Wednesday, May 4, 2011

साहित्त्यिकाचे मुलभूत प्रश्न...!

ओंकार कुलकर्णी यांना काही मुलभुत प्रश्न पडले आहेत आणि ते महत्वाचे आहेतच. त्यावरील माझी सलग प्रतिक्रिया सर्वांच्या सोयीसाठी. आधी त्यांचे प्रश्न असून त्याखाली माझे विचार आहेत. ही एक चांगली चर्चा असल्याने त्यात सहभाग वाढावा हीच सदिच्छा.


onkar arvind kulkarni yanchi mool note sandarbhasathee...
लेखन करताना मला पडलेले काही प्रश्न -

1. मुळात व्यक्त होण्याला आपल्या आयुष्यात काय संदर्भ आहे ?
2. व्यक्त होण्याला दुसरा चांगला पर्याय काय ?
... 3. संवाद आला की पॉलिटिक्स बाय डिफॉल्ट शिरकाव करते. स्वतःचा स्वतःशी संवाद पॉलिटिकल नसतो का ?
4. ज्यासाठी लिहायचे व ज्यांच्यासमोर ते आणायचे यांच्यामधले आपण एका निगमासारखे (टेलिफोन एक्स्चेंज / हब) 'केवळ असणे' महत्वाचे की आपल्याला या खेळात किंगमेकरचा दर्जा आहे ?
5. जर का आपण खेळामधले नामधारी गॉड असू आणि लेखन प्रसिध्द झाल्या क्षणी लेखक म्हणून जर का आपला तात्काळ मृत्यू होत असेल तर अंतिम लेखन अशी काय चिज अस्तित्वात आहे की नाही ?
6. आपण स्व ची रुपे - प्रारुपे मांडणे ही कार्यसिध्दी मानल्यास या लेखनाचे संप्रेषण व स्वीकार हा अतिशय निसरडा मामला होत नाही का ?
7. स्व आणि विश्व यांना एकमेकांचे कोंदण देणे अथवा न देणे आणि या परस्परसंबंधावर लेखन करणे हे ''आरश्यात आरसा'' या टाईपचे अगणित, अमर्यादित स्व व विश्वे निर्माण करण्यासारखे खूळ तर होत नाही ना ?

यातील 7 व्या प्रश्नाला धरुन मी सध्या पुढे जात आहे. जे जगणे अनुभवायचे ते तर सगळ्यांनी पाहिले आहे. (तसे आहे म्हणूनच आपल्या लेखनाला सच्चेपणाची पावती मिळते.) असे जे सगळयांनी यूज केलेले जगणे ते स्वच्या अनुभवाच्या पातळीवर मात्र धादांत नवे ! त्यातील सुख दुःखे, चटके, टक्के टोणपे हे सारंच प्रथमोपात्त. आणि शैलीच्या लेव्हलवर बोलायचे तर काहीच नवे नाही. उत्स्फूर्त नाही. मग हे लेखन म्हणजे तरी काय ? केवळ बौध्दिक कक्षा रुंदावण्याचा एक विशुध्द एक्सरसाईझ म्हणावा तर ''जी गोष्ट माहीत नाही तिचा माईंडला अनुभव नाही आणि जिचा अनुभव नाही ती गोष्ट माहीत नाही - हा चिकन-एग प्रश्न आहेच.

लेखक-वाचक जन हो आपले काय मत

SANJAY SONAWANI STATES:

प्रश्न मुलभूत आहेत आणि विचार करण्यासारखेच आहेत. हा सारा मामला तत्वद्न्यानाशी येवून भिडतो. व्यक्त होणे ही मुळत मानसाची मुलभुत गरज (innate need) आहे...ती नसती तर भाषा-कला-विद्न्यान-धर्मादि मुळात विकसीत करण्याची गरज आदिमानवालाच वाटली नसती आणि आज आपण ही चर्चा करायलाही नसतो. व्यक्त होण्याला पर्याय काय तर याचे उत्तर आहे मुळात हा प्रश्न जेंव्हा मनात निर्माण होतो तीच अभिव्यक्तीच असते. प्रश्न पडने हे व्यक्त होण्याचेच लक्षण आहे. तिसरे असे कि स्वत:चाच स्वता:शी होणारा संवाद...पोलिटीकल असतो का...तर उत्तर आहे होय. मनुष्य स्वत:लाही फसवत असतो वा स्वत:बद्द्ल खरे नसलेले समज करुन घेत असतो वा अभिव्यक्तिमार्फत स्वत:ची विभ्रमी प्रतिमा निर्माण करत असतो...आणि हे सारे पोलिटिकलच आहे. चवथे म्हनजे आपण केवळ एक हब आहोत कि किंगमेकर...प्रत्येकजण त्याच्या त्याच्या पातळीवर हबच असतो. कारण लेखक कधीही स्वतंत्र नसतो तर त्या-त्या परिप्रेक्षातच त्याची वैचारिक आवर्तने असतात...आदिमानवावर कादंबरी लिहायचे ठरवले तर केवढी पंचाईत होवून जाईल? कारण त्याची मनोभुमिका समजणे अशक्यप्राय आहे. कल्पनेच्या डोला-याने कदाचित ती सजवता येईलही कदाचित...पण ती अवास्तव आणि अनैसर्गिकच असेल....कारण मनोवस्था काहीकेल्या वर्तमानाचे संदर्भ सोडु शकणार नाही. म्हणजे आपण हबच असतो...किंगमेकर नव्हे.

