Wednesday, April 30, 2014

या देशाच्या महान परंपरांचा.....

संवेदनशीलता पराकोटीची हरवत चालली आहे. प्रेमांतून माणुसकीचे, कुसूमकोमल भावनांचे मळे फुलायचे तेथे प्रेमिकांनाच ठार मारले जात विषाक्त भावनांना खत घातले जात आहे. मी "उच्च...मी उच्च" असा जयघोष करणारे महानीच लोक ज्या समाजाने प्रसवलेत त्या समाजाला याची जराशीही शरम वाटत नाही याचीच शरम अधिक वाटते.

जागतिकीकरणानंतर, माहितीचे विस्फोट अधिक व्हायला लागल्यानंतर, जग हे खेडे झाले असे म्हणत, आम्ही होतो तेही खेडे आम्हीच घालवले. आधी गांव जरा बरे होते. माणुसकीची सावली होते. शहरेही खेडूतपणाला आपल्या शुचिर्भुततेत जपत होते. कोणाच्या घरचा पोरगा कोणाच्या घरात जेवून आला याची पर्वा कोणी करत नव्हते. कोणाच्या पोराचे कोणाच्या पोरीशी "झांगडू" चालू आहे याच्या दबक्या चर्चा असल्या तरी कोणाचा जीव घ्यावा ही अवदसा कोणाला आठवत नव्हती. कधीमधी थोड्याफार मारामा-या होत...पण पुन्हा गांवाची लय मूळ स्थितीत यायची. पार गांवच्या पाटलाच्या पोरींवरही आम्ही लाईन मारत असू, त्यांच्या सौदर्याच्या चर्चा करत असू, कधी प्रेमप्रकरणही व्हायचे,  पण डोक्यात दगड घालायला यावे अशी हिंस्त्रता पाटलातच काय...कोणातच नव्हती. जात एवढी महत्वाची मला तरी माझ्या २० वर्षांच्या गांवाकडील जीवनात कधी साधे जाणवलेही नाही.

जात नांवाचा एक प्रकार असतो आणि त्यावरून तुमचे सामाजिक स्थान ठरते याचा साक्षात्कार मी पुण्यात आल्यानंतर झाला. मी अवाक झालो. जाती-पातींचे ताणेबाणे काय असतात आणि तुमची लायकी काहीही असो ती ठरवण्याचे मापदंड केवळ जातीधारितच असतात याचे भान मला पुण्याने दिले.

खेड्यांची नक्कल शहरांनी दुर्दैवाने केली नाही...महान दुर्दैव म्हणजे शहरांची नक्कल खेड्यांनी केली. येथेच सारे फसले. गांवचा सौहार्दपूर्ण जीवनाच्या आत्म्याचा मुडदा तेथेच पडला. शहरी लोक "आम्ही कोठे जात=पात पाळतो?" म्हणत गांवातून शिकायला येणा-या पोरांना त्यांची व आपली जातच दाखवत राहिले. ते गांवाकडे गेले को आवर्जून जातीपातीच्या फालतू चवकशा करायला लागले. जातीय अहंकार तेही वाढवत गेले.

शहरांत जातीमुळे सांस्कृतिक मुडदे पडतात...
गावांत जातीमुळे शब्दश: मुडदे पाडले जातात...

एकूणात सारेच मुडदेफरास झालेत...

"या देशाच्या महान परंपरांचा पाईक असल्याचा मला अभिमान वाटतो!"  

1 comment:

  1. एक नंबर सर. सहमत. हाच अनुभव माझापण

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...