Wednesday, April 2, 2014

निवडणूक...कोंग्रेस आणि भाजप!

सध्याची निवडणुकीची जी रणधुमाळी चालू आहे त्यावरून खालील बाबी लक्षात येतात.
१) मोदी हे पक्षापेक्षा मोठे झालेले आहेत...किंवा तसे दाखवण्यात ते यशस्वी होत आहेत.लोकशाहीसाठी हा अनिष्ट संकेत आहे.
२) गुजरातच्या विकासाचा फुगा फुटू लागला असून लोकांना वास्तव समजू लागले आहे.
३) मोदींची हवा एवढी मोठी होती तर इतर पक्षांची मदत अथवा इंपोर्टेड नेत्यांची भाजपाला गरज भासली नसती...खरे तर मोदींनाच मत तर इतरत्र दगडही उभे केले तरी चालू शकले असते...पण तसे वास्तव दिसत नाही. म्हणजे मोदी हा गुब्बारा आहे हे भाजपाच्या अंतस्थ वर्तुळाला माहित आहे.
४) त्यामानाने कोंग्रेस धिमी पण एकदिश आगेकुच करत आहे हे दर वेळच्या कथित का होईना पण सर्वेक्षनांनी कबूल केले आहे.
५) भाजपाचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध झाल्यानंतर मी दोघांची तुलना करणारा स्वतंत्र लेख लिहिलच, पण कोंग्रेसचा जाहीरनामा हा विकेंद्रीकरण (सत्ता आणि उद्योग) यावर भर देणारा आहे. राजकीय व आर्थिक लोकशाहीशी अत्यंत सुसंगत अशी ती भूमिका आहे.
६) आप आणि राज हे कोंग्रेसलाच मदत करणारे सहाय्यक घटक ठरतील अशी चिन्हे दिसत आहेत. कोंग्रेसने राजकीय डावपेचात भाजपला मात दिलेली आहे.
७) भाजपच्या तुलनेत कोंग्रेस आणि त्याचे घटकपक्ष यांत अधिक समन्वय व एकोपा या वेळीस दिसतो आहे. त्याचा फायदा कोंग्रेसला होईल असे दिसते.
८) मोदींना आक्टोबर-नोव्हेंबरमद्धे (वर्षभर आधी नव्हे) पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले असते तर कदाचित भाजपला अपेक्षित यश मिळालेही असते. या देशात कोना
चीही हवा इतका प्रदिर्घ काळ, आणि पुन्हा तेच ते बोलून टिकवता येत नाही हे लक्षात न घेण्यात भाजपने धोरणात्मक चूक केलेली आहे.

6 comments:

 1. निवडणुकीत सर्व पक्षांना शुभेच्छा

  ReplyDelete
 2. आप्पा - निवडणुकीचे जाहीरनामे म्हणजे कोणती उपमा सुचते का रे बाप्पा तुला ?
  बाप्पा - उपमा वगैरे नाही पण चक्क थापेबाजी असते , दरवर्षी काठावर पास होणारा मुलगा आईला म्हणतो ना तसेच ! आता पुढच्या वेळेस पैकीच्या पैकी !
  हा सर्व खेळच खोटा ,
  नाही आनंदा तोटा - विनोबा म्हणायचे " निवडणूक नावाचा खेळ खेळा " !
  आप्पा - अरे अस वाटत ते जाहीरनामे ऐकताना की किती सहृदयी नेते आहेत आपले , किती आपली काळजी वाटते संतांपेक्षाही थोर ! सगळेजण आपली इतकी काळजी घेतात आणि आपण त्याना उगीचच नावे ठेवत असतो !आपण किती नशीबवान !आपला देश किती नशीबवान !
  बाप्पा - हा तर चालता बोलता देव लोकच ! आपल्यासारखे दळभद्री आपणच !
  आप्पा - पंजा असो , कमळ असो , किंवा खराटा , विळा कोयता सगळे आपल्या प्रजेच्या दुःखाने अस्वस्थ झाले आहेत आणि भीष्म प्रतिज्ञा करत आहेत
  बाप्पा - अरे पण मागे अनेकदा असेच झाले होते , हेच नेते , हेच पक्ष आणि हेच शब्द !
  आप्पा - तो खराटे वाला पण तसाच
  बाप्पा - आपल्याला तर सुरवातीपासूनचे आठवतंय ते मेळे ,प्रभात फेऱ्या !
  आप्पा - परवा कुणीतरी या सर्व प्रकाराला उत्सवच म्हटले
  बाप्पा - खरच , आपण नाहीतरी गणपती बाप्पालापण म्हणतोच - पुढच्या वर्षी लवकर या !

