Tuesday, April 22, 2014

जीवनाला निर्वस्त्र भिडणारे ...!


मराठीत एके काळी उत्तमोत्तम इंग्रजी कादंब-या अनुवादित करण्याचे (आणि ढापण्याचेही) पेव फुटले होते. पाबळ (ता. शिरुर) येथील नेहरु वाचनालयात आणि धुळ्याच्या गरुड वाचनालयात मी अशा असंख्य कादंब-या वाचल्या. पण आज आठवतात अत्यंत मोजक्या. त्यातील एक म्हणजे "राक्षस" या नांवाने अनुवादित झालेली मुळ हर्मन मेल्व्हिल लिखित "मोबी डिक" ही कादंबरी. (याच कादंबरीचा मुलांसाठी साने गुरुजींनीही संक्षिप्त अनुवाद केला होता.) एका तरुण होतकरू खलाशाच्या नजरेतून लिहिली गेलेली ही कादंबरी. एका जहाजाचा कप्तान...एका निळ्या देवमाश्याने त्याचा पाय आणि त्याचा मुलगाही गिळलेला...सूडसंतप्त...काहीही करून त्या देवमाशाला शोधून त्याला ठार मारायचा प्रण केलेला...

कादंबरी संथ लयीत असली तरी एक शब्दही नजरेआड होऊ देत नाही. द्रुष्यात्मकता इतकी अचाट कि आजही "राक्षस" आठवली कि रोमांचित होतो. अनुवादकाचे मला नांव आठवत नाही...पण त्याचेही कसब पणाला लागलेले.  एकच शोध...निळा देवमासा शोधायचा आणि त्याचा खात्मा करायचा. या शोधात मानवी मनांतील अरण्ये आणि त्यातील प्रत्येक पात्राची सृष्ट-दुष्ट धाव....एक आंतरिक तर एक बाह्य तर कधी दोन्हीतही संघर्ष...

कोण यशस्वी होते या लढ्यात?

खरे तर कोणीही नाही. पण ही कादंबरी म्हणजे एकोणिसाव्या शतकातील एक सर्वोत्कृष्ठ मित्थकथा आहे. या कादंबरीलअ नोबेल मिळाले नाही...(चित्रपट मात्र निघाला तो मी पाहिलेला नाही) पण याच कादंबरीची भुतावळ अर्नेस्ट हेमिंग्वेंवर उतरली...आणि सिद्ध झाली एक अत्यंत छोटी पण महाकादंबरी....तिचे नांव "Old man & The Sea"! ही कादंबरी मोबी डिकची एकार्थाने प्यरोडी आहे. मोबी डिकचा अदृष्य पातळीवर वावरणारा तत्वज्ञानाचा जो गाभा आहे तोच पकडत हेमिंग्वेंनी एका पोराला आपल्या अजरामर जिद्दीचे दर्शन घडवण्यासाठी एक देवमासा मारायचा पराक्रम घडवत मृत देवमाशाला सांगाडा म्हणून का होईना, किनारी आणेपर्यंतचा  एका जर्जर वृद्धाचा संघर्ष टिपला. मानवी जिद्दीचे, अपयशांतीलही भव्यतेचे तत्वज्ञानात्मक अजरामर दर्शन घडवले. मेल्व्हिल काय...हेमिंग्वे काय...जीवनाला निर्वस्त्र भिडणारे साहित्यिक. 

पु.लं. नी "एका कोळियाने" नांवाने हेमिंग्वेचा अनुवाद कधीतरी साठ-पासठच्या दरम्यान नितांतसुंदर केला होता...ती आवृत्ती ९५-९६ सालापर्यंत तरी संपलेली नव्हती. "राक्षस" ची आवृत्ती परत काढावी असा माझा मानस होता...तोवर पाबळचे नेहरू वाच्नालय कोठे गेले याचा पत्ता लागला नाही...अन्यत्र शोधायचा प्रयत्न केला...यश आले नाही.

पण मला नेहमीच प्रश्न पडे...आमचे कोळी अशाच वेगळ्या प्रकारच्या का होईना जीवनानुभवांतून जात असतील. त्यांनी लिहिले असते तर? मी माझे (आता दिवंगत) मित्र प्रशांत पोखरकरांना कोकणात मासेमार वस्तीवर दोन-चार महिने, त्यांच्यासोबत मच्छीमार नौकांवर जात त्या अनुभ्वांतून, दंतकथांतून कादंबरी लिहायचा प्रस्ताव ठेवला होता. (अजुनही एक होता...पण त्याबद्दल नंतर...) अनिल जोशी या माझ्या रत्नागिरीतील पत्रकार मित्राने पोखरकरांसाठी मच्छीमारांच्या योग्य वस्त्या शोधल्याही होत्या...पण दुर्दैवाने पोखरकरांचा अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. राहिले ते राहिलेच! 

