Wednesday, April 23, 2014

हडपसरची लढाई

पेशव्याने शेवटच्या विनंतीलाही मान दिला नाही, चर्चेची तयारी दाखवली नाही यामुळे युद्ध अटळ झाले. शिंद्यांची व अन्य सरदारांची अजस्त्र फौज वानवडीजवळ जमा झालेली होतीच. यशवंतरावांनीही आपल्या सेनासागरासह हडपसर गाठले.

पेशव्यांच्या बाजुने सर्वाधिक भरणा अर्थातच शिंद्यांच्या सैन्याचा होता. जवळपास सव्वा लाखाचे घोडदळ व पायदळ आणि विलायती कंपु व जवळपास ८० तोफा शिंद्यांनी मैदानात उतरवल्या होत्या. त्याशिवाय त्यांनी भाडोत्री पेंढारी सैनिकही या युद्धात सामील करुन घेतले होते. पेशव्यांची रडतराव ६०००ची फौजही त्यांच्या दिमतीला होतीच.

होलकरांची बाजु अर्थात भक्कम होती. त्यांचे घोडदळ भारतातील सर्वोत्क्रुष्ठ मानले जात असे. होळकरांचे घोडदळ, पायदळ व तोफदळासहितचे एकुण सैन्य होते १४४०००. (सर जदुनाथ सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार. प्रत्यक्षात ते ८० ते ९० हजार एवढेच असावे असे अन्य काही साधने सुचवतात.) यशवंतरावांची सर्वात जमेची बाजु म्हणजे प्रत्येक सैनिकाचा, मग तो पठाण असो कि पेंढारी, हिंदु असो कि देशी मुसलमान, प्रत्येकाचा आपल्या सेनापतीवर पराकोटीचा विश्वास होता. प्रत्येक युद्ध शिपायाप्रमानेच त्यांचा सेनानी त्यांच्या खांद्याला खांदा लावुन लढला होता. त्यामुळे शिपाईगड्यांत असलेली मित्रत्वाची भावना निर्माण झालेली होती.

या उलट शिंदेंचे होते. स्वत: दौलतराव शिंदे अद्याप उत्तरेतच होते. होळकर दक्षीनेत गेल्याचा फायदा तो उत्तरेत बसुन घेत होता. स्वाभाविकच त्याच्या सैन्यात कितीसा जोर असणार?

२५ आक्टोंबर १८०२.

या युद्धाकडे सा-या हिंदुस्तानचे लक्ष लागुन राहिलेले होते. पेशव्यांच्या पुण्यावर निजामानंतर कोणीही स्वारी केल्याचे धाडस दाखवलेले नव्हते. दुर्बळ झाली असली तरी अजुन मराठेशाही पराक्रमी सरदारांमुळे जीवंत होती. येथे दोन बलाढ्य सरदार अस्तित्वाचा लढा लढणार होते.
युद्धाची व्युहरचना झाली होती. शिंद्यांच्या बाजुने (पश्चिम) कुल्ब अली खानच्या नेत्रुत्वाखालील अंबाजी इंगळेच्या सात बटालियन, क्यप्टन डेव्जच्या नेत्रुत्वाखालील सुदरल्यंडच्या चार बटालियन्स, डाव्या बाजुला सदाशिव भास्कर बक्षीच्या अधिपत्याखालील घोडदळ, आणि काही अंतरावर पेशव्याचे सैन्य आणि समोर तोफखान्याची रचना अशी स्थिती होती. या संपुर्ण सेनेचे सेनापत्य बक्षी करत होता.

होळकरांच्या उजव्या बाजुने मिरखानचे घोडदळ व पायदळ, कर्नल हार्डिंगच्या चार ब्रिगेड, विकर्सच्या पाच तर डोडच्या ३ बटालियन्स सज्ज होत्या तर डाव्या बाजुला शहामत खान, फत्तेसिंग माने, मिरखान, नागो शिवाजी शेणवी, भवानी शंकर खत्री (बक्षी)सारखे सेनानी आपापल्या दळाचे नेत्रुत्व करत होते. समोर तोफखाना होता. होळकरांकडे यासमयी जवळपास १०० तोफा होत्या.

स्वत: यशवंतराव घोड्यावर स्वार होवुन आपल्या हुजुरातीच्या कडव्या सैन्यासह उंचवट्याव समोर थांबले होते. तेथुन संपुर्ण रणभुमीचे त्यांना निरिक्षण करता येत होते.
सकाळी साडेनवाच्या आसपास शिंद्यांकडुन प्रथम तोफा धडादल्या. यशवंतरावांनी पुन्हा आदेश दिला, जोवर ते २५ वेळा तोफा डागत नाहीत तोवर आपण युद्ध सुरु करायचे नाही. त्यांनी आपल्या सैन्याची नाहक हानी होवु नये म्हणुन सैन्य जरा मागे सरकावले. शिंद्यांना वाटले शत्रु घाबरला...त्यांना अधिकच चेव चढला. जसे २५ बार होवुन गेले तसे यशवंतरावांनी इशारा केला आणि होळकरांची फौज त्वेषाने शिंदेंच्या सैन्यावर तुटुन पडली.