  ReplyDelete
 3. विषय उत्तम मांडला आहे अगदी खोलात जाउन सुरवात करुया !निवडणुका म्हणजे पक्षीय राजकारण आणि त्यात कोण भाग घेते ?बाबा आमटे ? विनोबा भावे ? डॉ बंग ?
  नाही ! कधीच नाही !
  त्यांचे क्षेत्र समाजसेवा आहे !
  निवडणुकीच्या सर्कस मध्ये भाग घेणारे हेच माध्यम का निवडतात ?त्याना समाजाचा उत्कर्ष हवा असेल तर दुसरे अनेक मार्ग आहेत ,पण त्याना समाजसेवा फक्त भाषणबाजीसाठी हवी असते !
  राजकारण हे सत्तेसाठी चालते पण तोंडाने अखंड लोकांची काळजी असल्याचा आव आणत सत्तेची भूक असलेले कावळे इथे जमा होतात ,एकमेकांवर चोचा मारत इथे सत्ता आणि महत्वाकांक्षा यांचा नंगा नाच चालू असतो ,
  पण प्रश्न असा पडतो की स्वभाव महात्वाकांशी असणे काही चूक नाही ,तर मग या राजकारणी लोकाना इतके बदनाम का धरले जाते ?त्याचे कारण ,विकासाच्या नावाखाली आपली सत्तेची भूक हे भागवत असतात , त्यांचे खरे लक्ष विकास नसतेच , टक्केवारी हाच त्यांचा जीवनाचा कणा असतो
  एसेम जोशी आणि मधु दंडवते ,लाल बहादूर शास्त्री आणि मधु लिमये असे पक्षाच्या सीमा पार करत लोकप्रिय होत केवळ तत्वांचे राजकारण करणारे अनेक होऊन गेले पण त्यांचे या आधाशी राजकारणात काहीच चालले नाही ,
  मधु दंडवते आणि शास्त्री हे तर रेल्वेमंत्री होते ! पण एखादया सिद्धांताला अपवाद असल्या सारखे !
  आज भ्रष्टाचार हा आपल्या राजकारणाचा कणा आहे आणि हे चित्र अजिबात बदलणार नाही !
  ठराविक रिसोर्सेस आणि खाणारी तोंडे अफाट , अशा खेचाखेचीत परकीय घुसखोरांची इथे पक्षीय राजकारणामुळे पद्धतशीर भरती होत असताना आपण कोणत्या तोंडाने भारतमाता आणि इतर भावनिक आवाहने करत असतो तेच उलगडत नाही !त्यातूनच मुलतत्ववादी लोकाना फूस मिळते !आता या देशात एकही भगतसिंग होणार नाही एकही शिरीषकुमार होणार नाही किंवा एकही सुभाषचंद्र होणार नाही - यापुढे इथे दुसऱ्याला हाकलून आपली सुबत्ता जपण्याचे राजकारण होणार !कारण मोजके रिसोर्सेस असताना ते आपल्याच हातात राहावेत म्हणून सर्व प्रकारचे राजकारण होत रहाणार ,पाण्यासाठी , जमिनीसाठी , शुद्ध हवेसाठी , शिक्षणासाठी , आरोग्यासाठी , धर्म आणि जात हे हत्यार वापरत , लोकाना एकत्र आणत , सुडाचे राजकारण होत रहाणार , हे सांगायला काही कोणा ज्योतिषाची गरज नाही !
  त्यानंतरची पायरी कोणती असेल ?
  म्हणून तर विवेकी लोक , सच्चाईने जगू ईच्छिणारे , आणि द्वेषाच्या भरकटलेल्या समाजमनाला विटलेले सर्व सुजाण लोक भारतमातेला शेवटचा सलाम करत इथून कायमची पाठ फिरवत दूरदेशी जात आहेत !याला जबाबदार कोण , तर इथले गलिच्छ समाजकारण आणि राजकारण !इथे हे असेच चालणार , डोंगरांच्या रांगाच्या रांगा पोखरून , सुपीक जमिनींचा कस शोषून शोषून सर्व प्रकारे शोषण होत राहणार !जमिनीचे , वनश्रीचे , नद्या आणि सरोवरांचे , आणि त्याला जबाबदार असलेले उंच मनोऱ्यात बसून वाताहत झालेल्या असंघटीत समाजावर राज्य करणार आणि स्थलांतरीत भारतीयांवर आगपाखड करत उरलेल्या जनतेला चकवत बसणार - हेच आजचे राजकारण आहे !मग ते मोडी असोत , ठाकरे असोत गांधी असोत नाहीतर केजरीवाल असोत !कोणी सिस्टिमला दोष देणार तर कुणी ब्राह्मण आणि मनुवाद असले गुळगुळीत झालेले शब्द वापरत सर्व रोष कुठेतरी रिकामा करण्याचे तंत्र वापरत राहणार !
  जे देश सोडून गेले ते काही सुखाने गेले नाहीत , त्याना हे सर्व असह्य झाले म्हणून ते गेले

