Thursday, June 8, 2017

अशीच येईल तुझी बातमी...


Image result for non existent lonely


अशीच येईल तुझी बातमी
तू मेल्यावर
पहिल्या पानावर हेडलाईन
किंवा खाली
नाहीतर आतल्या पानात सहा-आठ स्तंभांची
किंवा चार ओळींची
चुकून उरलेल्या कोणत्यातरी
कोप-यात
किंवा नाहीच येणार
कदाचित
जर तुझे जगणे माध्यमांसाठी
दखलपात्रच नसेल तर!

पण बरे होईल
तुला ते पाहताच येणार नाही
ते खरेही असतील
किंवा
तद्दन खोटेपणाने काढले गेलेले
तू जे नव्हतासच ते भरभरून सांगणारे
आणि तुझे असतेपण
कालांधारात गडप करणारे
कोरडे उमाळे भरलेले मृत्यूलेख
तुला
वाचताच येणार नाही
तर न आलेल्या
तुझ्या मृत्युच्या बातम्या
कशा दिसतील?
जाऊ दे ना मरुदे
कशाला चिंता करतोस आताच
तू मेल्यानंतर काय छापून येइल याची?

बघ वसंत बहरला आहे
कोणी घन अंधारात व्याकुळून बसला आहे
कोणासाठी काही करता येते का ते बघ
स्वत:ला फुलारता येते का ते बघ
मग खुशाल मोज आपली फळे
क्षणा क्षणांनी
थकता थकता
हलके हलके
ती अस्तित्वच विरवणारी
गाढ नीज येत असता...

हे विश्वच एक विशाल वृत्तपत्र आहे
कोणाच्याच बातम्या न छापणारे
मग मृत माध्यमांचीच पर्वा कशाला?



No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...