Sunday, June 25, 2017

अपूर्व मेघदूत



आषाढाच्या पहिल्याच दिवशी कवीकुलगुरू कालिदासांचे मेघदूत रंगमंचावर जिवंत अवतरलेले पहायला मिळणे हे भाग्यच आहे. मेघदूत हा निवांत वाचत अनुभवण्याचा विषय अशी सर्वसाधारण समजूत असल्यास नवल नाही. कालिदासाची प्रतिभाच एवढी की काव्याविष्कारात जेव्हा तो बोलतो तेव्हा तो हृद्य प्रतिमांच्या विलक्षण जगात घेऊन जात असतो. मेघदूतात त्याने विरही यक्षाचा पत्नीला संदेश देण्यासाठी निवड केलीय तीही एका मेघाची. कालिदासाशिवाय मेघ-दूताची निवड तरी कोण करणार? हे अजरामर काव्य मंचित करण्याचा विचार करणे हाच एक वेडाचार असे कोणीही म्हणेल. ज्यांना मेघदूत माहीत आहे ते तर नक्कीच. पण तसे झाले आहे. पण हे येथेच संपत नाही. मेघदूताचे नाट्यरुपांतर करणे, त्याच्या काव्याचा अनुवाद तितक्याच समर्थपणे करत रुढ नाट्यसंकेतांना फाट्यावर मारत काव्याने ओथंबलेले, कसलेही नाट्य नसलेले, विशेष घटनाही नसलेले आणि तरीही नृत्य व कालिदासाच्या प्रतिभेला कोठेही न उणावता येणारी गीते हे घेत रंगावृत्ती बनवणे आणि नाट्याचा परमोत्कर्ष त्यात साधता येणे हाही तसा सामान्यपणे अशक्यप्राय प्रकार!
आणि सर्वाहून अशक्यप्राय बाब म्हणजे सर्व अंध कलाकार घेऊन कालिदासाच्या प्रतिभेला जिवंत करत अक्षरश: डोळ्यांचे पारणे फेडायचा विचार करणे तर या मर्त्य भूतलावर तर अशक्यच! पण हे झाले आहे. अशक्यप्राय आव्हाने पेलायला घ्यायची सवय असलेल्या स्वागत थोरात या माझ्या मित्राने हे कालिदासाचे मेघभरले आभाळ पेलले आहे. रंगावृत्ती करणारे प्रतिभाशाली लेखक गणेश दिघे यांनी मेघदूताचे शाश्‍वत सौंदर्य त्यांच्या रंगावृत्तीत उतरवलेले आहे आणि अद्वैत मराठे, गौरव घावले, प्रविण पाखरे ते रुपाली यादव, तेजस्विनी भालेकर इत्यादी 19 त्याच ताकदीच्या खर्‍याखुर्‍या भूमिका जगणार्‍या कलावंतांनी या खरेच अपूर्व असलेल्या मेघदूतात कालजेयी रंग भरले आहेत. ज्यांनी पाहिले नाही त्यांनी काहीच पाहिले नाही. ज्यांनी ऐकले नाही त्यांनी काहीच ऐकले नाही.
अपूर्व मेघदूत या नाटकाच्या सुरुवातीसच परागंदा झालेला वयोवृद्ध, जर्जर असा कालिदास येतो आणि आपल्याला मेघदुताच्या कथागाभ्यात घेऊन जातो. यक्ष म्हणजेच कालिदास याची खात्री सुरुवातीलाच पटते. कालिदास आपल्यास्थानी यक्षाला कल्पितो हीच त्याच्या प्रतिभेची दिव्य खूण. यक्ष म्हणजे तसे सुखासीन, दैवी सामर्थ्य असलेले, कुबेराचा अलकापुरीत सुखनैव राहणारे लोक. या यक्षाला विरहाचा शाप मिळतो आणि प्रियेच्या, आपल्या यक्षिणीच्या विरहात त्याला एका पर्वतावर झुरावे लागते. हा विरही यक्ष आषाढाच्या पहिल्या दिवशी दिसणार्‍या मेघालाच आपला दूत बनवतो आणि आपला निरोप तिला द्यायला सांगतो. या काव्यात कालिदास वाटेत येणारी नगरे, अरण्ये, पर्वत यांचे हृदयंगम वर्णन करत आपल्या प्रियेला ओळखायचे कसे याचे परमोत्कर्षकारी काव्यमय वर्णनही करतो. नाटकात नद्या-नगरे, पशू-पक्षी यांची वर्णने नृत्य-संगीतातून जिवंत केली जातातच पण छाया-प्रकाशाचा अद्भुत खेळ त्यात आगळे-वेगळे रंग भरतात.
 हे नाटक अंध कलाकारांनी सादर केलेय हे खरेच वाटत नाही इतक्या त्यांच्या हालचाली सराईत आहेत. यामागे अर्थात दिग्दर्शक स्वागत थोरातांचे अविरत कष्ट आहेत. जवळपास 80 दिवस आणि रोज 6-7 तास तालीम त्यांनी घेतलीय. न कंटाळता कलाकारांनी त्यांना साथ दिली. रंगमंचावरील त्यांचा वावर, त्यांची कसलेल्या नर्तक-नर्तिकांची वाटावीत अशी नृत्ये या कष्टातूनच साकार झालीत. त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. या नाटकाची निर्मिती करण्याचे अलौकिक धाडस रश्मी पांढरे आणि वीणा ढोले यांनी करून मराठी रंगभूमीला एक मोठी देणगी दिली आहे. नाट्यरसिक त्यांच्या नेहमीच ऋणात राहतील. हे नाटक पाहिलेच पाहिजे, पण ते अंध कलाकारांनी सादर केलेय या सहानुभूतीच्या भावनेतून नाही. कालिदासाचे काव्य नाट्यरुप कसे घेते, कसे जिवंत केले जाऊ शकते या अद्भुत आणि यच्चयावत विश्‍वातील एकमात्र आविष्कारासाठी हे नाट्य पाहिलेच पाहिजे.
 संजय सोनवणी
Published in Weekly Chaprak, 

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...