  ReplyDelete
 4. विकास आणि इतिहास

  धर्मनिरपेक्षतेचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शाही इमाम बुखारींची भेट घेऊन आपले 'खायचे दात' दाखवून दिले होते. तोच कित्ता गिरवित भारतीय जनता पक्षानेही आपल्या जाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून विकासपुरुषाच्या मनात लपलेले हिंदुत्व मतदारांना हळूच दाखवून दिले. आर्थिक सुधारणा आणि देशाला जगात महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याच्या गप्पा करणारे दोन्ही पक्ष अखेर धार्मिकतेची नखे बाहेर काढतात, हे दुर्दैवी आहे. पक्षाने नरेंद्र मोदी यांना गेले काही महिने विकासाचा चेहरा म्हणून समोर केले. त्याला अनुसरून आर्थिक सुधारणांपासून तर गूड्स अँड सर्व्हिस टॅक्सपर्यंतच्या मुद्यांची चर्चा जाहीरनाम्यात केली आहे. मात्र त्याचवेळी भाजपच्या मूळ चेहऱ्याची ओळख पुसली जाणार नाही, याचीही काळजी घेतली आहे. राम मंदिराचे बांधकाम, गायीचे रक्षण, भारतीय संस्कृती-परंपरांचे स्मरण, ३७०वे कलम आणि समान नागरी कायद्याचा उल्लेख करून भाजपने आपला परंपरागत मतदार विकासाच्या आवरणामुळे बिथरणार नाही, याची पुरेपूर काळजी घेती आहे. विविध प्रकारची अनुदाने, अन्नसुरक्षा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा आणि एफडीआय ही भाजपच्या काँग्रेसवरील टीकेची प्रमुख शस्त्रे होती. भाजपच्या जाहीरनाम्यात या सर्व प्रमुख मुद्यांविषयी मोघम भूमिका घेण्यात आली आहे. यूपीए सरकारवरील भाजपच्या टीकेत आर्थिक धोरणांची चिरफाड हा प्रमुख मुद्दा होता; मात्र सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणूक, खासगीकरण, मार्केट इकॉनॉमी, कामगार कायदे याबाबत स्पष्टपणे काही सांगितलेले नाही. 'एक भारत, श्रेष्ठ भारत' आणि 'सबका साथ, सबका विकास' या दोन घोषवाक्यांसह सादर झालेल्या या जाहीरनाम्यात टॅलेन्ट, टुरिझम, ट्रेड, ट्रॅडिशन आणि टेक्नॉलॉजी या पाच 'टीं'वर भर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यापैकी चार 'टीं'बाबत मतभेद असण्याचे कारण नाही; मात्र ट्रॅडिशन अर्थात परंपरा जपण्याच्या नावाखाली पक्षाच्या मनात काय आहे ते अधिक स्पष्ट व्हायला हवे होते. भाजपचा आणि खुद्द नरेंद्र मोदी यांचा इतिहास पाहता ते आवश्यक आहे.