असो. "गतं न शोच्यं" असे म्हणतात. आजही मराठी किना-यांच्या थरारक कथा येवू शकतात...जीवनाचे सागरव्यापी रूप घेत!

4 comments:

 1. संजय सर ,
  आप्पा - गाढव म्हणा किंवा काहीही म्हणा
  बाप्पा - पण आम्ही लिहिणारच !सगळे जग कदाचित पु ल यांचे कौतुक करत असेल
  आप्पा - पण त्यांचे एका कोळियाने हे भाषांतर अत्यंत रद्दड आहे हे कुणीतरी सांगायलाच पाहिजे !
  बाप्पा - पु ल यांची जवळजवळ प्रत्येक ओळ आम्हाला तोंडपाठ आहे , पण त्यांची भाषांतरे फारच फसली आहेत हे मात्र निश्चित -निदान एका कोळियाने ते सिद्ध केले आहे !असे का होते ?
  आप्पा - तसे नाही बर का - त्यांनी ती फुलराणी फारच सुंदर केले !
  बाप्पा - पण माय फेयर लेडी त्याहून सरस आहे !पिग्म्यालीयन चे तर किती कौतुक करावे ?

  आप्पा - खलील जिब्रानचे काव्य असेच होते त्याचे भाषांतर कुणीतरी केले होते आपण लहान असताना ,कुणीतरी समाजवादी होता लेखक , पण भाषांतर सुद्धा इतके छान होते,मूळ नाव प्रोफेट असे होते आणि भाषांतरकाराचे नाव आठवत नाही !
  बाप्पा - त्या काळात सर्व मराठी लेखकांवर प्रभाव होताच इंग्रजी वाग्मयाचा ,प्र के अत्रे गडकरी बोरकर- अगदी आपले कुसुमाग्रज आणि त्यांचे नटसम्राट त्याला अपवाद नाहीत !
  आप्पा - खरेतर भाषांतर हा एक प्रचंड नाजूक विषय आहे त्यात तुमची वाग्मयिन प्रकृती आणि समज भाषांतराच्या आड येत असते ,तुम्हाला तो "विषय" किती समजला आणि तुम्हाला तो "लेखक" किती भावला याच्या आधाराने ते भाषांतर होत असते !
  बाप्पा - तसे पाहिले तर , तू मला एक सांग , भगवत्गीता आणि तिच्या वरील असंख्य टीका हे तरी काय आहे ?एकप्रकारे भाषांतर नाही का ?त्याची उत्पत्ती लावताना नकळत प्रत्येकाने आपल्या
  तत्वज्ञानाच्या समर्थनाचा आणि गीतेचा मिलाफ घालत हा पसारा सांभाळत नेला आहे !अगदी माउली पासून विनोबा पर्यंत तपासणी केली तर काय दिसते ?
  आप्पा - तू गाढव आहेस हेच दिसते !

  ReplyDelete
 2. राजकीय पारतंत्र्यता आणि तिचा वाग्मयीन निर्मितीवर होणारा परिणाम यांचापण एक अभ्यास झाला पाहिजे असे वाटते ,कारण ब्रिटीश काळात आपल्यासमोर जे लिखाण आले त्यानुसार आपला बाह्य जगताशी संबंध आला , पण समजा आपल्यावर पोर्तुगीजांनी राज्य केले असते तर ?आपल्याला युरोपियन जगताची अशी ओळख झाली असती का ?
  मी असे म्हणत नाही की ब्रिटीश राज्य हे देवाने आपल्यावर उपकार करण्यासाठी घडवले , पण इंग्रजांच्या सत्तेचा आपल्या लिखाणावर काय परिणाम झाला तेपण पाहिले पाहिजे त्याकाळात लिहिली गेलेली कविता ,नाटके आणि वैचारिक लिखाण यावर कोणाचा प्रभाव होता ?
  अजून न तुटलेली आध्यात्मिक घडी आणि वारसा , नवीन जगाची तोंड ओळख होताना मिळालेले इंग्रजी हे माध्यम याचा कसकसा परिणाम झाला ते बघण्यासारखे आहे !
  बर्नार्ड शा किंवा इतर लेखकांचे आपल्या वाग्मायीन चळवळीवर काय ठसे उमटले ते पण बघण्यासारखे आहे माधव ज्युलियन आणि सुनीते बघताना हे जाणवते !
  एकेकाळी सत्तेत असणाऱ्या लोकांशी घनिष्ट्पणा असल्यामुळे संस्कृत लेखक आणि कविना राजाश्रय मिळाला आणि प्राकृत निर्मिती हि दर्जेदार असूनही मागे राहिली , तसेच इंग्रजी हि विश्वभाषा ठरल्यामुळे तिला वाघिणीचे दूध म्हटले जाऊ लागले ,प्रत्येक उत्कृष्ट लेखन आधी इंग्रजीत भाषांतरीत होऊन मग जगात पसरले जात होते त्यातला मूळ कस किती हरवला हा पण एक चिंतनीय विषय आहे !
  असेच पूर्वी संस्कृत बाबत या उपखंडात घडले असेल , पण शब्द्छलाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे संस्कृतचे फार नुकसान झाले असे वाटते
  आधी विचार आणि मग व्याकरण असे असते का ? त्याचापण विचार करावासा वाटतो !
  आप्पा बाप्पा यांनी स्वतःलाच गाढव म्हणवून घ्यायचा विनोद हा नोंद घेण्यासारखा आहे !