बाजीराव पेशवा पर्वतीवरुन भरल्या पोटाने (त्या दिवशी दिवाळीचा दिवस होता.) युद्धाचे द्रुष्य काही वेळ पहात होता. नंतर जय झाला कि पराजय याची विचारपुस न करता वा अंतिम निकालाची वाटही न पहाता जो निघाला तो सरळ डोणज्यालाच जावुन धडकला.
इकडे धमासान युद्ध सुरु होते. शिंदेंच्या डी बोईं आणि सदाशिव भास्करने फारच कडवी लढत दिली. रक्ताचे पाट वाहु लागले. मिर खान त्या गर्दीत सापडला...त्याचा घोडा पडला...पण तरीही लढतच राहिला. कर्नल हार्डिंग आपल्या बटालियनसह पुढे आला...मिर खानाला सुरक्षित केले आणि कुल्ब अलीच्या ब्रिगेडला हादरवुन सोडले.

याच वेळीस आतापर्यंत युद्द्धभुमीचे निरिक्षण करणारे यशवंतराव आपल्या कडव्या सैन्यासह युद्धभुमीवर उतरले. झंझावाती वेगाने ते शिंदेंच्या तोपचींवर कोसळले व अनेकांना कंठस्नान घातले. तोफखाना बंद पाडुन मागे असलेल्या कुल्ब अलीच्या घोडदळावर उतरले आणि धुमश्चक्री सुरु झाली. तोवर त्यांच्या हाताला मोठ्या चार जखमा झालेल्या होत्या. तरीही ते शत्रुला सपासप कापुन काढत होते. स्वत: यशवंतराव एवढ्या वीरस्रीने युद्धात उतरल्यानंतर सैन्याला अजुनच त्वेष चढला. काही क्षणांतच युद्धाचा रांगरंग पालटला. शिंदेंचे घोददळ पळत सुटले. पायदळ कसे बसे जीव वाचवायचा प्रयत्न करत मागे हटत राहिले. पेशव्यांची हुजुरात तर कधीच गायब झाली होती.

डी बोई आणि डेव्ज हेच काय ते शिंद्यांकडुन शेवटपर्यंत लढले. त्यांच्या १४०० पैकी ६०० लोक ठार झाले होते. शेवटी त्यांनीही माघार घेतली. चारपैकी ३ युरोपियन अधिकारी ठार झाले. होन्रो नामक एक फ्रेंच अधिकारी वाचला, पण त्याला नंतर वानवडीच्या शिंदेंच्या वाड्यात पकडण्यात आले. फत्तेसिंग मानेंनी पळत्या सैन्याचा पाठलाग करुन पुरती वाताहत केली.
या युद्धात शिंदेंचे ५००० सैनिक ठार झाले तर हजारो जखमी झाले.
यशवंतरावांचा या युद्धात पुर्ण विजय झाला होता.

पुण्याकडे पळालेल्या शिंदेंच्या सैन्याची तर अजुनच फटफजिती झाली. लोक त्यांना प्यायला पाणी देईनात तर खायला अन्न कोठुन? त्यांच्या तोंडावर लोक दारे बंद करत होते. रस्त्यावर कुत्र्यासारखे त्यांना सडावे लागले. एवढी घृणा लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल होती. अनेक वर्ष ते शिंद्यांचा अत्याचार सहन करत होते...आता त्यांना कोणीतरी त्राता भेटला होता...अन्यायाचे पर्व आता दूर होईल अशी आशा त्यांच्या मनात प्रज्वलीत झाली नसेल तरच नवल!

पण दिवाळीचा दिवस असुनही पुण्यात कोनाच्या घरात चुल पेटली नाही हेही खरे.
लोक घाबरलेले होते...

याचे खरे कारण होते खुद्द पेशवाच पळुन गेला आहे ही बातमी संध्याकाळपर्यंत पुण्यात वा-यासारखी पसरली होती...

अनिश्चिततेचे पुरेपुर सावट पुण्यावर पडले होते.

