Saturday, June 10, 2017

संपुर्ण जगाचे एकच एक राष्ट्र!



Inline image 1

समस्त जगाची एकंदरीत वाटचाल कोणत्या दिशेने व्हावी हे पक्के ठरायचे असेल तर कोणती अर्थव्यवस्था राबवायची हे अखिल मानवजातीला आधी ठरवावे लागेल. भावी काळात जग स्वतंत्रतावादाकडेच वाटचाल करू लागेल अशी चिन्हे आहेत कारण शासनाची नियंत्रणे जास्त असणे हे आधुनिक मानवाला मान्य नाही. त्याल त्यचे वैचारिक अभिव्यक्तीचे आणि आर्थिक प्रेरणांचे खुले वातावरण हवे आहे तरच आपण ऐहिक आणि आत्मिक प्रगती करू शकतो ही भावना विचारी लोकांत प्रबळ होवू लागली आहे. अशात राष्ट्रवादामुळे उभारलेल्या कृत्रीम भिंतीमुळे जागतिक मानव जरी "अवघे विश्वची माझे घर" असे मनाने मानत असला तरी प्रत्यक्षात ते वास्तव नसल्याने तो अस्वस्थ आहे. राष्ट्रा-राष्ट्रांतील पराकोटीची विषमता, जीवघेणी स्पर्धा, युद्धे, दहशतवाद आणि काहींनी जपलेल्या ज्ञानाच्या मक्तेदा-या यातून समग्र मानवाचे कल्याण होत नाही असेही दिसून येईल.

मी १९९८ सालापासून "एक जग : एक राष्ट्र" ही संकल्पना प्रचारित करीत आलो आहे. आज जगात या विचाराचे आठ हजारांपेक्षा जास्त अनुयायी आहेत. माझ्या १९९४ च्या "आभाळात गेलेली माणसे" (इंग्रजी ’द माटालियन्स’) या कादंबरीत सर्वप्रथम मी ही संकल्पना मांडली होती. ही फार दुरवरची संकल्पना वाटली तरी हा विचार प्रबळ होत चालला आहे व कदाचित एखाद्या शतकात ही वास्तवात येणे अशक्य नाही. किंबहुना तोच अखिल मानवजातीच्या स्रव व्यवस्थांचा अंतिम थांबा आहे.

आपण मागील लेखांत जागतिक व्यवस्थांचा अदिम कालापासूनचा धावता आढावा घेतला. आपल्या लक्षात आले असेल कि मानव सातत्याने गरजेपोटी वा व्यावहारिक सुलभतेपोटी व्यवस्था बदलत आला आहे. टोळीराज्य ते राष्ट्र असा प्रवास त्याने केला आहे. एके काळी मानवाचे भुगोलाचे ज्ञान अत्यल्प होते. चार-पाचशे वर्षांपुर्वीपर्यंत त्यात भर पडत गेली असली तरी संपुर्ण पृथ्वी माणसाला माहित नव्हती. ज्ञान भुगोलातच तत्कालीन राज्ये होती-साम्राज्ये होती. जगभरच्या राज्यांत स्पर्धा-असुया-युद्धे जशी होती तशीच व्यापारी व सांस्कृतिक देवाण घेवाणही होती. एकविसाव्या शतकात तर जग हे खेडे बनले आहे असे आपणच म्हणत असतो व ते खरेही आहे. आजचा माणुस हा जागतिक माणुस बनला आहे. आणि तरीही राष्ट्रवादामुळे त्याच्या ख-या जागतिकीकरणावर मर्यादाही आहेत.

