Tuesday, May 31, 2011

हे आमचे तिसरे पारतंत्र्य आहे!

जगाचा इतिहास हा असंख्य संक्रमणांनी भरलेला आहे. प्रत्येक संक्रमने ही मानवजातीला उपकारक होती तशीच अनुपकारकही ठरलेली आहेत. पण काय उपकारक आणि काय अनुपकारक यातील सनातन संघर्ष सातत्याने सुरू राहिलेला आहे असेही दिसते, आणि नेमके काय याचा निर्णय आजही मानवी समुदाय लावू शकलेला नाही. मग ही संक्रमणे धार्मिक असोत, अर्थव्यवस्थेतील असोत कि राजकिय.आणि तत्वद्न्यान आणि विद्न्यानातील असोत. प्रुथ्वीकेंद्रीत विश्वसिद्धांताने हजारो वर्ष मानवी समाजाला एक स्व दिला...पण हळु-हळु सुर्यकेंद्रित ते आता पुर्णतया अकेंद्रित सिद्धांताशी यावे लागल्याने मानवाचा अहंकार पुर्ण चुर झाला. आपण किमान २० अब्ज प्रकाशवर्ष एवढ्या कल्पनातीत विस्ताराच्या विश्वातील एक अत्यंत नगण्य-अदखलपात्र भाग आहोत हे नव-द्न्यान पचनी पडने अवघडही गेले आणि त्यातून एक अप्रत्यक्ष प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया उद्भवलेली दिसते ती म्हणजे इहवाद. हा पुरातन काळीही होताच. पण त्याचे पराकोटीचे विस्फोटन गत-शतकापासुन व्हायला लागले आणि आता त्याने एक टोक गाठले आहे.

हा आताचा जो इहवाद आहे तो चार्वाक वा ग्रीक तत्वद्न्यांनी मांडल्याप्रमाणे साधासरळ नाही. आधीचा इहवाद हा पारलोकिक जीवन नाकारत आहे तेच जीवन मुक्तपणे उपभोगण्याचा होता. कोणतीही गोष्ट इश्वरनिर्मित नसून ती एक भौतिक घटना आहे असे मानण्याचा होता. या इहवादातून शास्त्रे-विद्न्यानाची दारे उघडली गेली. परंतु आताचा इहवाद हा नव्या संक्रमनात आला आहे. या इहवादाला सत्ता आणि वर्चस्ववादाची भयंकर परिमाने मिळाली आहेत.

याचा अर्थ असा नव्हे कि सत्ता आणि वर्चस्ववाद पुर्वी नव्हता. धर्मसत्ता, राजसत्ता आणि अर्थसत्ता या नेहमीच सर्वच जागतीक समुदायांना व्यापुन उरलेल्या होत्याच. ब्रुनो सारख्या संशोधकाला जीवंत जाळुन मारणे आणि ग्यालिलियोला माफी मागायला लावणारी पोपसत्ता कोण विसरेल? आर्यभट्टाचा जगात सर्वप्रथम मांडला गेलेला सुर्य-केंद्रित विश्वाचा सिद्धांत येथीलच नंतरच्या मुखंड खगोलविदांनी अडगळीत फेकुन त्याचे विक्रुतीकरण केले हे कोण विसरेल? तेंव्हा हवे तेच सोयिस्कर स्विकारायचे, स्व-सिद्धांतांना विरोधी नाकारायचे ही परंपरा पुरातन आहे.

परंतु हे वर्चस्ववादी गट कधीतरी माघार घेतात. बायबलमधील विश्व ख्रिस्तपुर्व ४००० हजार वर्षांपुर्वी बनले हा सिद्धांत चर्चला जाहीरपणे मागे घ्यावा लागला. ही द्न्यानसत्तेचे धर्मसत्तेवरील एक महान विजयस्मारक आहे. भारतीय धर्मसत्ता हीच मुळात अद्यापीही तमोयुगात वावरत असल्याने या सत्तेने कधीही कालोपयोगी आणि विद्न्यानाधारित भुमिका घेतलीच नाही हेही एक वास्तव आहे. त्याबाबत त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच् आहे.

सर्वच समाज संक्रमणावस्थेतून जात असतात. हे संक्रमण उर्ध्वगामी असावे कि अधोगामी? अर्थात ते उर्ध्वगामी असावे आणि त्यासाठी सर्वच...म्हणजे धर्म-अर्थ ते राजकीय...घटक त्यासाठी प्रयत्नशील असावेत अशी अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. संक्रमणात नेहमीच नवे-जुने विचारांत वाद होतच असतो. काही पुरातन मुल्ये किमान तोंडलावणीसाठी का होईना घेतच पुढे जावे लागते. एका अर्थाने -हासाकडुन -हासाकडे अशीच एक वाटचाल होत असते आणि त्याच संक्रमणावस्थेत या -हासाला उर्ध्वगामी प्रवाह देनारेही असतात आणि संपुर्ण -हास सहजी होत नाही.

ग्रीक संस्क्रुती लयाला गेली. रोमन संस्क्रुती आणि साम्राज्य लयाला गेले. हिटलरच्या आसुरी आकांक्षांचा अस्त झाला. जेथे कधी त्या साम्राज्यावरचा सुर्य मावळत नव्हता त्या ब्रिटिश साम्राज्याचे नुसते अध:पतन नव्हे तर ग्रेट ब्रिटन विखंडित झाला. आज अमेरिका जी महासत्ता आहे तेथील लोकांना खाण्यापिण्याचे-रोजगाराचे वांधे आहेत. हे संक्रमण असते. कोनतीही सत्ता चिरस्थायी नसते याचे हे बोलके उदाहरण आहे.

