Saturday, June 3, 2017

राष्ट्र उभारणी करणारी राष्ट्रमाता अहिल्या!


Inline image 2


अहिल्यादेवी होळकर यांची २९२ वी जयंती नुकतीच ३१ मे रोजी देशभर उत्साहाने साजरी केली गेली. अहिल्यादेवींनी देशभर केलेली निर्माण कार्ये आजही प्रेरक आहेत. खरे तर शेकडो राज्यकर्त्यांत वाटल्या गेलेल्या भारत देशाला त्यांनी मंदिरे, घाट, रस्ते, धर्मशाळा आणि बारवांच्या माध्यमातून जोडण्याचे अचाट कार्य केले. आपल्या संस्थानाच्या बाहेर पाहण्याची तत्कालीन राज्यकर्त्यांची प्रवृत्ती नसतांनाही त्यांनी फक्त आपल्या होळकर संस्थानाचा विचार न करता सोमनाथ ते केदारनाथ आणि दक्षीणेत पार रामेश्वरमपर्यंतच्या भुभागांत आपली निर्माण कार्ये केली. त्याबद्दल त्यांचा आजही सन्मान केला जातो व त्यांना त्यासाठी "राष्ट्रमाता" असेही म्हटले जाते. परंतू इतिहासकारांच्या नजरेतून सुटलेला भाग म्हणजे बहुसंख्य प्रदेशांतील राज्यकर्ते मुस्लिम असतांनाही अहिल्याबाईंनी त्यांच्या राज्यात हिंदू मंदिरे उभारायच्या परवानग्या कशा मिळवल्या हा. यातील काही मंदिरे इस्लामी आक्रमकांनी उध्वस्त केलेली होती. त्यानिकटच अहिल्यादेवींनी काही मंदिरे उभारली आहेत. त्यावेळीसही राज्यकर्ते मुस्लिमच होते. केवळ धनाच्या जोरावर व दानशुरता व धार्मिकता आहे या बळावर ही मंदिरे उभारणे अत्यंत अशक्य असेच कार्य होते हे उघड आहे.

सोमनाथ हे जुनागढ राज्याच्या सीमांतर्गत होते. तेथे बाबी (अथवा बाबई) हे पठाण घराणे राज्य करत होते. जेंव्हा मंदिर बांधले तेंव्हा मोहंमद महाबत खांजी (पहिला) राज्य करीत होता. या घराण्याने मोगल दरबाराशी नेहमीच सख्य ठेवलेले होते. पेशवा दरबारशी त्याचे संबंध चांगले नव्हते. पण सोमनाथ हे भारताचा मानबिंदू मानले गेलेले धर्मस्थान. इतिहासात ते अनेकवेळा उध्वस्त केले गेलेले आहे. औरंगजेबानेही तर ते पुरते नष्ट करण्याचा आदेश दिला होता. अशा स्थितीत तेथेच नसले तर त्याच्याच निकट त्या मानबिंदुची पुनर्स्थापना करणे व तेही मुस्लिम शासक असतांना तसे अशक्यच होते.

तीच बाब अयोध्येची. अहिल्याबाईंनी अयोध्येला राममंदिर बांधले तेंव्हा आसफौद्दुअला अमानी हा तेथला सुभेदार होता. काशी विश्वनाथ त्याच्याच अंकित होते. मल्हारराव होळकर यांनी काशी विश्वनाथाच्या मंदिराला उध्वस्त करून तेथे बांधल्या गेलेल्या मशिदीला पाडायचा विचारही केला होता. पण काशीतील तेलंगी ब्राह्मणांनी "तुम्ही निघून जाल आणि पातशहा आमची कत्तल करेन" अशी भिती व्यक्त करून सर्व मराठा सरदारांकडे गा-हाणे घातले म्हणून ती मशिद मल्हाररावांनी पाडली नव्हती. अर्थात त्यावेळीस मल्हाररावांकडे प्रचंड सैन्याचे बळ होते आणि त्यांचा लष्करी दबदबा मोठा होता. कालकादेवी यात्रा प्रकरणात आपण किती टोकाला जावू शकतो हे त्यांनी दाखवून दिले होते. पण अहिल्याबाई सत्तेवर आल्यानंतरची देशातील राजकारणाची दिशा बदलली होती. अंदाधुंदी जास्त वाढलेली होती. अहिल्याबाईंनी या मशिदीला लागुनच जागा मिळवून तेथे काशी विश्वेश्वराची पुनर्स्थापना केली. अयोध्येचे राममंदिर काय किंवा काशी विश्वनाथ काय, ही बांधकामे करणे अहिल्याबाईंनी कसे शक्य केले हा इतिहास थक्क करणारा आहे.

