Thursday, June 15, 2017

भटके स्थिर होऊ लागतात तेंव्हा...!


Inline image 1


एके काळी माणूस भटका होता. तो टोळ्या करून रहायचा. त्याचे जगण्या-मरणाचे प्रश्न जास्त टोकदार होते. त्याच्या भावनांना नैसर्गिक तीव्र धारही होती. टोळ्या-टोळ्यांत त्याच्या अस्मिता, स्त्रीया आणि सुपीक भागांवरील मालकीवरून सतत युद्धे होत. तात्पुरते तह व मैत्र्याही होत. पुन्हा संघर्ष डोके वर काढत असे. पुढे शेतीच्या शोधामुळे काही भागांत नागर संस्कृती विकसीत झाली. मनुष्य स्थिरावला. त्याने काही शतके हे स्थित्यंतर पचवण्यात घालवले तर काही भुप्रदेशांतील टोळ्या मात्र भटक्याच राहिल्या. मध्य आशियातील अशीच एका युएची जमातीतील कुशाण ही एक टोळी. नागर समाजाच्याच आसपास वावरणारी पण नागरी जीवनाचा तिरस्कार करणारी. शक, तार्तार आणि सर्वात महत्वाचे हाडवैरी म्हणजे खुद्द युएचीच! पिढ्यानुपिढ्या रक्ताने आपला इतिहास लिहित राहिलेल्या या टोळ्या आपल्याच जगण्याच्या आणि मरण्याच्या मस्तीत राहिलेल्या. शेवटी कुशाण टोळीला भारतात आश्रयाला यावे लागते, पण येथली राजकीय सत्ताच एवढ्या दुबळ्या होत्या की कुशाणांना सत्तेचे दावे आपल्या हाती घ्यावे लागले.

ही झाली माझ्या "कुशाण" (इंग्रजी- लास्ट ऑफ वाँडरर्स) या कादंबरीची पार्श्वभुमी. भटक्या जीवनातील माणसे नागरी जीवनात स्थिर होवू पाहतात तेंव्हा जे मनोवैज्ञानिक संक्रमण होत असते ते विलक्षण असते. स्थिर जीवन सुखद असते. आकर्षक असते. ही एक वेगळी अशी व्यवस्था असते जेथे श्रमविभाजनीमुळे इतकी सुखे अचानक येतात की जगण्याच्या अनेक प्रेरणा आणि संघर्षांना तिलांजली द्यावीच लागते. युद्धे असतात पण त्यात तो जोम नसतो. जगणे उरते पण त्यात जगण्याचा जल्लोष नसतो. एका अर्थाने जगणे बेचव वाटू लागते. जुने...खुल्या माळरानांवरील मृत्युच्या छायेखालील संघर्षरत साधे जगणे साद देवू लागते. पण मागे जाता येत नाही. अनेकदा मनुष्यच मनुष्याच्या विनाशाची वाट निवडतो आणि नेमके खरे काय हे समजेनासे होते. आदिम धर्म येथे नागरी जीवनात गुंतागुंतीचा बनलेला असतो. एवढेच नव्हे तर तत्वज्ञान नांवाचा माणसाला कोठेच न नेणारा राक्षस बोकांडी बसलेला असतो. आणि तरीही हेही जीवन हवेहवेसे वाटत असते. नेमके काय हवे हा संघर्ष उडतो आणि तो टिपणे, सांगणे हाच काय या कादंबरीलेखनामागील हेतू. या कादंबरीत ग्रीक सेनानी वेंटिलियस हा युएची वीर हविष्काला मरणासन्न असतांना वरुन विलोभनीय वाटणा-या नागरी संस्कृतीच्या सडक्या अंगाचे जे दर्शन घडवतो, ते मलाही आवडणारे!

