Saturday, June 3, 2017

अद्भुताच्या जगातील हिरण्यदुर्ग!


Inline image 1


मला गुढाचे, अद्भुताचे अनिवार आकर्षण राहिले आहे. लहानपणी गो. ना. दतारांच्या कादंब-यांची मी पारायणे केली. नंतर समजले की या कादंब-या दातारांनी परकीय कथानकांवर बेमालुमपणे देशी साज चढवलेल्या आहेत. दातारांनी ते मान्यच केले असल्याने त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला होता. नंतर या प्रकारचे फारसे लेखन मराठीत आले नाही. मर्मभेद नांवाची एक कादंबरी आली होती. तिचेही मूळ कथानक विदेशी आहे हे सहज लक्षात येण्यासारखे असले तरी लेखकाने ते मात्र कबूल केलेले नव्हते. असो.

माझ्या मनोविश्वात गुढरम्यता नेहमी घुमत असते. जीवनातील रहस्ये उलगडायची तर साहित्यातील सर्व प्रकार हाताळले पाहिजेत. सामाजिक कादंबरीही एका अर्थाने रहस्यकादंबरीच असते. किंबहुना जीवनात विलक्षण रहस्य भरलेले आहे आणि त्या रहस्याच्या शोधात अखिल मानवजात गुप्तहेराप्रमाणे निरंतर गढलेली आहे. अज्ञातात विलक्षण गुढे लपलेली आहेत यावर प्रत्येकाची श्रद्धा आहे. आदिम काळच्या मानवाच्या मनात विलक्षण मिथके जन्मली ती यामुळेच. तशी विराट मिथके आज जन्मावीत एवढी प्रतिभा माणसाकडे बहुदा उरलेली नसावी. तरीही काही तुरळक प्रतिभावंत आपल्या लेखणीच्या सहाय्याने एक विलक्षण, काल्पनिक असले तरी सत्याभास देणारे जग निर्माण करण्याचा प्रयत्न करतच असतात.

हिरण्यदूर्ग कादंबरी ही अशीच अद्भुतरम्य पण या मातीची. हे मला सुचली ती १९९३-९४ च्या आसपास. सुचायला खास असे काही कारण घडले नाही. तुरळक व तुटक अशी जी कथेची स्वप्नदृष्ये होती तीच काय ती मोहिनी घालत होती. ती मोहिनी अनावर झाली आणि मी लेखनही सुरू केले. जवळपास छापील ९६ पाने लिहुन आणि छापुनही झाले. मुखपृष्ठही छापले गेले. दुर्दैव असे की ज्या मुद्रणालयात ही कादंबरी छापली जात होती त्यावर आली सहकारी बँकेची जप्ती. मुद्रणालय सीलबंद केले गेले. सगळे छापील फॉर्म गायब झाले आणि मी आधी लिहिलेले हस्तलिखितही. पुन्हा लिहिणे शक्य नाही म्हणून लेखन थांबले ते थांबलेच. (मुड न लागल्याने वा मला कंटाळा आला म्हणून अर्धवट सोडून दिलेल्या जवळपास ४८ कादंब-या आहेत.)

त्यानंतर तब्बल २० वर्ष गेली. मनाच्या कोप-यात सिंहभद्र, केतुमाल आणि रहस्यांचे केंद्रबिंदू असलेला हिरण्यदूर्ग पुन्हा डोके वर काढू लागला. न राहवून मी परत लेखनाला सुरुवात केली. अर्थात मुळ कथेत पुर्ण बदल झाला होता. मुळ कथा नेमकी काय होती हे मलाही आता आठवत नाही. ते वेगळेच कथानक होते एवढे मात्र नक्की. मुख्य पात्रांचे नांवे मात्र सिंहभद्र आणि केतुमाल हीच होती. त्यातील अद्भुतही वेगळेच होते. आता प्रकाशित झालेल्या कादंबरीत एवढी सोडली तर कोणतीही साम्ये नाहीत. आजही जर यदाकदाचित मुळ हिरण्यदुर्ग सापडली तर ती पुर्ण करुन एक नवीच कादंबरी तयार होईल. ही कादंबरी लवकर पुर्ण होऊ शकली ती सागर भंडारे या माझ्या मित्राने खुपच पाठलाग केला म्हणून. प्राजक्त प्रकाशनाच्या बंधुवत जालिंदर चांदगुडे यांनी ती देखण्या स्वरुपात प्रकाशितही केली. अनेक आघाडीच्या वृत्तपत्रांत तिची परिक्षणेही प्रसिद्ध झाली. वाचकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. 

मी गरुड व नागवंशातील अथक संघर्षाच्या पुराकथेला या कादंबरीत खुबीने वापरत एक वेगळे जग निर्माण केले. इतिहास प्रसिद्ध सातवाहन घराण्यातील शक्तीश्री आणि त्याचा कवी राजपुत्र हाल सातवाहनांना कादंबरीतील महत्वाचे पात्र बनवले. सातपुड्याची धिरोदात्त पण गुढगहन पर्वतराजी पार्श्वभुमीला घेत सिंहभद्र आणि केतुमालातील युगानुयुगे सुरु असलेला अद्भूत पण रक्तरंजित संघर्ष चितारला. या निमित्ताने मला निखळ भारतीय म्हणता येईल अशी अद्भुतरम्य कादंबरी लिहिता आली याचे समाधान आहेच! वाचकही समाधान पावतो आहे हा आनंद वेगळाच!

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...