  एकूण हा जाहीरनामा पाहिला तर नवे काही करण्याऐवजी आहे तेच सुधारण्याचा प्रयत्न होणार असल्याचे भाजपने सूचित केले आहे. आपला केवळ रिटेलमधील एफडीआयला विरोध असल्याचे स्पष्ट करीत विदेशी गुंतवणुकीचे आताचेच धोरण राबविण्याचे संकेत पक्ष देतो. भाजपच्या करविषयक सुधारणांविषयी हास्यास्पद दावे सोशल नेटवर्कवर सुरू आहेत. पक्षाच्या जाहीरनाम्यात मात्र करविषयक दहशतवाद संपविण्यात येईल, असा मोघम उल्लेख आहे. जमीन अधिग्रहण कायद्याच्या विरोधात पक्षाने रान उठवले होते; परंतु केवळ नापीक जमिनीचे अधिग्रहण करण्याविषयीची सुधारणा या कायद्यात करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. एखादी जमीन नापीक किंवा नॉन अॅग्रिकल्चर ठरवणे या देशात किती सोपे आहे, याचा अनुभव देश गेली कित्येक वर्षे घेत आहे. भ्रष्टाचारावर जाहीरनाम्यात भाष्य आहे; त्याला तसा अर्थ नाही कारण काँग्रेसला लालुप्रसाद हवे असतात आणि भाजपला येडियुरप्पा. तळागाळाच्या विकासाची काँग्रेसी स्वप्ने आणि परंपरा जपत, देशाला श्रेष्ठत्व मिळवून देण्याची भाषा करणारी, भाजप दाखवत असलेली, स्वप्ने अखेर भ्रष्टाचाराच्या दगडावर आदळून ठेचकाळतात. 'शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करू; मात्र गरज पडल्यास कठोर निर्णय घेऊ,' ही जाहीरनामाम्यात वापरलेली भाषा सत्ता सांभाळण्यातले वास्तव दाखवून देते. शत्रूला संपवून टाकण्याची भाषणबाजी करणाऱ्या मोदींच्या आक्रमकतेला भाळणाऱ्यांनीही हे लक्षात घेतले पाहिजे.
  ..............................................................................................................

  ReplyDelete
 5. मोदी विरुद्ध मोदी

  विजय चोरमारे

  सहा महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली. स्वतः मोदी यांनी आणि त्यांना पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसवण्यासाठी इरेला पेटलेल्या समर्थकांनी त्यांचे एक भव्य-दिव्य कटआऊट बनवले. त्या कटआऊटकडे मान वर करून पाहताना त्या कटआऊटच्या उंचीएवढी आपली उंची आहे, असे दस्तुरखुद्द मोदी यांना वाटू लागले. मानसिकदृष्ट्या त्या कटआऊटने त्यांचा ताबा घेतला आणि प्रत्येक विरोधी राजकीय घटनेकडे ते तुच्छतेने पाहू लागले.

  देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली आहेत. स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढ्यामध्ये मोदी आणि त्यांच्या पूर्वजांपैकी कुणीही नव्हते. स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्षांहून अधिक काळ काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसचे सरकार असतानाच पाकिस्तान, चीनबरोबरची युद्धे झाली. पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याता भारताचा पुढाकार होता आणि काँग्रेस सत्तेवर असतानाच ते घडले. मोदी भाषणांमध्ये भारतीय सैनिकांचे शीर कापून नेल्याची आठवण करून पाकिस्तानला धडा शिकवण्याची दर्पोक्ती करतात. परंतु मोदींच्या पक्षाचे सरकार असताना कारगिल घडले आणि पाचशेहून अधिक भारतीय जवान शहीद झाले. काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना कारगिल शहीदांच्या शवपेट्यांच्या व्यवहारामध्ये घोटाळा आपल्याच पक्षाच्या सरकारच्या काळात झाल्याचे ते सोयीस्करपणे विसरतात.