  ReplyDelete
 3. आपले मध्यवर्ती प्रादेशिक वाग्मय आणि समुद्रकिनारचे पारंपारिक लिखाण आणि दंतकथा याचा अभ्यास फारच उद्बोधक होईल
  कोळी लोकांची पारंपारिक गाणी , त्यातील चेष्टेचा आणि भावनिक सूर तसेच सर्व जीवनाकडे आनंदाच्या भावनेने बघताना , त्याचे लोकगीतात उमटणारे पडसाद हे फारच सुरेख आहे
  कोकण किनारी गेले असताना दूर वरून जे संगीत ऐकू येते ते सर्व आसमंत भरून टाकते
  त्यातला ( भारतीय ? ) अस्सलपणा मन मोहून टाकतो त्यातील भाबडेपणा आपल्याला खरोखरच टाकतो आसपासचे जग झपाट्याने बदलत असताना हे लोक आपल्याच नादात दंग असतात आणि आपले सागरी जीवन आणि शेजारी बदलणारी दुनिया यातील संघर्ष अटळ दिसत असताना सुद्धा
  ते कधीही आक्रमक होताना दिसत नाहीत , हा या लोकांचा गोडवा आधुनिक माणसाना अवाक करतो !यांची देवी यांचा धर्म आणि जीवनमूल्ये अशी एका चोपडीत घटत बांधता येत नाहीत !
  यांचे तत्व ज्ञान फार फार थोर आहे आणि अगदी रोजच्या जीवनाशी निगडीत आहे !थोडेसे सैल असले तरी सर्व समावेशक आहे ह्याचे मोल करता येणार नाही !
  यांचे लिखाण फार नाही , पारंपारिक आहे , उद्बोधक नाही , आधुनिक लाटा इथ पर्यंत पोहोचत नाहीत , पण यांच्या वाद्य वस्तीत असणारा माणुसकीचा ओलावा इतर कुठेही दिसत नाही

  ReplyDelete
 4. संपूर्ण हेमिंग्वे चे लिखाण एका बाजूला आणि "Old man & The Sea" एका बाजूला
  असे अनेकांच्या बाबतीत घडते ,पु ल याना त्याचे भाषांतर अजिबात जमले नाही हे अत्यंत दुःखदायक सत्य आहे ,आधी कुणीतरी लिहिले आहे त्याप्रमाणे भाषांतर हा अवघड प्रकार आहे ,
  श्यामची आईचे भाषांतर कसे होईल ? आई हि संकल्पना इतर युरोपियन भाषेत किती उठावदार होईल ?इथे थोडासा संस्कृतीचा मुद्दा येतो !
  रशियात कम्युनिस्ट राजवटीत टोलस्टाय चेकोव्ह आणि गोर्कीचे इतके कौतुक आहे पण ते आधीच्या राज घराण्यांची सत्ता असताना झाले असते का ?
  रवींद्रनाथ समजा महाराष्ट्रात झाले असते तर त्यांच्या तरल काव्यरचनेला मराठमोळ्या मातीत किती उचलून धरले असते ? आपल्याकडे बहिणाबाई चौधरी प्रसिद्ध झाल्या तुकाराम आणि माउली याना एक स्थान आहे पण टागोरांचे कौतुक झाले असते का ? या मातीचा तो वारसा आहे का ?पोवाडा अभंग आणि लावणी या अंगाने पुढे जाणारी आपली कविता !त्याउलट क्रांतीकारकांची जन्मभूमी असलेल्या वंग भूमीत हे काव्य रुजले !याला अतिरेकी मानसिकता हीपण कारणीभूत आहे असे वाटते

  ReplyDelete