उद्या भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पहात आहे. पण महासत्ता म्हणजे नेमके काय याची व्याख्या कोणी केलेली मी अद्याप वाचलेली नाही. अर्थात्मक महासत्ता...द्न्यानात्मक महासत्ता...नैतिक महासत्ता...विद्न्यानात्मक महासत्ता...कि केवळ लोकसंख्यात्मक महासत्ता...? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळायचे आहे. चीनला आपण लोकसंख्येत मागे टाकुन लोकसंख्यात्मक महासत्ता होणारच याबाबत फारसा संशय नाही. द्न्यानात्मक म्हनाल तर आजही भारतीय पुरातन द्न्यानाला पुजण्याचे जातीय काम अधिक आहे पण ते विकसीत करून जागतीक पातळीवर मांडण्याचे धैर्य/साहस/तळमळ कोणात दिसत नाही. विद्न्यानाचा प्रश्नच येत नाही कारण जगात आज भारताचे म्हणुन प्रस्थापित विद्न्यान सिद्धांत कोणी मांडलेलेच नाहीत. असतील तर ते उपसिद्धांत आहेत.

आणि हे होण्याचे एक कारण असे कि मुळात भारतीयांचा भारतीयांवर सहसा विश्वास नसतो. पासःचत्यांचाही खूप उशीरा बसतो. तोवर अनेक हाय खावुन मेलेले असतात. जोवर पास्चात्य लोक आपले शिक्कामोर्तब करत नाहीत तोवर त्या संशोधकांना कोणी हिंग लावून विचारत नाही.

म्हणजे आपले वर्तमानातील संक्रमण नेमके कोठे चालले आहे हा प्रश्न येथे उपस्थित होतो. जागतिकिकरणाला आपनच निमंत्रित केले...या जागतिकिकरणात आपला लोकसमुदाय नेमका कोठे बसतो...त्याची काय ससेहोलपट होत आहे याचे पुर्व-द्न्यान आपल्या सरकारांना होते काय? त्यांनी त्यासाठी कोनती वेगळी सैधांतिक आणि कवचात्मक रचना केली काय? भारतीय समाजातील अंगभुत दोष (धार्मिक असोत कि जातीय) नष्ट करण्यासाठी कोणतीही पावले उचललीत काय? कि ते वाढावेत यासाठी प्रछ्छंन्नपणे अनेक बाबी रानोमाळ मोकळ्या सोडल्या आहेत? एकमेकांना डसत, आपापसात भांडत ठेवत सत्ताकारण हेच महत्वाचे ध्येय राबवत अन्य सत्ता कदापि पुढे येवू नयेत कारण तसे घडले तर द्न्यानसत्ता ते विद्न्यानसत्ता त्यांनाच डसतील हे भय त्यामागे आहे?

अस्वस्थ समाज हा अस्तित्वात असतोच. फक्त कळत नाही त्याला कि नेमके काय आणि कशासाठी होते आहे. त्या अस्वस्थ समाजात जातीयतेचे...धर्मांचे विषारी सर्प सोडुन द्यायचे आणि इतिहासाचा दर्प सोडत आपापसात झुंझी लावुन देण्याचे उद्योग करत आपापले स्वर्थ साधन करायचे हे एक नव्य संक्रमण आजच्या भारतात होत आहे. अपवादात्मक निरुपद्रवी शत्रुंना कोठड्या दाखवायच्या आणि ख-या समाजविघातकांकडे "दुर्लक्ष" करायला सांगायचे हा धंदा आता पराकोटीच्या टोकाला पोहोचला आहे.

पण जे टोकाला जाते ते खाली पडणारच हा शास्त्राचा नियम आहे. शासनकर्ते हे काही आभाळातुन पडलेले नाहीत तेंव्हा त्यांनाही हाच नियम लागू होतो. जसा समाज तसे राज्यकर्ते हे चीनी तत्वद्न्याने फार पुर्वी सांगितले आहे. भारतीय...महाराष्ट्रीय समाजाला बदलावे लागेल...तरच खरे संक्रमण होइल. खालुन वर जाणारे संक्रमण (म्हणजे सामाजिक प्रेरणांतुन) हे चिरकालीन असते.
पण आमचे दुर्दैव हे आहे कि आजही आम्ही वरुन खाली येणा-या संक्रमणावर अवलंबुन आहोत.

हे आमचे तिसरे पारतंत्र्य आहे!

2 comments:

  1. हे आमचे तिसरे पारतंत्र्य आहे!

    न्हवे.......
    हा शाप आहे एका राष्ट्राने स्वतःच स्वतःला दिलेला.....
    करंटे जन्माला घालण्याचा......

    ReplyDelete
  2. जे टोकाला जाते ते खाली पडणारच हा शास्त्राचा नियम आहे. पण सामाजिक शास्त्राचा नियम जरा वेगलाच आहे आहे ह्या शास्त्रात जे टोकाला जाते त्याला खाली आन्यासाटी प्रयत्न केला गेला पाहिजे नाहीतर ते वरच राहिल.

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...