अहिल्यादेवींनी देशभरातील सर्व शासकांच्या दरबारांत आपले वकील नियुक्त केलेले होते. प्रत्येक शासकाशी चांगले राजकीय संबंध तयार करण्यासाठी त्यांनी आधी आपल्या शासनकाळातील आरंभीची पाच-सहा वर्ष खर्च केली. मल्हाररावांनीच त्यांना राजकारणाचे धडे दिले असल्याने त्या जवळजवळ प्रत्येक शासक व मुत्सद्दी यांना चांगल्याच ओळखत होत्या. त्यांचा या शासकांशी दांडगा पत्रव्यवहार जसा होता तसाच आपल्या वकीलांमार्फत होणा-या पत्रव्यवहारातून त्या सगळीकदच्या वित्तंबातम्याही मिळवत असत. पेशव्यांनाही त्यांनी इंग्रजांबद्दलही प्रथम सावधान केले ते या त्यांच्याजवळील माहितीमुळेच!

सोमनाथच्या बाबतीत त्यांनी मुत्सद्दीपणा, आपली प्रतिमा आणि पैशाचा सढळ हस्ते उपयोग केला. तुकोजी होळकर व महादजी शिंदेंच्या प्रबळ सेनेच्या दबावाचा वापर करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे मोहंमद खांजीने अहिल्याबाईंना सोमनाथ मंदिर उभारायला परवानगी दिली. आसफौद्दूलाच्या बाबतीत त्यांनी मल्हाररावांच्या नांवाच्या दबदब्याचा व दिल्ली दरबारातील वजनाचा उपयोग करून घेतला. अयोध्येत त्यांनी भैरव मंदिरासारखी अजुन तीन मंदिरे तर बांधलीच पण शरयु घाटाचीही बांधणी केली. राम जन्मभुमी अमुकच ठिकाण आहे अशी काही समजूत त्याकाळी अस्तित्वात नसल्याने बाबरी मशिदीशेजारीच नवे राम मंदिर बांधण्याची त्यांना आवश्यकता पडली नाही. तसे असते तर्व त्यांनी तेही केले असते हे सोमनाथ व काशी विश्वेश्वरावरुनच सिद्ध होते. मराठ्यांशी सतत युद्धरत राहणा-या आणि हिंदुद्वेष्टा म्हणून प्रतिमा बनवण्यात आलेल्या टिपू सुलतानानेही अहिल्यादेवींना त्याच्याही राज्यात धर्मकार्ये करू दिली. एवढेच नव्हे तर त्यांना "तत्वज्ञ महाराणी" असेही संबोधले.

त्या काळात मंदिरे, रस्ते, घाट, धर्मशाळा याच देशभरातील लोकांना आत्मियतेने जोडण्याचे साधन होत्या. कोठेही इस्लामचा उपमर्द होणार नाही हे पहात त्यांनी राष्ट्रीय मानबिंदुही उभारले. अहिल्यादेवींचा व्यक्तीगत अंगरक्षक दलाचा प्रमुख शरीफभाई होता. त्यांचे वकीलही दुरदृष्टीचे व अहिल्याबाइंशी इमानाने वागत हे पत्रव्यवहारावरुनच स्पष्ट होते. राजा-रजवाड्यांशी, मग ते हिंदू असोत की मुस्लिम, अहिल्यादेवी राजकीय संबंध महेश्वरावरून न हलताही आत्मियतेचे ठेवू शकल्या त्या यामुळेच. यात त्यांचा रत्नपारखीपणाही दिसतो. त्या सामान्य धार्मिक महिला नव्हत्या तर उच्च कोटीचे नैतिक सामर्थ्य असणा-या महाराणी होत्या.

अहिल्यादेवींच्या प्रत्येक निर्माणकार्यामागे एक कथा आहे. मुत्सद्दीपणा, नैतिक सामर्थ्य आणि गरज पडली तर दबावही ही सारी अस्त्रे त्यांनी वापरली ती देशाच्या कानाकोप-यात एक राष्ट्रीयत्वाची भावना जोपासण्यासाठी. त्यासाठी प्रसंगी पेशव्यांशीही मतभेद करून घेतले. त्यांचे दृष्टी नुसती विशाल नव्हती तर प्रत्यक्ष कृती करण्याची त्यांची उमेद होती. त्यासाठी त्यांनी आपल्या व्यक्तीगत संपत्तीवर सत्तेत येताच तुळशीपत्र ठेवले होते. तरीही त्या संपत्तीचा मोह, मग तो अगदी त्यांच्या तत्कालिक युद्ध गरजांसाठी का असेना, अगदी राघोबादादांपासून महादजी शिंदेंनाही अधून मधून पडेच. पण अहिल्यादेवी त्यांनाही तोंड देत आपले कौशल्य पुरेपूर निर्मितीत लावत राहिल्या. त्यामुळे त्यांना ख-या अर्थाने राष्ट्रमाता म्हणने उचितच होईल.

(Published in daily Pudhari, 4/5/2017)

1 comment:

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...