्टर" हे नामकरण सिद्ध झाले.

या कादंबरीने माझी ओळख थरार-कादंबरीकार अशी झाली. तिच्या पुढे अनेक आव्रुत्त्याही झाल्या. एवढेच नव्हे तर नंतर मी जवळपास २०-२२ राजकीय-आंतरराष्ट्रीय थरार कादंब-या लिहिल्या आणि त्याही खूप नावाजल्या गेल्या. काही इंग्रजीतही प्रसिद्ध झाल्या.


या प्रस्तूत कादंबरीचे इंग्रजी भाषांतर पुढे पत्रकार कामिल पारखे यांनी केले. तेही प्रसिद्ध झाले. तोवर इंग्रजीतील रहस्य-थरार-गुढ कादंब-यांची कथानके मराठी रुप घेऊन अवतरत होती. पण मराठी थरार कादंबरी इंग्रजीत जाण्याची ही पहिलीच घटना होती. याचे खूप कौतुक झाले. समिक्षक रविप्रकाश कुलकर्णी यांनी यावर लोकप्रभामद्धे विस्तृत लेख लिहून दादही दिली. इंग्रजी व्रुत्तपत्त्रांनी मराठीचा लुडलुम अशी प्रशंसाही केली.

अर्थात या कादंबरीपुरता तरी मी एवढ्या प्रशंसेला लायक नव्हतो. आज वळुन पहातांना या कादंबरीतील त्रुटी ठळकपणे जाणवतात. मी तेंव्हा हिंदी व्रुत्तपत्त्रात काम करत असल्याने माझी मराठी बिघडल्याचे चित्र या कादंबरीत जाणवते. थरार शैली ज्या पद्धतीने विकसीत असायला हवी होती तसे यात नाही. अर्थात ही माझी पहिलीच थरार कादंबरी होती आणि राजकारणाचे सुक्ष्म धागे जेवढे मांडायला हवे होते त्यात मी अपयशी ठरलो. पुढे मी हळुहळु शिकत गेलो.

या कादंबरीने मराठीत जरी राजकीय थरारकथांचे नवे दालन उघडले गेले असले तरी सामंतांचा अपवाद वगळता त्यात लेखकांची फारशी भर पडली नाही.त्यामागे अनेक कारणे आहेत. मराठी समिक्षक अशा कादंब-याना मुळात साहित्य मानत नाहीत हे एक आणि बव्हंशी मराठी लेखकांचे मनोविश्व-अनुभवविश्व पराकोटीचे मर्यादित असते हेही एक.

पण वाचकांना आनंद देता आला हेही नसे थोडके!

1 comment:

  1. Sir, looking forward for 'जन्मकथा'of Savyasachi & Mahadwar....
    As I think Sharad Mahabal is alter ego of Sanjay Sonawani.(May be I'm wrong).

    ReplyDelete