Tuesday, April 22, 2014

विधवांचे युद्ध !


महादजी शिंदे हे शिंदे घराण्यातील मुत्सद्दी आणि शुर योद्धे होते. परंतु ते निपुत्रिक वारल्याने दौलतराव शिंदेंना (महादजींचा पुतन्या) वारस नेमण्यात आले होते. तेंव्हा दौलतरावाचे वय होते अवघे १५ वर्ष. पण दौलतरावाच्या स्वभावामुळे शिंदेंचे एकनिष्ट सेनानी, विशेषता: लखोबादादा लाड नाराज झाले होते. ते महादजी शिंदेंचे विश्वासु सेनानी व मुत्सद्दी होते. दौलतरावानेही आधी त्यांची आपला उत्तरेतील मुत्सद्दी प्रतिनिधी म्हणुन नेमणूक केली होती. दौलतरावाचे धरसोडीचे धोरण त्याला पसंत पडत नव्हते. त्यात महादजी शिंदेंच्या दोन विधवाही (लक्ष्मीबाई आणि यमुनाबाई) दौलतरावाला खरा वारस मानायला तयार नव्हत्या. या दोन्ही विधवांना पाठबळ मिळाले ते या महादजींशी इमानदार असलेल्या अशा असंतुष्ट सेनानीचे. त्यातुन बराच काळ एक युद्ध पेटले होते त्याला विधवांचे युद्ध म्हणुन ओळखले जाते. हे युद्ध खुद्द दौलतराव शिंदेंच्या विरुद्ध होते. अर्थात विधवांची सैन्यशक्ती कमी होती. लखोबादादाचाच काय तो त्यांना आधार उरला होता. आपल्या विधवा मातांना युद्ध करायला भाग पाडणारा हा दौलतराव महावीर!

शिंद्यांची राजधानी उज्जैन येथे होती हे सर्वांना माहितच आहे. त्यावेळी उज्जैनला शिंद्यांचे फारसे लष्कर नव्हते. या विधवांच्या युद्धायमान भुमिकेमुळे यशवंतरावांना आयतीच संधी चालुन आली. 
लखोबादादाने यशवंतरावांना स्वता:हुन मदतीचे आमंत्रण दिले ते उज्जैनी जिंकुन देण्यासाठी.

यशवंतरावांनी उज्जैनवर चढाई केली. सहज जिंकली. महादजींच्या विधवांच्या ताब्यात दिली (मे 1799) तेथील धनाढ्यांकडुन युद्धखर्च म्हणुन खंडणी वसुल करायला सुरुवात केली. दरम्यान ही बातमी दौलतरावांपर्यंत पोहोचली. यशवंतराव एवढा आक्रमक असेल याची त्याने कल्पना केली नव्हती. पण मग धुर्त दौलतरावाने लगोलग चाल खेळली. त्याने आपल्या दोन्ही विधवा मातांशी तहाची बोलणी सुरु केली. कायमचा तोडगा निघतो असे दिसताच लाखवादादाचा विचार बदलला आणि यशवंतरावांना उज्जैन सोडण्याची विनंती केली. यशवंतरावांनी ती विनंती मानली आणि खंडणी वसुली थांबवून तेथील बाळोबा (बाळाराव) इंगळे सरदाराकडुन नाममात्र खंडणी वसुल केली आणि आपला मोहरा कोटा आणि हाडा या राज्यांकडे वळवला. हे दोन्ही प्रांत त्यांनी कमालीच्या तडफेने जिंकले आणि तेथुन खंड्णी वसुल केली.

दौलतराव खरेच इरसालपणाचा एक नमुना होता. त्याने यशवंतरावांना शिंदे जागीरीतुन दुर करण्यासाठी खेळलेली ती चाल होती. दौलतरावाने आपल्या मातांना संरक्षण आणि खर्चाची सारी व्यवस्था करण्याचे वचन दिले. एवढेच नव्हे तर सर्जेराव घाटगे या दुष्ट सरदाराला पुन्हा आश्रय देनार नाही असेही कबुल केले...

