Wednesday, April 30, 2014

आणि वादळ विसावले....

मेजर जोन माल्कम हा महिदपुरच युद्ध ते मंदसोरच्या तहनंतर बराच काळ मध्य प्रदेशात होता. त्याचे Memoirs of Central India हे १८२३ ला प्रसिद्ध झालेले पुस्तक यशवंतरावांचे अंतिम दिवसांचा वृत्तांत, महिदपुरचे युद्ध ते मंदसोर येथील तहापर्यंतच्या कालावधीतील होळकर घराण्याचा इतिहास सांगते. यशवंतराव, तुळसाबाई, मल्हारराव तिसरे यांच्याबद्दलच्या समजुती-गैरसमजुती या केवळ एकाच पुस्तकाच्या आधारावर भारतीय इतिहासकारांनी बेतलेल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

प्रथमच स्पष्ट करतो कि जोन माल्कम हा पराकोटीचा होळकर द्वेष्टा होता. तो यशवंतरावांना लुटारु-दरोडेखोर व पेंढा-यांचा पुढारी असेच संबोधत राहतो. तो यशवंतरावांनी खंडेराव व काशीरावाचा खुन केला असेही म्हनतो.

खंडेराव व काशीराव हे आपल्याला प्रतिस्पर्धी आहेत या शंकेपोटी त्यांनी त्यांचा खुन केला असे तो म्हणतो. हा आरोप टिकत नाही ते कसे हे आपण वर पाहिलेच आहे. खंडेरावाचा म्रुत्यु झाला तेंव्हा मुळात यशवंतराव माळव्यात नव्हतेच. तरीही येथे आपल्याला १८०६ नंतर कधीही यशवंतरावांना खरोखर वेड लागले होते काय हे आपल्याला तपासुन पहायचे आहे. ज्याला इंग्रज वेड म्हणत होते त्याची लक्षणे तरी काय होती हेही पाहुन घेतले पाहिजे. कारण जो मनुष्य विपरीत स्थितीतही तोफा ओतुन घेत होता, सैन्य वाढवत चालला होता, पेंढा-यांची बंडे मोडत होता, जयपुरच्या राजाला धडा शिकवत होता, प्रजेची कार्ये जशी अहिल्याबाईंच्या कारकिर्दीत चालत तशीच न्यायनिष्ठेने चालवत होता त्याला "वेडा" कसे ठरवेले आणि का हे त्याशिवाय समजणार नाही.

तत्पुर्वी माल्कम यशवंतरावांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाबाबत काय म्हणतो हे पाहुयात.

"यशवंतराव हा मध्यम उंचीचा पण अत्यंत बळकट बांध्याचा होता. अपघाताने त्याचा एक डोळा अधु झाला असला तरी त्याचे एकंदरीत व्यक्तिमत्व प्रसन्न होते. अत्यंत दुर्दैवी स्थितीतही त्याचे मनोबल कधी ढळत नसे तर उलट तो आश्वासकच वाटत असे. त्याचे शिक्षण उत्तम झाले असुन मराठी उत्तम तो बोलेच पण हिंदी व पर्शियनवरही त्याचे चांगले प्रभुत्व होते. मराठी तो अत्यंत शुद्ध लिहु शकत होता आणि हिशोब ठेवण्यात त्याचा हात कोणी धरु शकत नव्हता. घोडेस्वारी, तलवारबाजीत तो उत्क्रुष्ठ होता पण भालाफेकीत तर त्याच्याइतक्या अव्वल दर्जाचा कोणीच नव्हता. त्याच्या कौशल्याइतकेच श्रेष्ठ असे त्याचे साहस होते आणि त्याने त्याचे दर्शन असंख्य वेळा घडवले आहे. पुण्याच्या युद्धात केवळ त्याच्या धाडसामुळे त्याचे सैन्य विनाशापासुन वाचले. शिंद्यांच्या तोफा आग ओकत असता तो तोफखाना थंडावण्यासाठी एकटा त्यांच्यावर चालुन गेला...त्याचा घोडा मेला तर त्याने पायउतार होवुन धुमश्चक्रीत स्वत: घुसुन कापाकापी करत, शिंदेंच्या तोपचींना कंठस्नान घालुन तोफांचा त्याच्या सैन्यावर होणारा मारा थांबवला." एवढे लिहुन नंतर माल्कम यशवंतराव हे कसे लुटारुंचे अधिपती, आणि सत्ताभिलाषी होते हेही लिहितो. हा भाग त्याच्या रोषाचा पदसाद आहे हे समजावुन घेत पुढे जावुयात. माल्कम पुढे म्हनतो-