या युद्धातील विजयानंतर यशवंतरावांनी पुणे लुटायची आद्न्या द्यावी असे मीरखानाने सुचवले. यशवंतरावांनी त्याला मनाई तर केलीच पण सर्व सैन्य वानवडीतच थांबेल, कोणीही पुण्याकडे जानार नाही असा आदेशच काढला. "कोणीही पुण्याकडे गेला, एकाही नागरिकाची साधी कवडी जरी लुटली वा स्त्रीयांच्या अब्रुला हात घातला तर त्याचे हात-पाय तोडुन भर रस्त्यात फेकले जाईल..." असा तो कठोर आदेश होता. यशवंतरावांची शिस्त अत्यंत कडक आणि वचक फार मोठा होता. त्यामुळे त्याच्या सैन्याने, विशेशता: पेंढारी व पठाण सैन्याने, निमुटपणे तो हुकुम पाळला.
पेशवा कुंजीर व अन्य काही दरबा-यांसह पळुन डोनजे येथे थांबला आहे ही वार्ता यशवंतरावांनाही संध्याकाळपर्यंत मिळाली. ही घटना अनपेक्षीत होती. त्याला तातडीने मदत पाठवायचा व पुण्याला परत आणायचा निर्नय त्यांनी घेतला व रसदेसह एक तुकडी डोणज्याला पाठवली. पण तोवर स्वारी पुढे निघुन गेली होती. यशवंतराव आपल्याला पकडण्यासाठी वा ठार मारण्यासाठी सैन्य पाठवत आहे अशी भिती त्याला असावी. पण ते खरे नव्हतेच. पेशव्याकडे आता सैन्यच काय होते? मनात आनते तर यशवंतराव त्याला पठाणी तुकड्या पाठवुन खरोखर पकडुन आणु शकले असते. पुढे बाजीराव रायगडावर जावुन पोहोचला. तेथुन त्याने इंग्रजांशी बोलणी चालु ठेवली. त्याला नि:शंकपणे पुण्याला येण्याची अनेक आर्जवी निमंत्रणे यशवंतरावांनी पाठवली, पण बाजीरावाने ऐकले नाही.

5 comments:

  1. संजय सर ,
    अतिशय सुंदर माहिती आहे
    त्या काळात काय आणि कसे घडले हे माहित होण्यासाठी इतिहासातल्या या गोष्टी नक्की उपयोगी पडतात , जर कुणाला त्याचे महत्व असेल तर !

    पण एक सांगा !

    ज्या मुलाना समजा सी ए , आय टी किंवा एम बी ए या किंवा अजून अगदी नवीन क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी याना यात काहीच सुख दुःख नसेल तर ?
    काहीना तर या शिळोप्याच्या गप्पा वाटू लागतात ,कारण हे असे अनेक वर्षे चालले आहे ,
    अमका थोर होता , तमका चुकला , तो होता म्हणून अमुक झाले आणि हा होता म्हणून असे झाले !
    तात्पर्य आजच्या घटकेला तरुणाना काय हवे आहे ?
    आज नवे जग त्याना बघायचे आहे ,नवी क्षितिजे बघायची आहेत , त्याना मागच्या शे पाचशे वर्षाचा हिशोब एकसारखा कशाला सांगायचा ? आणि त्यातच कुणी एकाने जर चुकून जातीपातीचा हिशोब मांडत तुझेमाझे केले की या ब्लोगवर आठ दहा दिवस तोच धुमाकूळ चालतो ,त्यापेक्षा जुने सगळे जाऊ दे , असे म्हणून जर नव्या विश्वात जर कुणी रममाण होत असेल तर त्याला सारखे इंडियन हेरीटेज च्या नावाखाली नवनवीन कथा सांगण्यात काय मतलब आहे ?
    मोहोन्जो दारो येथील संशोधनात २० वर्षापूर्वी असे समजले जात असेल की ते आर्य होते आणि आज नवे संशोधन निघाले की ते सर्व द्रविड होते , तर त्याने सूर्य चंद्र आणि पृथ्वीचे एकमेकातील अंतर बदलणार आहे का ? किंवा केमिकल समीकरणे बदलणार आहेत का ? मग रोज हा खेळ तुम्ही का मांडत असता ?त्या मुलाना हि सर्व अडगळ नाही का वाटणार ?

    ReplyDelete
    Replies
    1. अशा वेळीस उत्तम सल्ला म्हणजे जे वेळखाऊ वाटते ते वाचू नये. ज्यांना आपला इतिहास माहित नाही अथवा चुकीचा माहित आहेत त्यांच्यासाठी मी लिहितो. सल्ल्याबद्दल आभार.

      Delete
  2. धन्यवाद ह्या माहिती साठी

    खरच यशवंतराव होळकर हे अतुल्य असे योद्धे होते, पण पेशव्यान कडून नेहमीच त्यांच्यावर अन्याय का झाला?? यशवंतराव होळकरां बद्दल फार कमी माहिती आहे लोकांना?

    ReplyDelete
  3. Hi, Sanjay, one request you
    I want to know more about "pendhari" can you please put some light on this community or suggest source books, website etc.
    Thanks in advance

    ReplyDelete
  4. सर आपन जी माहीती दिली तीन अभिमानास्पद ...

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...