बाह्यत: जागतिकीकरण झाले आहे हे खरे आहे. सांस्कृतिक सरमिसळी होत आहेत. नव्या जगाची नवी मुल्ये जागतिक मानवी समाज शिकत आहे. त्याचा वेग कोठे जास्त तर कोठे कमी आहे. जगात तणावाची केंद्रेही असंख्य आहेत. राष्ट्रांचा राजकीय व व्यापारी साम्राज्यवाद आजही आपण पाहतो. गेल्या दोन शतकांत सर्वात घातक ठरलेली वंश संकल्पना आता बाद झाली असली तरी अगणित लोकांच्या मनातून ती अजून गेलेली नाही. सांस्कृतिक व धार्मिक वर्चस्वतावादाची अहमअहिका लागलेली आहे. भारतात तर जाती-जातींतच विभाजन आहे. खरे तर आज तरी समस्त विश्वात माणुस एकटा आहे. म्हणजे त्याला अद्याप तरी जीवसृष्टी असलेले ग्रह सापडलेले नाहीत. सापडले समजा तरी त्याचे स्वरूप काय असेल हेही आपल्याला माहित नाही. असे असुनही माणसाला अद्याप "मानव"पणाचे रहस्य उमगले आहे असे नाही.

राष्ट्रवाद नेमका काय आहे हे आपण आधीच्या लेखांत पाहिले आहे. ही कृत्रीम धारणा असून ती राष्ट्राराष्ट्रांत भेद करते. त्या अर्थाने जातीयवाद व राष्ट्रवाद वेगळे करता येत नाहीत. प्रत्येक राष्ट्रात स्वतंत्र व्यवस्था आहेत. त्या व्यवस्थेत अनेक उपव्यवस्था आहेत व त्यातही संघर्ष आहे. बव्हंशी प्रत्येक राष्ट्राला शत्रू आहेत नि मित्रही आहेत. आर्थिक विचारधाराही संघर्ष निर्माण करतात व अनेकदा तो आक्रमक होतो हे आपण साम्यवाद विरुद्ध भांडवलवाद यातील संघर्षात पाहिले आहे. आज स्थिती अशी आहे कि विज्ञानातील अनेक शोधही काही राष्ट्रे स्वत:पुरते मर्यादित ठेवतात. अनेक दुर्बल राष्ट्रांच्या साधनसंपत्तीचे शोषण केले जाते. पण हे शोषण अंतता: मानवी जगाचेच आहे हे मात्र कोणी लक्षात घेत नाही.

जगभर आज भिषण विषमता आहे. एकीकडे वैभवशाली राष्ट्रे आहेत तर दुसरीकडे सोमालियासारखी अन्नान्न करत मरणारी राष्ट्रेही आहेत. माणुस माणसाच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी सक्षम असतांनाही जागतिक वितरण हे अर्थ-राजकीय प्रेरणांनीच होत असल्याने विषम आहे. माणसांच्याच माणसांशी असलेल्या काल्पनिक शत्रुत्वापोटी वा माणसांनीच माणसांना गुलाम करण्याच्या भावनेपोटी जवळपास ५०% अधिक लोक आजच्या जगात दरिद्री राहिलेले आहेत तर दुसरीकडे हव्यासापोटी या जगण्यासाठी उपलब्ध अस्लेल्या एकमात्र ग्रहाचे साधनस्त्रोत लुटले जात आहेत.

असे असुनही, प्रत्येक राष्ट्राकडे सैन्य आहे. सातत्याने खरबो डालर्सची प्रतिवर्षी खरेदी विक्री होत असते. सैन्यदलांवर होणारा खर्च तर मोजता येणेही अशक्य आहे. कारण सीमांचे रक्षण प्रत्येक राष्ट्राला महत्वाचे वाटते. खरे तर या सीमा ज्या आज आहेत त्या काही शतकांपुर्वी नव्हत्या. यावर सारे जग जो अचाट खर्च करते तो थांबला तरी जगात कोणी दरिद्र राहणार नाही. काही शतकांपुर्वी तर मुळात राष्ट्र ही संकल्पनाच नव्हती. प्राचीन काळातील बलाढ्य टोळ्या आज अस्तित्वात नाहेत. आज ते सम्राट नाहीत की ती साम्राज्ये नाहीत. त्यांचे नामोनिशानही नाही. अलीकडच्या काही शतकांचा इतिहास पाहिला तरी तेंव्हाची बलाढ्य राष्ट्रेही आज दुय्यम बनली आहेत हे लक्षात येईल. आजच्या महासत्ता उद्या राहतीलच याची खात्री नाही. किंबहुना सत्तांची केंद्रे बदलत आहेत व पुढेही बदलत राहतील. मग व्यवस्था का बदलणार नाही?