  भारताने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीची उजळणी करण्यासाठी अनेक ग्रंथ लिहावे लागतील. गरिबी, निरक्षरता, आरोग्याचे प्रश्न, बेरोजगारी अशा अनेक समस्या आहेत आणि जगातील कुठल्याही राष्ट्रासमोर कमी-अधिक प्रमाणात याच समस्या आहेत. त्यामुळे भारत हा जगातला सर्वाधिक मागास देश आहे आणि त्याचा उद्धार करण्यासाठी नरेंद्र मोदी नावाचा महामानव कुठल्यातरी परक्या ग्रहावरून आला आहे, असे असा प्रचार केला जात आहे.

  गुजरात हा कुठलातरी स्वतंत्र देश आहे आणि त्याचे नंदनवन करून मोदी भारताच्या विकासासाठी पुढे आले आहेत वगैरे वगैरे. (गुजरातच्या सामाजिक विकासाचा पाया बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी घातला आहे, हेही लक्षात घ्यावे लागते. ज्या पायावर गुजरातच्या कथित विकासाचा डोलारा उभा आहे, त्या सरदार सरोवर प्रकल्पासाठी गुजरातमधील काँग्रेस सरकारने योगदान दिले आहे.) गुजरातमधील मानवविकासासंदर्भातील चर्चा गेल्या काही महिन्यांत होत असली तरी ठळकपणे ती लोकांसमोर येणार नाही, याची काळजी सगळीच प्रसारमाध्यमे घेत होती.

  आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गेल्या महिन्यात गुजरातचा दौरा केला आणि तिथल्या विकासाचे वास्तव लोकांसमोर आणले. हायवे चकचकीत आहेत, परंतु खुद्द नरेंद्र मोदींच्या मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. अडाणी आणि अंबानी या दोघांना केंद्रस्थानी ठेवून गुजरातचा विकास सुरू असल्याचे केजरीवाल यांनी पुराव्यानिशी मांडले आहे आणि त्याचा प्रतिवाद खुद्द मोदी किंवा भाजपच्या कुठल्याही नेत्या-कार्यकर्त्याने केलेला नाही. केजरीवालांना काँग्रेसचे दलाल म्हणून किंवा आम आदमी पक्षाला काँग्रेसची बी टीम म्हणून सुटका करून घेता येत नाही. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे कुणालाही देता आलेली नाहीत, हे वास्तव आहे. गुजरातमधल्या विकासाचे जे चित्र उभे केले जात आहे, ते भ्रामक असल्याचे त्यावरून सिद्ध झाले आहे.

  कॉर्पोरेट सेक्टरच्या मदतीने प्रचार आणि इमेज बिल्डिंगवर करोडो रुपये खर्च करून, प्रसारमाध्यमे विकत घेऊन मोदींनी दिल्लीचा रस्ता धरला आहे. हा रस्ता आपणच निवडला आहे आणि आपण ठरवलेय तिथपर्यंत पोहोचू शकतो, अशी घमेंड त्यांच्या देहबोलीतून आणि भाषणांतूनही दिसून येते. गुजरातसारख्या २६ जागा असलेल्या राज्याचे नेतृत्व करून देशाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहणे समजू शकते. असे स्वप्न कुणीही पाहू शकते. परंतु हे स्वप्न पाहताना एवढ्या विशाल देशाच्या आकांक्षा समजून घेण्याएवढे आपण प्रगल्भ आहोत का, असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला तरी उत्तर नकारार्थी येईल.