मला ही कादंबरी सुचायला कारण झाले ते मीच आणि माझ्यासारखेच खेड्यांतून शहरात शिकायला आलेले बांधव. शहर हे मला वेगळेच जग होते. येथील रितीभाती वेगळ्या, भाषा वेगळी, मानवी संबंध वेगळे...एवढेच नव्हे तर येथल्या मैत्र्याही वेगळ्या. खेड्यातून आलेल्या मला भांबावून सोडणा-या, न्युनगंडाने पछाडणा-या तरीही या शहरी लोकांप्रमानेच वागायचे-बोलण्याचे-कपडे घालण्याचे आकर्षण असणारा. हे संक्रमण मानसिकदृष्ट्या पचवणे सोपे नसते. याच संक्रमणाचा आदिम बंध मला सम्राट कनिष्काच्या इतिहासाचा शोध घेतांना सापडला. त्यांचे टोळीजीवन, पुरुषांची संख्या कमी झाल्यावर विवाह-नातेसंबंधांनाही तिलांजली देत लोकसंख्या वाढवणारी रूढ नीति, त्यांची धमासान युद्धे, विश्वासघात आणि सूड, अनवरत भटकंती आणि भारतात आल्यानंतर सन्माननीय सत्ताधारी म्हणून स्थिर होत असतांनाचे मानसिक द्वंद्व मी आजच्या वर्तमानातील ग्रामीण भागातून शहरांत स्थलांतरित होणा-यांच्यातही पाहिले. अर्थात कुशाणांच्या संघर्षाची धार आदिम होती, जास्त टोकदार होती, म्हणून मी त्याच पार्श्वभुमीवर (इतिहासात काही बदलही करून) ही कादंबरी लिहिली. आजवर तीन आवृत्त्याही झाल्या. अर्थात या कादंबरीवर मराठीत एक अवाक्षरही लिहिले गेले नाही. इंग्रजी आवृत्तीबाबत मात्र असे झाले नाही. प्रसिद्ध अमेरिकन लेखिका व समीक्षक सांड्रा सांचेझ यांनी या कादंबरीला महाकाव्य म्हणत आदिम भटक्या जमाती आणि स्थिर संस्कृत्या यातील दिर्घ तुलना करणारा प्रबंधवजा लेख कादंबरीला आधार घेत लिहिला. अमेरिकन कवी रॅण्डल रॉस यांनी मला "साध्या इतिहासात मानवी स्वभावाच्या गुंतागुंती शोधत त्यावर महानाट्य लिहिणारा आधुनिक शेक्सपियर" म्हटले. इतरही अनेकांनी लिहिले. इंग्रजीत चक्क दोन आवृत्त्या झाल्या. असो. 

आपल्याकडे मुळात ऐतिहासिक कादंबरीबद्दल बालिश व्याख्या असल्याने येथे समीक्षकीय प्रतिसाद न मिळाल्याचे नवल वाटत नाही. पण ही कादंबरी लिहिणे, नंतर ती इंग्रजीतही अनुवादित करत जागतिक वचकांसमोर नेणे हे एक आव्हानच होते. आजही या कादंबरीतील प्रश्न तेच आहेत. संघर्ष तोच आहे. त्या वेदनेतून मनुष्य आजही मूक्त नाही. कोणते जगणे श्रेय:स्कर हा प्रश्न अजुनही सुटलेला नाही. पण कधीतरी माणसाला त्याच पुरातन मुक्ततेचा मार्ग सापडेल ही आशा आहे.

2 comments:

  1. माणूस अन्न गोळा करणारा प्राणी असल्याने तो भटक्या असणे साहजिक होते. पण जेव्हा टोळ्या मोठ्या असण्याची गरज निर्माण झाली त्यावेळी तो स्थिरावला असे मला वाटते.

    ReplyDelete
  2. सर , पालख्या आल्या ,
    संजय सरांना शुभेच्छा !
    अभ्यास करायला ही सुवर्णसंधी आहे !
    खरेतर असा अभ्यास करायला पाहिजे की यातील शेतकरी किती आहेत ,त्यापैकी जिरायती किती आहेत आणि बागायती किती आहेत , तसेच त्यापैकी किती जणांच्या घरात आत्महत्या झाल्या आहेत .समस्यांग्रस्त वारकरी असतील तर वारी हाच त्यांना त्यांच्या समस्येवर तोडगा वाटतो का ? त्यांच्यापैकी किती जणांनी शेतकरी संपात भाग घेतला होता ?
    मागे एका वर्षी याच वारकरी लोकांनी दिंडीचे राजकारण केले होते आणि त्यात संत तुकाराम महाराजांच्या वंशजानी पुढाकार घेतला होता .
    सर , तुम्ही असे संशोधन करायला पाहिजे .

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...