लखोबादादा मात्र इमानदारीत आता महादजींच्या विधवांवरील आरिष्ट टळले या भ्रमात होता आणि दौलतरावांच्या आद्न्या पाळत थांबला होता. पण तसे व्हायचे नव्हते. ४ जानेवारी १८०० रोजी दौलतरावाने सर्जेरावाला पुन्हा आपल्या दरबारात स्थान दिले. सर्जेराव हा अत्यंत क्रुर इसम. १४ जानेवारीच्या मध्यरात्री त्याच्या भाडोत्री मारेक-यांनी दोन्ही विधवांच्या निवासात घुसुन त्यांचा खुन करण्याचा प्रयत्न केला. त्यात यमुनाबाई ही विधवा गंभीर जखमी झाली...पण आरड्याओरड्याने पहारेकरी सावध झाले व काही मारेक-यांना पकडले गेले. त्यांनी खरा कट सांगितल्यावर लाखवा दादा हादरला. आपला धनी एवढा नीच आहे याची त्याने कल्पनाही केलेली नव्हती. आपल्यालाही कधीही अटक होवू शकते आणि मातोश्रींचे येथे काही खरे नाही याची जाण त्याला आली. वरकरणी काहीही न दाखवता, शेवटी त्याने दोघींसहित सुरक्षित पलायन केले आणि सरळ बुर्हानपुर गाठले. दरम्यान उज्जैन पुन्हा दौलतरावाच्या ताब्यात गेले होते. विधवांचा नाईलाज झाला. तेथुन या दोन्ही महिलांनी यशवंतरावांना पत्र पाठवून आपल्याला उज्जैन पुन्हा मिळवुन देण्याची विनवणी केली.

या दररम्यान ब-याच घटना घडल्या होत्या. यशवंतरावांनी परत जिंकुन घेतलेल्या टोक व रामपुरा या जहागिरी जनरल पेरोंने पुन्हा ताब्यात घेवुन जयपुर राज्याला जोडुन टाकल्या होत्या. जनरल पेरों हा दौलतरावांचा उत्तरेतील सरसेनापती. त्याने आपले महाल पुन्हा ताब्ब्यात घेतल्याच्या व्रुत्तामुळे यशवंतराव अस्वस्थ होते. शिंदेंना एक जबरी झटका देणे भाग होते. त्यांनी अत्यंत मुत्सद्दीपणे प्रथम लक्ष्मीबाई व यमुनाबाई या दोन्ही विधवांना सन्मानपुर्वक महेश्वरला बोलावुन घेतले. त्यांना १ लाख रुपये रोख व एक लाख रुपयाची वस्त्रे-अलंकार दिले. यानंतर त्यांच्याशी करार केला. या करारानुसार यशवंतरावांनी त्यांना महादजी शिंद्यांची उत्तरेतील जहागीर परत मिलवुन द्यायची होती. यासाठी ज्या लढाया कराव्या लागतील त्या खर्चासाठी विधवांनी ४ लाख रुपये द्यायचे होते.

ज्या युद्धातुन यशवंतरावांना अंग काढुन घ्यावे लागले होते त्यात त्यांना पुन्हा उतरावे लागले.


या युद्धात यशवंतराव पडण्याचे साधे कारण म्हणजे त्यांना शिंद्यांचा जमेल त्या पद्धतीने पाडाव करुन होलकरी सत्तेचा उत्तरेत अंम्मल बसवायचा होता. महादजींच्या विधवांबद्दल त्याला सहानुभुती असण्याचे काहीच कारण नव्हते कारण होळकरी राज्यावर महादजी शिंदेंनी आक्रमण करुन होळकरांचा अपराध केलेला होताच. हे त्यांच्या द्रुष्टीने फक्त राजकारण होते आणि आपली सत्ता बळकट करण्याचे साधन.

यशवंतरावांनी लक्ष्मीबाई व यमुनाबाईंना उज्जैनला सुखरुप पोहोचवले. थोडक्या लढाईत उज्जैन पुन्हा ताब्यात आली. तेथे पोहोचल्यावर चार लाख देण्याचा वायदा होता. परंतु या दोघींनी ते पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली. त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतीलही कदाचित...पण लोक सहानुभुती देणार...पैसे कोठुन? आणि सैन्य पोटावर चालते. बरीच वाट बघुनही पैसे मिलत नाहीत हे पाहिल्यावर मात्र यशवंतरावांचा संयम सुटला. वाट पहात कालापव्यय करणे त्यांच्या स्वभावात नव्हते. अन्यत्र तरी स्वा-या करुन धन उभे करावे हा मनसुबा झाला. त्यांनी आपल्या कर्नल प्लमेट याची प्रशिक्षित बटालियन बोलावुन घेतली. हे कळताच त्या दोघींना वाटले कि यशवंतराव आपल्यालाच अटक करणार...पण तसे नव्हते. बटालियन बोलावण्यामागील हेतु शिंद्यांचे महाल जिंकण्यासाठीची आक्रमने हा होता. पैसे त्यातुनच उभे राहनार होते. उज्जैन लुटायचे नाही हे त्यांनी आधीच ठरवलेले होतेच. या दोन बायांना अटक करायला बटालियनची गरजच काय होती? तसे करायचे असते तर त्यांना ते पुर्वीच कधीही करता आले असते. किंवा त्यांची बाजु घेण्याचेही टाळता आले असते. पण त्या दोघी तेथुन चक्क पळुन गेल्या.