  दुष्काळाच्या काळात महाराष्ट्रातील गाई-गुरांसाठी दिलेल्या मदतीचे बिल पाठवणारा नेता देशाचे नेतृत्व कसे काय करू शकेल ? भाजपमध्ये अटलबिहारी वाजपेयींना विकासपुरूष आणि लालकृष्ण अडवाणींना लोहपुरूष म्हटले जाई. अर्थात नेत्यांना आकर्षक लेबले लावण्यात संघपरिवाराचा हात कुणी धरू शकणार नाही.

  contd....

  ReplyDelete
 6. मोदी यांनी त्यावर कडी करून विकासपुरुषही आपणच आणि लोहपुरूषही आपणच अशी प्रतिमा प्रसिद्धीवर करोडो रुपये खर्च करून निर्माण केली. मोदींसकट सगळे लोक एक गोष्ट विसरतात. बारा वर्षांपूर्वी भूकंपामुळे गुजरात उद्ध्वस्त झाला होता, तेव्हा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्याच्या पुनर्उभारणीची जबाबदारी शरद पवार यांच्यावर सोपवली होती. मोदी मुख्यमंत्री असताना राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली गुजरातची पुनर्उभारणी झाली, हा इतिहास फार जुना नाही.

  नव्वदच्या दशकात साध्वी ऋतुंभरा वगैरे फायरब्रँड वक्त्या भाजपच्या प्रचारात सक्रीय होत्या. त्यांच्या भाषणांना गर्दी व्हायची, परंतु त्यानंतर धार्मिक तेढ निर्माण व्हायची. त्यामुळे काही उमेदवारांना आपल्या मतदारसंघात त्यांची सभा व्हावी असे वाटायचे. तर त्यांनी आपल्या मतदारसंघात फिरकू नये, असे अनेकांना वाटायचे. आपल्याच पक्षातल्या एखाद्या उमेदवाराचा गेम करण्यासाठी त्याला न विचारता त्यांच्या मतदारसंघात ऋतुंभरा वगैरेंच्या सभा ठेवल्या जायच्या. कल्याण-डोंबिवलीमधून निवडून आलेल्या राम कापसे यांची खासदारकी नंतर अशा वादग्रस्त भाषणामुळेच रद्द झाली होती.

  कापसे यांच्यासारख्या मवाळ प्रकृतीच्या खासदाराच्या मतदारसंघात गरज नसताना या सभेचे आयोजन त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी केले होते. आताच्या निवडणुकीत मोदींच्या सभा गर्दी खेचत असल्या तरी आपल्या मतदारसंघात मोदींची सभा होऊ नये, यासाठी नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेतेही देव पाण्यात घालून बसले आहेत. मोदींची सभा झाल्यास सौहार्द बिघडेल आणि अल्पसंख्य समाजाची मते जातील, ही भीती मुंडे-गडकरी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनाही वाटते. मोदी हे सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन जाऊ शकत नाहीत, यावर शिक्कामोर्तब करणारेच हे वास्तव आहे.

  भारतीय जनता पक्षात मोदींच्या विरोधात एक गट आकार घेऊ लागला आहे, हे त्याचेच निदर्शक आहे. क्लब १६० कल्पनेचा उगम त्यातूच झाला आहे. मोदी पंतप्रधान झाल्यास उपपंतप्रधानपदी सुषमा स्वराज की अरुण जेटली यांची निवड होणार याची चर्चा आधीच सुरू करण्यात आली आहे. एनडीएला २७२ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी सुषमा स्वराज किंवा लालकृष्ण अडवाणी यांचा पर्याय पुढे आणावा लागेल आणि तसेच व्हावे, असे वाटणारा मोठा वर्ग भाजपमध्ये आहे.

  प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियाचा वापर करून नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिमा भव्य पोस्टरसारखी बनवली आहे. त्यांना स्वतःलाही आपण तेवढे उंच झाल्यासारखे वाटू लागले आहे आणि स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात ते अडकून पडले आहेत. पोस्टरच्या उंचीवरून खाली उतरण्याची त्यांची तयारी नाही त्यामुळेच अबकी बार मोदी सरकार ही त्यांची प्रचाराची मोहीम टिंगलटवाळीचा विषय बनली आहे.
  ............................................................................................................

  ReplyDelete