आपण सहजीवनाखेरीज, परस्पर सहकार्याखेरीज जगू शकत नाही याचीही जाण जागतिक समुदायाला आहे. पण गरज आहे ती व्यापक कृतीची. राष्ट्र या संकल्पनेची तार्किक परिणती "एक जग : एक राष्ट्र" संकल्पनेतच होऊ शकते. आपल्या जीवसृष्टी असलेल्या एकमात्र पृथ्वीवर राष्ट्राच्या सीमांनी गजबजलेली शेकडो राष्ट्रे असण्याची पुर्वीची निकड आता संपुष्टात आली आहे. माणसाचा भुगोल आता विस्तारला आहे. माणसाचे ज्ञानविश्वही आता विस्तारले असून त्याला जागतिक ज्ञानाचे स्वरूप आले आहे. इतिहास जर असेलच तर तो आता जागतिक इतिहास बनला आहे. भाषा वेगळ्या असल्या तरी त्यांना स्थानिक भुगोलाचे अनिवार्य संदर्भ आहेत. आनुवांशीकी वेगळी वाटली तरी माणसाचा जन्म एकाच एकमेवाद्वितीय रसायनातून जगभर झाली आहे. त्या अर्थाने सारेच मानव एकमेकांचे भाईबंद आहेत. किंबहुना रष्ट्रांचे परस्परावलंबित्व कधी नव्हे तेवढे वाढलेले आहे. अशा स्थितीत राष्ट्राच्या कृत्रीम भिंतींची कितपत गरज आहे याचा विचार आम्हाला करावा लागेल. 

"एक जग: एक राष्ट्र" व्हायला अशी अनुकूल पार्श्वभुमी आहे.

यातून असंख्य फायदे आहेत. ते आपण पुढील भागात पाहुच. व्यावहारिक अडचणी काय आहेत आणि त्या कशा सोडवता येतील यावरही विचार करू. पण अडथळ्यांची शर्यतही मोठी आहे याची जाणीव मला आहे. या दिशेकडे चालतांना धर्मवाद, वर्चस्वतावाद, अर्थवाद हे सर्वात मोठे अडसर आहेत. नव्या जगाची अर्थव्यवस्था कोणत्या अर्थविचाराच्या पायावर असावी यावर जसे रणकंदन होईल तसेच धर्मवादाच्या आहारी गेलेल्या इस्लामी राष्ट्रांचा आत्मघातकीवाद व अन्यधर्मीय वर्चस्वतावाद यातही संघर्ष होईल. आताच्या महासत्तांना जग आपल्याच अंकित असले पाहिजे असे वाटेल तर अनेकांना आपण जणू काही आपल्या अस्मितेला तिलांजली देत आहोत असे वाटून शोक-संतापाचे भरते येईल. अतिरेकी राष्ट्रवादाचे भक्त असे काही न होण्यासाठी अपरंपार प्रयत्न करतील

यादी बरीच वाढेल हे खरे आहे. ही कमी कशी करता येईल, हेही आपल्याला पहावे लागेल. पण ही क्रांती झालीच तर सर्व जागतिक सामान्य पण विचारी मानवी समुदायांकडुनच होईल. राजकीय व्यवस्थेत फायदे लाटणारे जागतिक राजकारणी व धर्माचे टुक्कार स्तोम माजवणारे याला विरोध करतील हे गृहित धरून विचारी जागतिक मानवी समुदायाला या दिशेने ठामपणे पावले उचलावी लागतील. किंबहुना असे घडून येण्यात भारतीय मोठ्या प्रमाणात नेतृत्व करू शकतील कारण वैश्विक दृष्टीकोण हा भारतीय तत्वज्ञानाचा एक गाभा आहे. 

वेळ लागेल...पण एके दिवशी आपल्या संपुर्ण जगाचे एकच एक राष्ट्र बनेल याचा मला विश्वास आहे. 

(Published in Dainik Sanchar, Indradhanu supplement)

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...