पाचवे म्हनजे खरे तर कल्पना सुचते तोच क्षण असतो निर्मितीचा...पुढची सारी हमाली असते. त्यामुळे लेखन प्रसिद्ध झाल्याक्षणी लेखकाचा म्रुत्यु होत नसतो तर ज्या क्षणी कल्पना सुचते त्याच क्षणी त्याचा म्रुत्यु झालेला असतो. पण एका कल्पनेशी मानवी जीवन संपत नसल्याने पुनरपी लेखकीय जननं सुरुच रहाते. मानवी मन हे पुन्हा सातत्याने कल्पनांच्या मुक्त अवकाशात विहरत असल्याने अंतिम लेखन ही गोष्ट आस्तित्त्वात असु शकत नाही. लिहितो तोच लेखक असेही नाही. लिहिणारा जरा जास्त हमाली करतो असेच फारतर म्हणता येईल.

मुळात लेखन वाचले जावे यासाठी लेखक लिहितो. लिहुन झाल्यावर व ते एकदाचे प्रसिद्ध झाल्यावर नाळ तुटली असे सहजी होत नाही. फक्त "स्व" ची प्रारुपे मांडली म्हणजे कार्यसिद्धी झाली हे लेखनापुरते खरे आहे. त्याचा स्वीकार करणारे वा न करणारे वा प्रतिक्रियाहीन होणारे वाचक हा तरीही लेखकावर एकुणात प्रभाव टाकणारा घटक असतोच. आणि लेखकाला या प्रतिक्रियांच्या मंडपाखालुन जावेच लागते. त्यामुळे तो निसरडा मामला नसुन वाचकीय अभिव्यक्तीच्या परिप्रेक्षातच लेखक घदतो...त्याला तसे फारसे स्वातंत्र्य नसते. ऊदा. हजारो वर्ष महाकाव्यांनी जगभर राज्य केले...महाकाव्यांची शैली जावून क्रमश: गद्य आले...लेखकांनी अभिव्यक्तीची पद्धत बदलली. त्यामुळे लेखक कि वाचक...कोण श्रेष्ठ असा प्रश्न विचारला तर लेखकांची पंचाईत होवून जाते ती यामुळेच.

तुमचा शेवटचा प्रश्न आहे कि "स्व आणि विश्व यांना एकमेकांचे कोंदण देणे अथवा न देणे आणि या परस्परसंबंधावर लेखन करणे हे ''आरश्यात आरसा'' या टाईपचे अगणित, अमर्यादित स्व व विश्वे निर्माण करण्यासारखे खूळ तर होत नाही ना ?" खरे तर हा प्रश्न नसुन उत्तरच आहे. मुळात खूळ असते म्हणुन लेखक बनतो. आणि कोणतीही कलाक्रुती ही आरशात आरसा अह्सीच असते आणि स्व आणि विश्व यातील परस्परसंबंधांचा त्याची क्रुती हा धांडोळा असते...आरसा मळकट असु शकतो...तसाच चकचकीतही...ते लेखकाचे व्यक्तिगत यशापयश म्हणता येईल, पण मतितार्थ तोच आहे.

शेवटी स्व पुरते जगणे हे नित्य नवेच असते. अनुभव अभिनवच असतात. जगणे हे युज्ड आहे हे खरेच...पण प्रत्येक जीव हेच मुळात स्वतंत्र आस्तित्व असल्याने ते युज्ड बनत नसुन विष्वात काहीच नवे नाही आणि तरीही नित्य नवे आहे हा अनुभव येतो. "मी आणि विश्व यात मी बघणारा आहे आणि विश्वही मला बघत आहे...हा विभेद तेंव्हाच नष्ट होतो जेंव्हा बघनारा आणि पाहिला जानारा एकाकार होतो." (ब्रह्मसुत्र) असे जेंव्हा होते तेंव्हा माणसाची अभिव्यक्तीची आदिम गरजच नष्ट होते...मग कसला लेखक आणि कसला वाचक?
लेखकाला लिहावे वाटते म्हणुन लेखक लिहितो आणि वाचकाला वाचायला आवडते म्हणुन वाचक वाचतो. वाचकाला असंख्य लेखकीय पर्याय असतात...लेखकाचे तसे नसते. वाचकच नसेल तर लेखक येणार कोठुन? लेखक आणि वाचक मिळुन समग्र साहित्य-समाज बनतो...तेंव्हा श्रेश्ठ-कनिष्ठत्वाच्या भावना तारतम्यानेच घ्याव्या लागतात.
ऒंकार, असे गहन प्रश्न पडणे ही तुमच्या सर्जनशील मनाची उत्कट झेप आहे. मला खात्री आहे तुम्ही खुप मोठे लेखक बनाल. माझ्या शुभेछ्छा.

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...