यामुळे यशवंतराव अधिकच संतापले. त्याने या दोघींना उज्जैन परत मिळवुन दिले होते. त्या बदल्यातला खर्च त्या देत नव्हत्या. आता त्या चक्क पळुन गेल्या होत्या. 


यशवंतरावांनी मग नाईलाजाने उज्जैनमधील धनाढ्यांवर ती खंडणी लादली. जे देत नव्हते त्यांच्या महालांत खनत्या लावण्यात आल्या. शिंद्यांचा प्रत्येक प्रदेश पायतळी तुडवायला सुरुवात झाली.

हे कळताच दौलतराव शिंद्यांनी पाच बटालियन्स उज्जैन व त्याच्या जहागिरीच्या रक्षणासाठी तातडीने पाठवल्या.

याच दर्म्यान दौलतरावाने पेशव्यांवर दबाव आणुन काशीरावाला होळकरी जहागिरीची वस्त्रे देण्यासाठी दबाव आणला.

उद्देश हा कि यशवंतरावांना उपरा ठरवता यावे व त्याच्याविरुद्ध जोरदार आघाडी उभारता यावी. त्याचवेळीस यशवंतरावांचा लाडका लहाणगा पुतन्या, दुस-या मल्हाररावांचा मुलगा याचा हक्क कायमचा हिरावता यावा.

पेशवा पुरता दौलतरावाच्या इच्छेपुढे काही करु शकत नव्हता. त्याने काशीराव होळकरांना वस्त्रे दिली. पण उत्तरेत याचा काहीएक पडसाद उमटला नाही. होळकरी प्रजा काशीरावाचे स्वामित्व मानण्याच्या मन:स्थितीत नव्हती.

आणि कोण पेशवा? हा प्रश्न आता देशातील जनता विचारायला लागली होती एवढी पेशवेपदाची अवनती दुस-या बाजीरावाने करुन ठेवली होती.

दररम्यान होळकरांच्या उत्तरेतील सर्व प्रांतांना ताब्यात घेण्यासाठी यशवंतरावांना छोट्यामोट्या लढाया लढाव्या लागतच होत्या. त्यांनी विधवांच्या संघर्षातुन अंग काढुन घेतले होतेच. त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा झाला कि शिंदेंचा बटालियन्स लाखवादादाच्याच पाठलागात व्यस्त राहिल्या. लाखवादादा त्या बटालियन्सशी सरळ लढु शकत नव्हता म्हणुन त्याने गनीमी काव्याचा आधार घेतला, त्यामुळे शिंदेंचा जयही लांबत गेला. शिंद्यांतर्फे या बटालियन्सचे नेत्रुत्व करत होता जनरल पेरों हा फ्रेंच सेनानी. त्याला दौलतरावांनी त्यांचा उत्तरेतील मुख्य सेनापती म्हणुन नियुक्त केलेले होते. तो अत्यंत शुर व साहसी योद्धा होता. त्याने तीन्ही दिशांनी फास आवळत आनला होता. लाखवादादाला पळायला एकच दिशा उरली होती...पुर्व. तो मागे सरकला ते सेउंधाचा किल्ला गाठला. शेवटी सेउंधा येथे घनघोर युद्ध झाले. या युद्धात मात्र 
लखोबादादा लाड प्राणांतिक जखमी झाला. या युद्धात त्याने जी पराक्रमाची शर्थ केली त्याला तोड नाही. महादजींचा हा स्वामीभक्त सेनानी. त्याला तेथुन माघार घ्यावी लागली...पण त्याने स्वत: घायाळ असतांनाही पाठलाग चुकवत महादजींच्या विधवांना प्रथम सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. तो त्या जखमांतुन पुर्णपणे कधीच बरा होवु शकला नाही. शेवटी ७ फेब्रुवारी १८०३ रोजी या शिंदेशाहीतील शेवटच्या इमानी माणसाने शेवटचा श्वास सोडला. 

2 comments:

 1. Hi Sanjayji,

  I found this link informative terms of ancient and modern history of India. Just thought if may come handy for you as well.

  http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00fwp/#fwp


  regards,

  Abhay Tarange

  ReplyDelete