"तोफा ओतायचे काम वेगात चालु होते. २०० लहान-मोठ्या तोफा ओतुन झाल्यावर अजुन दोनशे तोफा ओतायचे काम त्याने हाती घेतले. हळुहळु यशवंतराव शिघ्रकोपी होवू लागला होता. बालाराम शेट या त्याच्या मंत्र्याला तो म्हणे, मला थोड्या वेळापुर्वीचे आठवेना झाले आहे...मला औषध आणुन दे. त्याचे डोकेही प्रचंड दुखत असे....त्याच्या संतापाला तोंड देण्याची कोणात हिम्मत उरलेली नव्हती....यशवंतरावाला वेड लागले होते..."

हे झाले माल्कमचे म्हणने. अलीकडे अनेक इतिहाससंशोधकांनी संशोधन करुन यशवंतरावांचा म्रुत्यु ब्रेन ट्युमरमुळे झाला हे सिद्ध केले आहे. पण माल्कमच्या मताचा पगडा आमच्या मराठी इतिहासकारांवर अधिक असल्याने माल्कमचे मत स्पष्टपणे खोडुन काढने आवश्यक आहे.

१. आधीच स्पष्ट केल्याप्रमाने ३ फेब्रुवारी १८०६ ला यशवंतराव पंजाबमद्धे होते व इंग्रजांशी वाटाघाटी करत होते. ते त्यावेळीस वेड लागलेल्या स्थितीत असु शकत नाहीत. खंडेराव त्यावेळीस मालव्यात असल्याने ते खंडेरावांचा खुन करणेही शक्य नाही आणि त्यासाठी कसलेही कारण नव्हते. वाटेतुनच त्यांनी १५ फेब्रुवारी १८०६ रोजी व्यंकोजी भोसले यांना पाठवले. हे पत्र मागे दिलेले आहेच. हे पत्र यशवंतरावांनी सतलज व व्यासगंगा नदीच्या दोआबातुन पाठवले आहे. या पत्रातील भाषा उदासवानी असली तरी आपले पुढील इरादे त्यांनी त्या पत्रात स्पष्ट केलेले आहेत.

२. काशीरावाचा म्रुत्यु १८०८ मद्धे बिजागढ येथे झाला. खंडेरावाला 
१८०६ सालीच समजा मारलेच असते तर मग पुढे काशीरावाच्या खुनासाठी इतकी वर्ष थांबायचे एकही संयुक्तिक कारण नव्हते. यशवंतराव सार्वभौम महाराजे होते. काशीरावाचा कोणताही हक्क होळकरी राज्यावर उरलेला नव्हता. काशीराव हा त्यांचा कधीही प्रतिस्पर्धीही नव्हता. त्याने यशवंतरावांविरुद्ध कसली आगळीकही केलेली नव्हती. यशवंतराव रणमैदानात शत्रुला ठार मारत...खुनादि कारस्थाने करणे हे मुळात यशवंतरावांच्या सर्वच स्वभावाशी विसंगत आहे. काशीराव हा मुळात दुर्बळ आणि लकवा मारल्याने अशक्त असा माणुस होता.

३. सैन्याची उभारणी व प्रशिक्षण, तोफांची निर्मिती १८०९ पर्यंत सातत्याने सुरुच होती.

४. इतिहासकार जसवंतलाल मेहता आपल्या "Advanced study in the history of modern India 1707-1813" या ग्रंथात पुराव्यासहित सिद्ध करतात कि यशवंतरावांनी दोघांची हत्या केली होती वा त्यांना वेड लागले होते याचा कसलाही पुरावा उपलब्ध नाही.

५. मृत्युआधीच काही दिवस यशवंतरावांनी जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी जाण्याची तयारी केली होती. ही बातमी बाजीरावाला कळताच घाबरुन त्याने पुणे सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण यशवंतरावांचे निधन झाल्याचे समजताच त्याला हायसे वाटले. आता यशवंतरावांना वेड लागले आहे अशी काही वस्तुस्थिती असती तर जेजुरी प्रवासाची तयारी त्यांनी केली नसती व पेशवाही घाबरला नसता. एवतेव यशवंतरावांना बदनाम करण्यासाठी दोघांच्या मृत्युचा वापर केला गेला. माल्कमने स्वत: पुढे गफुरखानाला विकत घेवून महाराणी तुळसाबाईंचा खुन केला व त्यांच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत. स्वता: खुनी असलेल्या माल्कमला सर्वच खुनी वाटणार हे उघड आहे.
परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे ती ही कि १८०९ च्या आसपास यशवंतरावांना डोकेदुखी व स्म्रुतीभ्रंशाचा त्रास होवु लागला होता. १७९७ ते १८०९ पर्यंत त्यांनी अविश्रांत कष्ट उपसले होते, असंख्य ताणतणाव पचवले होते. स्वत: तोफा ओतत असल्याने धातुरसाच्या वाफांचाही त्रास त्यांना झाल्याने त्याची परिणती प्रक्रुतीवर होणे स्वाभाविक होते.

माल्कमने त्यांच्या आजारपणाचे जे वर्णन केले आहे ते पाहता आणि तत्कालीन स्थितीत मेंदुविज्ञान शास्त्र जवळपास आस्तित्वात नव्हतेच हे लक्षात घेता त्यांच्या आजाराचे निदान माल्कमने जी लक्षणे वर्णन केली आहेत त्यावरुन लावावे लागते.

मेंदुत गाठ (Cyst) झाल्यानंतर डोकेदुखी, स्म्रुतीभ्रंश ते शरीरात अधुनमधुन आकड्या येणे अशी लक्षणे दिसतात. आता शल्यक्रिया करुन अशी गाठ काढता येत असली तरी शल्यक्रियेतील यशाचे प्रमाण आजही ७० ते ८०% एवढेच आहे. तेंव्हा तर हे विज्ञान अस्तित्वातच नव्हते. माल्कमने त्या लक्षणांना वेडाचे लक्षण मानले, तसे नोंदवुन ठेवले आणि तेच ब्रह्मवाक्य मानले गेले हे अजुन एक यशवंतरावांचे दुर्दैव.

अशी गाठ काढली नाही तर ती वाढत जाते आणि त्याची परिणती ब्रेन स्ट्रोक...म्हणजे म्रुत्युत होते.
आणि तसेच झाले.

२८ आक्टोबर १८११ साली भानपुरा येथे यशवंतराव नावाचे इंग्रज व अन्य शत्रुंसाठीचे प्रलयंकारी आणि भारतभुमीच्या मुक्ततेसाठी क्षितिजे व्यापुन उरलेले वादळ विझले...विसावले...वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी!

कलकत्त्यावरील स्वारी राहुनच गेली.

"हिंदवाणा हलको हुवा
तुरका रहयो न तत
अग्र अंगरेजा उछल कियौ
जोखाकियौ जसवंत..."
(हिंदुस्तानचा एकमेव रक्षक आता राहिला नाही. हिंदु समाजाचे बळ तुटले आहे. मुस्लिम बादशहाचे बळ तर पुर्वीच तुटले होते. यशवंतरावांच्या देहांतामुळे इंग्रज बेहद्द खुष झाले आहेत.) असे कवि चैन सांदुने यशवंतरावांच्या म्रुत्युनंतर लिहिले, यावरुन उत्तर भारतात या पहिल्या स्वातंत्रयोद्ध्याचा केवढा सन्मान आहे याची मराठी वाचकांना कल्पना यावी!

2 comments:

  1. धन्यवाद यशवंतराव होळकर यांची खूपच चांगली माहिती मागली काही लेखातून दिलीत. त्यांच्या बदल अजून माहीती होण्यासाठी कोठले पुस्तक सांगू शकाल का आपण?

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...